चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 मे 2023

Date : 25 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता १२ वीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल जाहीर होत आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या mahresult.nic.in वर पाहता येईल.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जाऊन HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

निकालानंतर काही दिवसांनी गुणपत्रिका मिळतील

  • महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. उद्या (गुरुवार, २५ मे) निकाल घोषित केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून गुणपत्रिका (हार्ड कॉपी/ओरिजिनल मार्कशीट) मिळतील.
२० विरोधी पक्षांचा बहिष्कार, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनास राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याचा निषेध
  • राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असल्याचा निषेध करत या सोहळय़ावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय १९ भाजपेतर विरोधी पक्षांनी बुधवारी घेतला.
  • यामुळे या सोहळय़ावरून वाद तीव्र झाला आहे. नवे संसद भवन ही भारतीय संस्कृती आणि परंपरांशी आधुनिकतेची नाळ जोडणारी इमारत असून, समृद्ध लोकशाहीचे प्रतिक असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत विशद केले असले तरी, नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आलेले नसल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्र सरकारची भूमिका प्रजासत्ताक भारताच्या प्रमुखांचा आणि संविधानाचा अपमान आहे, अशी टीका करीत विरोधी पक्षांनी बुधवारी संयुक्त निवेदनाद्वारे केली.
  • षटकोनी आकाराच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी, २८ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. या समारंभाची निमंत्रण पत्रिका लोकसभा सचिवालयाने संसदेच्या सर्व सदस्यांना पाठवली असून, पत्रिकेवर पंतप्रधान मोदी व लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला या फक्त दोघांची नावे समाविष्ट आहेत. निमंत्रण पत्रिकेवरूनही विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला असून राज्यसभेचे सभापती म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचेही नाव वगळण्यात आल्याची टीका केली आहे.
दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याच्या RBI च्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल
  • दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय RBI ने जाहीर केला. या निर्णयानंतर असंही जाहीर करण्यात आलं की ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बँकेतून बदलून घेता येतील. २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत नोटा बदलून घेता येणार आहेत. मात्र आता या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे जनहित याचिकेत?

  • दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याच्या निर्णयाला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे. या जनहित याचिकेत असा उल्लेख आहे की अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार हा आरबीआयला नाही. रिझर्व्ह बँके ऑफ इंडिया अॅक्ट १९३४ नुसार असं करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला नाही असंही उदाहरण यात देण्यात आलं आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.
  • दोन हजारांच्या चांगल्या दर्जाच्या नोटा छापण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. हा सगळा खर्च वाया जाईल. अशा प्रकारे नोटा कुठल्याही कारणाशिवाय वितरणातून मागे घेणं अनावश्यक आहे. नोटा वितरणातून मागे घ्यायच्या असतील तर तसं ठोस कारण असलं पाहिजे तरच असा निर्णय घेतला जावा असंही ही या जनहित याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. हा निर्णय जेव्हापासून आरबीआयने घेतला आहे तेव्हापासून जवळपास प्रत्येकाने २ हजारांची नोट घेण्यास नकार द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे लोकांची अडचण निर्माण होऊ शकते असाही उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलन व्यवस्थापनाचा भाग म्हणून दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या गेल्या असून वैध चलन म्हणून या नोटांचा दर्जा कायम राहणार असल्याचं शक्तिकांत दास यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे दोन हजारांची नोट पुढेही वस्तू व सेवा खरेदीसाठी वापरता येऊ शकते, असे ते म्हणाले. दास यांच्या मते, दोन हजारांच्या बहुतांश नोटा ३० सप्टेंबपर्यंत परत येतील. अंतिम मुदत जवळ येईल तेव्हा बदलण्यात आलेल्या नोटांचे प्रमाण लक्षात घेऊन गरज पडल्यास मुदतवाढीचा निर्णयही घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर १९ विरोधी पक्षांचा बहिष्कार, ‘हे’ कारण देत नोंदवला निषेध
  • २८ मे रोजी देशाच्या नव्या संसदेचं उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भवनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संसद भवनाचं उद्घाटन करणार असल्याने १९ विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या सगळ्या पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. इतके विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात का गेले आहेत? जाणून घ्या

