चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ जुलै २०२०

Date : 27 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘भारत बायोटेक’च्या लशीचे प्राथमिक निष्कर्ष आशादायी :
  • नवी दिल्ली : भारत बायोटेक या कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आयसीएमआर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक व आशादायी  असल्याचे रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील प्रमुख संशोधक डॉ. सविता वर्मा यांनी म्हटले आहे.

  • वर्मा यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात आणखी सहाजणांना कोव्हॅक्सिन ही लस टोचण्यात आली. त्यामुळे आता पहिला टप्पा पूर्ण झाला असून देशात एकूण पन्नासजणांना लस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत.

  • रोहतक येथे पहिल्या टप्प्याची सुरुवात १७ जुलैला करण्यात आली होती. त्या दिवशी तीनजणांना लस टोचण्यात आली. करोनावरील ही लस दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात एका तीस वर्षांच्या व्यक्तीलाही देण्यात आली होती. कोव्हॅक्सिनचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा यातील चाचण्या पूर्ण होण्यास १ वर्ष तीन महिने लागणार आहेत. कोव्हॅक्सिन या लशीला मानवी चाचण्यासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली होती. याशिवाय झायडस कॅडिला कंपनीने तयार केलेल्या लशीच्या चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

२०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल दहांमध्ये :
  • नवी दिल्ली : लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे.

  • ‘‘ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंना यश मिळण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ‘लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ’ ही कनिष्ठ खेळाडूंसाठी असणारी योजना लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या योजनेतून १० आणि १२ वर्षांच्या गुणवान मुलांना हेरण्यात येणार आहे. भारताला क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सफल झाल्यास २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १०मध्ये असेल,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.

  • ‘‘कनिष्ठ खेळाडूंसाठी असणाऱ्या योजनेमुळे कुमार-कुमारी पातळीवरील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना दर्जेदार प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. जेणेकरून लॉस एंजेलिस येथील ऑलिम्पिकमध्ये नाव उंचावण्यासाठी खेळाडू सज्ज होतील. नुकतीच भारतीय प्रशिक्षकांवरील दोन लाख रुपये पगाराची मर्यादादेखील दूर करण्याचा निर्णय घेतला होता. चांगले प्रशिक्षक मिळण्यासाठीच हा निर्णय घेतला,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी :
  • पदवी परीक्षा - मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात युवासेनेसह देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर  सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी आव्हान दिले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

  • मराठा आरक्षण - नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

  • राजस्थान सत्तापेच - जयपूर : राजस्थानमधील सत्तापेच कायम आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होईल. दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैला बोलावण्याची विनंती करणारा सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे शनिवारी रात्री पाठवला. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे हा सत्तापेच निर्माण झाला आहे.

दुहेरी ऑस्करविजेत्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे निधन :
  • पॅरिस : ‘गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द  यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन  झाले. दुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख  ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती.  पॅरिसमध्ये वृद्धापकाळामुळे ऑलिव्हिया यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

  • टोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना १९४६ मधील ‘टू इच हिज ओन’ आणि १९४९ मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गॉन विथ दी विन्डमधील त्यांची भूमिका चित्रपट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.

जवानांचं शौर्य जाणून घेण्यासाठी ‘या’ वेबसाईटला भेट देण्याचं मोदींचे आवाहन :
  • कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहनही केले.

  • मोदी म्हणाले, “मी तुम्हाला आग्रह करतो की, gallantryawards.gov.in या वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला आपल्या वीर पराक्रमी योद्ध्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची अधिकाधिक माहिती मिळू शकेल. ही माहितीवर तुम्ही आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करा. त्यामुळे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थानही बनेल. आपण जरुर या वेबसाईटला भेट द्या मी तर म्हणेन वारंवार भेट द्या”

  • कारगिल युद्धादरम्यान, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाची यावेळी मोदींनी आठवण करुन दिली. ते म्हणाले, अटलजींनी कारगिल युद्धावेळी लाल किल्ल्यावरुन जे म्हटलं होतं ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रासंगिक आहे. अटलजींनी त्यावेळी देशाला गांधीजींच्या एका मंत्राची आठवण करुन दिली होती.

  • महात्मा गांधींचा मंत्र होता की, जर कोणाला कधी आपण काय करावं किंवा करु नये हे समजत नसेल तर त्याने भारतातील सर्वात गरीब आणि असहाय्य व्यक्तीबाबत विचार करायला हवा. आपल्या कृतीमुळं या गरीब व्यक्तीचं भलं होईल की नाही याचा त्यानं विचार करायला हवा.

२७ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.