चालू घडामोडी आणि दिनविशेष - 27 जून 2023

Date : 27 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सातारा भूषण पुरस्कार हा आजपर्यंत मिळालेला सर्वोच्च पुरस्कार - डॉ. प्रमोद चौधरी
  • रा. ना. गोडबोले ट्रस्ट तर्फे प्रदान केलेला सातारा भूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान असल्याचे उदगार प्राज इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा व जगभरात इथेनॉल मॅन म्हणून प्रसिध्द असलेले डॉ. प्रमोद चौधरी यांनी काढले.रा. ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्‍ट व सातारकर नागरिकांच्या वतीने प्रतिवर्षी आपल्‍या उत्तुंग कर्तुत्‍वाने सातारा जिल्‍ह्याचे नांव उज्‍ज्‍वल करणार्‍या व्‍यक्‍तीला सातारा भूषण पुरस्‍काराने गौरवले जाते. २०२२ सालचा हा पुरस्‍कार प्रसिध्‍द प्राज इंडस्‍ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रदान करण्‍यात आला. यावेळी डॉ. चौधरी बोलत होते. पुरस्कार विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे निंबाळकर यांचे शुभहस्ते व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली, ट्रस्टचे विश्वस्त अरूण गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, अशोक गोडबोले यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. रु. ३०,०००/- व सन्‍मानचिन्‍ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • यावेळी बोलताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले की, हा सन्मान माझा नसून आज पर्यंतच्या माझ्या वाटचालीत मला सहकार्य करणाऱ्या सर्व स्टाफचा आहे. बायोफ्युएल निर्मिती बरोबरच येत्या काळात कचऱ्यापासून इंधन निर्मिती, फॉसिल्स इंधन निर्मिती व संपुर्ण जगाला प्लॅस्टीक कचऱ्यापासून सुटका करणाऱ्या बायो प्लॅस्टीक निर्मितीचा संकल्प केला असून सातारा भूषण सारख्या पुरस्कारांनी मला काम करण्याचे अधिक बळ मला मिळेल.आजपर्यंत अनेक मान सन्मान पुरस्कार मला मिळाले आहेत. पण आपल्याच मातीत आपल्या माणसांनी केलेला सन्मान हा सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. प्रमोद चौधरी यांनी पुरस्काराच्या रक्कमेत स्वतःची रक्कम वाढ करून सदरची रक्कम ही पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला मदत म्हणून देत असल्याचे जाहिर केले.
  • यावेळी बोलताना रामराजे निंबाळकर म्हणाले की, जगात अनेक उद्योजक पैसा मिळवण्याच्या उद्देशाने काम करीत असतात पण डॉ. प्रमोद चौधरी हे एक उत्कृष्ठ उद्योजक असून उत्कृष्ठ शास्त्रज्ञ व उत्कृष्ठ नागरिक आहेत. व्यवसायात काम करताना आपले काम समाजाला उपयोगी कसे होईल याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे डॉ. चौधरी आहेत. संपुर्ण जगाला बायोफ्युएल च्या माध्यमातून उपकारक ठरणाऱ्या पर्यावरण रक्षक व संवर्धन करणार्‍या डॉ. चौधरी यांचे कार्य असेच बहरत राहो अशा शुभेच्छा दिल्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, डॉ. प्रमोद चौधरी यांच्या शोधामुळे साखर इंडस्ट्री, एव्हीएशन इंडस्ट्री , पर्यावरण व फ्युएल इंडस्ट्रीजला मोलाची मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गोडबोले ट्रस्टच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
आषाढी एकादशीसाठी एसटी सज्ज; पंढरपूर यात्रेसाठी ५ हजार विशेष बस
  • आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन वर्षे करोनाच्या संकटानंतर मागील वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी एकादशीची वारी नियमित सुरू झाली. यंदा या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ५ हजार विशेष बस चालवण्यात येत आहेत.
  • २५ जून ते ०५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी मंगळवारी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त राज्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी आणि भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. औरंगाबाद प्रदेशातून १,२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १,२००, नाशिक १ हजार आणि अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके

  • पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बस स्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
पत्नीला मालमत्तेत समान हक्क; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
  • पतीने विकत घेतलेल्या मालमत्तेवर पत्नीचा समान अधिकार असतो असा महत्त्वाचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. पत्नी घरामध्ये अनेक भूमिका निभावत असते आणि पतीच्या आठ तासांच्या नोकरीपेक्षा त्याला कमी लेखता येणार नाही, असे आदेश न्या. कृष्णन रामसामी यांनी अलीकडेच दिला.
  • एका खटल्यामध्ये पतीने पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप ठेवून, मालमत्तेवर मालकीहक्काचा दावा केला होता. खटला सुरू असतानाच फिर्यादीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलांनी खटला पुढे सुरू ठेवला होता. या खटल्याचा निकाल देताना न्यायाधीशांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली.  
  • गृहिणी पत्नी थेट आर्थिक कमाई करत नसली तरी, तिने मुलांची देखभाल, स्वयंपाक, सफाई आणि घरातील दैनंदिन व्यवस्था अशा कामांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली. घरामधील तिच्या योगदानाच्या आधारावरच पतीला परदेशात जाऊन पैसे कमावणे शक्य झाले. इतकेच नाही तर कुटुंब आणि मुलांची काळजी घेताना तिने स्वत:च्या स्वप्नांचा त्याग केला आणि त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले असेही न्यायालयाने नमूद केले.
नेदरलँड्सचा वेस्ट इंडिजवर ‘सुपर’ विजय
  • या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य फेरी प्रवेशासाठी सध्या सुरु असलेल्या पात्रता फेरीत सोमवारी नेदरलँड्सने ‘सुपर ओव्हर’ मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला.
  • संपूर्ण सामन्यात तब्बल ७४८ धावांचा पाऊस पडला. वेस्ट इंडिजने निकोलस पूरनच्या (नाबाद १०४) शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३७४ धावा केल्या. त्याला किंगची (७६) साथ मिळाली. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना निदामानुरुच्या (१११) फटकेबाजीच्या जोरावर नेदरलॅँड्सने ९ बाद ३७४ धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्यामुळे घेण्यात आलेल्या एका षटकाच्या खेळात नेदरलॅँड्सने बाजी मारली. या पराभवाने दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याचा आशा अंधुक झाल्या आहेत. यापूर्वी त्यांना झिम्बाब्वेने देखील पराभूत केले आहे. सुपर ओव्हरच्या एका षटकांत व्हॅन बीकने सहा चेंडूंत (४,६,४,६,६,४) तीस धावा फटकावून काढल्या. हे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. वेस्ट इंडिजने दोन फलंदाज गमावून केवळ ८ धावा केल्या.
  •  
  • व्हॅन बीकच्या या तुफानापूर्वी ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तेजा निदामानुरु आणि कर्णधार स्कॉट एडवर्डसने पाचव्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी करून नेदरलॅँड्सला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. या दोघांनी अवघ्या ९० चेंडूंत ही भागीदारी केली. मात्र, त्यानंतर नेदरलॅँड्सने घाईत १४ धावांत ३ गडी गमावले आणि अखेरच्या दोन षटकांत ३० धावा असे समीकरण राहिले. त्या वेळी खेळपट्टीवर असणाऱ्या बीकने ४९व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंत १४ धावा घेतल्या. अखेरच्या षटकांत नेदरलॅण्डसला ६ षटकांत ९ धावांची आवश्यकता होती. मात्र, शेवटच्या चेंडूंवर विजयासाठी १ धाव आवश्यक असताना बीक (१४ चेंडूंत २८) बाद झाल्याने सामना बरोबरीत सुटला.
  • त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ब्रेंडन किंग (८१ चेंडूंत ७६) आणि जॉन्सन चार्ल्स (५५ चेंडूंत ५४) यांच्या १०१ धावांच्या सलामीनंतर निकोलस पूरनच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिजचे आव्हान उभे राहिले होते. पूरनने ६५ चेंडूंत १०४ धावांची खेळी करताना ९ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली.

 

पंतप्रधान मोदी यांचे म्युनिकमध्ये स्वागत :
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी येथे जी ७ शिखर परिषदेसाठी आगमन झाले. जागतिक नेत्यांबरोबर आपली हवामान, ऊर्जा, अन्नसुरक्षा, दहशतवादविरोधी उपाययोजना, लिंगसमानता आणि लोकशाही मूल्ये या विषयांवर फलदायी चर्चा होईल, असे अपेक्षित असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

  • २६ आणि २७ जून रोजी होत असलेल्या जी ७ परिषदेसाठी मोदी येथे आले आहेत. त्यासाठी त्यांना जर्मनीचे चॅन्सेलर ओल्फ शोल्झ यांनी आमंत्रित केले आहे. जी ७ हा जगातील सात प्रमुख अर्थसत्ता असलेल्या देशांचा गट आहे. 

  • म्युनिकमध्ये मोदी यांचे आगमन होताच येथील अनिवासी भारतीय नागरिक, संघटनांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, असे बर्लिनमधील भारतीय दुतावासाने ट्विटरवर म्हटले आहे.

