चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 जानेवारी 2024

Date : 25 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रोहन बोपण्णा ४३व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी
  • ४३व्या वर्षी भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वर्षातल्या पहिलीवहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सेमी फायनलमध्ये वाटचालीसह रोहन बोपण्णा दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ४३व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरणार आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या राजीव रामच्या नावावर होता. राजीवने ऑक्टोबर २०२२ रोजी ३८व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन हा केवळ चौथा भारतीय टेनिसपटू ठरणार आहे. याआधी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनीच ही किमया केली आहे.
  • ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रोहन मार्क एब्डेन जोडीने अर्जेंटिनाच्या सहाव्या मानांकित मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टिनी जोडीवर ६-४, ७-६ (५) असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. रोहन-मार्क जोडीसमोर आता टॉमस मचॅक आणि झिनझेन झांग या जोडीचं आव्हान असणार आहे.
  • ‘दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान खूपच आनंददायी आणि समाधान देणारी गोष्ट आहे. मी स्वत: अजून ही गोष्ट मनाला पटवू शकलेलो नाही. गेले दीड वर्ष माझ्या कामगिरीत सातत्य राहिलं आहे. आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो आहे तो प्रवास आणि हे स्थान याबद्दल प्रचंड अभिमानास्पद वाटते आहे. भारतीय टेनिसपटू क्रमवारीत अव्वल स्थानी हे भारतीय टेनिससाठी आवश्यक आहे. देशवासीयांनी दोन दशकांहून अधिक अशा कारकीर्दीत वेळोवेळी मला पुरेपूर प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सदिच्छा माझ्यासाठी अतिशय मोलाचे आहेत. माझ्यामते क्रमवारीत अव्वल स्थान हे माझ्याकडून त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करण्यासारखं आहे’, अशा शब्दात रोहनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
  • ‘तुझा प्रचंड अभिमान वाटतो, तुझ्याइतकं या स्थानाचा दुसरा कोणीच दावेदार असू शकत नाही’, अशा शब्दात सानिया मिर्झाने रोहनचं कौतुक केलं आहे. ‘जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान ही बिरुदावली तुला शोभून दिसते’, अशा शब्दांत सुमीत नागलने रोहनची प्रशंसा केली आहे.
  • कारकीर्दीत रोहनच्या नावावर मिश्र दुहेरीचं एक जेतेपद आहे. २०१७ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत रोहनने कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोव्हस्कीच्या बरोबरीने खेळताना जेतेपदावर नाव कोरलं होतं. पुरुष दुहेरीत, २०१० मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. गेल्या वर्षी याच स्पर्धेत इब्डेनबरोबर खेळताना जेतेपदाने निसटती हुलकावणी दिली होती.
तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप; सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप
  • सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. सामान्यीकरणात घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनीही केला होता. असे असताना मंगळवारी रात्री उशीर भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे.
  • तलाठय़ांच्या सुमारे ४ हजार ६०० पदांसाठी ५ जानेवारीला सामान्यीकरण करून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी आदिवासीबहुल जिल्हे वगळता प्रसिद्ध झाली. सामान्यीकरणामुळे ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले. यावर समन्वय समितीसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर झाली. परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर करण्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी आक्षेप घेतला आहे.
  • तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्या १५ उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यीकरण सूत्रात वापरण्यात आले आहेत.
  • पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आहे. 
  • प्रामाणिक उमेदवारांच्या गुणांच्या आधारे सामान्यीकरण केल्यास गुणवत्ता यादीत बदलाची शक्यता असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
  • अशा उमेदवारांच्या गुणांच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे.
  • निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपांची चौकशी करण्याची मागणी झाली होती.
मोफत गणवेश योजनेअंतर्गत इयत्तानिहाय स्वरुप निश्चित, कसा असणार गणवेश?
  • राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणेशवाचे इयत्तानिहाय स्वरूप निश्चित केले आहे. त्यानुसार पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवाज कमीज ओढणी, तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश दिला जाणार आहे.
  • शालेय शिक्षण विभागाने या बाबतचे शुद्धीपत्र प्रसिद्ध केले. शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत एकसमान रंगांचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतमार्फत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४पासून लागू केला. मात्र शैक्षणिक वर्ष २०२३०२४साठी या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत १८ ऑक्टोबर रोजी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्काऊट गाईड विषयाला अनुरूप असेल असा आकाशी आणि गडद निळा असे रंग असलेला गणवेश असावा, मुलांना शर्ट-पँट, मुलींना सलवार कमीज, ओढणी, शर्टवर शोल्डर स्ट्रीप, दोन खिसे असावेत, असे स्पष्ट करण्यात आले होते.
  • या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून इयत्तानिहाय गणवेशाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवाज कमीज ओढणी, तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश दिला जाणार आहे. नव्या स्वरुपाच्या गणवेशाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंगळ आणि बुध ग्रह जवळ येणार, पूर्व क्षितीजावर अपूर्व अनुभूती; वाचा अनोख्या दृष्याचा आनंद केव्हा घेता येणार?
  • सूर्यमालेत सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रह आणि पृथ्वी नंतरचा मंगळ ग्रह २७ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. या अनोख्या दृष्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.
  • चंद्र आकाशात दररोज १२ अंश पुढे सरकत असल्याने दर महिन्याला प्रत्येक ग्रहाची आणि चंद्राची युती घडून येते. त्यामुळे आकाशात ग्रहाची ओळख सहज होत असते. चंद्राप्रमाणेच ग्रहसुद्धा ठराविक कालावधीत एकमेकांच्या जवळ येतात. बुध ग्रह सूर्याच्या जवळ आणि अंतर्ग्रह असल्याने केवळ सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर फार कमी वेळ या ग्रहाचे दर्शन घडते. दुर्बिणीतून या ग्रहाच्या चंद्राप्रमाणे विविध कला पाहता येतात. सध्या एकादशीच्या कलेप्रमाणे दिसेल. आकाशात लालसर रंगाचा मंगळ ग्रह लवकर लक्षात येत असल्याने त्याच आधारे बुध ग्रहाचे दर्शन अधिक सुलभ होईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
  • हे दोन्ही ग्रह सध्या धनु राशीत २२ व्या अंशावर आहेत. रात्री १० वाजता या दोन ग्रहांमधील अंतर सर्वात कमी असेल. असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवावा. याच प्रकारे मंगळ ग्रह येत्या २२ फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रहाजवळ असेल, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.
राज्यात १०८ क्रमांकाच्या ८१९ रुग्णवाहिका वाढणार, आता ‘बोट’ आणि नवजात शिशू रुग्णवाहिका सेवा
  • राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून त्यात आणखी ८१९ रुग्णवाहिकांची वाढ केली जाणार आहे. १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत.
  • गेल्या १० वर्षात राज्यातील असंख्य रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा लाभ झाला. अनेक नवजात बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता नव्याने ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहेत. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत. दहा वर्षांपूर्वी १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्यावतीने करण्यात आला होता.
  • नवीन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागेल. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे. रुग्णवाहिकांसाठी सद्यस्थितीत प्रतिमहिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतात. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतील. एकंदरीतच अतिरिक्त ३० कोटी प्रती महिना शासनाला खर्च करावा लागणार आहे. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यावर रुग्णवाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होईल.

