चालू घडामोडी आणि दिनविशेष - 27 फेब्रुवारी 2024

Date : 27 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताच्या युवाशक्तीचा विजय; चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली
  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सोमवारी रांचीत पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव करत मालिकेत ३-१ ने अजेय आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या विजयात शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलने नाबाद ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विननेही खारीचा वाटा उचलला.

भारताने कसोटी मालिका जिंकली -

  • या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ३५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३०७ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे इंग्लंडकडे पहिल्या डावाच्या आधारे ४६ धावांची आघाडी होती. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १४५ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारतीय संघाने ६१ षटकांत ५ गडी गमावून पार केले. जुरेलच्या बॅटमधून विजयी धावा आल्या. त्याने दोन धावा घेत सामना जिंकवला. जुरेल ३९ धावांवर नाबाद राहिला आणि शुबमन ५२ धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची खेळी केली. त्याचबरोबर इंग्लंडकडून शोएब बशीरने पुन्हा एकदा कमाल करत तीन विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाचे शानदार पुनरागमन -

  • आज चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. भारताला ८४ धावांवर पहिला धक्का बसला, जेव्हा जो रूटने यशस्वी जैस्वालला जेम्स अँडरसनकरवी झेलबाद केले. त्याला ३७ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टॉम हार्टलीने बेन फॉक्सच्या हाती झेलबाद केले. रोहितला ५५ धावा करता आल्या. रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजाही विशेष काही करू शकला नाही आणि चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

गिल आणि जुरेलच्या भागीदारीने इंग्रजांचे मनसुबे उद्ध्वस्त -

  • हार्टलेने सलग दोन चेंडूंवर जडेजा आणि सर्फराझ खानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सर्फराज खाते उघडू शकला नाही आणि झेलबाद झाला. यानंतर जुरेल आणि शुबमनने शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी स्ट्राईक रोटेट करत भारताला विजयाकडे नेले. शुभमनने कसोटी कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. त्याचवेळी पहिल्या डावात ९० धावा केल्यानंतर ध्रुवने त्याच आत्मविश्वासाने दुसऱ्या डावाला सुरुवात करत अनेक उत्कृष्ट फटके मारले.
‘विकसित भारता’त वस्त्रोद्योग महत्त्वाचा - मोदी
  • भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असताना वस्त्रोद्योग क्षेत्र भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केला. सरकार या क्षेत्राला सर्वतोपरी पाठिंबा देईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. नवी दिल्ली येथे ‘भारत टेक्स-२०२४’चे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदी बोलत होते.
  • मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या उभारणीत वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान आणखी वाढवण्यासाठी सरकार मोठय़ा प्रमाणावर काम करत आहे. ‘भारत टेक्स’ हा भारतात आयोजित सर्वात मोठय़ा जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र विकसित भारताचे गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला या चार महत्त्वाच्या स्तंभांशी संबंधित आहे. २०१४ मध्ये भारताच्या वस्त्रोद्योगाचे मूल्यांकन सात लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होते. तर आता ते १२ लाख कोटींच्याही पुढे गेले आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, वस्त्र उत्पादकांमध्ये दहापैकी सात महिला आहेत. सरकारने सादर केलेला ‘कस्तुरी कॉटन’ जागतिक स्तरावर भारताचे ‘ब्रँड मूल्य’ निर्माण करण्यासाठी मोठे पाऊल ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भारत टेक्स-२०२४’ची वैशिष्टय़े

