चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ मे २०२०

Updated On : May 27, 2020 | Category : Current Affairsशाळा-कॉलेज सुरु करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही - केंद्रीय गृहमंत्रालय :
 • देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यम्यांनी दिल्याने आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून यासंबंधी ट्विट करण्यात आलं आहे. “केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभराती सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत,” अशी माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.

 • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच शाळा, कॉलेज बंद आहेत. दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने सर्व पालकांना शाळा पुन्हा कधी सुरु होणार हा प्रश्न सतावत आहे. सोबतच लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला होता. यानंतर ३ मे आणि १७ मे रोजी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली. सध्या लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, अझिथ्रोमायसिन हानिकारक :
 • हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अझिथ्रोमायसिन या दोन औषधांचा वापर करोना रुग्णांवर करण्यात येत असला तरी ही दोन्ही औषधे घातक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. या दोन्ही औषधांचा हृदयावर विपरीत परिणाम होत असतो असे सांगण्यात आले.

 • विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आताच्या काळात हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे घातक परिणाम लक्षात घेऊन या औषधाच्या करोना रुग्णांवरच्या चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस घेब्रेसस यांनी सांगितले.

 • व्हँडरबिल्ट विद्यापीठ व स्टॅनफर्ड विद्यापीठ या अमेरिकेतील दोन संस्थांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या माहितीचा वापर करून असे म्हटले आहे,की १३० देशातील २.१० कोटी लोकांना १४ नोव्हेंबर १९६७ ते १ मार्च २०२० दरम्यान जी औषधे देण्यात आली त्यांचा अभ्यास केला असता हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधांमुळे हृदयावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

 • करोनाच्या आधीपासून ही औषधे वापरात आहेत. पण आता ती करोनावरील उपचारात समाविष्ट करण्यात आली आहेत. अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधाने हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याचे दिसून आले आहे. २.१ कोटी लोकांपैकी ७६८२२ लोकांमध्ये या काळात वाईट परिणाम झाले होते.

अमेरिकेतील कंपनीची लस मेलबर्नमध्ये सहा जणांना टोचली :
 • अमेरिकेतील ‘नोवावॅक्स’ या कंपनीने करोनावर तयार केलेल्या लशीच्या चाचण्या ऑस्ट्रेलियात सुरू करण्यात आल्या असून एकूण १३१ स्वयंसवेकांना ही लस टोचून त्याची परिणामकारकता तपासली जाणार आहे असे कंपनीचे प्रमुख डॉ. ग्रेगरी ग्लेन यांनी सांगितले. मंगळवारी मेलबर्नमध्ये सहा जणांना लस टोचण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या न्युक्लीयस नेटवर्कचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ  पॉल ग्रिफीन यांनी दिली आहे.

 • अमेरिका, चीन व युरोप हेच लस तयार करण्याच्या प्रयत्नात आघाडीवर असून अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने तसेच ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठानेही लस तयार केली आहे. पण त्यांच्या चाचण्या होऊन प्रत्यक्ष वापरात येण्यास अजून किमान बारा महिने लागू शकतात.

 • नोव्हाव्ॉक्स कंपनीची लस प्राण्यांमध्ये सुरक्षित ठरली असून या लशीचे १० कोटी डोस २०२१ पर्यंत तयार करण्यात येणार आहेत त्यासाठी १.५ अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. या लशीचे नाव एनव्हीएक्स सीओव्ही २३७३ असून नार्वेतील कोअ‍ॅलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेर्डनेस इनोव्हेशन्स या संस्थेने त्यात ३८८ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

करोनाचा फटका; एका डॉलरला विकली मीडिया कंपनी, पत्रकार बनणार मालक :
 • करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे उद्योगधंदे ठप्प झाले आहे. दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे. परिणामी अनेक मोठमोठ्या कंपन्या डबघाईला आल्या आहेत.

 • अशीच काहीशी अवस्था मीडिया कंपन्यांचीही झाली आहे. आर्थिक टंचाईमुळे बेजार झालेली ‘स्टफ’ ही न्यूझीलंडमधील नामांकित मीडिया कंपनी केवळ एक न्यूझीलंड डॉलरला विकली गेली आहे.

महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात असमर्थ, ८५ ऐवजी २७ ट्रेनच सुटल्या - पीयूष गोयल :
 • केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि राज्य सरकारमधील संघर्ष अद्यापही सुरु असल्याचं चित्र आहे. पीयूष गोयल यांनी पुन्हा एकदा ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारकडून मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत १४५ पैकी ८५ ट्रेन सुटणं अपेक्षित होतं.

 • पण राज्य सरकारकडून प्रवाशांची व्यवस्था करण्यात न आल्याने फक्त २७ ट्रेनच सुटू शकल्या असं ट्विट पीयूष गोयल यांनी केलं आहे. महाराष्ट्र सरकारला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की, गरीब मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत करावी असंही ते म्हणाले आहेत.

 • पीयूष गोयल यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राने १४५ ट्रेन मागितल्यानंतर आम्ही रात्रभर आढावा घेतला. यानंतर योजना तयार करुन १४५ ट्रेन पोहोचवल्या. महाराष्ट्रात १४५ ट्रेन उभ्या आहेत, पण त्यांच्यासाठी प्रवासीच नाहीत. महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरत आहे. त्यांची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे”. महाराष्ट्र सरकारने जेवढ्या ट्रेन मागितल्या तेवढ्या आम्ही दिल्या. पण प्रवासीच नसल्याने विनाप्रवासी ट्रेन पुन्हा परतत आहेत असंही ते म्हणाले आहेत.

भारतीय अमेरिकी जोडप्याकडून कमी खर्चात व्हेंटिलेटर निर्मिती :
 • भारतीय अमेरिकी जोडप्याने कमी खर्चातील आपत्कालीन व्हेंटिलेटर तयार केला असून तो लवकरच उत्पादनाच्या टप्प्यात येत आहे. तो भारतातही उपलब्ध होणार असून कोविड १९ रुग्णांवरील उपचारात त्यामुळे मदत होणार आहे. करोना साथीच्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता असताना जॉर्जिया टेकच्या जॉर्ज डब्ल्यू व्रुडफ स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनियरिंगचे प्रा. देवेश रंजन व अ‍ॅटलांटात डॉक्टर असलेली त्यांची पत्नी कुमुदा रंजन यांनी हा व्हेंटिलेटर विकसित केला आहे. 

 • तीन आठवडय़ात त्यांनी त्याची निर्मिती केली आहे. जर त्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केले तर त्याची उत्पादन किंमत १०० डॉलर्स राहील. त्यामुळे अगदी पाचशे डॉलर्सला विकूनही त्यात पुरेसा पैसा कमावूनही आरोग्यसेवा करता येऊ शकते.  या व्हेंटिलेटरची सध्या अमेरिकेतील किंमत १० हजार डॉलर्स आहे, त्यामुळे तो पाचशे डॉलर्समध्ये मिळणार असेल तर ती मोठीच गोष्ट आहे. या व्हेंटिलेटरच्या मदतीने  शरीराची सर्व श्वसन प्रक्रियाच ताब्यात घेतली जाते, पण असे फुफ्फुसे काम करीत नसतील तरच केले जाते.

 • व्हेंटिलेटरमुळे शरीराला संसर्गातून बाहेर पडण्यास वेळ मिळतो. अर्थात हा जो व्हेंटिलेटर आहे तो आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभागात वापरतात तेवढा आधुनिक व्हेटिंलेटर नाही. हा ओपन एअरव्हेन्ट जीटी व्हेंटिलेटर असून तीव्र श्वास विकारात त्याचा वापर करतात. कोविड १९ आजारात फुप्फुसांची लवचिकता कमी होतो. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज असते.

 • जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने हा व्हेंटिलेटर तयार केला असून त्यात इलेक्ट्रॉनिक संवेदक व संगणक नियंत्रण आहे. कमी खर्चात व्हेंटिलेटर तयार करणे हा या प्रकल्पाचा हेतू असल्याचे कुमुदा यांनी म्हटले आहे. रंजन यांचा जन्म बिहारमधील पाटण्याचा असून त्यांनी त्रिची येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली, नंतर विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातून पीएचडी केली.

२७ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)