चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ मे २०२०

Date : 28 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘भारतातील मृतांची संख्या जुलैत १८ हजारापर्यंत जाण्याची भीती’ :
  • भारतात जुलैच्या सुमारास करोना विषाणूची शिखरावस्था गाठली जाऊन मृतांची संख्या १८ हजारापर्यंत जाऊ शकते, असे साथरोग व सार्वजनिक आरोग्य तज्ञ तसेच सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रोनिक  कंडिशन्स या संस्थेचे संचालक प्रा. डी. प्रभाकरन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अजूनही करोनाची साथ चढत्या क्रमाने पुढे जात आहे.

  • प्रभाकरन हे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेतही प्राध्यापक आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील करोनाची साथ जुलैत शिखरावस्थेत राहील व तेव्हा भारतातील बळींची संख्या १८ हजार असू शकते. सध्या जी वेगवेगळी प्रारूपे सादर करण्यात आली आहेत त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात रुग्णांची संख्या चार ते सहा लाख राहील त्यात मृत्युदर तीन टक्के राहील. त्यामुळे अंदाजे १२ ते १८ हजार बळी जातील.

  • भारतात मृत्यूचा दर कमी का राहील, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, कुठलीही साथ जेव्हा संपण्याच्या दिशेने वाटचाल करते तेव्हा मृत्युदर कमी असतो. इटली व अमेरिका यांच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळेही मृत्युदर कमी राहील.

  • वय हा यात महत्त्वाचा घटक असतो. वयस्कर लोकांना करोनाचा धोका अधिक आहे. याशिवाय बीसीजी लसीकरण, मलेरिया प्रतिरोध, अस्वच्छतेमुळे नेहमीच होणाऱ्या संसर्गामुळे वाढलेली प्रतिकारशक्ती, उष्ण हवामान या घटकांचाही संबंध आहे पण त्याचे पुरावे नाहीत.  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे जी. व्ही. एस. मूर्ती यांच्या मते दक्षिण आशियात सर्वात कमी मृत्युदर श्रीलंकेत आहे. 

करोनावर मात करण्यासाठी पतंजलीचं पहिलं पाऊल; सुरु केली वैद्यकीय चाचणी :
  • सध्या जगभरात तसच देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचं महत्त्वाचं काम करत आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोविड १९ च्या उपचारासाठी वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची माहिती दिली आहे. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पतंजलीनं ही चाचणी सुरू केल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • “आम्ही केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबद्दल बोलत नाही. आम्ही करोनाच्या उपचाराबद्दल सांगत आहोत. गेल्या आठवड्यात नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर कंपनीनं इंदूर आणि जयपूरमध्ये करोनाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत,” अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

  • करोनाच्या चाचण्यांदरम्यान सध्या केवळ मोठ्या कंपन्यांची नावं समोर येत होती. यामध्ये गिलियड सायंसेज, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, इनोव्हियो फार्मा आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या कपंन्या पुढे असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता यात पतंजलीचंदेखील नाव जोडलं गेलं आहे. या यादीत पतंजलीचं नाव जोडलं जाणं ही कंपनीसाठी मोठी बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

रुग्णालये शोधून काढण्याचा सरकारला आदेश :
  • कोविड-१९ रुग्णांवर मोफत किंवा नाममात्र दरात उपचार करता येतील अशी खासगी रुग्णालये शोधून काढावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी दिला आहे.

  • सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने दूरसंवादाने केलेल्या सुनावणीत असे सांगितले की, ज्यांना रुग्णालयासाठी सरकारने मोफत किंवा नाममात्र दरात जमिनी दिल्या अशी काही खासगी रुग्णालये आहेत त्यांना मोफत किंवा नाममात्र दरात कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यास सांगावे त्यासाठी ती रुग्णालये शोधून काढावीत.

  • या न्यायपीठात न्या. ए. एस. बोपण्णा, न्या. हृषीकेश रॉय यांचाही समावेश होता. त्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की,  काही रुग्णालयांना सरकारने मोफत किंवा नाममात्र दरात जमिनी दिल्या आहेत. या धर्मादाय रुग्णालयांनी कोविड -१९ रुग्णांवर मोफत उपचार करावेत. मेहता यांनी केंद्राची बाजू मांडताना सांगितले की, हा धोरणात्मक मुद्दा असून त्यावर सरकार निर्णय घेईल. नंतर आम्ही आमचे म्हणणे सादर करू.

भारतात चोवीस तासांत ६,५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू :
  • देशातील करोना रुग्णांची सख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे. दिवसागणिक करोनचा विळखा आधिक घट्ट होत चालला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ५८ हजार ३३३ इतकी झाली असून ६७ हजार ६९२ रुग्ण बरे झाले आहेत.

  • ४,५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ६,५६६ नवे रुग्ण आढळले असून १९४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात ८६ हजार ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते आता ४२.४ टक्क्य़ांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

  • जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरातील २१३ देशात करोना व्हायरस या महामारीने विळखा घातला आहे. जगात आतापर्यंत ५७ लाख ८९ हजार ८४३ जणांना संसर्ग झाला आहे. तर तीन लाख ५७ हजार ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत २४ लाख ९७ हजार ६१८ जणांनी करोनावर मात केली आहे.

… म्हणून वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना देणार ७५ हजार रुपये; गुगलचा ‘सुंदर’ निर्णय :
  • गुगलने मंगळवारी कंपनीची जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये असणारी कार्यायले सुरु करण्यासंदर्भातील माहिती दिली. १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ६ जुलैपासून कार्यालये सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सप्टेंबरपर्यंत कर्मचारी संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच घरुन काम करणाऱ्यांसाठीही कंपनीने विशेष घोषणा केली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

  • गुगलबरोबरच फेसबुकनेही मार्चच्या सुरुवातीपासूनच आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करण्याची मूभा दिली होती. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता.

  • घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगलने एक हजार डॉलर किंवा या मुल्या इतका निधी प्रत्येक देशात घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. घरुन काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मग अगदी इलेक्ट्रीक गॅजेट्सपासून ते फर्निचरपर्यंतच्या गोष्टी घेण्यासाठी हा निधी देण्यात येणार असल्याचे गुगलनं म्हटलं आहे. २०२० वर्ष संपेपर्यंत अनेक कर्मचारी घरुन काम करण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

२८ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.