अशी आहे रुग्णवाहिकांची संख्या

  • सध्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेमध्ये २३३ ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ७०४ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, ३३ दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. नव्यामध्ये २२ ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ५७० ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, दुचाकी रुग्णवाहिका १६३, २५ नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका आणि ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका वाढणार आहेत.
न्यू हॅम्पशायर ‘प्रायमरी’मध्ये ट्रम्प विजयी
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणूक ‘न्यू हॅम्पशायर रिपब्लिकन प्रायमरी’मध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन निक्की हेली यांचा पराभव केला. ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाकडून आपल्या उमेदवारी निश्चितीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांची पुन्हा संभाव्य अंतिम लढत होण्याची चिन्हे आहेत.
  • तीन चतुर्थाश मतांच्या मोजणीसह ट्रम्प ५५ ते ४४ टक्क्यांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत केवळ दोन राज्यांमध्ये अशा निवडणुकांचे मतदान झाले असले तरी, ट्रम्प यांच्या मंगळवारच्या प्राथमिक विजयाने रिपब्लिकन पक्षावरील त्यांचे वर्चस्व अधोरेखित केले. ट्रम्प यांनी गेल्या आठवडय़ात आयोवाच्या ‘कॉकस’मध्ये दणदणीत विजय मिळवला होता. ट्रम्प यांच्याविरुद्ध ९१ गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. त्यात २०२० च्या अध्यक्षीय निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. असे असताना त्यांनी मिळवलेला हा विजय उल्लेखनीय आहे.
  • परंतु दक्षिण कॅरोलिनाचे माजी प्रांतपाल आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत, ५२ वर्षीय हॅली यांनी मंगळवारी रात्री समर्थकांना एक धडाकेबाज भाषण देऊन लढण्याची शपथ घेतली. त्यांनी ट्रम्प यांच्या मानसिक तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि रिपब्लिकनांना इशारा दिला की ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाचा पराभव होईल.

