चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ मार्च २०२२

Date : 26 March, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धा - भारतीय कुमारी संघाला विजेतेपद :
  • भारताने अखेरच्या साखळी लढतीत शुक्रवारी बांगलादेशकडून ०-१ अशी हार पत्करली. परंतु तरीही सरस गोलफरकाच्या आधारे कुमारी ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

  • भारताने ( ११) बांगलादेश ( ३) संघापेक्षा सरस गोलफरक राखला. या स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळाडूंचा आणि सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार लिंडा कोमने पटकावले. तिने एकूण पाच गोल झळकावले.

  • या सामन्यात पाचव्या मिनिटाला शुभांगीने गोल करण्याचा केलेला प्रयत्ना बांगलादेशची गोलरक्षक रुपनाने हाणून पाडला. मग ४०व्या मिनिटाला नितूने केलेला प्रयत्नही रुपनाच्या कौशल्यामुळे अपयशी ठरला.

  • दुसऱ्या सत्रात भारताचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनर्बी यांनी शुभांगीच्या जागी पूनमला मैदानावर आणले. ६०व्या मिनिटाला भारताची कर्णधार शिल्की देवीने लांबवरून गोल साकारण्याचा केलेला प्रयत्नही अयशस्वी ठरला. मार्टिना आणि सुनीता यांच्या जागी निकीता आणि अमिशा यांना बदली करण्यात आले. बांगलादेशने मग आक्रमणाची धार वाढवली. सामन्याच्या ७४व्या मिनिटाला प्रियांकाने साकारलेला गोल हा बांगलादेशसाठी निर्णायक ठरला.

योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उच्चपदस्थ नेते यांच्या उपस्थितीत झालेल्या एका भव्य समारंभात योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.

  • उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आदित्यनाथ यांना शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही यावेळी हजर होते.

  • भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शपथविधी समारंभाला हजेरी लावली. ५० हजार लोक बसू शकण्याची व्यवस्था असलेल्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये शपथविधी समारंभ पार पडला. सुरेश खन्ना, सूर्यप्रताप साही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य आणि आधी सनदी अधिकारी असलेले व नंतर राजकारणात आलेले ए.के. शर्मा यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.

गूगलकडून वर्चस्वाचा अवाजवी दुरुपयोग; चौकशी करण्याचे सीसीआयचे आदेश :
  • गूगलने वृत्त प्रकाशक या नात्याने त्याच्या प्रभावशाली स्थानाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारींची आपल्या महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचा आदेश भारताच्या स्पर्धा आयोगाने (काँपिटिशन कमिशन ऑफ इंडिया- सीसीआय) दिला आहे. 

  •  इंडियन न्यूजपेपर सोसायटीने (आयएनएस) पुरवलेल्या माहितीनुसार, अल्फाबेट आयएनसी. (मूळ कंपनी), गूगल एलएलसी, गूगल इंडिया प्रा.लि., गूगल आर्यलड लि. आणि गूगल एशिया पॅसिफिक पीटीई लि. या कंपन्या ‘न्यूज रेफरल सव्‍‌र्हिसेस’ शी संबंधित भारतीय ऑनलाइन वृत्त माध्यम बाजारातील त्यांच्या प्रभावी स्थानाचा कथितरित्या दुरुपयोग करत आहेत आणि हे स्पर्धा कायदा २००२च्या कलम ४ चे उल्लंघन आहे.

  • डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बातम्यांचे निर्माते/ प्रकाशक यांना त्यांच्या ‘कन्टेंट’ साठी योग्य ती किंमत दिली जात नाही. गूगलचे व्यासपीठ वापरून बातम्या शोधणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य तो कन्टेंट निर्माण करण्यासाठी भल्यामोठय़ा रकमेची गुंतवणूक केल्यानंतरही असे केले जाते. ‘सर्च रिझल्ट’ साठी कन्टेट निर्मात्यांचा कन्टेंट वापरल्याबद्दल त्यांना पुरेशी भरपाई देणे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स व स्पेन यांच्यासह अनेक देशांनी गूगलसह टेक कंपन्यांना कायद्योने बंधनकारक केले आहे.

