चालू घडामोडी आणि दिनविशेष - 26 डिसेंबर 2023

Date : 26 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सूचना
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार. १ जानेवारी २०२४ पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. दहावीच्या मुख्य परीक्षा १९ फेब्रुवारी १३ मार्च दरम्यान तर बारावीच्या १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२४ दरम्यान घेतल्या जातील.
  • शिक्षण मंडळाने सर्व शाळांना प्रात्यक्षिक परिक्षेशी संबंधित आवश्यक बाबी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
  • विद्यार्थी तसेच पालकांना परीक्षेबाबत माहिती देण्याचे निर्देश आहेत. जेणेकरून ते पूर्वतयारी करू शकतील.अपंग विद्यार्थ्यांसाठी शाळा इमारतीत योग्य ती रचना आवश्यक आहे. तसेच मंडळाने अन्य काही मार्गदर्शक सूचना सर्व शाळांना केल्या आहेत.
मतदान केंद्रांवरील गोंधळाला लगाम; लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० हजार मतदान केंद्रांवर चित्रीकरण
  • आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के म्हणजे सुमारे ५० हजार मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे.
  • संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण केले जाणार असून त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केले जाणार आहे. त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
  • राज्यात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यात ९७ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ५० टक्के मतदान केंद्रे म्हणजे सुमारे ५० हजार केंद्रांवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचाही समावेश आहे. 

काय होणार?
* मतदार मतदान केंद्रावर आल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत होणाऱ्या सर्व घडामोडी यांचे चित्रीकरण होणार आहे.

* मतदार मतदान करतानाचे चित्रीकरण केले जाणार नाही. मात्र मतदान यंत्राचा (ईव्हीएम) मतदान केल्यानंतरचा ‘बीप’ असा आवाज ध्वनिमुद्रित होणार आहे. यामुळे मतदान केंद्रावरील गडबडीला आळा बसणार आहे.

* ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्यास किंवा कोणताही गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मिळू शकेल आणि हे प्रकार रोखले जातील.

* हे चित्रीकरण लोकसभेचा कालावधी संपेपर्यंत जतन केले जाणार असून ते पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुरळीत व पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यास मदत होणार  आहे.

* ही प्रक्रिया राबवण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. मतदानाच्या दिवशी मंत्रालयातील मध्यवर्ती केंद्राचे त्यावर नियंत्रण राहणार आहे.

शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शतकमहोत्सवी मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या तंजावर, तामिळनाडू येथील सरस्वती महालात ठेवण्यात आलेल्या नाट्य वाङमयाला वंदन करुन करण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले यांनी २२ मराठी नाटके लिहिली असून, १६९० साली ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे त्यांनी पहिले मराठी नाटक लिहिले.
  • या शंभराव्या नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आहेत. हा नाट्य वाङमय वंदन सोहळा ९९ व्या नाट्य संमेलन अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते २७ डिसेंबर रोजी होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदी, गणेश वंदना, नटराज नृत्य व शाहराज राजे भोसले लिखीत ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ या नाटकातील प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करतील. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
  • नाटककार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून दिनांक २९ डिसेंबर रोजी सांगली येथे संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. त्यानंतर १०० व्या मराठी नाट्य संमेलनाचा आरंभ ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे होणार आहे.
..हा आहे भारतातील एकमेव व्याघ्रप्रकल्प, येथे ‘मेलेनिस्टिक’ वाघ आढळतात
  • ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे, ज्याठिकाणी देशातील सर्वच काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • जगभरातील एकूण ७५ टक्के वाघ भारतात आहेत. २०२२ च्या व्याघ्रगणनेनुसार देशातील वाघांची संख्या तीन हजार ६८२ इतकी झाली आहे. यात ७८५ वाघांसह मध्यप्रदेश पहिल्या, ५६३ वाघांसह कर्नाटक दुसऱ्या, ५६० वाघांसह उत्तराखंड तिसऱ्या तर ४४४ वाघांसह महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. वास्तविक ओडिशा या व्याघ्रसंख्येच्या जवळही नाही. मात्र, ओडिशातील सिमिलिपाल व्याघ्रप्रकल्प हा एकमेव आहे, ज्याठिकाणी एकूण १६ वाघांपैकी दहा वाघ काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ आहेत. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या अनुवंशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते.
  • गेल्या पाच वर्षांत सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पाला वन्यजीव संरक्षण, अधिवास व्यवस्थापन, मानव संसाधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ३२.७५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथील पर्यावरणशास्त्रज्ञ उमा रामकृष्णन आणि त्यांचे विद्यार्थी विनय सागर यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये एक अभ्यास करण्यात आला. ‘ट्रान्समेम्ब्रेन एमिनोपेप्टिडेज क्यू’ या जनुकामुळे वाघाच्या शरीराच्या वरच्या भागाचा रंग गडद होतो.
  • सप्टेंबर २०२१ मध्ये ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत याबाब एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या खूपच वेगळी आहे. इतर वाघांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये जीन्सचा प्रवाह खूपच मर्यादित आहे. अशा वेगळ्या वाघांची संख्या नामशेष होण्यास अत्यंत संवेदनशील आहे. परिणामी व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही या अभ्यासात संशोधकांनी म्हटले आहे.
आर्क्टिकवर आजवरचा सर्वांत उष्ण उन्हाळा ? जाणून घ्या जगावर काय परिणाम होणार…
  • जागतिक हवामान बदलाचा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळील आर्क्टिक प्रदेशाला मोठा फटका बसत आहे. आर्क्टिक प्रदेशाने २०२३मध्ये आजवरचा सर्वांत उष्ण उन्हाळा अनुभवला आहे. परिसरात वेगाने तापमानवाढ होत असून, परिसंस्था, मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. जगातील अन्य भागांच्या तुलनेत आर्क्टिक परिसर वेगाने गरम होत आहे, अशी माहिती जागतिक हवामान संघटनेने अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक (नोआ) या संस्थेच्या हवाल्याने दिली आहे.
  • नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फरिकने (नोआ) वार्षिक आर्क्टिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्या अहवालात म्हटले आहे, जगातील अन्य भागांच्या तुलनेत आर्क्टिक परिसर वेगाने गरम होत आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्क्टिक प्रदेशातील बर्फ वेगाने वितळत आहे. सन २०२३ चा उन्हाळा आजवरचा सर्वांत उष्ण ठरला आहे. ग्रीनलॅण्डमधील तापमानवाढीने बर्फ वितळण्याच्या वेगाने आजवरचा उच्चांक गाठला आहे.
  • उत्तर कॅनडातील तापमानवाढीमुळे पर्जन्यवृष्टी सरासरीपेक्षा कमी झाली. उष्णतेत वाढ झाल्यामुळे जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सन १९०० नंतर २०२३ हे वर्ष सहावे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. सन १९७९नंतर आर्क्टिक प्रदेशाचे उपग्रहाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू झाले, तेव्हापासून यंदा बर्फ वितळण्याच्या वेगाने उच्चांक गाठल्याचे, ग्रीनलँडमध्ये हिवाळ्यात जास्त बर्फ साचूनही उन्हाळ्यात कमी बर्फ राहिल्याचे आणि वेगाने बर्फ वितळल्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पतींची वाढ होऊन तो यंदा हिरवागार झाल्याची छायाचित्रे उपग्रहांनी टिपली आहेत.

