चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जून २०२२

Date : 25 June, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ :
  • मराठी व दखनी भाषेच्या स्नेहसंबंधावर संशोधनात्मक प्रकाशझोत टाकणारे प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय प्रा. आझम यांना शुक्रवारी कळवला आहे.

  • प्रा. आझम अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी, उर्दू व फारसी भाषेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख आहेत. त्यांचा ‘कदमराव पदमराव- दखनीचा आद्य काव्यग्रंथ- दखनी-मराठी अनुबंध’ हा संशोधनात्मक ग्रंथ सन २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला. त्यांची यापूर्वी ‘सुफी तत्त्वज्ञान स्वरूप व चिंतन’ ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा त्रिखंडात्मक, तसेच ‘नमाज-रहस्य व तत्त्वज्ञान’ असे तीन संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. प्रा. आझम मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गीचे (अक्कलकोट) आहेत, मात्र ते नगरमध्येच पूर्वीपासून स्थायिक झाले आहेत.

  • सुमारे ४५० ते ५०० वर्षांपूर्वी ‘कदमराव पदमराव’ हा आद्य काव्यग्रंथ कवी फक्रुद्दीन निजामी बिदरी यांनी लिहिलेला आहे. तो हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे. जैन दंतकथा व पुनर्जन्मावर आधारित हे काव्य आहे. त्यामध्ये २ हजार श्लोक (कडवे) आहेत. परंतु तो अपूर्ण अवस्थेत आहे. या ग्रंथाचा प्रा. आझम यांनी भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राजकारण व भूगोल या दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून मराठी व दखनी भाषेतील स्नेहसंबंधावर प्रकाश टाकला आहे.

  •  त्यातून मराठी व दखनी भाषा या भगिनी आहेत. मराठी ज्येष्ठ तर दखनी कनिष्ठ बहीण आहे, मराठी भाषेचे संस्कार दखनी भाषेवर झाले आहेत. अनेकानेक मराठी शब्दांनी दखनी भाषेचे वैभव, गोडवा वाढवला. दखनी ही आर्यभाषाच आहे. दखनी ही अभिजात व श्रेष्ठ भारतीय भाषा आहे. बहमनी साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर निजामशाही व अन्य चार शाह्यांच्या काळात दखनी मोठय़ा प्रमाणावर बोलली जात असे. या भाषेत विपुल साहित्यही निर्माण झालं. अठराव्या शतकात उर्दूचा प्रभाव वाढला, अरबी, फारसी शब्दांचा वापर वाढून दखनी मागे पडली, असे प्रा. आझम यांनी सांगितले.

निती आयोगाच्या ‘सीईओ’पदी परमेश्वरन अय्यर :
  • निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला. अय्यर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८१ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी असून ते अमिताभ कांत यांची जागा घेतील. ते निती आयोगाचे तिसरे सीईओ असतील.

  • भारत सरकारची सार्वजनिक धोरणे ठरविण्याचे काम निती आयोग करतो. निती आयोगाचे विद्यमान सीईओ कांत यांचा कार्यकाळ ३० जून २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर या पदावर अय्यर हे काम करतील, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अय्यर यांच्या नियुक्तीला दोन वर्षे किंवा पुढील आदेश मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत (यापैकी जो आधी असेल त्याप्रमाणे) मंजुरी दिली आहे.

  • परमेश्वरन अय्यर यांचा जन्म श्रीनगर येथे झाला असून त्यांनी देहरादूनचे डून स्कूल आणि नंतर दिल्लीच्या स्टीफन महाविद्यालयात प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती.

  • जागतिक बँकेचा अनुभव - अय्यर यांनी सनदी सेवेतून २००९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते जागतिक बँकेच्या पाणी आणि स्वच्छता प्रकल्पात रुजू झाले होते. २०१६ मध्ये केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी त्यांची नियुक्ती केली होती. उघडय़ावर शौचास बसण्याची गरज भासू नये तसेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन असे या योजनेचे स्वरूप होते. २०२० मध्ये ते पुन्हा जागतिक बँकेत परतले होते.

राष्ट्रपती निवडणूक: द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल, पंतप्रधान मोदींसह एनडीए नेत्यांची उपस्थिती :
  • राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली आहे. येत्या १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. एनडीए आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे नेते उपस्थित होते.

  • द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत ज्या भारताच्या सर्वोच्चपदाची निवडणूक लढवत आहेत.

  • द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जातील पहिले प्रस्तावक मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानत ट्विट केले आहे. मुर्मू यांच्या नामनिर्देशन पत्रावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी स्वाक्षरी करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

  • मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या पक्षाचे राज्यसभा खासदार विजय साई रेड्डी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते मिधुन रेड्डी उपस्थित होते.

