चालू घडामोडी आणि दिनविशेष - 29 जानेवारी 2024

Date : 29 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: यानिक सिन्नेर नवविजेता
 • दोन सेटच्या पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना इटलीच्या २२ वर्षीय यानिक सिन्नेरने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. पाच सेट आणि जवळपास चार तास चाललेल्या अंतिम लढतीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करताना सिन्नेरने कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. चौथ्या मानांकित सिन्नेरने अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित मेदवेदेववर ३-६, ३-६, ६-४,
 • ६-४, ६-३ अशी सरशी साधली. सिन्नेरने उपांत्य फेरीत अग्रमानांकित आणि २४ ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचला पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला होता. मात्र, अंतिम फेरीत त्याला पहिल्या दोन सेटमध्ये चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तो पराभवाच्या छायेत होता. परंतु त्याने लढवय्या वृत्ती दाखवली आणि सलग तीन सेट जिंकले. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा सिन्नेर हा इटलीचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
 • मेदवेदेवची मात्र पुन्हा निराशा झाली. २०२१च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या विजेत्या मेदवेदेवला ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये सहापैकी पाच अंतिम सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.यंदाच्या स्पर्धेत मेदवेदेवने तीन लढती पाच सेटमध्ये जिंकल्या. अंतिम लढतही पाचव्या सेटमध्ये गेल्यानंतर त्याचेच पारडे जड मानले जात होते. परंतु सिन्नेरने अचूक खेळ करताना मेदवेदेववर वर्चस्व गाजवले. निर्णायक पाचव्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असताना सिन्नेरने प्रथम आपली सव्‍‌र्हिस राखली, मग मेदवेदेवची सव्‍‌र्हिस तोडत ४-२ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सिन्नेरने पुन्हा दमदार सव्‍‌र्हिस करताना आपली आघाडी वाढवली. मेदवेदेवला आपली पुढील सव्‍‌र्हिस राखण्यात यश आले. मात्र, नवव्या गेममध्ये सिन्नेरने वेगवान सव्‍‌र्हिस केली आणि याचे मेदवेदेवकडे उत्तर नव्हते. त्यामुळे सिन्नेरने हा सेट ६-३ अशा फरकाने जिंकत कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
 • मेदवेदेव ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत दोन सेटची आघाडी असूनही दुसऱ्यांदा पराभूत झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियन स्पर्धेतच २०२२मध्ये त्याला राफेल नदालने दोन सेटची पिछाडी भरून काढताना नमवले होते.
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल रखडला; उमेदवार संभ्रमात, ‘एमपीएससी’कडे लक्ष
 • महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या (एमपीएससी) अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षेतील इतर सर्व पदांचा निकाल जाहीर झाला असून, चार महिन्यांपासून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुढील परीक्षेचा अभ्यास करावा की, शारीरिक चाचणीचा सराव करावा, अशा संभ्रमात उमेदवार सापडले आहेत.
 • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबर २०२२ रोजी झाली होती. त्यानंतर ‘एमपीएससी’कडून मुख्य परीक्षा २४ डिसेंबर २०२२ पासून नियोजित होती. परंतु, तृतीयपंथी उमेदवारासाठीचे निकष ठरवायचे असल्यामुळे मुख्य परीक्षा नऊ महिन्यानंतर म्हणजे १ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान झाली. अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासह दुय्यम निबंध, साहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक या पदांचाही समावेश आहे. असे असतानाही २९ ऑक्टोबपर्यंत झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षेचा निकाल २०२३ मध्ये जाहीर करण्यात आला. मात्र पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल परीक्षेला चार महिने उलटूनही जाहीर झालेला नाही. निकाल जाहीर न करण्याचे कुठलेही कारण किंवा स्पष्टीकरण आयोगाकडून मिळालेले नाही.