 

नेपाळच्या पंतप्रधानपदी प्रचंड यांची निवड : 
  • विरोधी पक्ष सीपीएन-यूएमएल आणि अन्य छोटे पक्ष रविवारी नाटय़मय घटनाक्रमानंतर सीपीएन- माओवादी सेंटरचे  (सीपीएन- एमसी) अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांना पाठिंबा देण्यास तयार झाले. त्यामुळे प्रचंड यांचा नेपाळचे पुढील पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

  • माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल, सीपीएन-एमसी, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आणि अन्य छोटय़ा पक्षांची एक महत्त्वाची बैठक काठमांडूमध्ये झाली. या वेळी सर्व पक्षांनी ‘प्रचंड’ यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यास सहमती दर्शविली. सीपीएन-एमसीचे सरचिटणीस देब गुरुंग यांनी सांगितले की, सीपीएन-यूएमएल, सीपीएन-एमसी आणि अन्य पक्ष घटनेच्या अनुच्छेद ७६ (२) नुसार १६५ खासदारांच्या स्वाक्षरीसह राष्ट्रपती कार्यालय ‘शीतलनिवास’मध्ये जाऊन प्रचंड यांचा पंतप्रधानपदावरील दावा सादर करण्यास तयार आहेत.

  • राष्ट्रपतींना देण्यासाठी एक करारपत्र तयार करण्यात येत आहे. ओली यांचे निवासस्थान बालकोटमध्ये झालेल्या बैठकीला माजी पंतप्रधान ओली यांच्यासह प्रचंड, आरएसपीचे अध्यक्ष रवि लामिछाने, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे प्रमुख राजेंद्र लिंगडेन, जनता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अशोक राय यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. प्रचंड आणि ओली यांच्यात ‘रोटेशन’ पद्धतीने सरकारचे नेतृत्व करण्यास एकमत झाले. त्यानंतर प्रचंड अगोदर पंतप्रधान होण्यास ओली यांनी सहमती दर्शविली.

  • नव्या आघाडीला २७५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहातील १६५ सदस्यांचा पाठिंबा आहे. यामध्ये सीपीएन-यूएमएलचे ७८, सीपीएन-एमसी ३२, आरएसपी २०, आरपीपी १४, जेएसपी १२, जनमतचे सहा आणि नागरिक उन्मुक्ती पार्टीचे तीन सदस्यांचा समावेश आहे. सीपीएन-यूएमएलचे सरचिटणीस शंकर पोखरेल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, सर्वात मोठा पक्ष म्हणून नेपाळी काँग्रेसला राष्ट्रपतींकडून देण्यात आलेल्या कालावधीत नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यात अपयश आले. आता सीपीएन-यूएमएलने १६५ खासदारांच्या पाठिंब्याने प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे.

शीख धर्मीयांना भरतीसाठी दाढी-पगडीसह मुभा; अमेरिकेच्या नौदलाला न्यायालयाचे आदेश : 
  • अमेरिकेच्या नौदलात भरती करताना शीख धर्मीयांना त्यांच्या दाढी-पगडीमुळे भरती नाकारता येणार नाही, असा निर्णय अमेरिकेतील न्यायालयाने दिला. त्यामुळे तीन शीख धर्मीय प्रशिक्षणार्थीचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना आता आपल्या धार्मिक श्रद्धांशी तडजोड न करता नौदलात भरती होऊन प्रशिक्षण घेता येईल.

  • आकाश सिंग, जसकीरत सिंग आणि मिलाप सिंग चहल यांनी नौदलाच्या नियमात त्यांच्यासाठी सवलत मागितली होती. आपल्या धार्मिक श्रद्धांनुसार पगडी व दाढी राखण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र ‘मरीन कॉर्प्स’ने या तिघांना स्पष्ट केले, की मूलभूत प्रशिक्षणापूर्वी दाढी-केस कमी करणे अनिवार्य आहे. तरच सेवा देऊ शकतात.

  • कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्राथमिक मनाई आदेशाची विनंती नाकारल्यानंतर त्यांनी सप्टेंबरमध्ये ‘यूएस कोर्ट ऑफ अपील’मध्ये यासंदर्भात दाद मागितली. या न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने शुक्रवारी निकाल दिला. त्यात नमूद केले, की त्यांच्या श्रद्धांचे पालन करण्यासाठी त्यांना खूप त्रास व आघात सहन करावे लागत आहेत. या तिघांचे वकील एरिक बॅक्स्टर यांनी ‘ट्वीट’ संदेशात नमूद केले, की न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘यूएस मरीन कॉर्प्स’मध्ये सेवा करताना शीख धर्मीय  धार्मिक श्रद्धेनुसार पगडी व दाढी राखू शकतात.

