चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ जुलै २०२१

Updated On : Jul 27, 2021 | Category : Current Affairs


महत्वाची बातमी : JEE Advanced - 2021 परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार :
 • आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून ही परीक्षा घेतली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

 • केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर, जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.

 • दरम्यान राज्यातील पूरग्रस्त सात जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत होणाऱ्या जेईई (मुख्य) तिसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर जाता आले नाही, तर त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेला आहे.

 • कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीमुळे या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘स्विस बँकेत देशातून किती काळा पैसा गेला?’; संसदेत सरकारने दिलं उत्तर :
 • बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा काळ्या पैश्याबाबत प्रश्न संसदेत उपस्थित झाला आहे. काँग्रेसचे खासदार व्हिन्सेंट एच पला यांनी संसदेत सरकारकडे यांदर्भात विचारणा केली आहे.

 • गेल्या दहा वर्षात स्विस बँकमध्ये किती काळा पैसा जमा झाला हे सरकार उघड करेल का? परदेशातून काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? किती लोकांना अटक झाली आणि किती जणांवर आरोपपत्र दाखल केले गेले आणि किती काळा पैसा भारतात येणार आहे आणि कोणाकडून आणि कोठून येईल असे प्रश्न त्यांनी विचारले होते.

 • विरोधकांच्या या प्रश्नाचे उत्तर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी  यांनी लोकसभेत दिले. त्यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षात स्विस बँकमध्ये काळा पैसा किती जमा झाला याचा कोणताही अधिकृत अंदाज नाही. तर, काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. अलिकडच्या काळात सरकारने परदेशात ठेवलेला काळा पैसा परत आणण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असे पंकज चौधरी यांनी सांगितले.

दहावी-बारावीचा निकाल लवकरच; निकाल पाहण्यासाठी ‘या’ गोष्टी करा :
 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जुलै अखेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. त्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, सीबीएसई या आठवड्यात १० आणि १२ वीचे निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कुठे आणि कसा पाहता येईल हे आपण जाणून घेऊया.

 • यावर्षी करोना महामारीच्या दुसर्‍या  लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन योजना स्वीकारली, तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.

 • विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येतील.

या वेबसाइटवर पाहता येतील निकाल

cbse.nic.in , cbseacademic.nic.in

कसे चेक कराल निकाल

 • सीबीएसईच्या cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
 • होमपेजवर ‘रिझल्ट’ टॅबवर क्लिक करा
 •  स्क्रीन वर एक नवीन पेज ओपन होईल
 • त्यानंतर पर्याय निवडा
 • त्यानंतर विचारलेले क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म :
 • राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी (FYJC CET 2021) सुरू झाली आहे. मात्र, नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. जवळपास तीन ते चार दिवस वेबसाईटच सुरु होत नसल्याने नोंदणी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर होता.

 • दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २६ जुलै पर्यंत होती.

 • दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे ते विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करु शकणार आहेत. मात्र, अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा ; विदितचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश :
 • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सोमवारी अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवर १.५-०.५ अशा फरकाने विजय मिळवत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तब्बल १९ वर्षांनी प्रथमच एखाद्या भारतीय बुद्धिबळपटूने अशी कामगिरी केली आहे.

 • पाचव्या फेरीतील दुसऱ्या डावामध्ये विदितने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना वासिफवर ३८ चालींमध्ये विजय मिळवला. या दोघांमधील पहिला गेम बरोबरीत सुटला होता. यापूर्वी २००० आणि २००२मध्ये विश्वनाथन आनंदने विश्वचषक जेतेपद मिळवले होते. आता पुढील फेरीत २६ वर्षीय विदितसमोर रशियाचा अलेक्झांडर ग्रिसचूक आणि पोलंडचा जॅन क्रेझीस्टोफ यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

 • दरम्यान, अन्य लढतीत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला रशियाच्या आंद्रे इस्पिनेकोने दुसऱ्या गेममध्ये बरोबरीत रोखल्यामुळे मंगळवारी टायब्रेकमध्ये त्यांच्यापैकी कोण उपांत्यपूर्व फेरी गाठणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार :
 • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी चीनची खेळाडू झीयू हौ हिची डोपिंग टेस्ट होणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर ही चर्चा रंगली आहे.

 • जर झीयू हौ डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्या क्रमांकावर विजेती राहिलेल्या मिराबाई चानूचं मेडल अपडेट केलं जाईल आणि सुवर्णपदक दिलं जाईल. असं झालं तर मिराबाई चानूसाठी हा ऐतिहासिक क्षण असेल. यासोबतच वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मिराबाई चानू पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे.

 • मिराबाई चानूची ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई - मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात उचलले.

२७ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

टिप्पणी करा (Comment Below)