 

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणीत यंदा वाढ; ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांची नोंदणी
  • राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पाचवी आणि आठवीचे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी वाढले असून, १२ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे.
  • शिष्यवृत्ती परीक्षा ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा असते. पूर्वी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात होती. मात्र त्यात बदल करून आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यभरात प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा विद्यार्थिसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
  • यंदा पाचवी आणि आठवीच्या मिळून ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०२१ मध्ये पाचवीच्या ३ लाख ८८ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी, आठवीच्या २ लाख ४४ हजार ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी २०२२ मध्ये पाचवीच्या ४ लाख १८ हजार ५३, आठवीच्या ३ लाख ३ हजार ८१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ४९३ आणि आठवीच्या ३ लाख ६७ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.
  • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिसंख्येत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह बैठका घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा पाया घातला जात असल्याने ही परीक्षा महत्त्वाची आहे. याबाबतची जागृती पालक आणि शिक्षकांमध्ये झाल्याने विद्यार्थिसंख्या वाढलेली आहे.

‘एमपीएससी’च्या सदस्य नियुक्तीमध्ये विदर्भावर अन्याय?

  • शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील (एमपीएससी) दोन सदस्यांच्या नियुक्तीची सोमवारी घोषणा केली. परंतु, यात विदर्भाला प्रतिनिधित्व नाकारण्यात आले आहे. सरकारने पुन्हा एकदा विदर्भाच्या पदरी भोपळा टाकल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात काम करू शकतील, असे तज्ज्ञ विदर्भात नाहीत काय, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था असून येथील सदस्यांची नियुक्ती ही राज्य सरकारकडून अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाते. एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी या आयोगाची रचना आहे. मागील दोन वर्षांपासून आयोगावर सदस्य नेमताना विदर्भावर कायम अन्याय केल्याचे दिसून येते. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व नाकारल्यानंतर आता ‘एमपीएससी’ सदस्य नियुक्तीमध्येही अन्याय केल्याचा आरोप होत आहे. सोमवारी डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची ‘एमपीएससी’च्या सदस्यपदी निवड करण्यात आली. यापूर्वी अध्यक्ष व दोन सदस्यांची निवड झाली होती. अध्यक्ष किंवा एकही सदस्य  विदर्भातील नाहीत.   लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या विदर्भाच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत, अशी ओरड अनेकदा केली जाते. त्यात आता सदस्य नियुक्तीमध्येही अन्याय झाल्याचे दिसून येते.
  • आक्षेप काय?
    आयोगावर डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, राजीव जाधव या तीन सदस्यांची पहिल्यांदा निवड करण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष म्हणून किशोर दत्तात्रय राजे-िनबाळकर यांची नियुक्ती झाली. आता पाचही सदस्य व अध्यक्ष हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ‘नागपूर करारा’प्रमाणे महाराष्ट्रातील तीन विभागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या मिळतील, असे ठरले होते. परंतु, आता अध्यक्ष किंवा एकही सदस्य हा विदर्भातला नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या विदर्भाला कितपत मिळणार, अशी शंका विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी उपस्थित केली आहे.
  • लोकशाही म्हटले की सगळय़ा लोकांचे प्रतिनिधित्व निर्णय प्रक्रियेत असणे आणि दिसणे आवश्यक आहे. ते नसेल व लोकांना प्रतिनिधित्व मिळत नसेल तर तो अन्याय आहे. विदर्भाला आयोगामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही हा नागपूर कराराचा भंग आहे. रोजगाराशी ही बाब जुळलेली असतानाही विदर्भावर अन्याय केला जात आहे.

प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्य पथा’वर होणार संरक्षण दलातील स्त्री सामर्थ्याचं दर्शन

