चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ मे २०२१

Date : 28 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार; मोदी सरकारचा निर्णय :
  • करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटलं आहे.

  • “रुग्णसंख्या कमी होत असली तरी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अद्यापही जास्त असल्याचं मला नमूद करायचं आहे. यामुळे करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाऊ शकते. दरम्यान स्थानिक परिस्थिती, गरजा आणि संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेऊ शकतात,” असं आदेशात सांगण्यात आलं आहे.

  • गृहसचिवांनी राज्यांनी करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धोरणं आखण्यास सांगितलं आहे. याआधी २९ एप्रिलच्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध लावण्याची सूचना केली होती. गेल्या एक आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची माहिती घ्या असंही यावेळी सांगण्यात आलं होतं.

मेरी कोम, साक्षी अंतिम फेरीत :
  • सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी भारताची अव्वल बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम तसेच साक्षी (५४ किलो) यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र सिमरनजित कौर (६० किलो), मोनिका (४८ किलो), जस्मिन (५७ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.

  • लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने मोंगोलियाच्या लुटसैखान अल्टानसेतसेग हिच्यावर ४-१ असा विजय प्राप्त केला. यासह अव्वल मानांकित मेरीने किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. मेरी कोमला अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नझीम कायझाबायचा सामना करावा लागेल.  पहिल्या फेरीत काहीशी सावध सुरुवात करणाऱ्या मेरीला अल्टानसेतसेग हिने जोरदार ठोसे लगावले. पण हार न मानता मेरीने दुसऱ्या फेरीत जोमाने पुनरागमन केले. मेरीच्या आक्रमक खेळाला अल्टानसेतसेगकडे उत्तर नव्हते. तिसऱ्या फेरीतही मेरीने वर्चस्व गाजवत ही लढत जिंकली.

  • दोन वेळा युवा जगज्जेती ठरलेल्या साक्षी हिने कझाकस्तानच्या अव्वल मानांकित दिना झोलामान हिचे कडवे आव्हान ३-२ असे परतवून लावले. तिला जेतेपदासाठी उझबेकिस्तानच्या सितोरा शोगदारोव्हा हिच्याशी लढत द्यावी लागेल. लालबुआतसैहीने (६४ किलो) कुवैतच्या नौरा अल्मुतारीला सहज हरवत अंतिम फेरी गाठली.

सदानंद मोरे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी :
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वाकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.

  • डॉ. मोरे यांच्या शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २९ सदस्यांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्त करण्यात आले आहे.

  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वाकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडित अध्यक्ष व ३० सदस्य अशा एकूण ३१ सदस्यांची ५ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार डॉ. राजा दीक्षित यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

बी.१.६१७ विषाणूचा ५३ देशांमध्ये फैलाव :
  • भारतात सर्वप्रथम आढळलेला कोविड-१९ विषाणूचा बी.१.६१७ हा प्रकार आता ५३ देशांमध्ये आढळून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. गेल्या सात दिवसांत भारतात करोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये २३ टक्क््यांची घट झाली आहे, मात्र तरीही ही संख्या जगात सर्वाधिक असल्याचेही या संघटनेने नमूद केले आहे.

  • गेल्या आठवडाभरात करोनाची नवी प्रकरणे आणि करोनामृत्यू यांची संख्या जगभरात कमी होऊन, ४ कोटी १ लाख नवी प्रकरणे आणि ८४ हजार मृत्यूंची नोंद करण्यात आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे १४ टक्के व २ टक्क््यांनी कमी आहे, असे २५ मे रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या डब्ल्यूएचओच्या महासाथविषयक ताज्या आकडेवारीत म्हटले आहे.

  • बी.१.६१७ विषाणू हे बी.१.६१७.१, बी.१.६१७.२ आणि बी.१.६१७.३ अशा तीन वंशात (लायनेज) विभागलेले आहेत. ‘हू’च्या आकडेवारीत बी.१.६१७ प्रकाराच्या तीन वंशांच्या निरनिराळ्या देशांत आणि भागांत २५ मे रोजी असलेल्या अस्तित्वाची माहिती देण्यात आली आहे.

‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ औषधी आता भारतातही; एका आठवड्यात रुग्ण होऊ शकतो बरा :
  • करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक प्रभावी औषधी वापरण्यावर भर दिला जात असून, यात आता एका औषधाची भर पडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोना झाल्यानंतर वापरण्यात आलेलं औषध भारतातही उपलब्ध झालं आहे. ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ असं या औषधाचं नाव असून, केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे. त्यामुळे करोना रुग्ण एका आठवड्यात बरा होऊ शकतो. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया टुडेनं याबद्दलची वृत्त दिलं आहे.

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारात ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. ट्रम्प यांच्यावर वापरण्यात आल्यानंतर हे औषध चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता भारत सरकारनंही याच्या वापराला परवानगी दिली असून, हैदराबादमधील एआयजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी विषयी महत्त्वाची माहिती दिली.

  • एआयजी रुग्णालयाने ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’चा उपचारात वापर करणं सुरू केलं आहेत. त्याचबरोबर नव्या म्युटेशनवर ते किती प्रभावी आहे, यावरही व्यापक स्वरूपात अभ्यासही केला जात आहे, असं रेड्डी म्हणाले. “या औषधाच्या वापरामुळे करोना रुग्ण एका आठवड्यातच आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह होऊ शकतो. करोनाच्या डबल म्युटेशनवर ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ किती प्रभावी आहे, याचा आम्ही एआयजीमध्ये अभ्यास करत आहोत,” असं रेड्डी म्हणाले.

२८ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.