२१ मे रोजी राहुल गांधींनी केलं होतं एक ट्वीट

  • नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की या भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाही. हे ट्वीट राहुल गांधी यांनी २१ मे रोजी केलं होतं. यानंतर हा मुद्दा आणखी पुढे आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनाचं उद्घाटन करण्याचा विरोधकांनी विरोध दर्शवला.
  • ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेचं उद्घाटन करणं हे घटनेला धरुन नाही अशी भूमिका मांडली होती. जेव्हा या संसद भवनाच्या बांधकामाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं तेव्हाही राष्ट्रपतींना बोलावलं गेलं नाही. तसंच आता संसद भवन बांधून पूर्ण झालं या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यालाही राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. या सोहळ्यापासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना दूर ठेवणं योग्य नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे असंही शर्मा यांनी म्हटलं आहे.
  • काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्वीट केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना या सोहळ्याला का बोलावलं नाही असा सवाल केला. राष्ट्रपती या भारताच्या प्रथम नागरिक आहेत त्यांनाच या सोहळ्याला बोलावणं आवश्यक आहे तरीही त्यांना का बोलावलं नाही ही बाब लोकशाही मूल्यांना धरुन नाही असं ट्वीट खरगेंनी केलं होतं.
कबाब खरेदी करायला गेला अन् दहा कोटींचा मालक बनला, वाचा काय आहे प्रकरण
  • कधी कुणाचे नशीब पालटेल, सांगता येत नाही. एक बस ड्रायव्हर चिकन कबाब खरेदी करायला गेला आणि चक्क दहा कोटींचा मालक बनला. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण हे खरेय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
  • ही घटना ब्रिटनच्या लीसेस्टर शहरातील आहे. मिरर यूकेच्या एका रिपोर्टनुसार, ५१ वर्षीय बस ड्रायव्हर प्रवासादरम्यान एका कबाब शॉपवर थांबला आणि त्याने चिकन कबाबची ऑर्डर दिला. चिकन कबाब यायला वेळ होता म्हणून टाइमपाससाठी त्याने जवळच्या लॉटरी शॉपमधून एक तिकीट खरेदी केले आणि त्याला चक्क दहा कोटी २५ लाख रुपयांची लॉटरी लागली. या नशीबवान व्यक्तीचे नाव स्टीव्ह गुडविन आहे.
  • स्टीव सांगतो की त्याच्या लॉटरीचा नंबर ७३ होता. त्याला कधीही वाटले नव्हते की तो इतकी मोठी रक्कम जिंकू शकेल पण जेव्हा लॉटरी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याला सुखद धक्काच बसला.
  • स्टीव्ह पुढे सांगतो, “जेव्हा मी लॉटरीचे तिकीट जिंकून घरी गेलो तेव्हा मी कबाब खाण्यासाठी काढले पण मी एवढा आनंदी होतो की मी कबाब खाऊ शकलो नाही. याच कबाबने मला करोडपती बनवले, हा विचारच माझ्या मनातून जात नव्हता. रात्रभर मी लॉटरीचे तिकीट उशीखाली घेऊन झोपलो.”
  • स्टीव्हने सुरुवातीला आपल्या आईला ही आनंदाची बातमी दिली. सुरुवातीला कुणालाच त्याच्यावर विश्वास बसला नाही. नंतर सर्वांना कळले की तो खरे बोलतोय. विशेष म्हणजे लॉटरी विजेता झाल्यानंतरही स्टीव्ह आताही ड्रायव्हरची नोकरी करतोय.
वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार, केंद्र सरकार आणणार ‘ही’ नवी पद्धत; जनगणनेबाबतही शाहांचा मोठा दावा
  • आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जागावाटपाच्या बैठकांना जोर आला असून मतदारांनाही आश्वासनांची प्रलोभने दाखवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, निवडणुकीकरता सर्वांत महत्त्वाचं असणाऱ्या मतदार याद्यांच्या अद्यायवतीकरणालाही वेग आला आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत येण्याकरता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सरकार एक नवी पद्धत आणणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सांगितलं.
  • “एखाद्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होताच त्याचं नाव मतदार यादीत येण्याकरता नव्या उपाययोजना आखण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. निवडणूक आयोग संबंधित व्यक्तीची परवानगी घेऊन त्याचं मतदान कार्ड तयार करणार आहे. तर एखाद्याचं निधन झाल्यास संबंधितांचं नाव मतदार यादीत काढून टाकणार आहे”, असं शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जनगणना भवनाचे उद्धाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. “विकासाची मूलभूत योजना तयार करण्यास जनगणनेतून प्राप्त झालेला डेटा महत्त्वाची ठरतो. तसंच, यामुळे वंचित आणि शोषितांना मूलभूत सुविधा प्रदान करणेही सरकारला सोपे जाते”, असं अमित शाह म्हणाले.

