चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ मे २०२२

Date : 28 May, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
उपकनिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा; महाराष्ट्राची आर्या सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटू :
  • राष्ट्रीय उपकनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या गर्देला सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत आर्या आणि समीक्षा सोलंकी यांनी आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीत ५-० असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.

  • पुण्याच्या आर्याने स्पर्धेच्या अंतिम दिवशी ३६ किलो वजनी गटात गोव्याच्या सगुण शिंदेचा, तर समीक्षाने ४० किलो गटात उत्तर प्रदेशच्या साधनाचा सहज पराभव केला. कुमारी गटात हरयाणाने स्पर्धेत सात सुवर्णपदक पटकावली. हरयाणासाठी पायलने (४६ किलो) तमिळनाडूच्या गुणा श्रीवर ५-० असा विजय मिळवला. याशिवाय लक्षूने (६३ किलो) अरुणाचल प्रदेशच्या नबाम अनियाविरुद्ध विजय मिळवला. या स्पर्धेत हरयाणाने सात सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण १० पदके मिळवत एकूण ६० गुणांसह पहिले स्थान पटकावले, तर पंजाब आणि महाराष्ट्र अनुक्रमे ३८ आणि २७ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेत मणिपूरच्या जयश्री देवी आणि सेनादलच्या आकाश बधवारला सर्वोत्तम बॉक्सिंगपटू पुरस्कार मिळाला.

  • कुमार विभागात सेनादलाच्या बॉक्सिंगपटूंनी ७३ गुणांसह सांघिक विजेतेपद मिळविले. त्यांनी नऊ सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण १० पदके जिंकली, तर हरियाणा आणि उत्तर प्रदेशने अनुक्रमे ५८ आणि २४ गुण मिळवून दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. हरयाणाने पाच सुवर्ण आणि तीन रौप्यपदके जिंकली, तर उत्तर प्रदेशने तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह आपल्या मोहिमेचा शेवट केला. ४६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात छत्तीसगडच्या गिरवान सिंगचा पराभव करणाऱ्या हरयाणाच्या महेशला सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटू म्हणून गौरवण्यात आले, तर झारखंडच्या अनिश कुमार सिन्हाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्तम आव्हानवीराचा पुरस्कार मिळाला.

हिंदी लेखिकेला ‘बुकर इंटरनॅशनल’; गीतांजली श्री यांच्या कादंबरीच्या अनुवादाला मानाचा पुरस्कार :
  • भारतीय भाषिक कादंबरीच्या अनुवादाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळण्याचा ऐतिहासिक क्षण गुरुवारी हिंदी लेखिका गीतांजली श्री यांच्या पुस्तकामुळे लाभला. त्यांच्या ‘रेत समाधि’ या कादंबरीचा  डेझी रॉकवेल यांनी केलेला ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ हा अनुवाद  पुरस्कारासाठी निवडण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेले समकालीन पोलिश, दक्षिण कोरियाई आणि जपानी साहित्यिकही या पुरस्काराच्या स्पर्धेत होते.

  • समकालीन, आजच्या वगैरे परिस्थितीवर भाष्यबिष्य करण्याच्या फंदात अजिबात न पडता गोष्टीत रमवणारी अशी ही कादंबरी आहे.  हा पुरस्कार मिळेल, याबाबत शाश्वती नव्हती. त्यामुळे मलाच हा आश्चर्याचा धक्का असल्याची प्रतिक्रिया गीतांजली श्री यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.

  • बुकर पुरस्काराच्या दीर्घ यादीत ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’सह वेगवेगळय़ा ११ भाषांतून अनुवादीत १३ पुस्तकांचा समावेश होता.  हा पुरस्कार ५० हजार ब्रिटिश पौंड इतक्या रकमेचा असतो. तो मूळ लेखिका आणि अनुवादकामध्ये विभागून देण्यात येतो.

  • थोडे कादंबरीविषयी - या कादंबरीची गोष्ट भारतात, पाकिस्तानात आणि वाघा-अटारी सीमेवरही घडते. चंद्रप्रभा देवी ही ८० वर्षांची स्त्री दिल्लीच्या घरी पतिनिधनानंतर अंथरुणाला खिळलेली, पण एक दिवस तिची जीवनेच्छा जागृत होऊन ती हिंडूफिरू लागते, ‘स्त्री आणि पुरुष यांच्या सीमेवर’ असलेल्या एका तृतीयपंथीयाला भेटते आणि मग, मुलीसह पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेते- त्यासाठी पासपोर्ट, व्हिसाचे सोपस्कार पार पाडते. वाघा सीमेवरले ते संचलन पाहाताना तिला सआदत हसन मण्टो, कृष्णा सोबती यांच्यापासून सारे ‘सरहदी’ लेखक भेटतात.

आयकॉनिक कार ‘अ‍ॅम्बेसेडर’चे होणार पुनरागमन? नव्या रुपात येणार बाजारात :
  • एकेकाळी वाहन बाजारात राज्य करणारी अ‍ॅम्बेसेडर कार नव्या अवतारात पुन्हा बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी हिंदुस्तान मोटर्स कंपनी जोमाने तयारीला लागली आहे. हिंदूस्तान मोटर्स कंपनी अ‍ॅम्बेसेडरला इलेक्ट्रिक रुपात बाजारात आणण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हिंदुस्तान मोटर्स इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करण्यासाठी युरोपियन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीसोबत भागीदारी करण्याची योजना आखत आहे.

