चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2023

Date : 25 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८ षटकार मारत भारताने रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच देश
  • इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली फलंदाजी करत ५० षटकांत ५ गडी गमावून ३९९ धावा केल्या. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी भरपूर चौकार आणि षटकार मारले. ज्यामध्ये ३१ चौकार आणि १८ षटकारांचा समावेश होता. या १८ षटकारांच्या आधारे टीम इंडिया वनडे फॉरमॅटमध्ये ३००० षटकार पूर्ण करणारा पहिला संघ बनला आहे. याआधी वनडेमध्ये कोणत्याही संघाने ३००० षटकार मारलेले नाहीत.

सूर्यकुमार यादवने लगावले सर्वाधिक षटकार -

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून ७२ धावांची नाबाद खेळी करणारा फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या डावात सर्वाधिक ६ षटकार ठोकले. यानंतर शुबमन गिलने १०४ धावांच्या खेळीत ४ षटकार, श्रेयस अय्यरने १०५ धावांच्या खेळीत ३ षटकार, तर कर्णधार केएल राहुलने ५२ धावांच्या खेळीत ३ षटकार ठोकले. इशान किशननेही वेगवान खेळी खेळली आणि १८ चेंडूत ३१ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने २ षटकार ठोकले.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३००० षटकार मारणारा भारत पहिला संघ -

  • इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने १८ षटकार ठोकले, परंतु याआधी २०१३ मध्ये टीम इंडियाने बंगळुरूमध्ये या संघाविरुद्ध १९ षटकार ठोकले होते. भारतीय संघाने २०२३ साली इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९ षटकारही ठोकले होते. वनडेमध्ये भारताने २००७ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये बर्म्युडाविरुद्ध १८ षटकार मारले होते, तर २००९ मध्ये क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १८ षटकार मारले होते.

भारतासाठी वनडे डावात सर्वाधिक षटकार -

  • १९ षटकार विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू, २०१३
  • १९ षटकार विरुद्ध न्यूझीलंड, इंदूर, २०२३
  • १८ षटकार विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, २००७
  • १८ षटकार विरुद्ध न्यूझीलंड, क्राइस्टचर्च, २००९
  • १८ षटकार विरुद्ध ऑस्ट्रेलिया, इंदूर, २०२३
नासाने अंतराळात जमा केलेले अशनीचे नमुने पृथ्वीवर
  • ‘नासा’ने अंतराळात प्रथमच जमा केलेले अशनीचे नमुने तब्बल सात वर्षांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर पोहोचले आहेत. ते वाहून आणणारी कुपी यूताह वाळवंटात उतरवण्यात आली. (सूर्याभोवती फिरणाऱ्या महाकाय खडकासारख्या घटकांना अशनी असे म्हणतात.) ऑसिरिस- रेक्स या अवकाशयातून पृथ्वीच्या कक्षेत सुमारे ६३ हजार मैलांवर हे नमुने सोडण्यात आले. त्यानंतर सुमारे चार तासांनी ही लहानशी कुपी एका लष्करी क्षेत्रात पडली. दरम्यान, ते यान पुन्हा दुसरे नमुने आणण्यासाठी रवाना झाले.
  • पृथ्वीवर पोहोचलेल्या या कुपीत बेनू या अशनीच्या दगडमातीचे किमान कपभर तरी नमुने असावेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पण कुपी उघडली गेल्यानंतरच त्याबाबत निश्चितपणे सांगता येईल. तीन वर्षांपूर्वी हे नमुने जमा करताना ते कुपीच्या झाकणात अडकले होते. याआधी केवळ जपानला असे अशनीचे नमुने आणता आले होते. काही मोहिमांतून त्यांना चमचाभर नमुने मिळाले होते.
जगातील बलाढय़ देशांत भारताचे स्थान अधोरेखित; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
  • ‘‘आफ्रिकेतील देशांच्या महासंघाचा ‘जी-२०’ राष्ट्रगटात सदस्य म्हणून समावेश आणि भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक मार्गिकेसंदर्भात झालेल्या निर्णयामुळे जगातील बलाढय़ देशांत भारताने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
  •  या प्रस्तावित आर्थिक मार्गिकेची तुलना मोदींनी भारताच्या इतिहासातील समृद्ध काळातील व्यापार-व्यवसायाचा मुख्य माध्यम असलेल्या रेशीम मार्गाशी (सिल्क रूट) केली. आगामी शेकडो वर्षे ही मार्गिका जागतिक व्यापाराचा मुख्य आधार बनेल आणि या मार्गिकेची सुरुवात भारतीय भूमीवर झाली यांची इतिहासात कायमची नोंद राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
  • ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील आपल्या मासिक संवाद सत्रातील १०५ व्या भागात मोदी बोलत होते. त्यात मोदींनी चंद्रयान-३ आणि ‘जी-२०’चे यश, रोजगारनिर्मितीमध्ये पर्यटनाची भूमिका, भारतातील जागतिक वारसा स्थळांची वाढती संख्या आणि भारतीय संगीताबद्दल जगभरातील वाढती आस्था या विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधला.  त्यांनी  सण-उत्सव काळात स्थानिक   उत्पादने खरेदी करण्याच्या मंत्राची आठवण करून दिली.

