चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जून २०२१

Updated On : Jun 25, 2021 | Category : Current Affairs


बारावी परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनाचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश :
 • बारावी परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनाचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना दिले. विद्यार्थ्यांसाठी स्वत:ची मूल्यमापन पद्धत तयार करण्याचे प्रत्येक मंडळाला स्वातंत्र्य असून ‘सर्वांसाठी योग्य’ अशी एकच पद्धत असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 • करोना महासाथीच्या काळात ज्यांच्या मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकनाची एकसमान पद्धत लागू करण्याचे निर्देश आपण देणार नाही असे सांगतानाच; अशा पद्धती गुरुवारपासून १० दिवसांच्या आत तयार करून अधिसूचित कराव्यात, असे निर्देश न्यायालयाने सर्व राज्य मंडळांना दिले.

 • प्रत्येक शिक्षण मंडळ स्वायत्त असून त्यांना मूल्याकंनाची स्वत:ची पद्धत तयार करावी लागेल, असे मत न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वारी यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.

 • ‘मूल्यांकनाच्या पद्धती लवकरात लवकर आणि आजपासून १० दिवसांच्या आत तयार करून अधिसूचित करण्याचे, त्याचप्रमाणे आमच्या २२ जूनच्या आदेशांच्या संदर्भात सीबीएसई व आयसीएसई मंडळांसाठी ठरवून दिलेल्या ३१ जुलै २०२१ या मुदतीपर्यंत अंतर्गत मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश आम्ही सर्व राज्य मंडळांना देत आहोत’, असे खंडपीठाने सांगितले.

सलग तिसऱ्या विजयासह ब्राझिल उपांत्यपूर्व फेरीत :
 • गतविजेत्या ब्राझिलने जेतेपदाच्या दिशेने कूच करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. कॅसेमिरोने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर ब्राझिलने गुरुवारी सकाळी झालेल्या सामन्यात कोलंबियावर २-१ अशी सरशी साधून स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

 • रिओ दी जानेरो येथील ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या ‘ब’ गटातील या लढतीत लुइस डायसने १०व्या मिनिटाला बायसिकल किकद्वारे अप्रतिम गोल नोंदवून कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत कोलंबियाला ही आघाडी कायम राखण्यात यश आले.

 • दुसऱ्या सत्रात रॉबर्टो फर्मिनोने ७८व्या मिनिटाला ब्राझिलला बरोबरी साधून दिली. या गोलवरून कोलंबियाचे खेळाडू आणि पंचांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र पंचांनी गोल योग्य असल्याचे जाहीर केले. यादरम्यान वेळ वाया गेल्यामुळे ९० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तब्बल १० मिनिटांचा भरपाई वेळ वाढवून देण्यात आला.

 • ९९व्या मिनिटापर्यंत सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच ब्राझिलला कॉर्नर मिळाला आणि नेयमारने लगावलेल्या या कॉर्नरला कॅसेमिरोने हेडरद्वारे गोलजाळ्याची दिशा दाखवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्राझिलचे तीन सामन्यांत नऊ गुण झाले असून कोलंबियाने चार सामन्यांत चार गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. त्यांचेही उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. तत्पूर्वी, बुधवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत पेरू संघाने इक्वाडोरला २-२ असे रोखले.

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना :
 • दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

 • कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

 • मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे.

लस घेतल्यानंतरही करोना झाला तर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी – ICMR :
 • करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ७६ टक्के नागरिकांमध्ये करोना संसर्गाचे प्रकरणे आढळले आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) लसीकरण आणि करोना संसर्गासंबंधी प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात ही माहिती देण्यात आली. अहवालानुसार, यापैकी संक्रमित लोकांमध्ये १७ टक्के रुग्णांना कोणतेही लक्षणे नव्हती होते, तर १० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

 • लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या २७ पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की लस करोनाविरूद्ध लढण्यासाठी खूप प्रभावी आहे.

 • १ मार्च ते १० जून या काळात ओडिशाच्या वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमधून ३६१ लोकांचे नमुने घेण्यात आले. यापैकी बहुतेक प्रकरणे अशी होती ज्यांनी करोनाचे दोन्ही डोस घेतले होते. भुवनेश्वर येथील आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या या नमुन्यांपैकी २७४ जणांचा करोना अहवाल पॉझीटिव्ह आले.

चीनच्या कृतींमुळे सीमेवरील शांतता भंग, भारताचा दावा :
 • चीनने गेल्या वर्षी सीमेजवळ सैन्याची मोठ्या प्रमाणात केलेली जमवाजमव आणि जैसे थे परिस्थिती एकतर्फी बदलण्याचे केलेले प्रयत्न यामुळे या भागातील शांतता व स्थैर्य यांचा भंग झाला, असे भारताने गुरुवारी सांगितले.

 • पूर्व लडाखमधील आपली सैन्य तैनाती ही ‘संबंधित’ देशाच्या कारवायांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने केलेली सामान्य ‘संरक्षणविषयक व्यवस्था’ असल्याचे चीनने म्हटल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ही प्रतिक्रिया दिली.

 • पूर्व लडाखमधील तिढ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, प्रत्यक्षात चीनच्या गेल्या वर्षीच्या कारवायांमुळेच या भागातील शांतता धोक्यात आली.

 • चीनच्या कृती १९९३ व १९९६ सालच्या करारांसह द्विपक्षीय करारांचा भंग करणाऱ्या आहेत. दोन्ही बाजू प्रत्यक्ष ताबा रेषेचा आदर राखतील आणि या रेषेलगतच्या भागात आपली लष्करी दले कमीतकमी पातळीवर तैनात करतील, असे या करारांद्वारे ठरले होते, मात्र चीनने त्याचे उल्लंघन केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

२५ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)