MahaNMK > Blog > चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ नोव्हेंबर २०२२

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ नोव्हेंबर २०२२

Date : 28 November 2022 | MahaNMK.com
पी. टी. उषा ‘आयओए’ची पहिली महिला अध्यक्ष :
 • भारताची माजी अव्वल धावपटू ‘पायोली एक्सप्रेस’ पी. टी. उषा  भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहे. ‘आयओए’च्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी केवळ पी.टी. उषाचा अर्जच दाखल झाला आहे.

 • ‘आयओए’ची निवडणूक १० डिसेंबरला होणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी केवळ उषाचाच अर्ज आल्यामुळे तिची बिनविरोध निवड निश्चित असून, त्यावर केवळ शिक्कामोर्तब बाकी आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर अशी तीन दिवसांची मुदत होती. मात्र, पहिल्या दोन्ही दिवशी कुणीच अर्ज केला नाही. अखेरच्या दिवशी विविध पदासाठी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.   

 • अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष (१ जागा), दोन उपाध्यक्ष (एक पुरुष, एक महिला), कोषाध्यक्ष (१ जागा), सह सचिव (एक पुरुष, एक महिला), कार्यकारी परिषद (६ जागा, यातील दोन जागा सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंसाठी राखवी, एक पुरुष-एक महिला), कार्यकारी परिषदेमध्ये दोन सदस्य खेळाडू समितीमधील असतील.

राज्यातील १० टक्क्यांपेक्षा कमी अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर :
 • राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) एकूण अधिकाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत किमान ४० टक्के अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असावेत, अशी तरतूद असली तरी सध्या १० टक्क्यांपेक्षा कमी अधिकारी हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

 • राज्यांमधून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचे प्रमाण फारच अल्प आहे. यामुळेच गेल्या वर्षी केंद्र सरकारने नियमात बदल करण्याचे जाहीर करताच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. केंद्र सरकारने प्रतिनियुक्ती नियम १९५४ मधील कलम ६ मध्ये दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे प्रतिनियुक्तीत केंद्र सरकारचे वर्चस्व राहणार असा राज्यांचा सूर आहे. विशेषत: विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांनी या बदलाला विरोध दर्शविला होता, कारण कोणत्याही अधिकाऱ्याची केंद्रात प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्याचे अधिकार केंद्राला मिळणार आहेत.

 • महाराष्ट्रात सध्या ३४० आय.ए.एस. अधिकारी सेवेत आहेत. यापैकी किमान ८० अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असावेत, अशी केंद्राची अपेक्षा असते; पण मुंबई किंवा राज्याच्या विविध भागांमध्ये काम करणारे अधिकारी नवी दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नसतात. सध्या फक्त २१ अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

 • केंद्र सरकारची दिल्लीस्थित कार्यालये अथवा केंद्रीय मंत्र्यांची अस्थापना याऐवजी राज्यातच विविध विभागांचे प्रमुख, महानगरपालिका आयुक्त, मंत्रालयात विविध खात्यांचे सचिव, प्रधान सचिव अथवा अपर मुख्य सचिव म्हणून कर्तव्य बजावण्यात धन्यता मानतात.

प्रजासत्ताक दिन सोहळय़ासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे :
 • यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात इजिप्तला दिलेल्या भेटीदरम्यान अब्देल फतेह अल -सीसी यांना भारताकडून औपचारिक आमंत्रण दिले होते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला पहिल्यांदाच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 • करोना संसर्गामुळे २०२१ आणि २०२२ या दोन वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ासाठी भारताकडून कोणत्याही देशाच्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले नव्हते.

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद :
 • इंडियन प्रिमीअर लीग ( आयपीएल ) २०२२ मधील अखेरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्याने आता मोठा विश्वविक्रम केला आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

 • बीसीसीआयने सांगितलं की, “आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताने आपलं नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं गेलं आहे. चाहत्यांच्या समर्थनामुळे हे शक्य झालं,” असे बीसीसीआयने म्हटलं.

 • जय शाह म्हणाले की, “२९ मे २०२२ साली नरेंद्र मोदी स्टेडियमवर १०१,५६६ प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला. ट्वेन्टी-२० सामन्यात सर्वाधिक उपस्थितीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला, अभिमान वाटला. सर्व चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन,” असे जय शाह यांनी म्हटलं.

 • अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. २९ मे २०२२ साली झालेल्या या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात १०१,५६६ प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.

आरोग्य वार्ता - स्वच्छतागृहात मोबाइलचा वापर धोकादायक :
 • मोबाइल फोन लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण सकाळी उठल्यानंतर लगेचच मोबाइल हातात घेतात आणि रात्री मोबाइल पाहतच झोपतात. एवढेच नव्हे, काहींना तर त्याची एवढी सवय झाली आहे की, ते स्वच्छतागृहातही मोबाइल घेऊन जातात; पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे, हे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

 • पचनासंबंधी समस्येमुळे मूळव्याध होते; परंतु स्वच्छतागृहात मोबाइलचा वापर हेसुद्धा या व्याधीचे एक प्रमुख कारण ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्यानंतरही त्यामध्ये किटाणू कसे असू शकतात, असे अनेकांना वाटते; पण, मोबाइलमुळे स्वच्छतागृहात अधिक वेळ जातो. या दरम्यान किटाणू मोबाइलला चिकटतात. त्यांचा संसर्ग झाल्यानंतर पोटदुखी आणि युरिनल ट्रक्स इन्फेक्शन  यांसारखे आजार होतात.

 • विशेष म्हणजे मोबाइल घेऊन स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्याच्यासोबत असंख्य किटाणू आणि जिवाणू येतात आणि ते घरात पसरतात. हे संपूर्ण कुटुंबासाठी धोकादायक ठरते.

 • स्वच्छतागृहातील वस्तूंवर ई-कोली हे जिवाणू असतात. ते फक्त आतडय़ांसंबधी आजारांचेच कारण ठरत नसून ते अतिसारासारख्या आजारालाही आमंत्रण देणारे ठरतात, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

२८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.