देशाचा प्रत्येक भाग ‘वंदे भारत’ने जोडणार : मोदी

  • नवी दिल्ली : ‘‘पायाभूत सुविधांच्या विकासाची सध्याची गती आणि प्रमाण १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळणारे आहे. लवकरच देशाचा प्रत्येक भाग वंदे भारत रेल्वेगाडय़ांच्या सुविधेने जोडला जाईल. तो दिवस फार दूर नाही.’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी व्यक्त केला. 
  • मोदी यांनी  ११ राज्यांतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या नऊ ‘वंदे भारत’ रेल्वेगाडय़ांना दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील.
“शाळांऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्या”, महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती आक्रमक
  • समूहशाळा विकसित करणे, कंपन्यांना शाळा दत्तक देण्याची योजना आणि शासकीय पदभरतीचे कंत्राटीकरण करणे असे निर्णय राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने केली. हे निर्णय रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्यासोबतच प्रत्येक आमदार, खासदार आणि तहसीलदार यांना निवेदन द्यावे, राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र लिहून भावना कळवाव्यात, असे आवाहन समितीने शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना केले आहे. राज्य शिक्षण बचाव कृती समितीची बैठक शनिवारी (२४ सप्टेंबर) पुण्यात झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
  • “शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा करणारे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे निर्णय सरकारने बिनशर्त मागे घ्यावेत,” अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने सरकारकडे केली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “आम्ही बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची मागणी सरकारकडे करत असताना सरकार आणि प्रशासन गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण हिरावून घेत आहे. हे थांबवण्यासाठी आपल्याला मोठी लढाई उभारावी लागणार आहे. त्यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी करावी लागेल.”

“शाळांऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्या”

  • “शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरण्याऐवजी सरकारचा भर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावर भर देत आहे. १४ हजारांहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून समूहशाळा विकसित करणे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण हिरावून घेण्याचा गंभीर प्रकार आहे. शाळांना कंपन्यांकडे दत्तक देण्याऐवजी मंत्रालयाला कंपन्यांकडे दत्तक द्या,’ अशी बोचरी मागणी सुधीर तांबे यांनी केली.

“बहुजन विद्यार्थ्यांनी शिक्षणच घेऊ नये हे सरकारचे धोरण”

  • आमदार डॉ. आसगावकर म्हणाले, “राज्यातील एकही सरकारी शाळा बंद करणार नाही, असे शिक्षणमंत्री सभागृहात सांगतात. मात्र, दुसरीकडे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतात. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणच घेऊ नये, असे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे या धोरणाच्या विरोधात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी एकत्रित तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. याची सुरुवात कोल्हापुरातून करत असून येत्या ३० सप्टेंबरला सरकारच्या धोरणाविरोधात विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी अशा सर्वांना घेऊन मोर्चा काढणार आहे.”

“सरकार कोणत्याही प्रकारचे वेतनेतर अनुदान २०१९पासून देत नाही”

  • “शिक्षण क्षेत्रात सुरू असलेली बेबंदशाही थांबविण्यासाठी कृती कार्यक्रम आखून सरकारी आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे सरकारच्या विरोधात लढा उभारला पाहिजे,” असे बोरस्ते यांनी सांगितले. सावंत यांनीही सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करत सरकार कोणत्याही प्रकारचे वेतनेतर अनुदान २०१९पासून देत नाही. केवळ आश्वासने देत असल्याची टीका केली.
एशियन गेम्समध्ये भारताने उघडला पदकाचा पंजा, पहिल्या दिवस नारी शक्तीच्या नावावर
  • चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३मध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रविवारी या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी ५ पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता या त्रिकुटाने भारताला पहिले पदक मिळवून दिले. नेमबाजीत आणखी एक पदक जिंकले तर रोइंगमध्ये देशाला आतापर्यंत ३ पदके मिळाली आहेत.

