चालू घडामोडी आणि दिनविशेष - 29 एप्रिल 2023

Date : 29 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 

आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही.सिंधू, एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टा
  • दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि अनुभवी एचएस प्रणॉय यांना आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी गटात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
  • आठव्या मानांकित सिंधूने कोरियाच्या दुसऱ्या मानांकित आन से यंगकडून २१-१८, ५-२१, ९-२१ अशी हार पत्करली. या लढतीतील संघर्षपूर्ण झालेला पहिला गेम जिंकत सिंधूने आघाडी घेतली. मात्र, उर्वरित दोन गेममध्ये यंगच्या आक्रमक खेळापुढे सिंधूचा निभाव लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये यंगने आपल्या फटक्यांनी सिंधूला स्थिरावू दिले नाही व गेम २१-५ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्येही आपली हीच लय कायम राखत तिने गेमसह सामनाही जिंकला.
  • यानंतर सर्वाच्या नजरा प्रणॉयच्या सामन्याकडे होत्या. मात्र, त्यानेही निराशा केली. जपानच्या कांता त्सुनेयामाविरुद्धच्या सामन्यात पहिला गेम प्रणॉयने ११-२१ असा गमावला. दुसऱ्या गेममध्येही १३-९ असा पिछाडीवर असताना दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी, पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या रोहन कपूर व एन. सिक्की रेड्डी जोडीने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात इंडोनेशियाच्या देजान फेरदिनानस्याह व ग्लोरिया एमान्युएल जोडीकडून १८-२१, २१-१९, १५-२१ असा पराभव पत्करला.
१ मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
  • महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्त्वे जन्माला आलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळेच या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आलेले आहेत. मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो.

१ मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो? –

  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास –

  • जेव्हा इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाची प्रादेशिक घटना खूप वेगळी होती. शेकडो राज्ये एकवटली गेली आणि देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापन करावी लागली. १९५६ मध्ये, राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा निश्चित केल्या. आज बरीच नवीन राज्ये आपल्या परिचयाची आहेत, पण त्यांत मराठी, गुजराती, कच्छी आणि कोंकणी अशा भाषिक गटांचा समावेश असलेल्या मुंबई राज्यासारख्या विसंगती निर्माण झाल्या. या मतभेदांमुळे बॉम्बे स्टेटला दोन राज्यांत विभागण्यासाठी एक चळवळ उभी राहिली, एक म्हणजे जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरे जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोंकणी बोलतात.

महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? –

  • देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्ये मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्या वेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याच वेळी भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिकांना स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. त्याच वेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनांचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये २५ एप्रिल १९६० रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम १९६० नुसार अस्तित्वात आली. हा कायदा १ मे १९६० रोजी अमलात आला. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली.
आकाशवाणीच्या ‘एफएम’ सेवेचा ८४ जिल्ह्यांमध्ये विस्तार! विधानसभा निवडणूक होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थानात सर्वाधिक केंद्रे
  • ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या शतकपूर्तीच्या दोन दिवस आधी, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९१ एफएम ट्रान्समीटरांचे आभासी समारंभात उद्घाटन केले. १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ८४ जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीच्या एफएम सेवेचा विस्तार होणार आहे. सीमा भागांमधील तसेच, निश्चित केलेल्या अन्य जिल्हांमधील सुमारे दोन कोटी लोक पहिल्यांदाच एफएम सेवेशी जोडले जातील.
  • सर्वाधिक प्रत्येकी १३ एफएम ट्रान्समीटर्स मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये बसवण्यात आले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या एफएम सेवेचा विस्तार हा भाजपच्या धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एफएम रेडिओचे देशव्यापी जाळे विस्तारण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदींनी ‘मन की बात’चा व्यापक उपयोग केला आहे. रेडिओच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा मनोदय मोदींनी केला व त्याद्वारे आकाशवाणीचे माध्यम पुनरुज्जीवित केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
  • मोदींनी ‘मन की बात’चा थेट उल्लेख केला नसला तरी, रेडिओ-एफएम यांच्याशी माझे जवळचे नाते असल्याचे ते उद्घाटन समारंभात म्हणाले. एफएम सेवेमुळे महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत वेळेवर पोहोचू शकते. हवामानाचा अंदाज, कृषीविषयक माहिती, महिला बचत गटांसाठी नव्या बाजारपेठांची माहिती पोहोचवण्याचे काम एफएम केंद्रे करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत आकाशवाणीची सेवा न पोहोचलेल्या अधिकाधिक लोकांना एफएम सेवेद्वारे जोडून घेणे गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.
  • सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्या कमी किमतीमध्ये तंत्रज्ञान पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असतो. प्रत्येक नागरिकासाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध असले पाहिजे. किफायतशीर मोबाइल यंत्रे व सेवांमुळे माहितीही अधिकाधिक लोकांपर्यंत झिरपते. तंत्रज्ञानामुळे एफएम सेवाही देशव्यापी होऊ लागली आहे. आकाशवाणीच्या दूरदृष्टीमुळे देश एकत्र जोडला गेला आहे. तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे रेडिओ व एफएम सेवांना नवी दिशा मिळाली आहे. डिजिटल भारताने नवे श्रोते मिळवून दिले आहेत, असे असेही मोदी म्हणाले.
‘प्रत्येक भारतीयाला सुखरूप परत आणण्याचे उद्दिष्ट’
  • सुदानमधील सुरक्षाविषयक परिस्थिती अद्यापही अतिशय गुंतागुंतीची व अस्थिर असून, त्या देशात अडकून पडलेल्या प्रत्येक भारतीयाला सुखरूप परत आणणे हे भारताचे उद्दिष्ट आहे, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी गुरुवारी सांगितले.
  • भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत अंदाजे १७०० ते दोन हजार भारतीय नागरिकांना सुदानमधील संघर्षग्रस्त भागातून हलवण्यात आले आहे. यात सुदानमधून पूर्वीच हलवण्यात आलेले नागरिक, तसेच राजधानी खार्तुमहून पोर्ट सुदानच्या वाटेवर असलेले नागरिक यांचा समावेश आहे, अशी माहिती क्वात्रा यांनी पत्रकारांना दिली.
  • भारत सुदानमधील दोन्ही लढाऊ गटांच्या व इतर संबंधितांच्या संपर्कात असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आपल्या नागरिकांना हलवण्यात यशस्वी ठरला आहे. भारत सुदानसोबत बळकट अशा विकासात्मक भागीदारीच्या बाजूने असल्याची त्यांना जाणीव आहे, असेही परराष्ट्र सचिवांनी सांगितले.
  • ‘सुदानच्या भूमीवरील परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची, अस्थिर व अकल्पित आहे. सुदानी सशस्त्र दल आणि रॅपिड सपोर्ट फोर्स या दोघांच्याही आम्ही संपर्कात राहिलेलो आहोत. आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. भारतीयांना संघर्षग्रस्त भागांतून सुरक्षित भागांत आणि नंतर पोर्ट सुदनला हलवण्यासाठी आम्ही सर्व बाजूंच्या संपर्कात आहोत’, असे क्वात्रा म्हणाले. सुदानमधून भारतात जाण्यास इच्छुक असलेल्या भारतीयांपैकी सुमारे ३१०० लोकांनी राजधानी खार्तुममधील भारतीय राजदूतावासात नोंदणी केली आहे, तर आणखी ३०० लोक दूतावासाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग, बंद रस्ते, पार्किंग व्यवस्था
  • महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२३ रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात एक नवीन ॲडव्हायजरी जारी केली आहे. यामुळे दादरसह आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत.
  • मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, १ मे २०२३ रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त परेड आयोजित केली जात आहे. परेड सुरळीत पार पाडण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी ६.०० वाजल्यापासून ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. या अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले जात आहेत.