भारताला जगात विशेष स्थान - मोदी :
  • भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे, करोना प्रतिबंधक लशींच्या २२० कोटींहून अधिक मात्रा देण्यात आलेले व्यापक यश व निर्यात आकडा चार ‘ट्रिलियन डॉलर’पर्यंत पोहोचणे आदी क्षेत्रांतील यशोगाथेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घेतला. ते म्हणाले, की २०२२ या वर्षांत विविध क्षेत्रात मिळालेल्या यशामुळे जगात भारताने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. आकाशवाणीच्या मासिक संवाद सत्राच्या ९६ व्या व या वर्षांतील अखेरच्या भागात मोदींनी अनेक देशांमध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे देशवासीयांचे लक्ष वेधले. या संदर्भात सर्वानी सतर्क, सुरक्षित आणि सावध राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  • भारताला ‘जी-२०’ राष्ट्रगटाचे अध्यक्षपद मिळाल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमास देशवासियांनी ‘लोक चळवळ’ बनविण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले, की २०२२ हे वर्ष खरोखरच खूप प्रेरणादायी आणि अनेक अर्थानी अद्भूत होते. या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे ७५ वर्षांची पूर्तता झाली. या वर्षी देशाचा ‘अमृतकाळ’ (७५ ते १०० वर्षांदरम्यानचा काळ) सुरू झाला. या वर्षी देशाला नवी गती मिळाली. २०२२ च्या विविध यशांनी आज संपूर्ण जगात भारताचे एक विशेष स्थान निर्माण झाले आहे. २०२२ मध्ये भारताने जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला.

  • भारताने २२० कोटी नागरिकांना करोना प्रतिबंधक लशींची मात्रा देण्याची अविश्वसनीय कामगिरी आपण केली. याच वर्षी भारताने निर्यातीत ४०० अब्ज डॉलरचा जादूई आकडा मागे टाकला. २०२२ मध्ये देशवासीयांनी ‘स्वावलंबी भारता’चा संकल्प केल्याचे सांगून मोदी म्हणाले, की देशातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ नौदलाच्या सेवेत रुजू झाली.

  • ‘करोनाबाबत सतर्क राहावे’- चीन, जपान, दक्षिण कोरियासह जगातील अनेक देशांमध्ये करोना प्रादुर्भावात वाढ झाल्याचे नमूद करून मोदींनी देशवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की यावेळी बरेच लोक सुट्टीचा आनंद लुटण्याच्या  तयारीत आहेत.  आनंद भरपूर लुटा, पण थोडे सावधही राहा. मुखपट्टी व नियमित हात धुणे आदी खबरदारी घेतलीच पाहिजे. सावध राहिलो तर आपण सुरक्षित राहू.

‘आधार’संलग्न नसलेले ‘पॅन’ खाते ३१ मार्चनंतर निष्क्रिय : 
  • ज्या नागरिकांनी आपला कायम खाते क्रमांक (पर्मनंट अकाउंट नंबर – पॅन) ‘आधार’शी जोडला नाही, त्यांचे ‘पॅन’ निष्क्रिय केले जाईल, त्यामुळे ‘पॅन’ विनाविलंब ‘आधार’शी जोडून घेण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.१९६१ च्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार, सवलत श्रेणीत नसलेल्या सर्व ‘पॅन’धारकांनी ३१ मार्च २०२३ पूर्वी आपले ‘पॅन’ ‘आधार’शी जोडणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास १ एप्रिल २०२३ पासून संबंधितांचे ‘पॅन’ निष्क्रिय केले जाईल.

  • केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे २०१७ मध्ये प्रसृत केलेल्या अधिसूचनेनुसार आसाम, जम्मू-काश्मीर व मेघालयातील रहिवासी, तसेच अनिवासी भारतीय व ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना यात सवलत देण्यात आली आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’ने (सीबीडीटी) ३० मार्च रोजी प्रसृत केलेल्या परिपत्रकात नमूद केले, की एकदा ‘पॅन’ निष्क्रिय झाले, की संबंधित व्यक्ती प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या कारवायांसाठी जबाबदार असेल.

  • निष्क्रिय ‘पॅन’ वापरून प्राप्तिकर परतावा भरता येणार नाही. प्रलंबित धन परताव्यांची प्रक्रिया केली जाणार नाही, निष्क्रिय ‘पॅन’मधून प्रलंबित परतावा जारी केला जाणार नाही. सदोष परतावा दुरुस्त केला जाऊ शकत नाही. जास्त दराने जास्त कर आकारला जाईल.

प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांचा देशभर ट्रॅक्टर मोर्चा : 
  • प्रजासत्ताकदिनी देशातील सर्व जिल्ह्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची शनिवारी कर्नाल (हरियाणा) येथील गुरुद्वारा डेरा कार सेवा येथे ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक हन्नान मौला यांनी ही माहिती दिली.

  • हन्नान मौला म्हणाले, या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरावरील सरकारी कार्यक्रम पार पडल्यानंतर देशभरात जिल्हास्तरावर ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. याच दिवशी हरियाणातील जिंद येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात येईल. या महापंचायतीमध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीत करावयाच्या आंदोलनाची तारीख आणि रुपरेषा निश्चित करण्यात येईल.

मागण्या काय?

  • शेतमाल हमीभाव कायदा करा
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा
  • शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्या 
  • शेतीयोग्य जमिनीचे भूसंपादन करू नका 
  • लखीमपूर खेरी हत्याकांडप्रकरणी राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या 
  • नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या
भारताचे मालिकेत निर्भेळ यश : 
  • रविचंद्रन अश्विन (६६ चेंडूंत नाबाद ४२) आणि श्रेयस अय्यर (४६ चेंडूंत नाबाद २९)  यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. भारताने १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी ४ बाद ४५ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, भारताचे तीन गडी लवकर बाद झाल्याने त्यांची अवस्था ७ बाद ७४ अशी बिकट झाली. यानंतर अय्यर आणि अश्विन यांनी आठव्या गडय़ासाठी १०५ चेंडूंत केलेल्या निर्णायक ७१ धावांच्या अभेद्य भागिदारीमुळे भारताला विजय मिळवता आला.

  • बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने (६३ धावांत ५ बळी) प्रभावी मारा केला, मात्र त्याला इतर गोलंदाजांची म्हणावी तशी साथ लाभली नाही. या मालिका विजयामुळे भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील आपली स्थिती मजबूत केली आहे. भारताने मालिकेतील पहिला कसोटी सामना १८८ धावांनी जिंकला होता.

  • चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर फिरकी गोलंदाजांनी आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केली. भारताने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात जयदेव उनाडकटला (१३) गमावले. पहिल्या डावात ९३ धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतने मैदानात येताच आक्रमक पवित्रा घेतला, मात्र नऊ धावांवर त्याला मिराजने बाद केले. यानंतर मिराजने अक्षर पटेलला (३४) माघारी पाठवत भारताच्या अडचणी वाढवल्या. यानंतर मैदानात असलेल्या अश्विन आणि अय्यर सुरुवातीला संयमाने खेळ केला. यादरम्यान, त्यांनी धावसंख्येत भर घालणे सुरूच ठेवले. ही भागीदारी मोडीत काढण्यासाठी बांगलादेशने आपला मोर्चा वेगवान गोलंदाजांकडे वळवला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. अश्विनला जीवदानही मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. अश्विनला सामनावीर, तर चेतेश्वर पुजाराला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

26 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.