चालू घडामोडी आणि दिनविशेष - 26 जून 2023

Date : 26 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून आता डिजिटल प्रमाणपत्रे, गुणपत्रके
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी, टायपिंग आदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. अशी बनावट प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आता राज्य परीक्षा परिषदेकडून सर्व परीक्षांची प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि क्यूआर कोड वापरण्यात येणार आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षा परिषदेची आर्थिक बचतही होणार आहे.
  • परीक्षा परिषदेकडून देण्यात येणारी सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्यासह त्यांची पडताळणी क्युआर कोडच्या माध्यमातून संबंधित संस्था, तसेच अधिकारी स्तरावर केली जाईल. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी टायपिंग व लघुलेखन विषयासाठी एकूण ६२ हजार ७०६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार ४८२ (उत्तीर्ण) विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि १२ हजार २२४ (अनुपस्थित, अनुत्तीर्ण आणि राखीव) विद्यार्थ्यांना गुणपत्रक आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन स्वरुपात संबंधित संस्थांना संस्था लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • तसेच या पुढे परीक्षा परिषदेमार्फत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र, गुणपत्रक दिले जाईल. सध्या उपलब्ध माहितीनुसार संबंधित संस्थांना संस्था लॉगिनद्वारे प्रमाणपत्र, गुणपत्रक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र पुढील परीक्षेवेळी विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक घेऊन थेट उमेदवारांच्याच ई-मेलवर प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.
  • डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संबंधित उमेदवारांना प्रमाणपत्र, गुणपत्रक उपलब्ध होईल. सध्यस्थितीत उमेदवारांपर्यंत प्रमाणपत्र पोहोचण्यासाठी किमान एक ते दोन महिने लागतात. यापूर्वीच्या परीक्षा प्रमाणपत्र वितरणातील गैरप्रकार लक्षात घेता डिजिटल प्रमाणपत्रावर डिजिटल स्वाक्षरी असल्याने आपोआपच गैरप्रकाराला आळा बसेल.
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे
  • साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक…यांची नावे चर्चेत होती. त्यातून अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
  • याच बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार झाला असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
राज्यातील १०७ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द होणार, ७ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे महारेराचे आवाहन
  • राज्यभरातील १०७ महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. या प्रकल्पांची यादी महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी ७ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जुन्या ८८ प्रकल्पांबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी १७ जूनपर्यंत असलेली मुदत ७ जुलै अशी करण्यात आली आहे. नवीन १९ प्रकल्पांबाबत ७ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविता येतील असे महारेराने जाहीर केले आहे.
  • नवीन गृहप्रकल्पांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. तर विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करणेही विकासकांसाठी बंधनकारक आहे. जे विकासक वेळेत प्रकल्प पूर्ण करत नाहीत किंवा नोंदणीची मुदत संपते त्या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद रेरा कायद्यात आहे. आता महारेराने १० फेब्रुवारी रोजी एका परिपत्रकाद्वारे अव्यहार्य आणि कधीही पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरु झाली असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात महारेराने अशा ८८ प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शून्य नोंदणी, निधी उपलब्धता नसणे, प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असणे, न्यायालयीन खटले, कौटुंबिक वाद, नियोजनाबाबत शासकीय नवीन अधिसूचना या आणि अशा काही कारणांमुळे पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे.
  • अशा ८८ प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी महारेराने १७ जूनपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते. मात्र विहित मुदतीत एकही आक्षेप नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यासाठी आणखी एक संधी ग्राहक आणि संबंधितांना देण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. त्यानुसार ही मुदत आता ७ जुलै अशी करण्यात आली आहे. त्याचवेळी असे आणखी १९ प्रकल्प शोधून महारेराने त्यांचीही नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही ७ जुलैपर्यंत [email protected] या मेलवर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले आहे. विहित मुदतीत आक्षेप न आल्यास नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
भारतात बनवलेली लस आता खासगी रुग्णालयातही मिळणार, किंमत किती आहे माहितेय?
  • GEMCOVAC – OM ही भारतीय बनावटीची ओमायक्रॉन व्हायरसविरोधातील बुस्टर लस आता खासगी रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने ही लस उत्पादित केली असून ही लस प्रति डोस २ हजार २९२ रुपयांना विकली जाणार आहे.
  • ही जगातील पहिली इंट्राडर्मल सुईमुक्त लस आहे, असं कंपनीचे सीईओ संजय सिंग यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी mRNA बुस्टल लस लॉन्च केली असून या लसीला नुकतीच ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडियाकडून आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. करोना भारतातून अद्यापही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे आम्ही हाय अलर्टवर आहोत. आमच्याकडे सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीद्वारे GEMCOVAC – OM चे १२ लाख डोस मंजूर झाले आहेत, अशी माहिती सिंग यांनी दिली.
  • डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (DBT) आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) यांच्या निधीच्या मदतीने जेनोव्हाने स्वदेशी प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पहिली mRNA लस विकसित केली आहे. काही दिवसांपूर्वी या लसीला इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन (EUA) साठी ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
  • GEMCOVAC-OM ही सरकारच्या आत्मनिर्भर भारत ३.० पॅकेज अंतर्गत DBT आणि BIRAC द्वारे राबविण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षाच्या मदतीने विकसित केलेली पाचवी लस आहे. “या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही भारतात लस विकासाची गती वाढवू शकतो. भविष्यात जलद लस विकास कार्यक्रमाद्वारे आम्ही नवीन लस आणण्यासाठी लागणारा वेळ आणखी कमी करू शकतो”, असं जेनेव्हाचे सीईओंनी स्पष्ट केलं.
  • या लसीचा प्रभाव लक्षात घेता अनेक परदेशी कंपन्यांनीही या लसीची मागणी करायला सुरुवात केली आहे. पीफायजर आणि मॉर्डनासारख्या लसी ऋण ८० अंश सेल्सिअस तापमानाता ठेवणे गरजेचे असताना Gemcovac-OM या लसीसाठी २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे गरजेचे आहे.
कैरोतील ऐतिहासिक मशिदीला पंतप्रधान मोदींची भेट
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इजिप्तमध्ये कैरो येथील अकराव्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला भेट दिली. भारतातील दाऊदी बोहरा समाजाच्या मदतीने या मशिदीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
  • इजिप्त भेटीदरम्यान दुसऱ्या दिवशी मोदींनी फातिमिया काळातील या शिया मशिदीला भेट दिली. तेथे त्यांचे स्वागत इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री डॉ. मुस्तफा वझीरी यांनी केले. मोदींना ही मशीद दाखवण्यात आली, तिचे नूतनीकरण सुमारे तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. पंतप्रधानांनी मशिदीच्या िभती आणि दरवाजांवर केलेल्या जटिल कोरीव नक्षीकामाची प्रशंसा केली. ही मशीद सन १०१२ मध्ये उभारण्यात आली आहे.
  • परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे, की, पंतप्रधान मोदींनी या शिया मशिदीच्या देखभालीत सक्रिय सहभागी असलेल्या बोहरा समुदायाच्या नेत्यांचीही भेट घेतली व भारत-इजिप्तवासीयांतील दृढ संबंध अधोरेखित केले. फातिमिया काळाशी भारतात स्थायिक बोहरा समाजाचा संबंध आहे. इजिप्तमधील भारताचे राजदूत अजित गुप्ते यांनी यापूर्वी सांगितले होते की, बोहरा समाज १९७० पासून मशिदीची देखभाल करत आहे. पंतप्रधानांचे अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये स्थायिक बोहरा  समाजाशी दीर्घकाळ स्नेहसंबंध आहेत.
भारत-अमेरिका संबंधांचा नवा अध्याय; भारतीय समुदायाच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
  • भारत व अमेरिका यांच्या संबंधांचा नवा आणि गौरवशाली अध्याय सुरू झाला असून, जग आणखी चांगले बनवण्यासाठी दोन महान लोकशाही देश त्यांचे संबंध बळकट बनवत असल्याचे सारे जग पाहात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात केले.
  • या दोन देशांमधील भागीदारीची पूर्ण क्षमता अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही, असे येथील रोनाल्ड रेगन इमारत व आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रात शुक्रवारी भारतीय समुदायाच्या एका अत्यंत उत्साही मेळाव्याला संबोधित करताना मोदी म्हणाले. एकविसाव्या शतकात जग आणखी चांगले बनवण्यासाठी भारत व अमेरिकेची भागीदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • या दोन्ही देशांनी जागतिक मुद्दय़ांवर अभिसरणाचा अनुभव घेतला असून, त्यांचे वाढते संबंध ही ‘मेक इन इंडिया अँड मेक फॉर दि वल्र्ड’च्या प्रयत्नांसाठी चालना राहील, असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञान हस्तांतरण, उत्पादनाला चालना आणि औद्योगिक पुरवठा साखळी मजबूत करणे याबाबत झालेल्या अनेक करारांचा त्यांच्या विधानाला संदर्भ होता.
  • भारत ही लोकशाहीची जननी असून, अमेरिका हा आधुनिक लोकशाहीचा कैवारी आहे आणि दोन महान लोकशाही देशांच्या संबंधांचे बळकटीकरण होताना जग पाहात आहे, असे मोदी यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या संबंधांच्या खऱ्या क्षमतेच्या जाणिवेत मदत करण्यात भारतीय समुदाय मोठी भूमिका बजावेल आणि भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्यास हीच योग्य वेळ आहे, याचाही मोदी यांनी उल्लेख केला.

26 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.