बंद असलेले रस्ते आणि वाहनांसाठी सुरू असलेले वन-वे

  • १) एल. जे.रोड जंक्शन (गडकरी जंक्शन) पासून दक्षिण आणि उत्तर जंक्शनपर्यंत एन. सी. केळकर रोड आणि केळुस्कर रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
  • २) केळुस्कर रोड दक्षिण हा पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘वन-वे’ सुरू असेल म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावरून येणाऱ्या वाहतुकीला या मार्गाने येण्यास परवानगी असेल.
  • ३) केळुस्कर रोडवरील मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून उत्तरेकडील उजवे वळण हे पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘वन-वे’ सुरू असेल.
  • ४) एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शन असा वन-वे सुरू असेल.
  • ५) स्वातंत्र्यवीर सावरकर रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँकेपर्यंत वन-वे सुरू असेल.
  • ६) सिद्धिविनायक जंक्शनकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्याने जाणारी वाहने सिद्धिविनायक जंक्शनवर उजवीकडे वळण घेऊन एस. के.बोले रस्त्यावरून पुढे जातील, पोर्तुगीज चर्चकडे डावीकडे वळण घेऊन गोखले रोड-गडकरी जंक्शन-एल. जे. रोड-राजा बढे चौक मार्गे पश्चिम उपनगराकडे जातील.
  • -७) येस बँक जंक्शनपासून सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सामान्य सार्वजनिक वाहनांनी येस बँक जंक्शन-शिवाजी पार्क रोड क्रमांक ५-पांडुरंग नाईक रस्ता-राजा बढे चौक येथे उजवे वळण घेऊन पुढे एल. जे. रोड मुंबई- गडकरी जंक्शन- नंतर गोखले रोडने दक्षिण मुंबईकडे जावे

‘या’ रस्त्यांवर पार्किंग बंद

  • १) केळुस्कर रोड (मुख्य, दक्षिण आणि उत्तर)
  • २) लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोड केळुस्कर मार्ग (उत्तर) ते पांडुरंग नाईक रोडपर्यंत.
  • ३) पांडुरंग नाईक मार्ग, (रस्ता क्र. ५)
  • ४) न. चिं. केळकर रोड गडकरी चौक ते कोतवाल गार्डन.
  • ५) संत ज्ञानेश्वर रोड.

पोलीस/BMC/PWD वाहनांसाठी पार्किंगची सुविधा

  • १) वीर सावरकर स्मारक सभागृह
  • २) वनिता समाज सभागृह
  • ३) महात्मा गांधी जलतरण तलाव
  • ४) कोहिनूर पीपीएल, न. चिं. केळकर रोड, दादर (प.).

29 एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.