‘चांद्रयान-३’ नव्या भारताच्या जिद्दीचे प्रतीक; ‘मन की बात’मध्ये मोदींचे गौरवोद्गार
- ‘‘भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाने हे सिद्ध केले, की संकल्पाचे सूर्य चंद्रावरही उगवतात. ही मोहीम कुठल्याही परिस्थितीत जिंकायचेच, या ‘नव्या भारता’चे प्रतीक बनली आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी काढले. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक संवाद सत्राच्या १०४ व्या भागात मोदींनी श्रोत्यांशी संवाद साधला.
- देशवासीयांना आपल्या कुटुंबातील सदस्य संबोधून मोदी म्हणाले, की हे यश प्रत्येकाच्या प्रयत्नाने साकारले आहे. ‘चांद्रयान-३ ’च्या यशामुळे श्रावणातील सणांचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे. चांद्रयानाला चंद्रावर पोहोचून तीन दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तरीही हे यश इतके मोठे आहे की त्याची चर्चा करावी तितकी कमीच आहे.
- चांद्रयान मोहीम नारीशक्तीचे बोलके उदाहरण असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की त्याला नारीशक्तीचे सामथ्र्य लाभल्याने अशक्य गोष्टीही शक्य झाल्या. या मोहिमेत अनेक महिला वैज्ञानिक आणि अभियंता सक्रिय सहभागी होत्या. प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापन अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. भारतीय कन्या आता अनंत अवकाशालाही आव्हान देत आहेत. जेव्हा एखाद्या देशाच्या मुली इतक्या महत्त्वाकांक्षी बनतात तेव्हा त्या देशाला विकासापासून कोण रोखू शकेल?
- ‘अभी तो सूरज उगा है’ ही कविता वाचून पंतप्रधान म्हणाले की, २३ ऑगस्ट रोजी चांद्रयानाने हे सिद्ध केले की संकल्पाचे काही सूर्य चंद्रावरही उगवतात. आज प्रत्येकाची स्वप्ने मोठी असून, प्रयत्नही अथक आहेत. त्यामुळेच देशाने एवढी उंची गाठली आहे.
पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! बुडापेस्टमध्ये रचला इतिहास
- तमाम भारतीयांच्या आशा पूर्ण करत भालाफेकपटू नीरज चोप्रानं रविवारी मध्यरात्री देशाला जागतिक अॅखलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिलं. या विजयासह नीरज चोप्रानं इतिहास घडवला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र आपल्या भात्यात जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.
अर्शद नदीमचं कडवं आव्हान!
- पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला मोठं आव्हान होतं. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असं चित्र दिसत होतं. झालंही तसंच. अर्शदनं पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं. मात्र, नदीमला लीलया मागे टाकत नीरजनं सुवर्णपदक मिळवलं!
नीरजचा ‘गोल्डन थ्रो’
- नीरज चोप्रानं नदीमला मागे टाकताना तब्बल ८८.१७ मीटरच्या टप्प्यावर भालाफेक केली. खरंतर नीरजच्या सर्वोत्तम पाच कामगिरींपेक्षाही हा टप्पा कमी असला, तरी त्याला इतिहास घडवण्यासाठी आणि भारताच्या नावावर पहिलं सुवर्णपदक करण्यासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली. याआधी ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजनं सुवर्णपदक पटकावलं आहे.
- नीरजबरोबरच पाचव्या स्थानी भारताकडून किशोर जेना (८४.७७ मीटर) आणि सहाव्या स्थानी डी. पी. मनू (८४.१४ मीटर) यांच्या कामगिरीनं भालाफेक प्रकारात भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज, राज्य मंडळाने केली घोषणा
- राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (२८ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
- राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेतली. अतिवृष्टीमुळे तीन परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा घ्यावी लागली. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
- राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी ( २८ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. http://www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील, या माहितीची प्रत घेता येईल. निकालानंतर गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
‘एआय’च्या नैतिक उपयोगासाठी प्रयत्नांची गरज; ‘बी-२० परिषदे’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
- कृत्रिम प्रज्ञेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) नैतिक उपयोग करण्यात यावा. त्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रितपणे उपाय शोधणे आवश्यक आहे. तसेच कूटचलनासंदर्भात (क्रिप्टोकरन्सी) एकात्मिक जागतिक धोरण निश्चित गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
- ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’तर्फे (सीआयआय) आयोजित ‘बी-२० समिट इंडिया-२०२३’ परिषदेत मोदी बोलत होते. आंतरराष्ट्रीय ग्राहक सेवा दिन साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातील पूर्वग्रह आणि समाजावर होणाऱ्या त्यांच्या दुष्परिणामांविषयी मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ‘जी-२०’ राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या काही दिवस आधी, पंतप्रधानांनी कूटचलनाशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याचा आग्रह धरला आहे.
- मोदी म्हणाले, ‘कूटचलन (क्रिप्टोकरन्सी) हे एक आव्हान असून, ते हाताळण्यासाठी अधिक एकजुटीची गरज आहे. या संदर्भात सर्व संबंधितांच्या हीत रक्षणासाठी एक जागतिक आराखडा तयार केला पाहिजे. कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) संदर्भातही असाच दृष्टिकोन आवश्यक आहे. आज जग ‘एआय’बद्दल खूप उत्साह दाखवत आहे. परंतु या संदर्भात काही नैतिक बाबीही आहेत. त्याच्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या समस्याही सोडवल्या गेल्या पाहिजेत.’’ मोदींनी यावेळी उद्योग आणि सरकारने ‘एआय’चा नैतिक वापर निश्चित करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की विविध क्षेत्रांत निर्माण होणारी आव्हाने-अडथळय़ांना आपण समजून घेतले पाहिजे. ही समस्या जागतिक स्तरावर सोडवावी लागेल.