या खेळाडूंनी पहिली ५ पदके जिंकली

  • चीनमधील हांगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने रविवारी शानदार सुरुवात केली. भारतीय खेळाडूंनी पदक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी तीन रौप्य आणि दोन कांस्यांसह एकूण पाच पदके जिंकली. भारतासाठी पहिले पदक अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी रोइंगच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कलमध्ये जिंकले. या जोडीने रौप्यपदक पटकावले. महिला संघाने १० मीटर एअर रायफलमध्ये भारताला दुसरे पदक मिळवून दिले. मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी रौप्य पदक जिंकले. बाबूलाल यादव आणि लेखराम यांनी जोडी रोइंग स्पर्धेत भारतीय संघासाठी तिसरे पदक (कांस्य) जिंकले. चौथे पदक: रोईंग-८ मध्ये नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजित सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष आणि धनंजय उत्तम पांडे यांनी भारतासाठी रौप्यपदक जिंकले. रमिताने १० मीटर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले.

विदित संतोष गुजराथी बुद्धिबळमध्ये झाला पराभूत

  • भारतीय ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत कझाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय मास्टर काझीबेक नोगारबेकविरुद्ध पराभूत झाल्याने मोठा अपसेट ठरला. विदित हा पुरुष गटात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम खेळाडू आहे.

भारताने म्यानमारशी १-१ अशी बरोबरी साधली

  • करिष्माई स्ट्रायकर सुनील छेत्रीच्या गोलच्या जोरावर भारतीय पुरुष फुटबॉल संघाने म्यानमारशी १-१ अशी बरोबरी साधत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १६व्या फेरीत प्रवेश केला आहे. आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारताचा सामना सौदी अरेबियाशी होणार आहे. २३व्या मिनिटाला छेत्रीने पेनल्टीवर गोल केला. म्यानमारचा खेळाडू हेन जेयार लिनने रहीम अलीला बॉक्सच्या आत खाली आणले, त्यामुळे भारताला पेनल्टी मिळाली आणि गोल केला.
महिला आरक्षण २०३४ च्या आधी मिळू शकणार नाही; माजी केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा दावा
  • संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी २०३४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे आरक्षण प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभेची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून हे विधेयक मांडले गेले, असा आरोप माजी केंद्रीय विधिमंत्री कपिल सिबल यांनी मोदी सरकारवर केला आहे.
  • राज्यसभेचे सदस्य असलेल्या सिबल यांनी त्यांच्या ‘दिल से’ या अभियानांतर्गत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हे विधेयक आताच मंजूर करण्याच्या सरकारच्या हेतूबद्दल मला शंका आहे. ते याबद्दल प्रामाणिक असते तर २०१४ मध्येच त्यांना हे करता आले असते.
  • हे आरक्षण प्रत्यक्षात कधी अमलात येईल, असे विचारले असता सिबल यांनी सांगितले की, २०२९ मध्येही हे आरक्षण मिळू शकणार नाही. कारण, आधीची मतदारसंघ पुनर्रचना १९७६ मध्ये झाली. त्यानंतर ८४ वी घटनादुरुस्ती करण्यात आली. तीमध्ये म्हटले होते की यापुढे ही पुनर्रचना जैसे थे ठेवली जाईल. आता २०२६ मध्ये आपण जनगणनेला सुरुवात केली तरी लोकसंख्या लक्षात घेता त्याला एक ते दीड वर्ष लागेल. त्यातच जातनिहाय  गणना करायची झाल्यास त्याला आणखी कालावधी लागेल. उत्तर भारतात जातनिहाय गणनेची मागणी होत असल्याने भाजप त्याला विरोध करू शकत नाही, नाहीतर ते निवडून येणार नाहीत. हे सर्व लक्षात घेता जास्तीत जास्त लवकर महिला आरक्षण अमलात आणायचे म्हटले तरी त्याला ते २०३४ मध्ये शक्य होऊ शकेल.

बिधुरी यांची हकालपट्टी करा

  • लोकसभेत बसप खासदार दानिश अली यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टीकाटिप्पणी केलेले भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांची संसदेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी सिबल यांनी केली. माझ्या ३० वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत इतकी घृणास्पद, विषारी भाषा मी ऐकली नाही. त्यातही मला त्या वेळी पीठासन अधिकारी असलेल्या व्यक्तीचे आश्चर्य वाटते. मी इतिवृत्त तपासून ही विधाने कामकाजातून काढून टाकतो, असे त्यांनी सांगितले होते. मला त्याचे कारण समजत नाही, असे सिबल म्हणाले.

आणखी एका भाजप खासदाराचे लोकसभाध्यक्षांना पत्र

  • नवी दिल्ली :  भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या पाठोपाठ याच पक्षाचे खासदार रवी किशन शुक्ला यांनीही लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना रविवारी पत्र लिहून बसपचे खासदार दानिश अली यांच्या संसदेतील वर्तनाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अली यांच्या असंसदीय भाषेची तसेच आक्षेपार्ह वर्तनाची चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

25 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.