चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ सप्टेंबर २०२१

Date : 25 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचे तीन तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीत : 
  • भारताच्या अंकिता भाकट, अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठून जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील वैयक्तिक पदकाच्या आशा जिवंत राखल्या आहेत.

  • कंपाऊंड प्रकारामधील महिला आणि मिश्र गटाची अंतिम फेरी गाठून भारताने दोन पदकांची आधीच निश्चिती केली आहे. वैयक्तिक रीकव्‍‌र्ह गटात २३ वर्षीय अंकिताने कोरियाच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील कँग शाई-यंगचा ६-४ (२९-२८, २८-२८, २७-२७, २४-२९, २९-२८) अशा फरकाने पराभव केला. अभिषेकने स्लोव्हाकियाच्या जोझेफ बोसॅन्स्कीला १४५-१४२ (२९-२८, ३०-२७, २८-२९, ३०-२९, २८-२९) असे नमवले. ज्योतीने कोरियाच्या चाईवॉन सो हिचा

  • १४६-१४२ (३०-२९, २९-२९, २८-३०, २९-२९, २६-२९) पराभव केला.

UPSC Results : यूपीएससीचे निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, महाराष्ट्राची मृणाली जोशी ३६वी :
  • भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या UPSC परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये शुभम कुमार देशात पहिला आला आहे. एकूण ७६१ उमेदवारांची यादी यूपीएससीकडून जाहीर करण्यात आली आहे.

  • भोपाळच्या जागृती अवस्थीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीनं इंजिनिअरिंग केलं आहे. महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६वी आली असून विनायक नरवदे देशात ३७वा आला आहे. ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.

  • २०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यूपीएससीची वेबसाईट upsc.gove.in वर हे निकाल पाहता येणार आहेत. नियमाप्रमाणे वेबसाईटवर आत्ता फक्त निकाल पाहता येणार असून सविस्तर गुणपत्र १५ दिवसांत संकेस्थळावरच अपलोड केलं जाईल.

  • एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २६३ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. ८६ उमेदवार मागासवर्गातील, २२९ ओबीसी, १२२ अनुसूचित जाती तर ६१ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. याशिवाय १५० उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. त्यामध्ये १५ आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील, ५५ ओबीसी, ५ अनुसूचित जाती तर एक उमेदवार अनुसूचित जमातीमधील आहे.

राज्य शासनाची आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ही परीक्षा पुढे ढकलली :
  • राज्य शासनाची आरोग्य विभागाची गट क व गट ड ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक उमेदवाराच्या मोबाईलवर अधिकृत मेसेज पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाची परीक्षा ही २४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर या दिवशी होणार होती. राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत घेण्यात येणार होती.

  • आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा शनिवारपासून सुरू होणार होती. लेखी परीक्षेचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आलं होते. तसेच उमेदवाराच्या ओळखपत्राचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही.

  • सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा लवकर घेण्यात येतील. व परीक्षेच्या नियोजित तारीख उमेदवाराना विभागच्या संकेतस्थळावरून तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येईल.

४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू, काय असतील नियम? शिक्षणमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती :
  • राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यभर मुलांना पुन्हा शाळेत जायला कधी मिळणार? यावर सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र, त्यासोबत आता शाळांमध्ये मुलं जाताना नेमके कोणते नियम असतील? हे महत्त्वाचं ठरणार आहे.

  • त्यासंदर्भात आज दुपारी वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, राज्यात ग्रामीण भागात ५वी ते १२वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.

  • “७ जुलै २०२१ रोजी आपण जीआर काढला होता की ज्या ग्रामीण भागात कोविडमुक्त झाला आहे, तिथे ८ वी ते १२वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून त्या शाळांना परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार एसओपीही दिल्या होत्या. नंतर ग्रामीण भागात ५वी ते ८वी आणि शहरी भागात ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

  • १० ऑगस्ट रोजी त्याच्या एसओपी देखील जाहीर केल्या होत्या. त्यानंतर यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या एसओपींमध्ये अजून काही सूचना दिल्या”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. हा निर्णय निवासी शाळांना लागू असणार नसून, नियमित भरणाऱ्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असेल, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्य सरकारचा निर्णय ; महिला पोलिसांना आता १२ ऐवजी ८ तास असणार ड्युटी :
  • राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून महिला पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले असून, त्यांना आता १२ ऐवजी ८ तासांची ड्युटी असणार आहे.

  • महाराष्ट्र सरकारने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे.

  • “महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट्द्वारे म्हटलं आहे.

भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत, दृढ :
  • जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत, घनिष्ठ आणि दृढ होतील, यात शंका नाही, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय बैठकीदरम्यान दिली.  

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची व्हाइट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेतली. यावेळी, ४० लाख भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अमेरिकेला अधिक मजबूत बनवत आहेत, असे बायडेन यांनी मोदी यांच्याशी चर्चा करताना नमूद केले. मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत करण्याचे बीज रोवले गेले आहे. दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या या पहिल्या द्विपक्षीय बैठकीत हवामान बदल, आर्थिक सहकार्य, करोना विषाणू साथ यांसह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.  

  • आपल्यातील द्विपक्षीय बैठक महत्त्वाची आहे. या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या प्रारंभी आपण भेटत आहोत. या दशकाला आकार देण्यात आपले नेतृत्व निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, अशा शब्दांत मोदी यांनी बायडेन यांचे कौतुक केले. अमेरिकेच्या प्रगतीत भारतीय वंशाचे नागरिक सक्रीय सहयोग देत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. मोदी यांची २०१४ पासूनची ही सातवी अमेरिका भेट आहे. बायडेन अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतरची प्रथमच मोदी यांनी त्यांची भेट घेतली.

‘मंगळयान’ मोहिमेला ७ वर्षे पुर्ण :
  • भारताच्या ‘ मंगळयान ‘ला मंगळ ग्रहाभोवती आज बरोब्बर ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ५ नोव्हेंबर २०१३ ला मंगळयान हे इस्त्रोने प्रक्षेपित केले होते, जवळपास १० महिन्यांचा प्रवास पुर्ण करत आजच्या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास २०१४ ला मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला.

  • इस्त्रोने खरं तर या मोहीमेचे फक्त सहा महिन्यांसाठी नियोजन केले होते. सहा महिन्यांनंतर मंगळयानमधील सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याने आणि यानामध्ये इंधन बाकी असल्याने मोहिमेचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी आढावा घेत मंगळयान मोहिमेला extension देण्यात आले. असं करत मंगळयानाने आज ७ वर्षाचाही टप्पा गाठला आहे.

  • आजही मंगळयान सुस्थितीत असल्याने आणि यानामध्ये काही इंधन बाकी असल्याने आणखी पुढील काही वर्षे मंगळयान हे मंगळ ग्रहाभोवती भ्रमण करू शकणार आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाचा अभ्यास यापुढेही सुरु रहाणार आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाभोवती पोहचणारा जगातील पहिला देश म्हणून भारताच्या मंगळयान मोहिमेचे याआधीच जगभरात भरपूर कौतुक झाले आहे.

  • सध्या मंगळयान हे मंगळ ग्रहाभोवती सुमारे ४२० ते ७७,०००  किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. २०१८ ला इस्रोने मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या घेतलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून मंगळ ग्रहाचा Mars Atlas प्रकाशित केला, मंगळ ग्रहाच्या वातावरणाबद्दल काही निष्कर्ष जाहीर केले होते. 

२५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.