  • ‘भारत टेक्स-२०२४’ देशातील दोन सर्वात मोठी प्रदर्शन केंद्रे असलेल्या भारत मंडपम आणि यशोभूमी येथे होत आहे. विद्यार्थी, विणकर, कारागीर आणि कापड कामगार तसेच धोरणकर्ते आणि जागतिक कंपन्यांचे सीईओ, साडेतीन हजारांहून अधिक प्रदर्शनातील सहभागी, १०० हून अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक ग्राहक आणि ४० हजारांहून अधिक व्यावसायिक अभ्यागत त्यात सहभागी झाले आहेत.
‘अग्निपथ’विरोधात काँग्रेस आक्रमक; सत्तेवर आल्यास रद्द करण्याचे आश्वासन, खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र
  • तरुणांना अल्पावधीसाठी सैन्यदलात भरतीची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा असेल. केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर ‘अग्निपथ’ योजना रद्द करून जुनी सैन्यभरतीची पद्धत कायम ठेवली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने सोमवारी दिले. ‘सुमारे २ लाख तरुण-तरुणींवर अन्याय करणारी योजना मागे घेण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा’, अशी मागणी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे. साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींना फक्त चार वर्षांसाठी सैन्यदलात कार्यरत ठेवणारी ‘अग्निपथ’ योजना २०२२मध्ये सुरू झाली होती. मात्र, भरती केलेल्यांमध्ये केवळ २५ टक्के तरुण-तरुणींनाच सैन्यदलात कायमस्वरुपाची नोकरी मिळण्याची शक्यता असल्याने या योजनेवर काँग्रेससह विरोधकांनी कडाडून टीका केली होती. 
  • सैन्य दलाच्या नियमित भरती पद्धतीद्वारे २ लाख तरुण-तरुणींना सैन्याच्या तीन दलांमध्ये भरती करण्यात आल्याचे सांगितले गेले होते. ३१ मे २०२२ पर्यंत या तरुणांना सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असे वाटत होते. पण, केंद्र सरकारने सैन्यदलातील ही भरती बंद करून ‘अग्निपथ’ योजना आणली. त्यामुळे हे २ लाख तरुण-तरुणी भरतीपासून वंचित राहिले, असा दावा खरगे यांनी पत्रामध्ये केला आहे.
  • माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचाही ‘अग्निपथ’वर आक्षेप असल्याचे खरगेंनी नमूद केले आहे. ‘अग्निपथ’सारखी योजना लष्करासाठी अनपेक्षित होती, इतकेच नव्हे तर हवाई दल व वायुदलासाठीही हा धक्का होता, असे नरवणे यांनी लिहिले आहे, असा उल्लेख खरगेंनी पत्रात केला आहे.

सैन्यभरतीमध्ये हात का अखडता?

  • केंद्राने ‘जी-२०’ शिखर परिषदेसाठी ४१०० कोटी, पंतप्रधानांच्या विमानावर ४८०० कोटी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर २० हजार कोटी, जाहिरातींवर ६५०० कोटी खर्च केले. मग, सैन्यदलातील भरतीमध्ये पैसा का वाचवले जात आहेत, असा सवाल काँग्रेसचे महासचिव सचिन पायलट यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

१० वर्षांत ६ लाखांची कपात?

  • लष्करामध्ये दरवर्षी सरासरी ६० हजार ते ६५ हजार भरती होत असे. गेल्या वर्षी ४५ हजार ‘अग्निवीर’ भरती झाले. सैन्यदलातील भरती कमी होत असून पुढील १० वर्षांमध्ये १४ लाखांचे सैन्य ८ लाखांपर्यंत कमी होईल, असा धोका खासदार दीपेंद्र हुडा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
‘ज्ञानवापी’मध्ये पूजेची परवानगी कायम
  • वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण बाजूच्या तळघरामध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी यापुढेही कायम राहील असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या तळघरात पूजेला परवानगी देण्यात आली आहे. त्याविरोधात मशीद व्यवस्थापन समितीने दोन अर्ज दाखल केले होते. ते उच्च न्यायालयाने फेटाळले.न्या. रोहित रंजन अगरवाल यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. वाराणसी जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या ‘व्यास तहखाना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण तळघरासाठी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीला तिथे पूजा करण्यास परवानगी दिली होती. काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या या ‘व्यास तहखान्या’त पूजा सुरू राहील असे उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले.
  • संपूर्ण नोंदी तपासल्यानंतर आणि संबंधित पक्षकारांचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर, जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण या न्यायालयाला दिसत नाही.’’न्यायालयाच्या या निकालाचा वकील अभ्यास करत असल्याचे ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद’चे संयुक्त सचिव मोहम्मद यासिन यांनी सांगितले. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी समितीने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर समितीने २ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • संपूर्ण नोंदी तपासल्यानंतर आणि संबंधित पक्षकारांचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर, जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण या न्यायालयाला दिसत नाही.’’न्यायालयाच्या या निकालाचा वकील अभ्यास करत असल्याचे ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद’चे संयुक्त सचिव मोहम्मद यासिन यांनी सांगितले. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी समितीने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर समितीने २ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आदेश काय?

  • वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या तळघरात पूजेला परवानगी देण्यात आली आहे. त्याविरोधात मशीद व्यवस्थापन समितीने दोन अर्ज दाखल केले होते. ते उच्च न्यायालयाने फेटाळले.
देशभरातील संकटातील २०० हत्तींचं रिलायन्सनं केलं पुनर्वसन; अनंत अंबानींनी केली ६०० एकरमधील ‘वंतारा’ प्रकल्पाची घोषणा
  • रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशन्सकडून सोमवारी संयुक्तपणे ‘वंतारा’ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. भारतात आणि विदेशातही जखमी झालेले किंवा केलेल्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना सुरक्षित वातावरणात राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आल्याचं कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. अनंत अंबानी यांनी या प्रकल्पाची सुरुवात केल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकल्पाविषयी स्वत: अनंत अंबानी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
  • “माझ्यासाठी पॅशन म्हणून ज्या गोष्टीची सुरुवात मी लहान असताना झाली, ती गोष्ट आता एका मोहिमेच्या स्वरुपात उभी राहिली आहे. दुर्मिळ प्राण्यांचं जतन, उपचार व संवर्धन करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे”, अशी माहिती अनंत अंबानी यांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकल्पामध्ये जवळपास २०० जखमी हत्तींवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले आहेत. त्याशिवाय हजारो इतर वन्य प्राण्यांवरही उपचार करण्यात आले आहेत.

कोविड काळात हत्तींवर उपचारांना सुरुवात

  • दरम्यान, कोविड काळातच जखमी हत्तींवर उपचारांना सुरुवात करण्यात आली होती, अशी माहिती अनंत अंबानी यांनी दिली आहे. “आम्ही कोविड काळातच वन्यजीव बचाव केंद्राची उभारणी सुरू केली होती. आम्ही त्यासाठी जवळपास ६०० एकर परिसरात जंगल उभं केलं आहे. आम्ही हत्तींना राहण्यासाठी एका मोठ्या परिसराची उभारणी केली. २००८ साली आम्ही पहिल्या हत्तीला वाचवून त्याच्यावर यशस्वीरीत्या उपचार केले होते”, असं अनंत अंबानी म्हणाले.
  • “ग्रीन झुओलॉजिकल रेस्क्यु सेंटर २०२०मध्ये सुरू झालं. या केंद्रासाठी आमच्याकडे तब्बल ३ हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. त्यातले २० ते ३० तज्ज्ञ आहेत. या सर्व तज्ज्ञांवर शिक्षक किंवा प्राध्यापक पदाची भूमिका सोपवण्यात आली आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या पदवीधर तरुणांना आम्ही इथे सहभागी करून घेतलं आहे. शिवाय प्राण्यांविषयी प्रचंड आस्था असणारे काही नियमित डॉक्टरही आम्ही आमच्या या टीममध्ये सहभागी करून घेतले आहेत”, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला रेल्वेच्या ४१ हजार कोटींच्या दोन हजार हून अधिक प्रकल्पांचं गिफ्ट, महाराष्ट्राला काय मिळालं?
  • भारतीय रेल्वे खात्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ४१ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. दोन हजारांहून जास्त प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी एकट्या रेल्वेखात्यासाठी घेऊन आले आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत ५५३ स्टेशन्सची पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसंच हे सगळे प्रकल्प आणि देशाला समर्पित करतो आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या निर्णयामुळे देशातल्या २७ राज्यांमधल्या ५५३ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी त्यांच्या X अकाऊंटवरुनही माहिती दिली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेत विविध प्रकल्प आणि योजनांचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्रीही उपस्थित होती. आपण पहिल्यांदाच २ हजार योजना एकाचवेळी सुरु करत आहोत. रेल्वेच्या पायाभूत बदलांमध्ये महत्त्वाच्या बदलांची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

कुठल्या राज्यांच्या स्थानकांची पुनर्बांधणी होणार?

