चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ एप्रिल २०२०

Date : 29 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘करोना’चा परिणाम - १२ हजार नोकऱ्या जाणार, ब्रिटिश एअरवेजचे स्पष्ट संकेत :
  • करोना व्हायरस महामारीचे परिणाम आता हळूहळू दिसायला सुरूवात झाली आहे. बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन असल्याने अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर संकट येईल अशी शक्यता व्यक्त होत असताना आता आघाडीची विमान सेवा देणारी कंपनी ब्रिटिश एअरवेजने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

  • विमान सेवा पुरवणाऱ्या जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ब्रिटिश एअरवेजची पॅरेंट कंपनी इंटरनॅशनल एअरलाइन्स ग्रुपने (आयएजी)याबाबत मंगळवारी माहिती दिली. “हवाई वाहतूक पूर्वपदावर यायला काही वर्ष लागू शकतात, त्यामुळे १२ हजार जणांना नोकरीवरुन कमी करावे लागू शकते”, असे एका निवेदनाद्वारे आयएजीकडून सांगण्यात आले आहे.

  • पहिल्या तिमाहीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागल्याचं आपल्या निवेदनामध्ये नमूद करत आयएजीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कपातीबाबतचा स्पष्ट इशारा दिला.

देशात १५९४ नवे करोना रुग्ण, एकूण संख्या ३० हजारांजवळ, एकाच दिवसात ५१ मृत्यू :
  • देशात गेल्या २४ तासात करोनाचे १५९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • COVID 19 या व्हायरसविरोधात लस शोधण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे अशी माहिती सोमवारीच WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी दिली. मात्र करोनाचं संकट इतक्यात टळणारं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना संदर्भात आणि लॉकडाउन संदर्भात चर्चा केली.

  • ३ मे पर्यंत लॉकडाउन कायम आहे. आता यापुढे तो वाढणार की नाही ? की काही राज्यांमध्ये लॉकडाउन वाढणार आणि काही राज्यांमध्ये शिथील होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच केली जाईल. ३ मे रोजी म्हणजेच येत्या रविवारी देशभरातला लॉकडाउन संपणार आहे. मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम :
  • केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी केली. आयटी क्षेत्रातील ८५ टक्के काम घरुनच केले जात असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले. वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.

  • वर्क फ्रॉम होमसंदर्भात सरकारने अनेक सवलती दिल्या असल्याचाही उल्लेख प्रसाद यांनी यावेळी केला. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. घरुन काम करण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहे. “घरुन काम करणे हे सर्वसामान्य व्हावे यासाठी आम्हा प्रयत्नशील आहोत,” असंही प्रसाद यावेळी म्हणाले. तसेच नवीन उद्योजकांनी या संदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली.

  • सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे. १३ मार्च रोजी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार ३० एप्रिलला हा कालावधी संपणार होता. मात्र आता तो वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण; एकूण आकडा ९ हजारांवर :
  • करोनानं सध्या देशात आणि राज्यात थैमान घातलं आहे. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे.

  • केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

  • धारावीत एका दिवसात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मंगळवारी सापडले. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी मुंबईतील ४३१ करोना संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  • त्यापैकी ३९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तर सोमवारी केवळ मुंबईत करोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सोमवारी मुंबईत करोनाचे ३९५ नवे रुग्ण सापडले होते.

अध्यक्षीय निवडणूक लांबणीवर टाकणार नाही - ट्रम्प :
  • करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीची तारीख बदलण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ३ नोव्हेंबर रोजी तेथे अध्यक्षीय निवडणूक होत आहे. व्हाइट हाऊस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा विचार आपण करूच शकत नाही, तसे करण्याचे काही कारणही नाही.

  • त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांनी गेल्या आठवडय़ात असे म्हटले होते की, ट्रम्प हे अमेरिकी निवडणुकीच्या तारखा बदलण्याच्या विचारात आहेत. ट्रम्प हे निवडणुकांच्या तारखा बदलणार आहेत, त्याची कारणे ते काहीही सांगतील, पण निवडणुका कशासाठी लांबणीवर टाकायच्या हे समजत नाही.

  • ट्रम्प यांनी सांगितले की, झोपाळू बिडेनना कुणीतरी काहीही लिहून देते आणि प्रचाराच्या काळात ते काहीही बोलतात. त्याप्रमाणेच मी निवडणुका लांबणीवर टाकण्याची अटकळ त्यांनी बांधली आहे. पण निवडणुका लांबणीवर टाकण्याचा विचार मी कधीही केलेला नाही.

जलद चाचणी संच सदोष ठरवण्याच्या निर्णयावर चीनकडून चिंता व्यक्त :
  • करोनाच्या जलद प्रतिपिंड चाचण्यांसाठी खरेदी करण्यात आलेले पाच लाख संच सदोष असल्याच्या भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या निष्कर्षांवर चीनने चिंता व्यक्तकेली आहे.

  • चीनच्या दोन कंपन्यांकडून खरेदी केलेले हे चाचणी संच बाद ठरवण्यात आले असून आता त्यांचा वापर करण्यात येऊ नये असा आदेश जारी करण्यात आला आहे. भारत चाचणी संचांचा मुद्दा तर्कसंगततेने निकाली काढेल अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.

  • भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने सोमवारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना चिनी संचांचा वापर बंद करण्याचा आदेश जारी केला असून हे संच ग्वांगझाऊ वोडफो बायोटेक व झुबाई लिव्हझॉन डायगनॉस्टिक्स या कंपन्यांकडून खरेदी केले होते. त्यावर चीनच्या दूतावासातील प्रवक्त्या जी रोंग यांनी सांगितले की, ‘या संचांचे मूल्यमापन करून काही व्यक्तींनी जो निर्णय घेतला आहे त्याची चिंता वाटते.

  • चीन वस्तूंच्या उत्पादन दर्जाला मोठे महत्त्व देतो. चीनची उत्पादने सदोष ठरवणे अन्याय्य व बेजबाबदारपणाचे आहे, पूर्वग्रहदृष्टिकोनातून निर्णय घेणे योग्य नाही.’ चीनने काही व्यक्ती म्हणजे कोण याचे स्पष्टीकरण केलेले नाही.

२९ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.