चालू घडामोडी आणि दिनविशेष - 27 मार्च 2023

Date : 27 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्विस खुली बॅडिमटन स्पर्धा : सात्विक-चिरागला जेतेपद
  • भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने वर्चस्वपूर्ण कामगिरी सुरू राखताना रविवारी स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील (सुपर ३०० दर्जा) पुरुष दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले.
  • दुसऱ्या मानांकित सात्विक-चिराग जोडीने चीनच्या रेन शिअँग यू आणि चान क्विअँग जोडीवर २१-१९, २४-२२ अशी सरळ गेममध्ये मात केली. भारतीय जोडीने हा सामना ५४ मिनिटांत जिंकला. सात्विक-चिराग जोडीचे हे नव्या हंगामातील पहिले जेतेपद ठरले. गेल्या आठवडय़ात झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेत सात्विक-चिरागला दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, स्विस स्पर्धेत त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला.
  • स्विस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी सायना नेहवाल (२०११, २०१२), किदम्बी श्रीकांत (२०१५), एचएस प्रणॉय (२०१६) आणि पीव्ही सिंधू (२०२२) यांनी एकेरीत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
  • सात्विक-चिरागला यंदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यांचे तीन सामने तीन गेमपर्यंत रंगले होते. अंतिम फेरीत दोनही जोडय़ांनी झुंजार खेळ केला, परंतु दोन्ही गेममध्ये मोक्याच्या क्षणी सात्विक-चिरागने आपला खेळ उंचावत जेतेपद मिळवले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘या’ चार शहरांची चर्चा! २३ एप्रिलला एक ठिकाण होणार निश्चित
  • आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये निश्चित होणार आहे. सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या निमंत्रण आलेल्या चार स्थळांना साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार असून, २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे.
  • महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा येथील संमेलनाला जेमतेम ८० दिवस झाले असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आता आगामी ९७ व्या साहित्य संमेलनाचे वेध लागले आहे. आगामी संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणांहून निमंत्रणे साहित्य महामंडळाकडे प्राप्त झाली आहेत.
  • साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर २३ एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या अहवालावर चर्चा होऊन आगामी संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली.
  • दोनच वर्षांपूर्वी म्हणजे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उदगीर येथे झाले होते. त्यामुळे जालना या स्थळाचा विचार होण्याची शक्यता कमी दिसते. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा, औदुंबर येथील औदुंबर साहित्य मंडळ आणि अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ या तीन स्थळांपैकी एकाचा विचार होईल, याकडे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले.
पोलीस हवालदारांची पदोन्नती अखेर मार्गी
  • राज्यातील ५२० पोलीस हवालदारांची पदोन्नती गेल्या वर्षभरापासून रखडली होती. आता पोलीस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करीत पात्र हवालदारांकडून संवर्ग-बंधपत्र मागितले आहेत.
  • पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती. यानुसार, ५२० पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीसाठी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, महासंचालक कार्यालयातील लालफीतशाहीमुळे पदोन्नती रखडली होती.  पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात केली. पदोन्नतीसाठी पात्र ३९७ पोलीस हवालदारांना नुकताच संवर्ग आणि बंधपत्र मागण्यात आला आहे.
  • नागपुरात १४ जणांना लाभ : पदोन्नतीसाठी नागपूर शहर आणि ग्रामीणमधून १४ पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. त्यात संजय तिवारी, राजेश वाकडे, सुरेंद्रकुमार पांडे, संजय आठवले, सुरेंद्र लामसोंगे, अनिल ब्राह्मणकर, सुरेश आठवले, संजयसिंह ठाकूर, राजेंद्र पाली, तिलोत्तम देवतळे, सुनील कामडी, अजय चौधरी, पुष्पपाल आकरे आणि नागोराव भुरे यांचा समावेश आहे. 
  • पोलीस उपनिरीक्षकांची २४५७ पदे रिक्त : राज्य पोलीस दलात सध्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या २४५७ जागा रिक्त आहेत. पोलीस दलात तपास अधिकाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे अनेक गुन्हे निकाली निघण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे २०१३ मधील उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिल्यास राज्य पोलीस दलात अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांची संख्या वाढेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘इस्रो’कडून ३६ उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण; व्यावसायिक मोहिमेची यशस्वी सांगता
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘एलव्हीएम३’ या सर्वात मोठय़ा प्रक्षेपणास्त्राच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह रविवारी प्रक्षेपित केले. सर्व उपग्रह नियोजित कक्षेत स्थिर झाले असून त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला आहे. ‘इस्रो’ची व्यावसायिक उपशाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया प्रा. लि.’ची ही दुसरी यशस्वी मोहीम आहे. 