जनगणना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार

  • देशाच्या एकूण प्रगतीकरता डेटा आधारित नियोजन करणे गजरेचे आहे. हा डेटा जणगणनेतूनच प्राप्त होऊ शकतो, असंही शाह म्हणाले. मोदी सरकार आता जनगणना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला डेटा भरण्याचा अधिकार असेल. व्यक्तीने भरलेल्या माहितीची पडताळणी आणि ऑडिट केले जाईल. त्यात सामाजिक-आर्थिक स्थितीचे 35 पेक्षा जास्त पॅरामीटर्स समाविष्ट असतील, असंही शाहांनी पुढे स्पष्ट केलं. जन्म आणि मृत्यूची नोंद ऑनलाईन करण्याकरता संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आताची पद्धत कशी?

  • मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक नोंदणी विभागाकडे ‘फॉर्म ६’ द्वारे अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील फॉर्मबरोबर जमा करावी लागतात. फॉर्म आणि ही कागदपत्रे निवडणूक नोंदणी विभाग किंवा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागतात. यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन. जर या प्रक्रियेबाबत काही शंका असेल तर तुम्ही 1950 या क्रमांकावर फोन करु शकता. (या नंबरपूर्वी तुमचा एसटीडी कोड वापरण्यास विसरू नका.)
निवृत्तीबाबत इतक्यात निर्णय नाही -धोनी
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा सराव आणि सामन्यांमध्ये खेळल्यामुळे शरीरावर ताण पडत असला, तरी निवृत्तीबाबतचा निर्णय आपण इतक्यातच घेणार नसून विचार करण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा कालावधी असल्याचे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला.
  • धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने मंगळवारी झालेल्या ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात गुजरात टायटन्सवर १५ धावांनी मात करत ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणारा अंतिम सामना धोनीच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असू शकेल असे म्हटले जात आहे. मात्र, तूर्त आपण निवृत्तीचा निर्णय घेतला नसल्याचे धोनीने स्पष्ट केले. ‘‘या स्पर्धेत खेळल्याने माझ्या शरीरावर नक्कीच ताण पडतो आहे. मी चार महिने घरापासून दूर आहे. त्यामुळे भविष्यात मी इतका वेळ घराबाहेर राहणे पसंत करेन का, हे आताच सांगणे अवघड आहे,’’ असे धोनी म्हणाला.
  • ‘‘मी ३१ जानेवारीला घराबाहेर पडलो, माझे दुसरे काम संपवले आणि २ किंवा ३ मार्चपासून सरावाला सुरुवात केली. ‘आयपीएल’सारख्या स्पर्धेची तयारी करताना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे पुढे काय होईल हे आता सांगू शकत नाही. (निवृत्तीबाबत) निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आठ-नऊ महिन्यांचा कालावधी आहे. मी आताच याचा ताण घेणार नाही. पुढील हंगामासाठीची खेळाडू लिलावप्रक्रिया डिसेंबरमध्ये पार पडेल. तोपर्यंत विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे,’’ असे ४१ वर्षीय धोनीने सांगितले. यंदाच्या स्पर्धेत खेळताना धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, त्यानंतरही तो एकाही सामन्याला मुकलेला नाही. ‘‘चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी मी कायम उपलब्ध असेन, मग ते खेळाडू म्हणून असो किंवा अन्य एखाद्या भूमिकेत. मी आता काहीही स्पष्टपणे सांगू शकत नाही,’’ असे धोनी म्हणाला.

