चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ जून २०२१

Updated On : Jun 26, 2021 | Category : Current Affairs


पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षी जुलैमध्ये :
 • पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षी जुलै महिन्यात कार्यान्वित होईल. त्या युद्धनौकेची क्षमता, वैविध्य हे  देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

 • कोचीन बंदराजवळ अर्नाकुलम येथे भेट दिल्यानंतर त्यांनी या  युद्धनौकेची पाहणी केली. राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारतासाठी ही युद्धनौका  अभिमानास्पद  असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले ते पाऊल आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने या विमानवाहू युद्धनौके चा प्रकल्प मंजूर केला होता. या विमानवाहू युद्धनौकेच्या बांधणीत लक्षणीय प्रगती झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 • पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ही भारताच्या  स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना एक महत्त्वाची बाब आहे. या  युद्धनौकेची मारक क्षमता मोठी असून ती वैविध्यपूर्ण आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेत त्यामुळे भरच पडणार आहे.  देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल. असे सांगून ते म्हणाले की, ही युद्धनौका पाहताना अतिशय आनंद झाला.

 • स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आहे. कारवार येथे सीबर्ड प्रकल्पाची पाहणी राजनाथ सिंह यांनी केली. तेथे भारताचा सर्वात मोठा नौदल तळ उभारला जात आहे. हिंदी महासागरात त्यामुळे भारताची ताकद वाढणार आहे.  भारतीय शिपयार्डमध्ये ४४ युद्धनौकांची निर्मिती केली आहे. विमानवाहू युद्धनौकेत ७५  टक्के भाग स्वदेशी असून त्यातील पोलाद, शस्त्रे व संवेदक भारतीय आहेत.

चीनची पहिली ‘बुलेट ट्रेन’ भारतीय सीमेलगत सुरू :
 • तिबेट या हिमालयातील भागात चीनने  शुक्रवारी संपूर्णपणे विजेवर चालणारी बुलेट ट्रेन सुरू केली असून ती राजधानी ल्हासा व न्यायिंगची यांना जोडणारी आहे. अरुणाचल प्रदेश लगत असलेल्या एका शहराजवळून ही रेल्वे जाते.

 • ल्हासा- न्यायिंगची यांना जोडणारा शिचुआन-तिबेट रेल्वेमार्ग तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन १ जुलैला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त होणार आहे.  तिबेट स्वायत्त प्रदेशात विद्युत बुलेट ट्रेन शुक्रवारी सकाळी सुरू झाली असून तिचा वेग ताशी १६० कि.मी आहे.

 • एकेरी मार्गावरून ही रेल्वे धावणार असून ती  ल्हासा, शन्नान, न्यायिंगची यासह नऊ स्थानकांवर थांबेल. प्रवासी व मालवाहतूक त्यातून केली जाणार असून रस्ता मार्गापेक्षा ल्हासा- न्यायिंगची अंतर ५ तासांवरून ३.५ तासांवर येणार आहे. शन्नान व न्यायिंगची यांच्यातील प्रवासाचा काळ ६ तासांवरून दोन तासांवर येणार आहे.

अमेरिकेतील २ लाख भारतीय युवकांवर माघारीचे संकट :
 • अमेरिकेतील भारतीय तरुणांच्या एका गटाला मायदेशी पाठवले जाण्याची भीती असून त्यांनी त्याबाबत बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी व काँग्रेस सदस्यांशी संपर्क साधला आहे. हकालपट्टी होण्याची शक्यता असलेल्या अशा तरुणांची संख्या दोन लाख असून त्यांनी त्यांचे सगळे बालपण अमेरिकेत घालवलेले आहे.

 • त्यांना आता देश सोडावा लागणार हे जवळपास निश्चिात आहे. कारण ते वयाच्या एकविशीत आले आहेत. ते आईवडिलांवर अवलंबून  न राहण्याच्या वयात येत आहेत. या मुलांच्या आईवडिलांना ग्रीनकार्ड मिळालेले नाही. ग्रीनकार्ड मिळण्यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतात. नंतर अमेरिकेत कायमच्या वास्तव्यासाठी परवाना मिळत असतो.

 • दीप पटेल या भारतीय युवकाच्या नेतृत्वाखाली भारतीय लोक काँग्रेस सदस्य व सेनेट सदस्यांना भेटले. कॅपिटॉल हिल येथे गेल्या आठवड्यात त्यांचे स्वागत करण्यात आले. अमेरिकी काँग्रेसवर मायदेशी पाठवले जाण्यापासूनच्या कारवाईतून मुक्तता मिळण्यासाठी संपर्क साधणारा हा पहिला गट आहे. पटेल याने या प्रकरणात पुढाकार घेतला असून त्याला परीन म्हात्रे, नागा राधल श्रीराम यांचा पाठिंबा आहे. लक्ष्मी पर्वतीनाथन, सर्वणी कुनापरेड्डी हेही  सहभागी झाले होते.

अखेर सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत दिली मुदतवाढ :
 • SMS च्या माध्यमातून आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याचा पर्याय सुरू आहे. यामध्ये ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत म्हणजेच आधार आणि पॅनशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरुन एसएमएस पाठवून आधार आणि पॅन लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. लिंक करण्यासाठी…UIDPAN<SPACE><12 Digit Aadhaar Number><SPACE><10 Digit PAN>

 • ऑफलाइन लिंक करण्यासाठी पॅन सर्व्हिस प्रोव्हायडर, एनएसडीएल किंवा यूटीआयआयटीएसएलच्या सर्व्हिस सेंटरवर जाऊन पॅनकार्ड आधारशी लिंक केलं जाऊ शकतं. यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागणार आहे. निर्धारित शुल्क भरून आपल्याला हे करता येणार आहे.

 • ऑनलाइन लिंक करण्यासाठी https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर जाऊन डाव्या बाजूला क्विक लिंक्स सेक्शनमध्ये ‘Link Aadhar’वर क्लिक करा. पेज ओपन झाल्यानंतर त्यात पॅन, आधार नंबर आणि आधारवरील नाव भरा. जर तुमच्या आधारवर फक्त जन्म वर्ष असेल तर आपल्याला ‘I have only year of birth in Aadhaar card’या विकल्पावर टिक करावं लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि लिंक आधार वर क्लिक करा. यानंतर कन्फर्मेशन पेज ओपन होईल. त्यात पॅन आणि आधार लिंक झाल्याचं दिसेल.

भारतीय महिला संघाला कांस्य :
 • राही सरनोबत, मनू भाकर आणि यशस्विनी सिंग देस्वाल या भारतीय त्रिकुटाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेतील महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.

 • कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघाने हंगेरीच्या संघाला (व्हेरोनिका मेजर, मिरआम जॅको आणि सारा राहेल फॅबियान) १६-१२ असे पराभूत केले. पात्रता स्पध्रेत भारतीय त्रिकुटाने ५७३ गुणांची कमाई केली.

 • पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, दीपक कुमार आणि दिव्यांश सिंग पनवार या त्रिकुटाने कांस्यपदकाची लढत गमावली. सर्बियाने त्यांना १६-१४ असे पराभूत केले.  महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक गटात भारताच्या अंजुम मुदगिल, अपूर्वी चंडेला आणि ईलाव्हेनिल व्हालारिव्हान या त्रिकुटाला ११वे स्थान मिळाले. पात्रता फेरीत त्यांना १६६७.७ गुण मिळाले होते.

२६ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)