  • महाराष्ट्र – ५६ रेल्वे स्थानकं
  • गुजरात – ४६ स्थानकं
  • आंध्रप्रदेश – ४६ स्थानकं
  • तामिळनाडू- ३४ स्थानकं
  • बिहार – ३३ स्थानकं
  • मध्य प्रदेश- ३३ स्थानकं
  • कर्नाटक- ३१ स्थानकं
  • झारखंड- २७ स्थानकं
  • छत्तीसगड- २१ स्थानकं
  • ओदिशा- २१ स्थानकं
  • राजस्थान- २१ स्थानकं

 

युक्रेनप्रश्नी शांतता प्रक्रियेत योगदानास भारत तयार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

  • रशिया-युक्रेन संघर्षांवर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असून, कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास भारत तयार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांना दिली. प्रदूषणमुक्त ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
  • जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ हे शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. यावेळी झालेल्या उभयपक्षी चर्चेत रशिया-युक्रेन संघर्ष, ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’, ‘फिनटेक’, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आदी मुद्यांवर भर देण्यात आला. शोल्झ यांच्याबरोबरील बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी नमूद केले, या समस्यांचे निराकरण केवळ संयुक्त प्रयत्नांनीच शक्य आहे आणि ‘जी-२०’ च्या अध्यक्षपदी असतानाही भारत या दिशेने प्रयत्न करत आहे.
  • ‘‘युक्रेनमधील घडामोडी सुरू झाल्यापासून भारताने हा संघर्ष संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा आग्रह धरला आहे. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास तयार आहे.’’
  • अशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडातील देशांवर युक्रेन संघर्षांचा नकारात्मक प्रभाव पडू नये, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. या युद्धामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची पायाभूत सुविधा व उर्जा यंत्रणा नष्ट झाली आहे. आपण हिंसाचार करून (देशांच्या) सीमा बदलू शकत नाही, असे शोल्झ यांनी निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धा : महाराष्ट्राचा हर्षिल दाणी उपांत्य फेरीत

  • महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करताना वरिष्ठ राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. महिला विभागातून आकर्षि काश्यप, अस्मिता चलिहा, आदिती राव आणि अनुपमा उपाध्याय यांनी उपांत्य फेरी गाठली.
  • म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीने आपली आगेकूच कायम राखली. ताकदवान आणि नियंत्रित फटक्यांच्या जोरावर हर्षिलने यश योगीचे आव्हान २१-१०, २१-५ असे ३० मिनिटांत संपुष्टात आणले.
  • हर्षिलने कमालीच्या आत्मविश्वासाने खेळ करताना लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. २-२ अशा बरोबरीनंतर पहिल्या गेममध्ये हर्षिलने ६-३ अशा स्थितीत सलग ८ गुणांची कमाई करताना १४-६ अशी मोठी आघाडी घेतली आणि तीच कायम राखत मोठय़ा फरकाने पहिला गेम जिंकला.
  • दुसऱ्या गेमलाही हर्षिलचे वर्चस्व होते. गेमच्या उत्तरार्धातील १२-१२ अशी बरोबरी वगळता हर्षिल यशचा सामना करू शकला नाही. या एकमेव बरोबरीनंतर हर्षिलने यशला केवळ तीनच गुण मिळू दिले. उपांत्य फेरीत हर्षिलसमोर प्रियांशू राजावतचे आव्हान असेल.
  • पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित श्रीकांतने कार्तिकेय गुलशन कुमारचे आव्हान २१-१०, २१-१८, २१-१६ असे मोडून काढले. ही लढत ५९ मिनिटे चालली. श्रीकांतची गाठ एम. मिथुनशी पडणार आहे. एम. मिथुनने अनुभवी सौरभ वर्माचे आव्हान १५-२१, २१-१९, २१-१९ असे मोडून काढले.