धोनीने मुद्दाम वेळ वाया घालवला?

  • ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना गुजरातला अखेरच्या पाच षटकांत ७१ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी गुजरातच्या डावातील १६वे षटक वेगवान गोलंदाज मथीश पाथिरानाला देण्याची धोनीची योजना होती. मात्र, पाथिराना त्यापूर्वी थोडा वेळ मैदानाबाहेर होता. नियमानुसार, गोलंदाज जितका वेळ मैदानाबाहेर होता, तितकाच वेळ त्याला पुन्हा मैदानावर घालवावा लागतो. त्यानंतरच त्याला गोलंदाजीची परवानगी असते. पाथिराना साधारण चार मिनिटे मैदानाबाहेर होता आणि मैदानावर परत येऊन त्याने त्वरित चेंडू हाती घेतला. त्यामुळे पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखले. परंतु त्यावेळी धोनीने पंचांशी संवाद साधला. चेन्नईचे अन्य काही खेळाडूही पंचांशी चर्चा करण्यासाठी आले. यात काही मिनिटे वाया गेली आणि पाथिरानाला पुन्हा मैदानावर येऊन आवश्यक तितकी मिनिटे झाल्याने गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे धोनीने मुद्दाम वेळ घालवल्याची टीका समाजमाध्यमावर करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगनेही धोनी व विशेषत: पंचांवर टीका केली.

 

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत प्रवेश :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चीनच्या वे यीला २.५-१.५ असे नमवत चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. १६ वर्षीय प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत अनिश गिरीशी (हॉलंड) सामना होईल. अन्य उपांत्य लढतीत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनपुढे चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असेल.

  • गिरी आणि कार्लसन यांनी उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे आर्यन टोरी (नॉर्वे) आणि डेव्हिड अ‍ॅन्टोन गुजारो (स्पेन) यांचा पराभव केला. लिरेनने अझरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हला २.५-१.५ असे पराभूत केले.

  • प्रज्ञानंदने यीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याचा पहिला डाव ९० चालींमध्ये जिंकला. तसेच त्याने दुसऱ्या गेममध्येही बाजी मारत चार डावांच्या या लढतीत २-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर तिसऱ्या डावात यीने पुनरागमन करताना विजय नोंदवला. मात्र, चौथा डाव बरोबरीत सुटल्याने प्रज्ञानंदला आगेकूच करण्यात यश आले.

भारत-अमेरिकेची प्रगत संरक्षण भागीदारी; ‘क्वाड’ परिषदेदरम्यान मोदी-बायडेन यांची स्वतंत्र चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची मंगळवारी भेट झाली. दोन्ही देशांनी त्यांच्या अग्रगण्य सुरक्षा दलांसाठी विकसित होणाऱ्या तांत्रिकदृष्टय़ा प्रगत व गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या भागीदारीची घोषणा या वेळी केली. मोदी व बायडेन या दोन्ही नेत्यांनी या वेळी अधिक समृद्ध, संपन्न, सुसंवादी, सुरक्षित, मुक्त व परस्परांशी दृढ संबंध असलेल्या विश्वासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला. 