 • आगामी दिवसात लोकसभेची निवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल रखडून शारीरिक चाचणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडण्याचीही भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; कृष्णविवराजवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरण रहस्याचा केला उलगडा
 • जवळपास चार दशकांपूर्वी सापडलेल्या ‘सिग्नस एक्स १’ या कृष्णविवर प्रणालीच्या जवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांच्या (एक्सरे) रहस्याचा उलगडा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे. ‘ॲस्ट्रोसॅट’ या भारताची अवकाशातील वेधशाळेवरील उपकरणाच्या साह्याने भारतीय शास्त्रज्ञांनी ‘सिग्नस’कडून येणाऱ्या ‘हार्ड एक्स रे’चे ध्रुवीकरण मोजले असून, या अभ्यासातून उच्च ऊर्जेच्या क्ष किरणांची उत्पत्तीचा वेध घेण्यात आला आहे.
 • आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्राने (आयुका) याबाबतची माहिती दिली. कृष्णविवराच्या जवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांचे संशोधन ‘ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात तन्मॉय चटोपाध्याय, अभय कुमार, ए. आर. राव, यश भार्गव, संतोष वडावले, अजय रतीश, गुलाब देवगण, दीपांकर बॅनर्जी, एनपीएस मिथून, वरूण भालेराव यांचा सहभाग होता. क्ष किरणांच्या ध्रुवीकरणाचे मोजमाप अत्यंत कठीण असते. मात्र २०१५मध्ये प्रक्षेपित केलेल्या ‘ॲस्ट्रोसॅट’ या भारतीय वेधशाळेवर असलेल्या ‘कॅडमिअम झिंक टेल्युराइड इमेजर’ (सीझेडटीआय) या उपकरणाच्या सहाय्याने शास्त्रज्ञांनी कृष्णविवरांकडून येणाऱ्या क्ष किरणांच्या आठ वर्षे नोंदी घेतल्या. या नोंदींमधून सुमारे २४ टक्के ध्रुवीकरण झालेल्या हार्ड एक्सरेच्या नोंदींचा अभ्यास करताना हे एक्सरे आणि कृष्णविवराच्या जवळून प्रकाशाच्या वेगाने उत्सर्जित होणारे झोत (रिलेटिव्हिस्टीक जेट्स) यांचा परस्परसंबंध शास्त्रज्ञांच्या समोर आला.
 • ‘सीझेडटीआय’ या उपकरणामध्ये तब्बल १६००० पिक्सेल आहेत. प्रत्येक ‘पिक्सेल एक्स रे’ची स्वतंत्र नोंद घेतली जाते. अवकाशात पाठण्याआधी सर्व भागांचे अचूक कॅलिब्रेशन करण्यात आले असल्याने अत्यंत कठीण मानले जाणारे हार्ड एक्सरेचे ध्रुवीकरण या उपकरणाला मोजता आले. मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन केंद्रासह (टीआयएफआर) ‘यूआरएससी’, ‘आयुका’, ‘पीआरएल’, ‘सॅक’, ‘व्हीएसएससी’ अशा विविध संस्थांच्या सहभागातून या उपकरणाची निर्मिती करण्यात आली.
 • गेले दशकभर सुरू असलेल्या संशोधनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आल्याचे संशोधनाचे मुख्य शास्त्रज्ञ तन्मॉय चटोपाध्याय यांनी नमूद केले. क्ष किरण ध्रुवीकरणाच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ प्रगती करत आहेत. क्ष किरणांच्या ध्रुवीकरणाच्या मोजमापासाठी ‘सीझेडटीआय’ या उपकरणाचा वापर हे त्याचे उदाहरण आहे. आता एक्स्पोसॅटच्या नोंदी उपलब्ध होऊ लागल्यावर अधिक महत्त्वपूर्ण माहिती हाती येऊ शकेल, असे आयुकातील प्रा. गुलाब देवगण यांनी सांगितले. क्ष-किरण ध्रुवीकरणाचे मोजमाप खगोल भौतिकशास्त्रासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षाचा उपयोग जगभरातील सैद्धांतिक खगोलभौतिकशास्त्रज्ञांकडून केला जाईल, असे टीआयएफआरमधील प्रा. ए. आर. राव यांनी नमूद केले.
उत्तराखंडमधील ११७ मदरशांमध्ये शिकवलं जाणार प्रभू रामाचं चरीत्र
 • उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ११७ मदरशांमध्ये आता रामाचं चरित्र शिकवलं जाणार आहे. मदरशांच्या नव्या अभ्यासक्रमात हा समावेश करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापासून मदरशांच्या अभ्यासक्रमात बदल केला जाईल आणि रामाचं चरित्र अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल.

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स काय म्हणाले?

 • वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, “यावर्षी मार्चमध्ये प्रारंभ होणार्‍या सत्रात नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. श्रीराम हे प्रत्येकासाठी अनुकरणीय आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे अनुकरण केले पाहिजे. वडिलांना त्यांचे वचन पूर्ण करण्यास साहाय्य करण्यासाठी श्रीराम सिंहासन सोडून वनात गेले. श्रीरामसारखा मुलगा कुणाला नको असेल ? मदरशातील विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद यांच्यासह श्रीरामांचे जीवनही शिकवले जाईल.”
 • संपूर्ण देशात रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा जो पार पडला त्याचा उत्साह होता. त्यामुळे आम्हालाही ही वाटलं की रामाचा आदर्श हा मदरशांमध्येही शिकवला गेला पाहिजे. अल्लामा इक्बाल हे आमचे प्रख्यात कवी आहेत त्यांनी भगवान रामाला इमाम ए हिंद अर्थात भारताचे नेते, भारताचे राजे असं संबोधलं आहे. भारतीय मुस्लिम समाजानेही रामाच्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. आम्ही आमच्या पूर्वजांना बदलू शकत नाही पण आम्ही बदल घडवू शकतो असंही शादाब शम्स यांनी म्हटलं आहे.
उमेदवार नसल्यास शैक्षणिक आरक्षण हटवण्याची शिफारस; ‘यूजीसी’चा नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुदा प्रसिद्ध
 • अनुसूचित जाती किंवा जमाती अथवा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागेवर या श्रेणीतील पुरेसे उमेदवार उपलब्ध नसल्यास ही जागा अनारक्षित जाहीर करता येऊ शकते, असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात म्हटले आहे.‘उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारत सरकारच्या आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे’ संबंधितांचे अभिप्राय मागवण्यासाठी सार्वजनिक करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांवर अनेकांकडून टीका होते आहे.
 • आपण याविरुद्ध निदर्शने करून यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांची प्रतिमा जाळणार असल्याचे जेएनयू विद्यार्थी संघटनेने जाहीर केले आहे. मार्गदर्शक तत्त्वांवर होणाऱ्या टीकेबाबत कुमार यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
 • ‘अनुसूचित जाती किंवा जमाती अथवा ओबीसी उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागेवर या श्रेणींव्यतिरिक्त इतर उमेदवार भरले जाऊ शकत नाहीत. तथापि, आरक्षित जागा अनारक्षणाच्या प्रक्रियेने अनारक्षित जाहीर केली जाऊ शकते व नंतर ती अनारक्षित जागा म्हणून भरली जाऊ शकते’, असे या सूचनांमध्ये नमूद केले आहे. सध्याच्या नियमांनुसार, थेट भरतीच्या संदर्भात, आरक्षित रिक्त जागा अनारक्षित करण्यावर सर्वसामान्य बंदी आहे.
न्यायालयांनी आव्हाने ओळखणे आवश्यक! सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या वर्धानपनदिनी सरन्यायाधीशांचे प्रतिपादन
 • एक संस्था म्हणून उपयुक्तता कायम राखण्याची न्यायपालिकेने आव्हाने ओळखणे आणि ‘कठीण संभाषणे’ सुरू करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी केले. न्यायालयांची सुनावण्यांसाठी वारंवार ‘तारखा घेण्याची संस्कृती’ आणि दीर्घकालीन सुट्टय़ा अशा मुद्यांनाही त्यांनी स्पर्श केला.
 • उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या आणि पहिल्या पिढीतील वकिलांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या उद्घाटनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी प्रमुख पाहुणे होते. देशात होत असलेल्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांचाही न्या. चंद्रचूड यांनी उल्लेख केला.
 • न्याय व कायदा व्यवसायात पारंपरिकरित्या कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या महिलांचे प्रमाण आता जिल्हा न्यायाधीशांच्या क्षमतेच्या ३६.३ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वकील आणि न्यायाधीश या दोहोंमध्ये अनुसूचित जाती व जमातींचे प्रतिनिधित्व कमी असल्याचे ते म्हणाले. प्रलंबित खटल्यांची संख्या, पुरातन प्रक्रिया आणि तारीख घेण्याची संस्कृती यांसारख्या न्यायपालिकेच्या दृष्टीने संरचनात्मक मुद्यांवरही न्या. चंद्रचूड यांनी भाष्य केले आणि नजीकच्या भविष्यकाळात या मुद्दय़ांवर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘न्यायाधीश आणि प्रशासक म्हणून आमच्या कामातील प्रयत्न हे नागरिकांचा आधी संबंध येणाऱ्या जिल्हा न्यायालयांची प्रतिष्ठा सुनिश्चित करणे हा असायला हवा’, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
रेल्वेत हजारो लोको पायलट्सची भरती; जाहिरात शेअर करत राज ठाकरे म्हणाले, “मराठी तरुण-तरुणींना…”
 • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने मराठी अस्मिता आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चा करतात. तसंच, सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, असा त्यांचा आग्रह असतो. याकरता त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनाही सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आता भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयात सहाय्यक लोको पायलटपदी नोकर भरतीची जाहिरात निघाली आहे. ही जाहिरात येताच राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सतर्क केलं असून गरजू तरुणांना मदत करण्याचंही आवाहन केलं आहे.
 • राज ठाकरे यांनी भरतीची जाहिरात शेअर करत एक्सवर पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणाले, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.
 • ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे.

देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भाषेचा अभिमान असेल तर…

 • दरम्यान, काल २८ जानेवारी रोजी नवी मुंबईत दुसरे विश्व मराठी संमेलन पार पडले. या संमेलनात त्यांनी मराठी भाषा आणि शाळांचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भाषेचा व आपल्या राज्याचा अभिमान असेल तर आम्ही मराठीचा अभिमान का बाळगू नये. महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसाने मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा अभिमान बाळगला पाहिजे.
वेई-मेर्टेन्स जोडी महिला दुहेरीत विजेती
 • सेह सु वेई आणि एलिसे मेर्टेन्स या जोडीने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्यांनी जेलेना ओस्टापेन्को आणि ल्युडमिला किचेनॉक जोडीचा ६-१, ७-५ असा पराभव केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद मिळवणारी ३८ वर्षीय वेई ही दुसरी सर्वात वयस्क टेनिसपटू ठरली. मार्टिना नवरातिलोवाने २०११मध्ये वयाच्या ४९व्या वर्षी बॉब ब्रायनच्या साथीने अमेरिकन खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते.मेर्टेन्सचे या स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद ठरले.
 • यापूर्वी तिने अरिना सबालेन्काच्या साथीत २०२१ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे त्याच वर्षी मेर्टेन्सने सेहच्या साथीने विम्बल्डनचे विजेतेपदही मिळवले होते.मेर्टन्सने २०१९ मध्ये अमेरिकन स्पर्धेतही दुहेरीत विजेतेपद मिळवले आहे. नव्या जागतिक क्रमवारीतील दुहेरीत आता मेर्टेन्स महिलांमध्ये अव्वल स्थानावर येईल. यापूर्वी २०२१ मध्ये मेर्टेन्स २८ आठवडे अव्वल स्थानावर होती.

 

आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिलांना कांस्यपदक :
 • गतविजेत्या भारताने शुक्रवारी चीनवर २-० असा विजय मिळवून महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक पटकावले.

 • उपांत्य फेरीत कोरियाकडून पत्करलेल्या पराभवातून सावरत भारतीय संघाने नियंत्रित खेळ केला. पहिल्या दोन सत्रांत एकेक गोल करीत भारताने मध्यंतरालाच २-० अशी आघाडी मिळवली. उर्वरित दोन सत्रांत भारतीय संघ गोल नोंदवण्यात अपयशी ठरला.

 • भारताने सुरुवातीपासून सामन्यावर पकड मिळवत पहिल्या सत्रात दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. १३व्या मिनिटाला गुर्जित कौरने मारलेला फटका चिनी बचावाने अडवल्यानंतर शर्मिला देवीने पुनप्र्रयत्नात गोल साकारला. दुसऱ्या सत्रातही भारताने चीनच्या बचावावर दडपण आणत १९व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. गुर्जितने अप्रतिम ड्रॅग-फ्लिक करीत आघाडी २-० अशी वाढवली. चीनचा एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न भारताची कर्णधार आणि गोलरक्षक सविता पुनियाने हाणून पाडला.

 • उपांत्य फेरीत कोरियाकडून २-३ असा पराभव पत्करल्याने भारत जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला.