  • युक्रेन पेचामुळे निर्माण झालेला भूराजकीय संघर्ष आणि त्यातून आलेला ऊर्जा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न यावर जी ७ देशांचे नेते प्रामुख्याने चर्चा करतील, अशी शक्यता आहे.

  • मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, या परिषदेत आपण सहयोगी देशांचे नेते आणि अभ्यागत आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याबरोबर विद्यमान आव्हाने जसे की पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्नसुरक्षा, आरोग्य, दहशतवादविरोधी उपाययोजना, लिंगसमानता आणि लोकशाहीची जपणूक यावर चर्चा करणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, यूएई दौऱ्यावर; जी-७ शिखर परिषदेत घेणार सहभाग :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) सध्या जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. जर्मनीमधील आयोजित जी-७ शिखर परिषदेत (G-7 Summit) सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जर्मनीचे चान्सलर (German Chancellor) ओलाफ स्कोल्स यांच्यासह अनेक पदाधिकारी विमानतळावर उपस्थित होते.

  • देशांतील काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक - जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांवर आपले विचार मांडण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या इतर लोकशाही देशांनाही या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी देशांतील काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.

  • शिखर परिषदेनंतर मोदी युएई दौऱ्यावर - शिखर परिषदेनंतर मोदी युएईला भेट देणार आहेत. युएईचे माजी राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबाबत मोदी शोक व्यक्त करतील. तसेच युएईचे नवे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे मोदी अभिनंदनही करतील. २८ जून रोजी मोदींचा अरब दौरा संपणार असून ते भारतात परत येणार आहेत.

भारताचा आयर्लंडवर शानदार विजय, मालिकेत घेतली आघाडी :
  • भारतीय टी २० संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि यजमान संघात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना आज (२६ जून) डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर झाला. भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला. या विजयामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

  • आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी २० संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. कर्णधार पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे सामना दोन तास उशीरा सुरू करण्यात आला. दोन्ही डावांतील ८-८ षटके कमी करण्यात आली.

  • प्रथम फलंदाजीला उतरलेल्या यजमानांची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. आयर्लंडचे पहिले तीन गडी झटपट बाद झाले. मात्र, आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने शानदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३३ चेंडूत ६४ धावा करून संघाला १०८ धावांपर्यंत नेऊन पोहचवले. भुवनेश्वर, पंड्या, आवेश खान आणि चहलला प्रत्येक एक बळी मिळाला.

  • यजमानांनी दिलेले १०९ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने ९.२ षटकांमध्येच विजय मिळवला. कारकीर्दीमध्ये दुसऱ्यांदाच सलामीला आलेल्या दीपक हुड्डाने चमकदार कामगिरी केली. त्याने २९ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी केली. त्याला ईशान किशन (२६) आणि हार्दिक पंड्याने (२४) साथ दिली.

बंडखोर गट आणि शिवसेना आज कोर्टात आमनेसामने, एकनाथ शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय आहे :
  • शिवसेनेने एकनाथ शिंदे तसेच ४० बंडखोर आमदारांना खिंडीत गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब सुरु केला आहे. शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदाराचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना पक्षाचे कोणतेही निर्णय घेता येऊ नयेत म्हणून त्यांना गटनेते पदावरुन बाजूला सारून हे पद अजय चौधरी यांना देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला असून शिवसेनेच्या या दोन्ही निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे निर्णय रद्द करावेत अशी मागणी केली आहे. आज १०.३० वाजता या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

  • शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय आहे - शिंदे यांनी शिवसेनेने निवडलेला गटनेता तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीवर आक्षेप घेतला आहे. २१ आणि २२ जून अशा दोन दिवसांच्या बैठकांना आमदारांनी उपस्थित राहण्याचे व्हीप जारी करण्यात आले होते. पण व्हिप विधिमंडळ कामकाजाशिवाय इतर गोष्टींना लागू होत नाही, असे शिंदे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. तसे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

  • तसेच, २१ जून रोजी शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी २४ आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. पण त्याच दिवशी ५५ आमदारांपैकी एकूण ३४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदीच्या निवडीवर विश्वास व्यक्त केला. अजय चौधरी यांची निवड अवैध आहे. अजय चौधरी यांनी दिलेल्या पत्रानुसारच आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी कायद्यानुसार सात दिवसांचा वेळ मिळणे गरजेचे. पण आम्हाला अवघ्या ४८ तासांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे, असेदेखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

27 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.