  • कमी उंचीच्या कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट) एकूण ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने ब्रिटनच्या नेटवर्क अ‍ॅक्सेस असोसिएट्स लि. (वनवेब ग्रूप कंपनी) सोबत करार केला आहे. त्यातील पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. तर उर्वरित ३६ उपग्रहांचा दुसरा ताफा रविवारी सकाळी ९ वाजता तमिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या तळावरून प्रक्षेपित करण्यात आला.
  • उड्डाणानंतर प्रक्षेपणास्त्राने सर्व उपग्रह क्रमाक्रमाने त्यांच्या नियोजित  कक्षांमध्ये प्रस्थापित केले. त्यामुळे ‘एलव्हीएम३-एम३/ वनवेब इंडिया-२’ यी मोहिमेची यशस्वी सांगता झाल्याचे इस्रोने जाहीर केले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल एनएसआयएल, इस्रो आणि वनवेब यांचे अभिनंदन केले. ‘वन वेब’ने सर्व उपग्रहांशी यशस्वीरीत्या संपर्क प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.
इंटेल कंपनीचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन
  • इंटेल कंपनीचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं आज हवाई येथे निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. इंटेल कंपनी आणि गॉर्डन मूर फाउंडेशनने यासंदर्भात संयुक्त निवेदन जारी करत माहिती दिली आहे. सेमीकंडक्टरची निर्मिती आणि आजच्या काळात वापरले जाणारे संगणक विकसित करण्यात मूर यांचं मोठं योगदान होतं.
  • गॉर्डन अर्ले मूर यांचा जन्म ३ जानेवारी १९२९ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. मूर यांनी सेमीकंडक्टरची डिझाइन आणि त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मूर यांनी १९६८ साली काही सहकाऱ्यांसह इंटेल कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे नाव पूर्वी इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स असे होते. मूर हे १९७९ मध्ये इंटेलचे सीईओ बनले. त्यांनी आठ वर्षे सीईओ म्हणून काम केले.
  • मूर यांनी शेवटच्या काही वर्षात स्वत:ला सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात वाहून घेतलं होतं. गेल्या वर्षी इंटेलने त्यांच्या सन्मानार्थ ओरेगॉन येथील कार्यालयाला गॉर्डन मूर पार्क असं नाव दिलं होतं.
  • मूर यांच्या निधनानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शोक व्यक्त केला. मूर हे अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधानाने तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत, असे ते म्हणाले. याबरोबच अॅपलचे सीईओ टीम कूक यांनीही मूर यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली. मूर यांच्या निधनाने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे एक द्रष्टे व्यक्तीमत्त्व जगाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ते म्हणाले.
निखत झरीन सलग दुसऱ्यांदा ठरली वर्ल्ड चॅम्पियन, भारताला मिळाले तिसरे सुवर्णपदक
  • महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. निखत झरीनने ४८-५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. निखतने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी तामचा पराभव केला. जागतिक स्पर्धेत तिचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. निखतच्या आधी नीतू गंगस (४५-४८ किलो) आणि स्वीटी बोरा (७५-८१ किलो) यांनी शनिवारी वजन गटात सुवर्णपदक जिंकले होते. निखत जरीनचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे सुवर्णपदक आहे. तिने गेल्या वर्षी ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.
  • पहिल्या फेरीत निखतचे पूर्ण वर्चस्व होते. तिने विरोधी बॉक्सरला एकही संधी दिली नाही. पहिल्या फेरीतच तिने ५-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या व्हिएतनामच्या बॉक्सरने दमदार पुनरागमन केले. पण, निखतने संधी मिळताच विरोधी बॉक्सरवरही ठोशांचा पाऊस पाडला. मात्र, दुसरी फेरी व्हिएतनामच्या बॉक्सरने ३-२ अशी जिंकली.
  • तिसरी फेरीही चुरशीची झाली. निखत आणि व्हिएतनामच्या बॉक्सरने आपली पूर्ण ताकद दाखवली. प्रशिक्षकाने दिलेल्या मार्गाचा अवलंब करत निखतने विरोधी बॉक्सरपासून अंतर राखले आणि उत्कृष्ट अप्परकट आणि जॅब्स लावले. यानंतर रेफ्रींनी सामना थांबवून व्हिएतनामी बॉक्सरची स्थिती जाणून घेतली. इथूनच निखतचा विजय जवळपास निश्चित झाला होता आणि अखेरीस निखतने ही लढत ५-० अशी जिंकली आणि सलग दुसऱ्यांदा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे सुवर्णपदक जिंकले.

27 मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.