चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ मार्च २०२१

Date : 27 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ग्रँडमास्टर लेऑन मेंडोसाला जेतेपद :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथे झालेल्या दुसऱ्या कुमानिया बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

  • गोव्याच्या १५ वर्षीय मेंडोसाने या स्पर्धेत अपराजित राहताना चार विजय आणि पाच डाव बरोबरीत सोडवले. त्याने नऊ फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांची कमाई केली. मेंडोसा आणि स्लोव्हाकियाचा मिलान पॅचर यांचे समान गुण झाले, पण सरस टाय-ब्रेकच्या आधारे मेंडोसाने जेतेपद प्राप्त केले.

  • पहिला डाव बरोबरीत सोडवल्यानंतर मेंडोसाने सलग चार विजय प्राप्त केले. त्यानंतरचे चार डाव बरोबरीत सोडवत त्याने ६.५ गुण मिळवले.

राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी :
  • राज्यात करोना संसर्ग अतिशय झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

  • राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे  आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. 

  • यावेळी  दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

“हा फक्त जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नाही,” सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया :
  • सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाचा १८ डिसेंबरचा निर्णय रद्द केला आहे ज्यामध्ये सारयस मिस्त्री यांना पुन्हा एकदा टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला दिलासा दिला असून सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या न्यायालयीन संघर्षांत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी महत्वाचा निर्णय दिला. दरम्यान रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • रतन टाटा यांनी ट्विट करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून आभार मानले आहेत. हा जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

  • “माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं मी स्वागत करत असून आभार मानतो. हा फक्त जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नव्हता. माझ्या अखंडतेवर आणि ग्रुपच्या नैतिक आचरणावर सतत कठोर हल्ले झाल्यानंतर टाटा सन्सच्या सर्व मागण्यांना मान्यता देणारा निकाल हा या ग्रुपचे नेहमीच मार्गदर्शक तत्त्व राहिलेल्या मूल्यं आणि नैतिकता यांचं प्रमाणीकरण आहे,” असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.

सर्व भारतीय बांगलादेशच्या निर्मितीच्या बाजूने होते तर मोदींना सत्याग्रह कशासाठी केला?; शिवसेना खासदाराचा प्रश्न :
  • दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. 

  • ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं आहे. मात्र आता मोदींच्या या दाव्यावरुन भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झालीय.

  • याचसंदर्भात शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही मोदींच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय.

तेजस्विनी-संजीव यांना सुवर्णपदक :
  • महाराष्ट्राची तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत या अनुभवी नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताने सुवर्णपदकाची भर घातल्यानंतर विजयवीर सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. यासह भारताने १२ सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह एकूण २७ पदकांनिशी अग्रस्थानी मजल मारली आहे.

  • सुवर्णपदकासाठी रंगलेल्या अंतिम लढतीत भारताच्या या जोडीने युक्रेनच्या सेरहिय कुलिश आणि अ‍ॅना इलिना यांच्यावर ३१-२९ असा थरारक विजय मिळवला. तेजस्विनी-संजीव यांनी आपला अनेक वर्षांचा अनुभव पणाला लावत हे सुवर्णपदक खेचून आणले. यासह भारताची सुवर्णपदकांची संख्या ११वर पोहोचली आहे. भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि सुनिधी चौहान यांनी अमेरिकेच्या टिमोथी शेरी आणि विर्जिनिया थ्रॅशर यांच्यावर ३१-१५ अशी सहज मात करत कांस्यपदक पटकावले.

  • अंतिम लढतीत तेजस्विनी-संजीव यांची सुरुवात निराशाजनक झाली होती. मात्र १-३ असे पिछाडीवर पडल्यानंतरही त्यांनी ५-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी कायम टिकवत जेतेपद पटकावले. युक्रेनच्या जोडीने बरोबरी साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण भारताच्या अनुभवी जोडीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. पात्रता फेरीत भारताच्या जोडीने सर्वाधिक ५८८ गुण मिळवले होते. तर कुलिश आणि इलिनाने ५८३ आणि तोमर-चोहान यांनी ५८० गुण पटकावले होते.

२७ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.