चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ एप्रिल २०२१

Date : 29 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारी :
  • कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत.

  • आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहे. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे.

  • विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्ली आता नायब राज्यपालांची :
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी ‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा’ अधिसूचित केल्यामुळे दिल्ली आता नायब राज्यपालांच्या अधिकारकक्षेत आली. दिल्लीतील राज्य सरकारच्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या अधिकारांना कात्री लागली असून नायब राज्यपालांच्या संमतीशिवाय कोणत्याही निर्णयाची दिल्ली सरकारला अंमलबजावणी करता येणार नाही. अनिल बैजल हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.

  • दिल्लीत करोनाने थैमान घातले असून राजधानीतील रुग्णालयांमध्ये प्राणवायूच्या पुरवठ्याअभावी रुग्णांना जीव गमवावे लागले. अजूनही रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. दिल्ली सरकारच्या प्राणवायू व्यवस्थापनातील ढिसाळ कारभारावर मंगळवारी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली व ‘दिल्ली सरकारला व्यवस्थापन जमत नसेल तर ही जबाबदारी केंद्राकडे देऊ’, असा सज्जड इशाराही दिला. त्याच दिवशी मंगळवारी दिल्ली नायब राज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात आली.

  • राज्य सरकारच्या वतीने प्राणवायू पुरवठ्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मात्र यापुढे करोनासंदर्भात घेतल्या जाणाऱ्या निर्णयाआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला नायब राज्यपालांचे मत विचारात घ्यावे लागेल. अधिकारांच्या मुद्द्यांवरून यापूर्वीही नायब राज्यपाल व केजरीवाल सरकारमध्ये तीव्र मतभेद झाले होते. पण, दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करोनाच्या काळात होत असल्याने सरकार व राज्यपालांमधील नवे मतभेद निर्माण झालेच तर दिल्लीकरांच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘डीआरडीओ’कडून तीन महिन्यांत ३०० प्रकल्पांची निर्मिती :
  • संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओ येत्या तीन महिन्यांत पाचशे वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प सुरू करणार आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. या प्रकल्पांसाठी पीएम केअर निधीचा वापर करण्यात येणार आहे. वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प हे संरक्षण संशोधन व विकास संस्था तयार करणार असून हे तंत्रज्ञान तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी तयार करण्यात आले होते. त्याचाच वापर प्राणवायू तयार करण्यासाठी केला जाणार आहे.

  • डीआरडीओच्या निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प तंत्रज्ञान बेंगळूरुच्या टाटा अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम्स लि. व कोईंबतूरच्या ट्रायडेंट न्यूमॅटिक्स यांना हस्तांतरीत करण्यात येणार असून या दोन कंपन्या ३८० प्राणवायू प्रकल्प निर्माण करणार आहेत. याशिवाय  १२० प्रकल्प हे मिनिटाला पाचशे लिटर प्राणवायू तयार करणार असून ते प्रकल्प डेहराडून येथील भारतीय पेट्रोलियम संस्थेशी संबंधित उद्योग तयार करणार आहेत.

  • सिंगापूर, दुबईमधून आयात भारतीय हवाई दलाने नऊ क्रायोजेनिक प्राणवायू  कंटेनर दुबई व सिंगापूरमधून भारतात आणले. पश्चिम बंगालमधील  पनागड येथे हे कंटेनर  दाखल झाल्याचे बुधवारी सांगण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या ‘सी १७’ विमानांनी दोन क्रायोजेनिक प्राणवायू कंटेनर इंदूर येथून जामनगरला आणले.

  • दोन कंटेनर जोधपूरहून उदयपूर व जामनगरला तर दोन हिंडोन येथून रांचीला आणले आहेत. भारतीय हवाई दलाच्या सी १७ विमानांनी सहा क्रायोजेनिक प्राणवायू  कंटेनर दुबईहून पनागडला आणले होते. सी १७ विमानांनी सिंगापूर येथून तीन प्राणवायू कंटेनर  पनागडला हवाई तळावर आणले.

व्लादिमिर पुतिन यांच्याशी मोदींची फोन पे चर्चा; मानले मित्राचे आभार :
  • भारतात करोनाची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू लागलेली असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर अनेक देशांनी भारताता विविध पद्धतीने मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

  • त्यामध्ये रशियाचा देखील समावेश असून स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले आहेत. तसेच, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी ट्विटर हँडलवरून व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. “आज माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी उत्तम संभाषण झालं. आम्ही कोविड-१९ च्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. करोनाच्या साथीविरोधात भारताच्या सुरू असलेल्या लढ्याला मदत केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो”, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवणार”- पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यास मंजुरी दिली आहे. द्रवरुप ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ करण्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • ज्या राज्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे त्या राज्यांना लवकरात लवकर हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यात यावेत असे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत.यापूर्वी पीएम केअर फंडातून ७१३ पीएसए ऑक्सिजन प्लांट्स मंजूर करण्यात आले होते. तर आता आणखी ५०० प्लांट्सना मंजुरी देण्यात आली आहे.

  • हे पीएसए ऑक्सिजन प्लांट्स जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली रुग्णालये तसंच दुसऱ्या श्रेणीच्या शहरांमधल्या रुग्णालयांमध्ये द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा करतील.

  • हे प्लांट्स संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांनी स्थानिक उत्पादकांसाठी बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन बसवता येणार आहेत. यामुळे ऑक्सिजन प्लांट्सपासून रुग्णालयांपर्यंत ऑक्सिजन पुरवणं सोपं होणार आहे.

लसीकरण - नोंदणी सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच CoWIN चा सर्व्हर क्रॅश :
  • केंद्र सरकारने एक मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करणार असून या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अ‍ॅपवर सुरु झाली.

  • मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत.

  • इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास १७ कोटी ८८ लाख भारतीय आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करत होते. आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.

२९ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.