चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ मे २०२१

Updated On : May 25, 2021 | Category : Current Affairs


१८ ते ४४ वयोगटासाठी आता थेट सरकारी केंद्रांवर नोंदणी :
 • १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आता थेट सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

 • लशींचा अपव्यय टाळण्यासाठी अठरा ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी थेट सरकारी लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे, परंतु ही सुविधा खासगी केंद्रांवर नसेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

 • लसीकरणाची वेळ घेतलेले अठरा ते ४४ वयोगटातील काही नागरिक कोणत्याही कारणास्तव लसीकरणासाठी येऊ शकले नाहीत तर त्यांच्यासाठी असलेल्या लसमात्रा विनावापर राहू शकतात. अशा परिस्थितीत काही नागरिकांची थेट केंद्रांवरच नोंदणी करून त्यांचे लसीकरण केल्यास लसमात्रांचा अपव्यय कमी करता येऊ शकतो, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

 • ऑनलाइन नोंदणी करून लसीकरणाची वेळ घेण्याची सुविधा सरकारच्या कोविन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सुविधेचा वापर संबंधित राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘स्पुटनिक व्ही’ लसीचं भारतात उत्पादन सुरु; वर्षाला १० कोटी लस निर्मितीचं टार्गेट :
 • भारतीय कंपनी पॅनासिया बायोटेकनं रशियन लस असलेल्या ‘स्पुटनिक व्ही’चं उत्पादन सुरु केलं आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडच्या मदतीने हे उत्पादन सुरु करण्यात आलं आहे. पॅनासिया कंपनी स्पुटनिव्ह व्ही लसीचे वर्षाला १० कोटी डोस तयार करणार आहे. आरडीआयएफ आणि पॅनासिया बायोटेकनं लस निर्मितीसाठी करार केला होता. त्या करारानुसार लस निर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

 • पॅनासिया बायोटेक कंपनीनं हिमाचल प्रदेशातील बद्दी कारखान्यात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती सुरु केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लशींची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता पारखली जाणार आहे.

 • “पॅनासिया बायोटेकसोबत आम्ही भारतात उत्पादन सुरु केलं आहे. यामुळे देशातील करोना स्थितीशी लढण्यात मदत होणार आहे. भारतात लसींची पूर्तता झाल्यानंतर इतर देशांमध्ये त्याची निर्यात केली जाणार आहे.”, असं आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल्ल डमित्रिव यांनी सांगितलं आहे. “स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती भारतात सुरु झाल्याने त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास पुन्हा सामान्य जीवन जगता येईल”, असं पॅनासिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना :
 • करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाउन शिथील केला जाण्याची शक्यता आहे.

 • राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. दरम्यान ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 • “आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

‘बँक आपल्या दारी’ :
 • ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घरपोच अनुदान वाटप करण्यात येत आहे. करोनाच्या कालावधीत वयोवृद्ध निराधारांना बँकेच्या शाखेपर्यंत जाता येत नाही म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षी पाच कोटी रुपयांचे अशाच उपक्रमातून अनुदान वाटप करण्यात आले होते. यावेळीही वार व वेळ ठरवून अनुदान वितरित करण्यात येत आहे.

 • श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, विधवा पत्नी योजना अशा अनेक योजनांचे अनुदान जिल्हा बँकेच्या विविध शाखेतून वितरित होत असते. करोना लॉकडाऊन काळात संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाने वृध्द, दिव्यांग, निराधारांना करोनाची लागण होऊ नये, तसेच बँकेपर्यंत जाण्यास आर्थिक भुर्दंड बसू नये, यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या संकल्पनेतून ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 • बिराजदार व संचालक मंडळ यांनी पाठपुरावा करून नाबार्डकडून अनुदानावर मोबाइल एटीएम व्हॅन व मायक्रो एटीएम मिळवले आहे. या दोन्हीच्या माध्यमातून गतवर्षीही टाळेबंदीच्या काळात जेथे बँकेचे शाखा नाही अशा ग्रामीण भागात जाऊन त्यांच्या घरी जाऊन पाच कोटी रुपयांचे अनुदान रकमेचे वाटप केले. अशा प्रकारची सेवा देणारी राज्यातील पहिली बँक म्हणून प्रशासनाचे कौतुक होत आहे.

मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी आठवडय़ाभरात मुलाखती :
 • अव्वल प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार, भारताचा माजी फिरकीपटू साईराज बहुतुले आणि माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्यात मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी चुरस रंगणार आहे.

 • मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) गेल्या आठवडय़ात मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते.  सोमवारी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी मुझुमदार, बहुतुले आणि कुलकर्णी या प्रमुख उमेदवारांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले.  आठवडय़ाभरात काही उमेदवारांच्या मुलाखतील घेऊन क्रिकेट सुधारणा समिती निर्णय घेईल, अशी माहिती मिळत आहे.

 • मुझुमदार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून त्याने राजस्थान रॉयल्स तसेच दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका निभावली आहे. बहुतुलेने विदर्भ, केरळ, बंगाल संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले असून गेल्या दोन मोसमात तो गुजरातच्या प्रशिक्षकपदी आहे. कुलकर्णी यांनी मुंबईला २०१२-१३मध्ये रणजी जेतेपद मिळवून दिले होते. त्यांनी विदर्भ व छत्तीसगढचेही प्रशिक्षकपद भूषवले आहे.

जनमत सर्व्हेक्षण - मोदी 2.0 सरकारची दोन वर्षे, मांडा तुमचं मत :
 • नरेंद्र मोदींनी ३० मे २०१९ रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली त्यास दोन वर्षे पूर्ण होत आहेत, तर त्यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यास सात वर्षे पूर्ण होत आहेत.

 • मोदी सरकारचं मूल्यमापन जनता कसं करते याचा अंदाज घेणारं हे सर्व्हेक्षण असून तुम्ही हा फॉर्म भरा आणि तुम्हाला काय वाटतं हे जरूर सांगा. या सर्व्हेक्षणामध्ये काय आढळलं हे २७ मे २०२१ रोजी लोकसत्ता डॉट कॉमवर प्रकाशित करण्यात येईल.

२५ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)