वर्धा : ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशकात; १ मार्चपासून अर्ज करता येणार

  • ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशकात सुरू झाले आहे. राज्य स्थापन झाल्यानंतर प्रथमच अशी विशेष व्यवस्था उपलब्ध झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
  • महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनी २४ फेब्रुवारीस नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा मुद्दा लावून धरला होता. २० मार्चला त्याचे उदघाटन होणार आहे. दोनशे मुलींची प्रवेशक्षमता असलेल्या या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी १ ते १५ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
  • निवड समिती २०० मुलींची निवड करेल. २० मार्चला रीतसर प्रवेश होतील. याबाबत प्रक्रिया होऊनही वसतिगृह सुरू न झाल्याने प्रा.गमे यांनी शासनास नोटीस दिली होती. सुरू न झाल्यास नाशिक येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अखेर हे काम मार्गी लागले, याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. प्रवेशात ७५ ओबीसी, ७५ मराठा व ५० आर्थिक दुर्बल घटकांच्या मुलींना प्रवेश मिळणार आहे.

प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटी संघाचा विजय

  • पहिल्या सत्रात केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर मँचेस्टर सिटी संघाने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये बॉर्नमाऊथ संघावर ४-१ असा विजय मिळवला.
  • सामन्याच्या पहिल्या सत्रात सिटीच्या झंझावातासमोर बॉर्नमाऊथच्या बचावफळीचा निभाव लागला नाही. ज्युलिअन अल्वारेझ (१५व्या मिनिटाला), अर्लिग हालँड (२९व्या मि.) व फिल फोडेन (४५व्या मि.) यांनी गोल सिटीला मध्यंतरापर्यंत ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
  • दुसऱ्या सत्रात, ख्रिस मेफामने (५१व्या मि.) केलेल्या स्वयंगोलमुळे सिटीच्या आघाडीत आणखी भर पडली. बॉर्नमाऊथकडून जेफरसन लेर्माने (८३व्या मि.) गोल करत आघाडी काहीशी कमी केली. यानंतर सिटीच्या बचावफळीने त्यांना एकही गोल करण्याची संधी न देता आघाडी अखेपर्यंत कायम राखत विजय नोंदवला. हालँडचा सध्याच्या प्रीमियर लीग हंगामातील हा २७वा गोल आहे.
  • अन्य सामन्यात, गॅब्रिएल मार्टिनेलीच्या (४६व्या मिनिटाला) निर्णायक गोलच्या जोरावर आर्सेनलने लिस्टर सिटीवर १-० अशा विजयाची नोंद केली. तर, लिव्हरपूल व क्रिस्टल पॅलेस यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला.

रशियाने माघार घ्यावी; संयुक्त राष्ट्रांचा ठराव; युक्रेनमधील पेचावर भारतासह ३२ देश तटस्थ

  • युक्रेनमधील युद्ध संपवून रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी करणारा गैरबंधनकारक ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मंजूर केला. भारताने मात्र तटस्थ राहून या ठरावावर मतदान केले नाही. या ठरावाद्वारे युक्रेनमध्ये व्यापक, न्याय्य व चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली गेली.
  • या ठरावावर संयुक्त राष्ट्र आमसभेच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी ३२ देशांनी मतदान केले नाही. त्यात भारतही होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ‘युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत व कायमस्वरुपी शांतता प्रस्थापनेसाठी संयुक्त राष्ट्रांची सनद (चार्टर) सिद्धांत’ ठराव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने १४१ मते पडली, तर सात मते विरोधात पडली. या युद्धाच्या एक वर्षांनंतरही युक्रेन व रशिया या दोघांनाही मान्य असलेला तोडगा शोधण्यास जगाला यश आले आहे का, असा सवाल मात्र भारताने उपस्थित केला.
  • हा ठराव मंजूर झाल्यानंतर भारताच्या बाजूने स्पष्टीकरण देताना, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या, की युक्रेन संघर्षांला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे आमसभेने स्वत:ला काही प्रश्न विचारणे महत्वाचे आहे.
  • आम्ही युक्रेन व रशिया या दोघांनाही मान्य असलेल्या संभाव्य तोडग्यापर्यंत पोहोचलो आहोत का? रशिया व युक्रेन या दोन्ही बाजूंचा सहभाग नसलेली कोणत्याही प्रक्रियेतून आपल्याला विश्वासार्ह व सार्थ तोडगा मिळू शकणार आहे का? जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची यंत्रणा आणि विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कुचकामी ठरली नाही का? युक्रेनमधील परिस्थितीबद्दल भारताला अतीव चिंता वाटते.

27 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.