  •  गूगल जाहिरातींतून जो एकूण महसूल मिळवते आणि त्याचा जो प्रत्यक्ष हिस्सा माध्यम समूहांना हस्तांतरित करते, त्याबाबत वृत्त माध्यम समूहांना पूर्णपणे अंधारात ठेवले जाते. ‘अ‍ॅड टेक व्हॅल्यू’ साखळीवर गूगलने पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, अशाप्रकारे त्याच्या प्रभावी स्थानाचा दुरुपयोग केला आहे असा आरोप करणारी तक्रारी दि युरोपियन पब्लिशर्स कौन्सिलनेही दाखल केली होती.

भारताची चीनकडून तातडीने सैन्यमाघारीची अपेक्षा :
  • पूर्व लडाखमधील संघर्षांच्या उर्वरित टिकाणांवरून सैन्यमाघारीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे भारताने शुक्रवारी चीनला स्पष्ट शब्दांत सांगितले. सीमाभागातील परिस्थिती असामान्य असेल, तर द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर येऊ शकत नाहीत, यावर भारताने भर दिला.

  • संबंध पुन्हा सामान्य व्हायचे असतील, तर सीमा भागांत शांतता प्रस्थापित होणे आवश्यक असेल, असे सुमारे तीन तास चाललेल्या ‘स्पष्ट’ चर्चेत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी भारत भेटीवर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांना सांगितले.

  • ‘आपले संबंध सुधारण्यास आपण दोघेही बांधील असू, तर सध्या सुरू असलेल्या सैन्य माघारीच्या बोलण्यांमध्ये ही बांधिलकी पूर्णपणे व्यक्त व्हायला हवी’, असे जयशंकर यांनी या चर्चेनंतर लगेचच पत्रकार परिषदेत सांगितले.

  • सध्याच्या परिस्थितीचे वर्णन ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे करून, एप्रिल २०२० मध्ये चीनने केलेल्या कृतींमुळे भारत व चीन यांच्यातील संबंध ‘विस्कळीत’ झाले आहेत, असेही जयशंकर यांनी सांगितले.

पुढील वर्षीपासून महिला ‘आयपीएल’; यंदा चार प्रदर्शनीय सामने; ‘बीसीसीआय’ची घोषणा :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) पुढील वर्षीपासून महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटला प्रारंभ करण्याची योजना आहे, असे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी सांगितले. याचप्रमाणे एक वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा महिलांचे चार प्रदर्शनीय सामने होणार आहेत.

  • महिलांचे ‘आयपीएल’ सुरू करण्यात दिरंगाई केल्यामुळे टीका होत असलेल्या ‘बीसीसीआय’ला आता वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर गांगुली यांनी दिली.

  • ‘‘पुरुषांच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने चालू असताना तीन महिला संघांमध्ये चार प्रदर्शनीय सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या हंगामात पाच ते सहा संघांचा समावेश असू शकेल, परंतु यासाठीसुद्धा सर्वसाधारण सभेची मंजुरी लागेल,’’ असे ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. प्रदर्शनीय सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होण्याची दाट शक्यता आहे.

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे,” अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन :
  • संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज दोन्ही सभागृहात केले. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  • गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती व अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.

  • यावेळी परब यांनी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८% करण्यात आला, घरभाडे भत्ता ७ %, १४ % २१ % वरुन ८%, १६ % आणि २४% टक्के करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये ५०००, रुपये ४००० व रुपये २५०० अशी वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये ७००० ते ९००० रुपये वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये ६३ कोटीपेक्षा जादा भार पडला आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने घेतली असल्याची माहितीही मंत्री, ॲड. परब यांनी सभागृहाला दिली.

  • तसेच संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसताना कर्मचाऱ्यांना २५०० ते ५००० रुपये दिवाळी भेट म्हणून दिले. यामुळे महामंडळावर सुमारे २४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला, असेही त्यांनी सांगितले.

२६ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.