चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ नोव्हेंबर २०२१

Date : 27 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अल्फा, डेल्टानंतर आता - ‘या’ नावानं ओळखला जाणार करोनाचा नवा व्हेरिएंट; WHO नं केलं जाहीर : 
  • करोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत असल्याची चिन्हं दिसत असतानाच आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. करोनाच्या या नव्या B.1.1.529 व्हेरिएंटचं आता जागतिक आरोग्य संघटनेने नावही निश्चित केलं आहे.

  • पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या करोना व्हेरिएंटला ओमीक्रोन हे नाव दिल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेनं सांगितलं की आत्तापर्यंत B.1.1.529 या नावाने ओळखला जाणारा हा व्हेरिएंट करोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने प्रसार होणारा असून यामुळे होणारा संसर्गही गंभीर स्वरुपाचा आहे. तसंच ज्यांना आधी करोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.

  • हेही वाचा - भारतीयांनो सावधान! ‘तो’ पुन्हा आलाय; दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट

  • भारतात सर्वप्रथम आढळलेल्या आणि नंतर जगभरात पसरलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही हा नवा व्हेरिएंट अधिक घातक आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तज्ज्ञांनाही ओमीक्रोनच्या उगमाबद्दल ठोस अशी माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेसह बेल्जियम, बोटस्वाना, हाँगकाँग आणि इस्राइल या देशांमध्ये आढळून आल्याची माहिती हाती आली आहे.

गोंडवाना विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार :
  • गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ ची लेखी परीक्षा १० जानेवारी २०२१ पासून ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा बहुपर्यायी व ओएमआर शिट पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवण्यात येणार आहे.

  • मागील दोन वर्षे करोनामध्ये गेल्याने देशातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. नुकत्याच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या सभा पार पडली. या सभेत ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हिवाळी २०२१ ची लेखी परीक्षा १० जानेवारी २०२१ पासून ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा बहुपर्यायी व ओएमआर शिट पद्धतीने घेण्यात आहे.

  • विद्यार्थ्यांना एका तासाच्या अवधीची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला १ गुण असे एकूण ५० गुणांचा पेपर होणार आहे. यामध्ये चुकींच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाही. करोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा केंद्रांवर गर्दी टाळता यावी यासाठी चार पाळीत म्हणजे सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत परीक्षा घेतल्या जाणार आहे.

  • गोंडवाना विद्यापीठाने सीजीएस अभ्यासक्रमातील बदल करुन सीबीसीएस अभ्यास प्रणाली शैक्षणिक सत्र २०१६-१७ पासून अंमलात आणलेली आहे. त्याअनुषंगाने जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम पास करण्याकरिता विद्यापीठ समितीच्या सूचनेनुसार संधी देण्यात आली आहे.

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय :
  • यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवला.

  • मुंबईने गुजरातचा सात गडी आणि ४८ चेंडू राखून धुव्वा उडवत अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. वेगवान गोलंदाज सक्षमने (४/२२) गुजरातचा डाव ४६.४ षटकांत २२७ धावांत गुंडाळला. मग यशस्वी-अरमानच्या ११३ धावांच्या सलामीमुळे मुंबईने ४२ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले.

  • विजयानंतरही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर - सलामीवीर डी. एस. पटनागरेच्या (११७ धावा) शतकाच्या बळावर महाराष्ट्राने चंडीगडवर १२ धावांनी सरशी साधली. या विजयानंतरही ‘क’ गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने महाराष्ट्राने गाशा गुंडाळला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ७ बाद ३३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमृत लुबानाच्या शतकानंतरही चंडीगडला ५० षटकांत ८ बाद ३२५ धावांपर्यंतच मजल मारता आली.

अस्थाना यांच्या नियुक्तीप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस :
  • ज्येष्ठ आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी होकार दिला.

  • याप्रकरणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या पीठाने केंद्र सरकार आणि अस्थाना यांना नोटीस जारी केली असून त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. दी सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थेने ही याचिका केली आहे.

  • अस्थाना हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्याच्या चार दिवस आधी त्यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्याविरुद्ध या संस्थेने अपील केले असून याचिकेद्वारे दाद मागितली आहे. या संस्थेतर्फे अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अस्थाना यांच्या नियुक्तीविरोधात १८ नोव्हेंबर रोजी अपील दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानातील ‘२६-११’ खटला वेगाने चालवण्याची मोदींकडून समज :
  • मुंबईवरील २६-११च्या हल्ल्याच्या जखमा भारत विसरू शकत नाही, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्या हल्ल्याच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त व्यक्त केली. पाकिस्तानने २६-११च्या हल्ल्यासंदर्भातील खटला वेगाने आणि क्षमतेने चालवावा, असे त्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनाही बजावण्यात आले आहे.

  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने २६-११च्या हल्ल्यासंदर्भात शुक्रवारी एक लघू ध्वनिचित्रफीत प्रसारित केली आहे. त्यातील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ‘‘आजचा भारत दहशतवादाशी नव्या धोरणानुसार आणि नव्या मार्गांनी लढत आहे,’’ असेही मोदी यांनी म्हटले आहे. 

  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनात मुंबईवरील हल्ला प्रकरणाची सुनावणी वेगाने करण्यात यावी, या भारताच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच आपल्या नियंत्रणाखालील भूभाग भारताविरोधातील दहशतवादी कारवायांसाठी वापरू न देण्याचा शब्द पाकिस्तानने पाळावा, असेही बजावण्यात आले आहे. २६-११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात आखण्यात आला, तेथूनच तो अमलात आणला गेला, असेही भारताने या निवेदनात स्पष्ट केले आहे.

वर्षभरानंतर अखेर भारतातील विमानसेवा सुरू होणार, ‘या’ दिवसापासून प्रवास करता येणार :
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा अखेर वर्षभरानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत घोषणा केलीय.

  • त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचंही नमूद करण्यात आलंय.

  • दोन दिवसांपूर्वीच नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच पूर्ववत होण्याचे संकेत दिले होते.

  • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवेसंदर्भात केंद्र सरकारने २२ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा बंद केली होती. या स्थगितीची मुदत ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली होती. यानुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि १० वर्षांखालील मुलांनी घरातच रहाण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात राज्य सरकारांनी निर्देश जारी करावेत अशी सूचनाही भारत सरकारने केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी क्षेत्राने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी असेही सरकारने म्हटले होते.

२७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.