  • चेन्नई उत्पादन प्लांटमध्ये बनणार नवे मॉडेल - भागीदारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच आगामी प्रकल्पातील सहयोग ५१.४९ गुणोत्तरावर आधारित असेल. अ‍ॅम्बेसेडरचे नवीन मॉडेल हिंदुस्थान मोटर्सच्या चेन्नई उत्पादन प्लांटमध्ये तयार केले जाईल. जे सध्या HMFCI च्या मालकीचे आहे. HMFCI सीके बिर्ला समूहाचा भाग आहे.

  • शेवटची अ‍ॅम्बेसेडर कधी बनवली होती - भागीदारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की हिंदुस्थान मोटर्सचा चेन्नई प्लांट मित्सुबिशी कार बनवत असे, तर उत्तरपारा प्लांट अ‍ॅम्बेसेडर कार बनवत असे. हिंदुस्तान मोटर्सच्या उत्तरपारा प्लांटमधील शेवटची अ‍ॅम्बेसेडर सप्टेंबर २०१४ मध्ये बनवण्यात आली होती. त्यावेळी निर्मात्यावर खूप कर्ज होते आणि विक्री कमी होती, म्हणून ब्रँड ग्रुप PSA ला विकला गेला.

  • स्वस्त कारमुळे अ‍ॅम्बेसेडरसमोर आव्हान - १९७० च्या दशकात हिंदुस्थान मोटर्सचा भारतीय ऑटोमोबाईल बाजारात ७५% हिस्सा होता. ते आयकॉनिक अ‍ॅम्बेसेडर कारचे उत्पादन करत होते. जेव्हा मारुती ८०० आणि इतर मॉडेल्ससारख्या स्वस्त आणि अधिक परवडणाऱ्या कार देशात येऊ लागल्या, तेव्हा हिंदुस्थान मोटर्स अ‍ॅम्बेसेडरसमोर आव्हान उभे राहिले. २०१७ मध्ये, Groupe PSA ने हिंदुस्तान मोटर्सच्या मालकीच्या बिर्ला ग्रुपकडून Peugeot A आणि Ambassador ब्रँड खरेदी केला.

‘हे’ आहेत मोदी सरकारचे आठ वर्षातले महत्वाचे निर्णय :
  • २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर दुसऱ्यांदा २०१९ लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केंद्रात सत्तेत आले. आता मोदी सरकारला देशात सत्ता स्थापन करून ८ वर्ष झाली आहेत.

  • या काळात केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. त्यापैकी काही निर्णयांनंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली, तर काही निर्णयांचं स्वागत झालं. गेल्या आठ वर्षात केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांबद्दल आपण जाणून घेऊयात…

  • नोटबंदी, कृषी कायदे, कलम ३७०, GST, राफेल, नवीन शिक्षण धोरण, पीएम किसान सम्मान निधी योजना, उज्वला योजना असे अनेक महत्वाचे निर्णय आणि योजना या मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत घेतले आहेत.

एकल वापर प्लास्टिकच्या वापरावर १ जुलैपासून संपूर्ण बंदी :
  • एकल (एकदाच) वापर प्लास्टिकच्या वापरावर येत्या १ जुलैपासून बंदी घालण्यात आली असून या प्रकारच्या प्लास्टिकची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकॉल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक काडय़ांनी कान कोरणे, प्लास्टिकच्या काडय़ा, प्लास्टिकचे झेंडे, कॅन्डी, आइस्क्रीम कांडय़ा, प्लास्टिकच्या थाळय़ा, कप, ग्लास व इतर साहित्यांचा या बंदीमध्ये समावेश आहे.  

  •  एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी निसर्गपूरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबू, लाकडी वस्तू, सिरामिक्सची प्लेट, वाटय़ा आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपूरक वस्तूंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. प्लास्टिकच्या वस्तूंपासून पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने यावर पुनप्र्रक्रिया करण्यावर अधिक भर द्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी, मुख्यालय प्लास्टिक सेल, नंदकुमार गुरव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राक्षे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी, क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे, सर्व नगर परिषद, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

  • बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा राहणार आहे.

मोहम्मद सिराजच्या नावे झाली ‘या’ लाजीरवाण्या विक्रमाची नोंद :
  • राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर सामना खेळवला गेला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्या राजस्थान रॉयल्सने सात गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजांची पिसे काढली. बंगळुरूच्या फलंदाजापाठोपाठ गोलंदाजाचीदेखील कामगिरी ढासळ्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद सर्वात जास्त महागडे ठरले. खास करून मोहम्मद सिराज जास्त चर्चेत राहिला. कारण, क्वॉलिफायर सामन्यात त्याच्या नावे एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर या आयपीएल हंगामात ३० षटकार मारले गेले आहेत. आयपीएलच्या कोणत्याही हंगामात एका गोलंदाजाविरुद्ध मारले गेलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. क्वालिफायर २ सामन्यात राजस्थानच्या डावाच्या सुरुवातीला जेव्हा यशस्वी जैसवालने सिराजला एक उत्तुंग षटकारा मारला तेव्हा त्याने ड्वेन ब्राव्होच्या २९ षटकारांचा विक्रम मागे टाकला. २०१८ च्या हंगामात ब्राव्होच्या गोलंदाजीवर २९ षटकार खेचले गेले होते.

  • आयपीएल २०२२ हंगाम मोहम्मद सिराजसाठी खूपच खराब गेला आहे. सिराजने १५ सामन्यांमध्ये नऊपेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत आणि फक्त ९ बळी मिळवले आहेत. त्याच्या बिघडलेल्या तंत्राचा प्रतिस्पर्धी फलंदाजांनी पुरेपुर फायदा घेतला आहे.

२८ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.