चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 जुलै 2023

Date : 25 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा: जर्मनीकडून मोरोक्कोचा धुव्वा
  • जर्मनीच्या संघाने यंदाच्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात मोठय़ा विजयाची नोंद करताना सोमवारी मोरोक्कोचा ६-० असा धुव्वा उडवला. दोन वेळचा विजेता संघ जर्मनी आणि महिला विश्वचषकात पदार्पण करणारा मोरोक्कोचा संघ यांमधील गुणवत्ता व अनुभव यातील तफावत या लढतीतून दिसून आली.
  • जर्मनीचे आक्रमण रोखण्यात मोरोक्कोला अपयश आले. जर्मनीने ७५ टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला आणि गोलच्या दिशेने १६ फटके मारले. पूर्वार्धात आघाडीपटू अलेक्सांड्रा पॉपने (११ आणि ३९व्या मिनिटाला) दोन गोल नोंदवत जर्मनीला भक्कम आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धातही जर्मनीने आपल्या आक्रमणाची गती कायम राखली. ४६व्या मिनिटाला क्लारा बुएलने जर्मनीचा तिसरा गोल केला. यानंतर मोरोक्कोच्या एल हाज (५४व्या मि.) आणि यास्मिन मरबेत (७९व्या मि.) यांच्याकडून झालेल्या स्वयंगोलमुळे जर्मनीला ५-० अशी आघाडी मिळाली. अखेरीस ९०व्या मिनिटाला लिया शुलेरने गोल करत जर्मनीला ६-० असा मोठा विजय मिळवून दिला.
  • जर्मनीचा संघ महिला विश्वचषकातील आपल्या गेल्या २० साखळी सामन्यांत अपराजित राहिला आहे. त्यांनी १६ विजय मिळवले असून चार सामने बरोबरीत राखले आहेत.दुसरीकडे, इटलीने विश्वचषकातील मोहिमेची यशस्वी सुरुवात करताना अर्जेटिनाला १-० असे पराभूत केले. इटलीकडून ख्रिस्टियाना गिरेलीने ८७व्या मिनिटाला निर्णायक गोल नोंदवला. त्यामुळे अर्जेटिनाला महिला विश्वचषकात आजवर खेळलेल्या १० सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ८,६७७ कोटी रुपये मंजूर! अजित पवारांची घोषणा
  • गेल्या वर्षी पावसाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरपाई जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२४ जुलै) विधान परिषदेत सांगितलं की, गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी ८ हजार ६७७ कोटी रुपये तर यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात अवेळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५१३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
  • अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी १,५०० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीबीटी प्रणालीमार्फत ६०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर केले असून हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.
  • त्याचबरोबर गेल्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. प्रामुख्याने यवतमाळ, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर आणि वाशिम या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या मुसळधार पावसात ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते, त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नोकरभरतीच्या कठोर कायद्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे ‘टि्वटर वॉर’ आंदोलन; जाणून घ्या सविस्तर…
  • राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता अशा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे ठरले आहेत.
  • मंत्रालयात बसलेले आयएएस अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे संचालक, दलाल, परीक्षा केंद्र चालक आणि शेकडो उमेदवारांना या घोटाळ्यांमध्ये अटक झाली होती. त्यामुळे अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात परीक्षांमधील गैरप्रकारांसाठी इतर राज्यांप्रमाणे विशेष कायदा करणे आणि परीक्षा केंद्र हे टीसीएसचे स्वत:चे हवेत या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मंगळवार २५ जुलैला सकाळी ११ ते दुपारी १२ वाजातपर्यंत टि्वटर वॉर पुकारला आहे.
  • स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. याचाच भाग म्हणून आता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन टि्वटरच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी या मार्गाने लढा दिला जाणार आहे. यामध्ये हॅश टॅग परीक्षा केंद्र फक्त टीसीएस आणि हॅश टॅग पेपरफुटीवर कडक कायदा अशी मागणी राहणार आहे. यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
‘ट्विटर’चे नवे बोधचिन्ह
  • ट्विटरचा चिरपरिचित निळा पक्षी आता या प्रसिद्ध समाजमाध्यमावर दिसणार नाही. त्याऐवजी काळी-पांढरी फुली ट्विटरची खूण मानली जाणार आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी सोमवारी ‘ ’ हा नवीन लोगो लोकांसमोर आणला. ट्विटरचे हे मोठे रिब्रँडिंग मानले जात आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी ४४ अब्ज डॉलरना ट्विटर खरेदी केले होते.
  • मस्क यांनी स्वत:च्या ट्विटर हँडलवर हा बदल करून त्याची प्रतिमा पोस्ट केली. सोमवारी डेस्कटॉपवर ट्विटरची काळय़ा पार्श्वभूमीवर पांढरी फुली दिसू लागली. मात्र फोनवरील अ‍ॅपमध्ये निळा पक्षीच मोठय़ा प्रमाणात दिसत होता. मस्क यांनी नवीन लोगोसाठी चाहत्यांकडून कल्पना मागवल्या होत्या. रिब्रँडिंगनंतर ट्वीट हे एक्स नावाने ओळखले जातील असेही मस्क यांनी स्पष्ट केले आहे.
देशातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची विक्री, ‘इतक्या’ कोटींना झाला व्यवहार
  • नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने भारतातील पहिले खासगी हिल स्टेशन लवासा हे डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरला विकण्यास मान्यता दिली आहे. NCLT ऑर्डरमध्ये सादर केलेल्या ठराव योजने(Resolution Plan)ला डार्विनच्या कर्जदारांनी परवानगी दिल्यानंतर NCLT ने लवासाच्या विक्रीला मान्यता दिली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने खासगी हिल स्टेशन लवासाची दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया (Insolvency resolution process) सुरू झाल्यानंतर सुमारे पाच वर्षांनी १८१४ कोटी रुपयांच्या ठराव योजनेला मंजुरी दिली आहे. आठ वर्षांमध्ये १८१४ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. ठराव योजनेमध्ये कर्जदारांना ९२९ कोटी रुपये आणि घर खरेदीदारांना पूर्णतः बांधलेली घरे देण्यासाठी ४३८ कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. ८३७ गृहखरेदीदार आहेत, ज्यांचे दावे स्वीकारण्यात आले आहेत.
  • विशेष म्हणजे त्यांचे स्वीकृत दावे एकूण ४०९ कोटी रुपयांचे आहेत. कंपनीने कर्जदार आणि ऑपरेशनल क्रेडिटर्ससह एकूण ६,६४२ कोटी रुपयांचा दावा स्वीकारला आहे. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (DPIL) लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी विजेता बोलीदार म्हणून समोर आले आहेत. कंपनी प्रामुख्याने पुण्यातील खासगी हिल स्टेशनच्या लवासाच्या विक्री प्रक्रियेत गुंतलेली आहे. ट्रिब्युनलने शुक्रवारी दिलेल्या २५ पानांच्या आदेशात १,८१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संकल्प योजनेला मंजुरी दिली. “या रकमेमध्ये १,४६६.५० कोटी रुपयांच्या ठराव योजनेच्या रकमेचा समावेश आहे, ज्यामधून कॉर्पोरेट कर्जदाराला हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाणार आहे,” असंही आदेशात म्हटले आहे.

