चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जुलै २०२१

Date : 25 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“मिराबाई तुम्ही यापुढे तिकीट तपासण्याचं काम करायचं नाही,” मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा :
  • मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात उचलले. दरम्यान मिराबाई चानू यांच्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

  • एका जिद्दीची कहाणी - मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी मिराबाई चानूला नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या मिराबाई चानू भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस (टीसी) म्हणून काम करत आहे. एन बिरेन सिंग यांनी मिराबाई चानू रौप्यपदक घेऊन घरी परतल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

  • मिराबाईची रौप्यक्रांती - “तू यापुढे रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नाही,” असं मुख्यमंत्री मिराबाई चानूला व्हिडीओत सांगत आहेत. “मी तुमच्यासाठी एक विशेष पोस्ट राखीव ठेवत आहेत,” असंही आश्वासन यावेळी त्यांनी दिलं असून माहिती मात्र गुपित ठेवली.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीत मानवाधिकाराचा मुद्दा मांडणार :
  • भारत व अमेरिका यांच्यात इतर बाबींपेक्षा मानवाधिकार व लोकशाही यांच्या संबंधांत अनेक मूल्ये समान आहेत. त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन हे त्यांच्या पहिल्या भारत भेटीत भारतीय अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत हे मुद्दे उपस्थित करणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने दिली.

  • ठरलेल्या कार्यक्रमानुसार, ब्लिंकन हे २७ जुलैला उशिरा नवी दिल्लीत येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना भेटतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेही ब्लिंकन यांना भेटणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीत सांगितले.

  • ‘मानवाधिकार व लोकशाही यांच्या संदर्भात सांगायचे, तर आम्ही ते मुद्दे उपस्थित करणार आहोत आणि आम्ही ते संभाषण सुरू ठेवू. कारण, इतर बाबींपेक्षा मानवाधिकार व लोकशाही यांच्या संबंधांत भारत व अमेरिका यांच्यात अनेक मूल्ये समान आहेत, यावर आमचा ठाम विश्वास आहे’, असे दक्षिण व मध्य आशिया व्यवहारविषयक प्रभारी सहायक परराष्ट्रमंत्री डीन थॉम्पसन यांनी ब्लिंकन यांच्या भेटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ब्राझीलमध्ये कोव्हॅक्सिनच्या चाचण्या अखेर बंद :
  • ब्राझीलने भारत बायोटेकच्या कोविड १९ लशीच्या चाचण्या अखेर  थांबवल्या आहेत. कंपनीचा ब्राझील बरोबरचा करार तेथील औषध नियंत्रक कंपनीने रद्द केला असून त्यानंतर या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.

  • भारत बायोटेकने शुक्रवारी म्हटले आहे, की प्रिसिसा मेडिकॅमेंटॉस व एनव्हिक्सिया फार्मास्युटिकल्स बरोबरचा करार रद्द करण्यात आला आहे. समझोता करार आता अमलात राहणार नाही.

  • ब्राझील सरकारने २ कोटी कोव्हॅक्सिन लशींच्या पुरवठ्याचे कंत्राट दिले होते. या खरेदीत सरकाने गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचा फटका कोव्हॅक्सिनला बसला आहे. भारत बायोटेकने मात्र आपली बाजू स्पष्ट केली असूून या प्रकरणात कंपनीने कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी मात्र दोन जणांवर कोव्हॅक्सिन लस खरेदीसाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता.

  • एनव्हिक्सियाने शुक्रवारच्या चाचण्या थांबवल्या असून आता त्या होणार नाहीत, असे ब्राझीलच्या औषध नियंत्रक कंपनीने म्हटले आहे.

राज्यात दिवसभरात ६ हजार ८४३ नवे करोनाबाधित ; १२३ रूग्णांचा मृत्यू :
  • राज्यात आज दिवसभरात ६ हजार ८४३ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर १२३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ५ हजार २१२ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होताना दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असतानाच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबतही सतर्क केले जात आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्यी ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे.

  • राज्यात आजपर्यंत एकूण ६०,३५,०२९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६८,४६,९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६४,९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१७,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,९८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात लहान मुलांना लवकरच करोनाची लस?; ‘या’ लसींचे पर्याय :
  • करोनाची दुसरी लाट आता मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. त्यात करोनाचा वेग मंदावल्याने पुन्हा शाळा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असं असलं तरी करोनाचा धोका पाहता पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. करोना लस घेतल्यानंतर मुलांना शाळेत पाठवू, असं काही पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही सप्टेंबरपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु होईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे पालकांपुढे कोणते पर्याय आहेत, याची चाचपणी केली जात आहे.

  • कोव्हॅक्सिन- भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचं लहान मुलांवर सध्या ट्रायल सुरु आहे. त्याचा निकाल सप्टेंबरपर्यंत येईल असं एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे. दोन वर्षांपासूनच्या मुलांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता लसीचा दुसरा डोस पुढच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. दिल्लीच्या एम्समध्ये ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीची दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिनचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

  • जायडस कॅडिला- जायडस कॅडिलाने १२ ते १८ वयोगटातील डीएनए आधारीत करोना लसीचं क्लिनिकल ट्रायल नुकतंच पूर्ण केलं आहे. लवकरच ही लस देशात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परवानगी मिळताच हा पर्याय पालकांसमोर असणार आहे.

२५ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.