राज्यात ७२०० पोलिसांची भरती-गृहमंत्री :
 • राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली आलेली ५७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ७२०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

 • गृहमंत्री वळसे यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी यांच्या हस्ते ‘ई-टपाल’ सेवासुविधेचे तसेच स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलीस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीनंतर गृहमंत्री वळसे यांनी पत्रकारांवरील माहिती दिली.

 • राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण आशियाई शिक्षण परिषदेचा पारनेर महाविद्यालयास पुरस्कार :
 • जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पारनेर महाविद्यालयास दक्षिण आशियाई शिक्षण परिषदेचा ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनाही शिक्षण परिषदेकडून ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

 • या पुरस्कारासाठी दक्षिण आशियातून एकूण २५९ नामांकने प्राप्त झाली होती. त्यातून उत्कृष्ट महाविद्यालय व आदर्श प्राचार्य असे दोन पुरस्कार पारनेर महाविद्यालयास जाहीर झाले आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयाने राबवलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, प्राध्यापकांचे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांनी केलेले समाजाभिमुख काम याचा विचार करून हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.

 • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी विकास मंडळ पुरस्कार, महाविद्यालयाच्या चेतना वार्षिक अंकास उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्कार असे विविध पुरस्कार पारनेर महाविद्यालयाला यापूर्वी प्राप्त झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांना यापूर्वी आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

 • डॉ. आहेर यांचे शंभरपेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून महाविद्यालयात त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नंदकुमार झावरे, सचिव जी. डी खानदेशे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॉ. आहेर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत-फिलिपाइन्स करार :
 • फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. भारताला मिळालेला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला देकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 •  भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.  

 • लढाऊ जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवारी बीएपीएलने फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.  बीएपीएल ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या धोरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती :
 • केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात Chief Economic Advisor (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात चर्चा सुरू होती.

 • अनंत नागेश्वरन यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यासंदर्भात आज दुपारी केंद्र सरकारने अधिकृत निर्णय जारी केला असून त्यानुसार नागेश्वरन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. २०२२-२३ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

 • मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्ती होण्याआधी नागेश्वर हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते. याआधी नागेश्वर यांची एक लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून ओळख आहे. भारत आणि सिंगापूरमधील अनेक व्यवसायविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. तसेच, त्यांचे अनेक शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत.

“या विशेष उड्डाणात तुमचं स्वागत आहे जे…”; टाटांनी टेकओव्हर केल्यानंतर आजपासून Air India च्या विमानांमध्ये होतेय घोषणा :
 • आजपासून एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक विशेष उद्घोषणा ऐकायला मिळणार आहे. ६९ वर्षांनंतर, एअर इंडिया ही कंपनी गुरुवारी त्याच्या संस्थापक पित्याकडे, टाटा समूहाकडे परत आल्यानंतर या संदर्भातील घोषणा इन फ्लाइट अनाऊन्सेमंटमध्ये केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 • विमानामध्ये बसल्यानंतर होणाऱ्या उद्घोषणेमध्ये कंपनीची मालकी टाटा समूहाकडे आल्याचा उल्लेख करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे. कंपनीकडून दैनंदिन कारभार पाहणाऱ्या विभागाला म्हणजेच ऑप्रेशन्स विभागाला डोअर क्लोझरनंतर म्हणजेच विमानाचे दरवाजे बंद झाल्यानंतर करण्यात येणारी उद्घोषणा बदलण्यास सांगितली आहे.

 • नवीन आदेशानुसार, “प्रिय प्रवाशांनो, मी तुमचा वैमानिक कॅप्टन (नाव) बोलत आहे. या विशेष उड्डाणामध्ये तुमचं स्वागत आहे जे एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार ठरत आहे. आजपासून एअर इंडिया सात दशकांनंतर पुन्हा एकदा अधिकृतरित्या टाटा समूहाचा भाग झाली आहे. आम्ही तुम्हाला या उड्डाणादरम्यान तसेच एअर इंडियाच्या प्रत्येक उड्डाणादरम्यान सर्वोत्तम सेवा देऊ इच्छितो,” अशी घोषणा आज विमानांमध्ये करण्यात येत आहे.

29 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.