काय सांगता? अवघ्या आठ वर्षांच्या मुलाने १८ मिनिटांत पार केली यमुना :
  • बहुतेकांना वाहत्या पाण्याची भीती वाटते आणि तेच पाणी जर यमुनेसारख्या मोठ्या नदीतील असेल तर मग विचारूच नका. मात्र, प्रयागराजमधील एक आठ वर्षांचा मुलगा याला अपवाद आहे. शिवांश मोहिले नावाच्या या आठ वर्षांच्या मुलाने यमुनेच्या पाण्यात उतरून विक्रम केला आहे. त्याने अवघ्या १८ मिनिटांत यमुना नदी पार केली आहे. १८ मिनिटांमध्ये यमुना पार करणारा शिवांश पहिलाच मुलगा ठरला आहे. त्यापूर्वी, आराध्य श्रीवास्तव नावाच्या मुलाने २२ मिनिटांमध्ये यमुना पार केली होती.

  • शिवांश सध्या टागोर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकतो. याशिवाय, नवजीवन जलतरण क्लबमध्ये तो पोहण्याचे प्रशिक्षणही घेतो. त्याने आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मीरापूर सिंधू सागर घाट (काकरा घाट) येथून सकाळी सहा वाजता पाण्यात उडी मारली होती. सहा वाजून १८ मिनिटांनी तो नदीच्या दुसऱ्या टोकाला पोहचला. यादरम्यान, आपत्कालीन मदतीसाठी पाच बोटी तैनात होत्या. शिवांशच्या कामगिरीमुळे त्याचे आई-वडील विकास आणि खुशी मोहिले यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे’, अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली.

  • मुख्य प्रशिक्षक निषाद त्रिभुवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजीवन जलतरण क्लबच्या बॅनरखाली सध्या सर्व वयोगटातील १०० मुले प्रशिक्षण घेत आहेत. शिवांश हा यावर्षीचा दोन ते आठ वयोगटातील पहिला प्रशिक्षणार्थी जलतरणपटू आहे. शिवांश आता वेळ आणखी कमी करण्यावर भर देणार आहे. अवघ्या आठ वर्षांच्या शिवांशचे त्याने केलेल्या कामगिरीमुळे कौतुक होत आहे.

‘म्हाडा’ सोडतीसाठी आता प्रतीक्षा यादी बंद – राज्य सरकारने घेतला निर्णय :
  • म्हाडा सोडतीतील प्रतीक्षा यादी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षानुवर्षे प्रतीक्षा यादीवरील घरांचे वितरण सुरूच असून त्याद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

  • म्हाडा सोडत प्रकियेअंतर्गत संकेत क्रमांकानुसार आणि उत्पन्न गट, आरक्षित गट याप्रमाणे जितकी घरे तितके विजेते ऑनलाइन पध्दतीने जाहीर केले जातात. म्हणजे १० घरे असतील तर १० विजेते घोषित केले जातात. त्याचवेळी एकास तीन याप्रमाणे ३० प्रतीक्षा यादीवरील विजेतेही घोषित केले जातात. पात्रता सिद्ध करण्यात मूळ विजेता अपात्र ठरल्यास प्रतीक्षा यादीवरील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला संधी दिली जाते. तो पात्र ठरला तर त्याला घर वितरित केले जाते. मात्र तो अपात्र ठरला तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला संधी मिळते. ही प्रक्रिया अशीच पुढे जाते.

  • त्यामुळे सोडत प्रक्रियेतील प्रतीक्षा यादी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र प्रतीक्षा यादी सोडत प्रक्रियेतील भ्रष्टाचराचे मोठे कारण ठरत असल्याचे सांगून म्हाडाच्या मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादी बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव आता मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादी बंद करण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

  • हा निर्णय सर्व विभागीय मंडळांना लागू - हा निर्णय केवळ मुंबई मंडळासाठी लागू करावा असा प्रस्ताव होता. मात्र आता हा निर्णय सर्व विभागीय मंडळांना लागू करण्यात आला आहे. विजेता अपात्र ठरल्यास त्याचे घर पुढच्या सोडतीत समाविष्ट केले जाणार असल्याचे समजते आहे.

  • वर्षानुवर्षे प्रतीक्षा यादी संपत नसून २०१४ पासूनच्या अनेक प्रकरणात त्यापूर्वीच्या सोडतीतील घरांचे वितरण सुरूच असल्याचे मुंबई मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याने मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

२५ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.