चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जुलै २०२०

Date : 25 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीयांच्या चिंतेत वाढ; १३,३६,८७४ करोनाबाधित, ३१,४१३ जणांचा मृत्यू :
  • भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून भारतात ४५ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे तर ७५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे. मागील २४ तासांत देशात ४८ हजार ९६२ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ७५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • (त्रिपुरा राज्याचा डेटा रात्री उशीरा पर्यंत आला नव्हता. ) त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १३ लाख ३६ हजार ८७४ इतकी झाली आहे. तर ३१ हजार ४१३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांत देशात एक लाख रुग्णांची वाढ झाली आहे.

  • देशातील करोना रुग्णांची संख्या तीन आठवडय़ांमध्ये दुप्पट झाली आहे. २ जुलै रोजी रुग्णसंख्या सुमारे सहा लाख होती. गेल्या ४८ तासांमध्ये सुमारे एक लाख रुग्णांची भर पडली आहे. जगभरात करोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंच्या क्रमवारीत फ्रान्सला मागे टाकून भारत सहाव्या स्थानी आला आहे. असे असले तरी जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर नीचांकी २.३८ टक्के आहे. १० लाख लोकसंख्येमागे ८६४ लोकांना करोनाची बाधा झाली असून २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका-चीन संघर्षांचा भारत, ब्राझीलला फटका :
  • अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा अमेरिका व चीन यांच्यातील संघर्ष तीव्र होत असून त्यामुळे जागतिक व्यापाराची घडी विस्कटली आहे. कोविड १९ साथीनंतर परत व्यवहार सुरू होण्याच्या मार्गावर असलेल्या भारत व ब्राझील यासारख्या देशांसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

  • राजन म्हणाले, अमेरिकेतील आस्थापनांचे नुकसान झाले असून कोविड १९ नंतरच्या काळात ही सगळी विस्कटलेली घडी दुरुस्त करण्याची गरज आहे. अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या असून युरोपातही तशीच परिस्थिती आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठी भांडवली रचनेची फेरमांडणी, साधनांचे फेरवाटप करावे लागणार आहे.

  • ‘पॅन आयआयटी’च्या आभासी परिषदेत ‘दी न्यू ग्लोबल इकॉनॉमिक नॉर्म-पोस्ट कोविड १९’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, अमेरिका, ब्राझील, मेक्सिको व भारतात टाळेबंदी करूनही करोनाचा प्रसार थांबलेला नाही. ज्या देशांनी करोनावर नियंत्रण मिळवले त्यांच्या पेक्षा ज्यांना ते मिळवता आले नाही त्यांना मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागणार आहे.

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द :
  • रिपब्लिकन  पक्षाचे जॅक्सनव्हिल येथे होणारे अधिवेशन करोना विषाणूच्या प्रसारामुळे रद्द करण्यात आले आहे, हे अधिवेशन पुढील महिन्यात होऊन त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार होती. २४-२७ ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन होणार होते. आता हे अधिवेशन पूर्ण स्वरूपात होणार नाही.

  • फ्लोरिडात करोना वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागला असून तो ट्रम्प यांच्या पुन्हा निवडून येण्यात अडथळा ठरणार आहे. उत्तर कॅरोलिनात हे अधिवेशन होणार  होते पण तेथील गव्हर्नरांनी सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव ते घेण्यास नापसंती दर्शवली होती. व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार जास्त असल्याने जॅक्सनव्हिल येथील अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या अधिवेशनासाठी ही योग्य वेळ नाही कारण फ्लोरिडात करोनाचा प्रसार जास्त आहे.

  • ट्रम्प हे डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यापेक्षा जनमत चाचण्यात पिछाडीवर आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, मला अमेरिकी लोकांचे संरक्षण करायचे आहे. तेच मी नेहमी केले आहे व करीन.

पूर्व लडाखमधून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यास भारत-चीनची मान्यता :
  • पूर्व लडाखमधील वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य लवकरात लवकर आणि पूर्णपणे माघारी घेण्याचे शुक्रवारी भारत आणि चीनने मान्य केले. द्विपक्षीय संबंधांमध्ये र्सवकष सुधारणा होण्यासाठी सीमेवरील भागात शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, या बाबतही दोन्ही देशांचे मतैक्य झाले.

  • भारत आणि चीन यांच्यात नव्याने ऑनलाइन राजनैतिक चर्चा झाली त्यामध्ये लडाखमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला. कमांडर स्तरावर १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अपेक्षेनुसार होत नसल्याचे लक्षात आल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने चर्चा करण्यात आली.

  • दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याबाबतची रणनीती ठरविण्यासाठी चर्चेची आणखी एक फेरी लवकरच आयोजित करण्याचे शुक्रवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी मान्य केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दूरध्वनीवरून तणाव कमी करण्यासंदर्भात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर ६ जुलैपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. कमांडरांच्या बैठकीत जो समझोता झाला त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे दोन्ही देशांनी शुक्रवारी झालेल्या चर्चेत मान्य केले.

आनंदचा सलग तिसरा पराभव :
  • भारताचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या व्लादिमिर क्रॅ मनिककडून पराभूत झाल्यामुळे आनंदची तळाच्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

  • आनंदला क्रॅमनिककडून ०.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला. चांगला खेळ करूनही आनंदला पहिला गेम गमवावा लागला. माजी जगजेत्या क्रॅमनिकने कडवी झुंज देत या गेममध्ये पुनरागमन करून बाजी मारली. दुसरा गेम गमावल्यामुळे आनंदचा पराभव अटळ होता. पण तिसऱ्या गेममध्ये बरोबरी पत्करत आनंदने विजयाच्या आशा कायम ठेवल्या. पण आनंदने चौथा गेमही गमावला.

  • याआधी आनंदला पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पीटर स्विडलर आणि विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसनकडून हार पत्करावी लागली होती. आनंदचा चौथ्या फेरीतील सामना नेदरलँड्सच्या अनिश गिरिशी होणार आहे.

२५ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.