 

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नीरजची रौप्यक्रांती!; जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा दुसरा भारतीय :
  • ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राने रविवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष अ‍ॅथलेटिक्सपटू ठरला आहे. २४ वर्षीय नीरजला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जात होते. चौथ्या प्रयत्नात नीरजने सर्वोत्तम ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला. ही कामगिरी ग्रेनाडाच्या २०१९ मधील दोहा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अँडरसन पीटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकाची ठरली.

  • गतवर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले होते. जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने ८८.५८ मीटर अंतर गाठत एकंदर दुसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली होती. नीरजच्या रौप्यपदकामुळे तब्बल दोन दशकांच्या कालावधीनंतर भारताचे नाव प्रथमच पदकतालिकेत झळकले आहे. भारतीय संघ संयुक्तपणे २८व्या क्रमांकावर आहे. एक रौप्य आणि पाच क्रीडापटू अंतिम फेरीत ही भारताची जागतिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

  • २४ वर्षीय पीटर्स हा जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भालाफेकपटू ठरला आहे. पीटर्सने सहा प्रयत्नांपैकी तीनदा ९० मीटर अंतराचा टप्पा ओलांडला. त्याने पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ९०.५४ मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली. नीरजसह कोणत्याही खेळाडूला त्याच्या तीन सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आले नाही. चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जॅकूब व्हॅडलेचने ८८.०९ मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावले.

‘मी द्रौपदी मुर्मू…’, देशाला मिळाल्या नव्या राष्ट्रपती, ठरल्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती :
  • द्रौपदी मुर्मू आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेणार असून संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा सुरु होईल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाईल.

  • त्यानंतर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिले भाषण करतील. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित राहतील.

  • देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.

केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल; आता ‘या’ वेळातही तिरंगा फडकवता येणार :
  • केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.

  • ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत उचलले पाऊल - ‘आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना याबाबत पत्र दिले आहे.

  • २० जुलै रोजी आदेश - भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे.

  • दिवस- रात्र फडकवता येणार तिरंगा - ध्वज संहिता-२००२ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१ अंतर्गत राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम सांगण्यात आले आहेत. या ध्वज संहितेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता. तसेच पॉलिस्टरचे आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांना परवानगी नव्हती. मात्र, आता पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करण्याची परवनागी देण्यात आली आहे. तसेच २४ तास तिरंगा फडवण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे :
  • १) द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी राजघाटला भेट देत राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

  • २) शपथविधी सोहळ्याआधी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू संसदेत पोहोचतील.

