नवी दिल्ली: भारतीयांनी परदेशी उत्पादनांना पर्याय असलेल्या भारतीय वस्तू वापरण्याचा संकल्प नवीन वर्षांच्या निमित्ताने करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले.
या वर्षांतील शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी म्हणाले, ‘‘आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेला लोकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता उत्पादक आणि उद्योजकांनी जागतिक दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करावे.’’ सरते वर्ष आत्मनिर्भर भारताचे प्रतिध्वनी उमटवणारे ठरले, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी गुरु गोविंद सिंग, माता गुजरी, श्रीगुरु तेग बहादूरजी यांना आदरांजली वाहिली. त्यांचा त्याग आणि करुणेचा उल्लेखही केला.
नवी दिल्ली : महिनाभरापूर्वी करोनाचा संसर्ग झालेले नृत्य इतिहासकार व समीक्षक सुनील कोठारी यांचे रविवारी सकाळी दिल्ली येथील रुग्णालयात निधन झाले, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांना पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९३३ रोजी मुंबईत झाला. ते चार्टर्ड अकाउंटंट होते. नंतर ते भारतीय नृत्य प्रकारांच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी वीस पुस्तके लिहिली असून त्यात भारतीय नृत्य प्रकारांवर नवा प्रकाश टाकला आहे. त्यात सत्रिया डान्सेस ऑफ आसाम, न्यू डायरेकशन्स इन इंडियन डान्स ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. भरतनाटय़म, ओडिशी, छाहू, कथ्थक, कुचीपुडी या नृत्य प्रकारांवर त्यांनी लेखन केले.
रबींद्र भारती विद्यापीठाच्या उदय शंकर अध्यासनाचे ते प्रमुख होते. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या नृत्य विभागात अध्यापन केले. ते फुलब्राइट प्राध्यापकही होते.
३१ डिसेंबपर्यंत सरकारी घर खाली करण्याच्या नोटिसा ज्यांना देण्यात आल्या होत्या, त्यात त्यांचा समावेश होता. त्यावर त्यांनी आपल्याला अवमानकारक वागणूक देण्यात येत असल्याचे म्हटले होते.
टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थांनी घेतली आहे.
बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी करोना टाळेबंदीतही मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही. त्यांच्या शाळेत ४० विद्यार्थी शिकतात. आई-वडिलांकडे स्मार्टफोन नसल्याने जाधव यांनी दूरसंवादाच्या (कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांना सहज आकलन होण्यासाठी गोष्टींचा वापर केला. मोठय़ा मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला.
जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली. या अभिनव कार्यासाठी त्यांना २४ डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह अॅवॉर्डस पुरस्कारा जाहीर झाला. त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला.
आर्सेनलने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये शनिवारी मध्यरात्री चेल्सीवर ३-१ असा विजय मिळवला. जवळपास दोन महिन्यांतील आर्सेनलचा हा पहिला विजय ठरला.
अलेक्झांडे लाकाझेट्टे याने ३५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर पहिल्या सत्राच्या अखेरीस ग्रॅनिट झाका याने फ्री-किकवर अप्रतिम गोल करत आर्सेनलला २-० अशा आघाडीवर आणले.
बुकायो साका याने ५६व्या मिनिटाला तिसऱ्या गोलची भर घालत आर्सेनलला मोठी आघाडी मिळवून दिली. अखेर चेल्सीने चॅमी अब्राहमच्या (८५व्या मिनिटाला) गोलमुळे सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अतिरिक्त वेळेत चेल्सीला पेनल्टी-किक मिळाली. पण जॉर्गिन्योने मारलेला फटका आर्सेनलचा गोलरक्षक बेर्नार्ड लेनो याने अडवला. आर्सेनलने या मोसमातील खराब सुरुवातीनंतर १४वे स्थान प्राप्त केले आहे. चेल्सी मात्र २५ गुणांसह सातव्या स्थानी आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.