चालू घडामोडी आणि दिनविशेष - 27 नोव्हेंबर 2023

Date : 27 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘खेळाडूंमधील स्पर्धा वाढल्यामुळेच निवड चाचणीचा नियम आवश्यक’
  • आम्ही खेळत होतो, तेव्हा खेळाडूंमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. मात्र, आता देशांतर्गत पातळीवर ही स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेसाठी केलेला नियम आवश्यक असून, त्याकडे आपण कसे बघतो यावर नियम वाईट की चांगला हे ठरते, असे मत ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल योगेश्वर दत्तने व्यक्त केले.ऑलिम्पिक पात्रतेसाठी हंगामी समितीने कोटा मिळविणाऱ्या मल्लास आव्हानवीराशी लढावे लागेल आणि त्या लढतीतील विजेता ऑलिम्पिकला जाईल असा नियम केला आहे. या नियमाबद्दल कुस्ती वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. काही खेळाडूंनी बोलण्यास नकार दिला, तर योगेश्वरने नियम चांगला किंवा वाईट असे कुठलेच थेट विधान केले नाही.
  • ‘‘आम्ही खेळत असताना जो मल्ल देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून द्यायचा, तोच ऑलिम्पिकमध्ये खेळायचा. मात्र, आता हंगामी समितीने त्याबाबत केलेला नियम हे त्यांचे धोरण आहे. नियम बनवणे किंवा सुधारणे हे त्यांचे काम आहे. त्याचा आदर करणे हे खेळाडूचे काम आहे,’’ असे योगेश्वरने नमूद केले.‘‘आपण नियमाकडे कसे बघतो यावर तो योग्य आहे की अयोग्य हे ठरते. या नियमाला दोन बाजू आहेत. एक म्हणजे ज्या मल्लाचे ऑलिम्पिक खेळण्याचे उद्दिष्ट असेल, तो या लढतीसाठी तयारी करेल. दुसरी बाजू म्हणजे आपण कोटा मिळवूनही जाऊ शकत नाही याचे शल्य त्याला बोचत राहील,’’ असे योगेश्वर म्हणाला.

विनेशला खेळता यावे यासाठी नियम?

  • भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या विनेश फोगटसाठी हे सगळे प्रयत्न नाहीत ना, अशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव मल्ल अंतिम पंघाल ही ५३ किलो वजनी गटातील असून, विनेशही याच गटातून आंतरराष्ट्रीय पदक विजेती आहे. आव्हानवीरांची नावे ३१ मे रोजी निश्चित केली जातील असे सांगतिले जात असले, तरी आतापासूनच अंतिमविरुद्ध विनेश अशी लढत होईल, असेच चित्र आहे.
भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
  • प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारायची आणि नंतर त्या धावसंख्येचा यशस्वी बचाव हे सूत्र अवलंबत भारतीय संघाने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला.
  • या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. 
कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगडला विजेतेपद
  • कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगडने पुन्हा एकदा विजेतेपद राखले. नवीमुंबई पोलीस दल उपविजेता संघ ठरला. तर रत्नागिरी तृतीय स्थानी राहीला. रत्नागिरीची शितल संभाजी पिंजरे महिला गटात तर पालघरचा आफताब खदुबुद्दीन सय्यद पुरूष गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले.
  • ४८ वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे पार पडल्या. पाच दिवस खेळविल्या गेलेल्या या स्पर्धांमध्ये रायगड पोलीस दलाने २२७ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांना रायगडचा संघ विभागात अव्वल ठरला. तर नवी मुंबई पोलीस दलाने १८५ गुण मिळवत उपविजेतेपद कायम राखले. गेल्या वर्षीही नवी मुंबई पोलीस दलाने उपविजेतेपद पटकावले होते. रत्नागिरी पोलीस दल ४७ गुण मिळवत स्पर्धेत तृतीय क्रमांकावर राहीला.
  • २० नोव्हेंबर पासून खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, पालघर, ठाणे ग्रामीण सह नवीमुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस खेळाडू सहभागी झाले होते. यात नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील १३५, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील ४५, ठाणे ग्रामिण मधील ७४, रायगड मधील १६३, रत्नागिरीतील ६०, सिंधुदूर्ग मधील ७१, पालघर मधील १२२ अशा एकूण एकूण ६८१ स्पर्धकां चा समावेश होता. सात सांघिक, तर ९ वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ही स्पर्धा पार पडली. यात प्रामुख्याने हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅन्डबॉल, कबड्डी, खो-खो, क्रॉसकंट्री तसेच वैयक्तीक प्रकारामध्ये कुस्ती, ज्युदो, वेट-लिफ्टींग, जलतरण, बॉक्सींग,अॅथलेटीक्स, वू-शू, त्वायकांदो अशा वैयक्तीक खेळ प्रकारांचा समावेश होता.
  • स्पर्धेतील विजेत्यांना श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त मिरा भाईदर आयुक्तालय, आमदार अनिकेत तटकरे, रायगडचे पोलीस अधिक्षक, सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, नवी मुंबईचे सहआयुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना राष्ट्रपतींची श्रद्धांजली
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना तसेच नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. भारतीयांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी पुनश्च दृढ संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  • २६ नोव्हेंबर २००८ रोजी, पाकिस्तानातील दहा ‘लष्कर-ए-तैयबा’च्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईत घुसून हल्ला केला होता. या हल्ल्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ नागरिक मृत्युमुखी पडले होते. अनेक जण जखमी झाले.
  • मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील सर्व पीडितांच्या स्मृतींना राष्ट्र उजाळा देत आहे. शूर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत कायम आहोत. मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सुरक्षा दलाच्या शूर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून, सर्वत्र सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्याची आपली प्रतिज्ञा पुन्हा करूया, असे मुर्मू यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.
वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे ‘पेटीएम’मधून बाहेर
  • वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेने डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’मधील संपूर्ण २.४६ टक्के समभागांची विक्री केली. सुमारे १,३७१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खुल्या बाजारातून विक्री करण्यात आली. बर्कशायर हॅथवे इंकने तिच्या संलग्न बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सद्वारे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर पेटीएमचे १.५६ कोटीपेक्षा जास्त समभागांची विक्री केली. या समभागांची प्रत्येकी ८७७.२९ रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली.
  • दरम्यान, कॉप्थॉल मॉरिशस इन्व्हेस्टमेंटने ७५.७५ लाख समभाग आणि घिसालो मास्टर फंड एलपीने सुमारे ४२.७५ लाख समभागांची खरेदी केली आहे. म्हणजेच पेटीएममधील त्यांची हिस्सेदारी आता अनुक्रमे १.१९ टक्के आणि ०.६७ टक्के आहे. शुक्रवारच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजारात ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा समभाग ३.०८ टक्क्यांनी ८९५ रुपयांवर बंद झाला.
  • सप्टेंबर अखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत पेटीएमचा एकत्रित तोटा २९१.७ कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला ५७१.५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सरलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल सुमारे ३२ टक्क्यांनी वाढून २,५१८.६ कोटींवर पोहोचला आहे. जो एका वर्षापूर्वी १,९१४ कोटी रुपये होता.
चीनमध्ये नव्या आजाराचा उद्रेक
  • चीनमधील बालकांमध्ये ‘एच९एन२’ (एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस) आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाला असल्याने करोनासारखाच या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आजारांचा भारताला धोका कमी असून केंद्र सरकारचे याकडे बारकाईने लक्ष असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. या आजारांमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यास लढा देण्यास तयार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
  • चीनच्या उत्तर भागांत काही बालकांना ‘एच९एन२’ आणि श्वसनविकार यांचा प्रादुर्भाव झाला असून या आजारांचा मोठय़ा प्रमाणात प्रसार होत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले.
  • जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत निवेदन जारी केले आहे. चीनमध्ये गेल्या महिन्यात ‘एच९एन२’चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. या आजाराविरोधात लढण्यासाठी चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला आहे. ‘एच९एन२’च्या संसर्गाचा प्रसार वेगाने होत नसून मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे आढळले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

‘डब्ल्यूएचओ’ची निरीक्षणे..

  • जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले की, चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी बालकांमध्ये ‘एच९एन२’, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूच्या वाढत्या प्रकरणांसह अनेक संसर्गजन्य श्वसनरोगांची नोंद केल्यानंतर या आजारांच्या वाढीबद्दल तपशीलवार माहिती चीनकडे मागितली आहे.
  • ‘डब्ल्यूएचओ’ने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या ‘एच९एन२’च्या प्रकरणांमध्ये एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे. त्याशिवाय या आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी आहे.

27 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.