चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ नोव्हेंबर २०२०

Date : 27 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संविधान लोकांना समजले पाहिजे :
  • अलीकडे आपण नो युवर कस्टमर (केवायसी) हा शब्द सातत्याने ऐकतो. याचा अर्थ ‘ग्राहकाला जाणून घ्या’ असा होतो. आता त्याचा अर्थ ‘नो युवर कॉन्स्टिटय़ुशन’ म्हणजे आपले संविधान समजून घ्या असा घेता येईल. देशातील नागरिकांना संविधानाची माहिती असली पाहिजे, त्याची जाण व्यापक झाली पाहिजे. त्यासाठी लोकांना संविधान समजावून सांगणेही गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८० व्या परिषदेत व्यक्त केले.

  • नव्या पिढीला संविधानामध्ये नेमके काय आहे हे समजले पाहिजे, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये सातत्याने जागरूकता मोहीम राबवली पाहिजे. संविधान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते तरुण पिढीत अधिक लोकप्रिय केले पाहिजे, त्यासाठी अभिनव मोहीम राबवण्याचा सल्ला मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांना दिला.

  • आपल्या संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याला महत्त्व दिले गेले आहे. महात्मा गांधीही त्याबद्दल आग्रही असत. नागरिकांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य हे एकमेकांशी जोडलेले असतात. नागरिक आपले कर्तव्य पार पाडतात तेव्हा त्यांच्या हक्कांचेही रक्षण होते यावर गांधीजींचा विश्वास होता. नागरिकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल अशी अपेक्षा संविधानातही व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वानी आपल्या संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षांपासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभरा साजरा केला जातो.

राष्ट्रहिताच्या कामात राजकारणाचा अडथळा नको, एक देश एक निवडणूक ही देशाची गरज - पंतप्रधान :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केवडिया येथे संविधान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच ही जखम आपण कधीही विसरु शकणार नसल्याचंही म्हटलं. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचा उल्लेख करत ती काळाची गरज असल्याचं म्हटलं.

  • “एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला पाहिजे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “आपण पूर्णत: डिजिटल होण्याकडे वाटचाल करणं आवश्यक आहे. कागदांचा वापरही पूर्णपणे बंद केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्षाकडे पाहता आपण हे लक्ष्य साधलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

  • “संविधानाच्या संरक्षणात न्यायपालिकांची भूमिका महत्त्वाची आहे. ७० च्या दशकात ते भंग करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु संविधानानं त्याचं उत्तर दिलं. आणीबाणीनंतर यंत्रणा अधिक मजबूत होत गेलली आणि आपल्याला खुप काही शिकायलाही मिळालं,” असंही त्यांनी नमूद केलं. प्रत्येक नागरिकाला संविधान समजून घेण्याची गरज आहे. संविधानाच्याच मार्गानं सर्वांनी चाललं पाहिजे.

‘दहशतवादाचा मुद्दा भारत जागतिक स्तरावर मांडत राहील’ :
  • सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि त्या दहशतवादापासून जगाला असलेल्या धोक्याचा केंद्रबिंदू कोठे आहे आदी मुद्दे भारत सातत्याने जागतिक स्तरावर ठामपणे मांडत राहील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास गुरुवारी १२ वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने भारताने पाकिस्तानचा संदर्भ देत वरील बाब स्पष्ट केली.

  • भारतातील सुरक्षा दले ज्या धैर्याने देशाचे रक्षण करीत आहेत त्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कौतुक केले. सीमेपलीकडून भारताविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कारवाया भारत सातत्याने जागतिक स्तरावर मांडत राहील, असे जयशंकर यांनी ट्वीट केले आहे.

  • जयशंकर हे बाहरिन, संयुक्त अरब अमिरात आणि सेशल्स या तीन देशांच्या दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांचे येथे आगमन झाले. करोनाने जगभरात थैमान घातले असताना जयशंकर दौऱ्यावर आले आहेत त्यामुळे त्याला महत्त्व आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स :
  • भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या करोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून कामाच्या अनेक ऑफर येत आहेत. कोविडच्या उद्रेकानंतर आता जगभरात कामाची ही नवी पद्धत रुजू पाहत आहे.

  • इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जगभरातील अनेक कंपन्या भारतातील हायप्रोफाईल टेक्निकल टॅलेंटच्या शोधात आहेत. करोनाचा काळ सुरु होण्यापूर्वी या प्रोफेशनल्सना जेवढी मागणी होती त्यापेक्षा दोन ते तीन टक्के जास्त मागणी सध्या या लोकांना मिळत आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं आहे.

  • या हायप्रोफाईल टेकीजना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आशियातील Instahyre, Interviewbit, Rocket, Techfynder, CIEL HR Services and Pesto Tech यांसारख्या कंपन्या कामावर रुजू करुन घेण्यास उत्सुक आहेत.

  • इन्स्टाहायरचे सहसंस्थापक सरबोजित मलिक बिझनेस लाईनशी बोलताना म्हणाले, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कंपन्या नवी भरती करण्यास उत्सुक नव्हत्या. त्यांचा व्यवसाय थंड पडला होता. मात्र, त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या काळात भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. इन्स्टाहायर सध्या ८,७०० कंपन्यांसोबत काम करत आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५,३०० इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा महसूलही तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बहुतकरुन त्यांचे क्लायन्ट्स हे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील आहेत.

ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची सावध सुरुवात :
  • लॉकडाउनपश्चात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून सिडनीच्या मैदानावर दोन्ही संघ पहिल्या वन-डे सामन्यासाठी समोरासमोर येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड दौरा आटोपून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेली नाही.

  • आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्व भारतीय खेळाडू व्यस्त असल्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला. त्यामुळे पहिलाच सामना ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यासोबत असल्यामुळे विराटसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे.

  • टीम इंडिया सध्या दुखापतींशी झुंज देते आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे वन-डे आणि टी-२० संघात स्थान मिळालेलं नाही. कसोटी संघात रोहित खेळेल की नाही याबद्दलही साशंकता आहे. त्यात भर म्हणून पहिल्या सामन्याआधी युवा गोलंदाज नवदीप सैनीच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे निवड समितीने टी. नटराजनला भारतीय संघात स्थान दिलं आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघातील युवा खेळाडूंसमोर स्वतःला मिळालेल्या संधीचं सोनं करत आपलं स्थान निश्चीत करण्याची चांगली संधी आहे.

  • विराट कोहलीच्या साथीला यंदा लोकेश राहुल हा उप-कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

२७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.