  • जपानमध्ये भारत-अमेरिका-ऑस्ट्रेलिया व जपानदरम्यान ‘क्वाड’ परिषद सुरू आहे. यानिमित्त येथे उपस्थित असलेल्या या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली. मोदींनी या वेळी सांगितले, की भारत-अमेरिकेचे संबंध हे खऱ्या अर्थाने विश्वासार्ह आहेत. मानवजातीचे कल्याण आणि जागतिक शांतता-स्थैर्यासाठी ही मैत्री चांगली शक्ती म्हणून काम करेल.

  • या वेळी भारत-अमेरिकेदरम्यानच्या दीर्घकालीन लस कृती कार्यक्रमास २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त सैनिक दलांत भारताचा समावेश करण्याचे ‘व्हाइट हाउस’तर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आले. यात बहारीन हा सहयोगी सदस्य देश असेल. मोदींनी चर्चेदरम्यान अमेरिकेच्या कंपनींना ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रात भारताशी भागीदारी करून येथे उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले. उभय देशांत व्यापार आणि गुंतवणूक सातत्याने वाढत असली, तरी ती अद्याप अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे.

भारताच्या विकासात जपानचे महत्त्वाचे योगदान ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन :
  • जपानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार असल्याचे नमूद करून भारताच्या विकासात जपानी गुंतवणुकीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे प्रतिपादन केले.

  • मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. त्यांनी अनिवासी भारतीयांपुढे केलेल्या भाषणात भारताच्या विकासाच्या प्रवासात जपानच्या गुतंवणूकदारांनी दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य केले.  जपानशी भारताचे नाते अध्यात्माचे, सहकार्याचे,आपुलकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतात पायाभूत सुविधा आणि क्षमता विकासाचा वेग विलक्षण असून जागतिक समुदाय त्याचा साक्षीदार असल्याचेही ते म्हणाले.

  • जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या निमंत्रणावरून ‘क्वाड’ परिषदेसाठी मोदी जपानच्या दौऱ्यावर असून ‘क्वाड’ देशांच्या प्रमुखांशी ते स्वतंत्र द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर आज, मंगळवारी मोदी आणि किशिदा यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल.

  • भारतात पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता निर्माण करण्यात करण्यातील जपान हा महत्त्वाचा भागीदार असल्याचे मोदी म्हणाले. त्यासाठी त्यांनी जपानच्या सहाकार्याने उभारण्यात येणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली-मुंबई औद्योगिक महामार्ग, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स या प्रकल्पांचे दाखले दिले. 

सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धा - आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी :
  • भारताचा पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सुपरबेट जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) पोलंड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.

  • ५२ वर्षीय आनंदने अतिजलद विभागात सोमवारी तीन विजयांची नोंद केली. त्याने २७व्या आणि अखेरच्या फेरीत रादोस्लाव्ह वोस्ताजेकला (पोलंड) पराभूत केले. तसेच त्याने रिचर्ड रॅपपोर्ट (हंगेरी) आणि किरिल शिव्हचेंको (युक्रेन) यांच्यावरही मात केली. मात्र, त्याला तीन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि त्याने तीन सामने गमावले. त्यामुळे या स्पर्धेच्या जेतेपदापासून त्याला वंचित राहावे लागले.

  • पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडाने २४ गुणांसह या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. त्याने जलद आणि अतिजलद या दोन्ही विभागांत प्रत्येकी १२ गुण मिळवले. डुडाने अतिजलद विभागात किरिल शिव्हचेंकोवर निर्णायक विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली.

  • आनंदला अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळाले. या दोघांच्याही खात्यावर २३.५ गुण होते.

मोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात :
  • प्रतिकूल स्थितीमुळे र्नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकले आहेत. त्यामुळे हे वारे २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाच्या काही सरी बरसल्या. मात्र, हा मोसमी पूर्व पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणतायेणार नसल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील. बुधवारी (२५ मे) विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

  • गुरुवारी (२६ मे) विदर्भातील गोंदिया जिल्हा सोडून उर्वरित सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारी (२७ मे) विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

२५ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.