  • ३) याशिवाय राष्ट्रपती भवनात सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी एक औपचारिक कार्यक्रम पार पडेल. पण जर पाऊस असेल तर हा कार्यक्रम रद्द केला जाणार असल्याचं शपथविधीच्या वेळापत्रकात नमूद आहे.

  • ४) उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि प्रमुख नागरी व लष्करी अधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

  • ५) रविवारी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री परिषदेतील सदस्यांसाठी राष्ट्रपती भवनात डिनरचं आयोजन केलं होतं.

  • ६) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.

  • ७) द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर ओडिशामधील त्यांच्या गावी गुरुवारपासूनच मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जात आहे.

  • ८) द्रौपदी मुर्मू २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

  • ९) द्रौपदी मुर्मू दोन वेळा आमदार राहिल्या असून ओडिशात भाजपाच्या पाठिंब्याने बिजू जनता दलाची सत्ता असताना नवीन पटनाईक सरकारमध्ये मंत्री होत्या.

  • १०) द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन यासारखी मंत्रालयं हाताळताना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे.

देशात लवकरच सैन्यदलांची संयुक्त कमांड; संरक्षणमंत्र्यांची घोषणा :
  • देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची ‘जॉईन्ट थिएटर कमांड’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली. त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश ही ओळख पुसत भारताची वाटचाल ही सर्वाधिक शस्त्रनिर्यात करणारा देश होण्याकडे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जम्मूतील गुलशन मैदानावर जम्मू काश्मीर पीपल्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

  • संरक्षणमंत्री म्हणाले की, कारगिरमधील ऑपरेशन विजय अंतर्गत झालेल्या संयुक्त मोहिमा लक्षात घेता देशात जॉईन्ट थिएटर कमांडची संकल्पना राबविली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या आव्हानांसाठी भारत सज्ज;मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन :
  • २१ वे शतक हे खऱ्या अर्थाने ‘भारताचे शतक’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि या शतकातील आव्हानांसाठी देश सज्ज होत असल्याचा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी व्यक्त केला. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, कोविंद यांनी भारताच्या ‘देदीप्यमान लोकशाही सामर्थ्यांला’ सलाम केला आणि ‘‘आपल्या मुळांना घट्ट पकडून राहणे’’ हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ असल्याचे प्रतिपादन केले.

  • राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना रामनाथ कोविंद यांनी भारतीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘पाच वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवून मला राष्ट्रपतीपदी निवडून दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींचे आभार मानतो,’’ असे कोविंद म्हणाले.

  • कानपूर जिल्ह्यातील एका खेडय़ातील सामान्य कुटुंबात वाढलेल्या, मातीच्या घरात राहिलेल्या एका तरुण मुलाला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची कल्पनाही नव्हती. तो रामनाथ कोविंद आज तुम्हा सर्व देशवासियांशी संवाद साधत आहे. आपल्या देशाच्या चैतन्यमय लोकशाही व्यवस्थेचे हे सामर्थ्य आहे, मी त्याला सलाम करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.

  • कोविंद यांनी हवामान बदलाच्या संकटाकडेही लक्ष वेधले आणि येणाऱ्या पिढय़ांसाठी सर्वानी पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले. ‘‘निसर्गमाता अतीव दु:खात आहे. हवामानबदलाचे संकट पृथ्वीचे भविष्य धोक्यात आणू शकते. आपल्या मुलांसाठी आपण आपले पर्यावरण, जमीन, हवा आणि पाणी यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना जपले पाहिजे’’, असे कोविंद म्हणाले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे पुत्र पुन्हा मुख्यमंत्री :
  • पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे पुत्र हमजा शरीफ हे पंजाब प्रांताच्या विधिमंडळात अवघ्या तीन मतांनी जिंकल्याने शनिवारी  त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. हमजा यांच्या विजयाच्या घोषणेनंतर देशभर त्याविरुद्ध निदर्शने झाली. विरोधी पक्षांनी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद  मागितली आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंजाब विधानसभेत शुक्रवारी सरकार स्थापनेसाठी मतदान घेण्यात आले. त्यात हमजा यांना विजयी घोषित करण्यात आले.

  • वास्तविक, त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्षास १७ जुलै रोजी झालेल्या पोटनिवडणुकीनंतर विधासभेत बहुमत नाही.  विधानसभेच्या उपसभापतींनी प्रतिस्पर्धी उमेदवाराची दहा निर्णायक मते बाद ठरवली. त्यामुळे हमजा यांची निवड होऊ शकली.

25 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.