  • Republic Day 2023 प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणारी परेड म्हणजे आपल्या देशाच्या सामर्थ्याचं दर्शन असतं. यामध्ये आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचंही दर्शन घडतं. गेली काही वर्षे या परेडमध्ये महिला लष्करी अधिकारीही सन्मानाने सहभागी होत आहेत एवढेच नव्हे तर नेतृत्वही करत आहेत. आपल्या देशाची ही गौरवशाली परंपरा याही वर्षी सुरुच राहणार आहे.
  • यावर्षीही महिला अधिकारी महत्त्वाच्या तुकड्यांचं नेतृत्व करणार आहेत. आकाश या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचं यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सादरीकरण होणार आहे आणि याचं नेतृत्व करणार आहेत लेफ्टनंट चेतना शर्मा . क्षेपणास्त्र तुकडीचं नेतृत्व पहिल्यांदाच महिला अधिकारी करणार आहेत. तर लेफ्टनंट डिंपल भाटी या भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हील्स मोटरसायकल टीममध्ये बाईक राईडर म्हणून सहभागी असतील. डिंपल या कोअर ऑफ सिग्नल्स या रेजिमेंटमध्ये आहेत. तर भारतीय नौदलाच्या एअर ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत या परेडमध्ये १४४ नौसैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करतील.
  • आकाश हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचं म्हणजे ‘मेड इन इंडिया’ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी सक्षम आहे. अर्थातच ‘आकाश’ भारतीय संरक्षण दलासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर संचलनाची ही जबाबदारी मिळाल्यानंतर लेफ्टनंट चेतना शर्मा यांनी साहजिकच आनंद व्यक्त केला आहे. चेतना शर्मा या सध्या भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये तैनात आहेत. शत्रूच्या विमाने आणि ड्रोनपासून भारतीय हवाई क्षेत्राचं संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी या रेजिमेंटकडे आहे.
  • प्रजासत्ताक दिनी राजधानीतील संचलनात सहभागी होता यावे हे अनेकांचं स्वप्नं असतं. पण अत्यंत कठोर मेहनत केल्यानंतरच काहीजणांचं हे स्वप्नं पूर्ण होतं. दरवर्षी आपण टीव्हीवर हे संचलन पाहायचो, मात्र आपल्याला ही संधी नक्कीच कधीतरी मिळेल असं वाटत होतं. यावर्षी ही संधी मिळाल्यानं या स्वप्नाची पूर्तता झाल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया चेतना शर्मा यांनी व्यक्त केली आहे. या संचलनामध्ये आपल्या युनिटीचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एकाच वेळी एक कोटी ‘५ जी’ मोबाइल संचांची यशस्वी चाचणी; स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाची पुढील वर्षी निर्यातही

  • एकाच वेळी एक कोटी ‘४ जी’ व ‘५ जी’ मोबाइल संच हाताळण्याची क्षमता स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञान संरचनेमध्ये असून त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा सहावा देश बनला असून पुढील वर्षांपासून ‘५ जी’चे तंत्रज्ञान प्रणाली निर्यात केली जाणार आहे.
  • अमेरिका, स्वीडन, फिनलंड, दक्षिण कोरिया आणि चीन या पाच देशांनी स्वत:ची दूरसंचार तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे. त्यातही जागतिक बाजारपेठेत स्वीडनची एरिक्सन, फिनलंडची नोकिया, चीनची हुआवै आणि दक्षिण कोरियाची सॅमसंग या चार कंपन्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. या देशांच्या दूरसंचार तंत्रज्ञानाशी स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली स्पर्धा करू शकेल, अशी ग्वाही केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिली.
  • केंद्र सरकारच्या आर्थिक साह्यातून ‘सी डॉट’ आणि टाटा समूहातील ‘टीसीएस’ यांच्या संयुक्त प्रकल्पातून देशातील दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘बीएसएनएल’ कंपनीद्वारे २०२३ मध्ये देशभर ‘४ जी’ व ‘५ जी’ दूरसंचार सेवा पुरवली जाणार आहे. ही सेवा कार्यान्वित करण्यापूर्वी तंत्रज्ञान प्रणालीची चाचणी घेतली जात आहे. स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञान संरचना एकाच वेळी एक कोटी दूरध्वनी हाताळू शकते. ही चाचणी यशस्वी झाली असून आता वर्षभरात ५० हजार ते ७० हजार मोबाइल टॉवर उभारले जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गांधीनगरमध्ये सोमवारी ‘सीआयआय’ने आयोजित केलेल्या ‘बी-२०’ कार्यक्रमात दिली. 
चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जानेवारी २०२२
Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर ‘हाय अलर्ट’ :

प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, समाजकंटकांकडून धमकी देण्या आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

फोर्सचे महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक ’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशद्रोही गडबड करू शकतात, असा अंदाज आहे.

काश्मीर झोनच्या बीएसएफ अधिकार्‍यांनी सांगितले की, २०२१ या वर्षात दलाने विविध ऑपरेशन्समध्ये तीन एके-47 रायफल, सहा ९ एमएम पिस्तूल, दारूगोळा, २० ग्रेनेड, दोन आयईडी आणि १७.३ किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण : सरकारी धोरणांच्या केंद्रस्थानी देशातील युवा पिढी- पंतप्रधान :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील २९ बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी युवा वर्ग असून बालकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचा अवलंब केला पाहिजे, असे पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी संवाद साधताना सांगितले.

‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधानांनी सर्व पुरस्कारप्राप्त बालकांना डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप केले. पुरस्कारप्राप्त २९ बालकांमध्ये १४ बालिकांचा समावेश होता. नवसंशोधन, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या विभागांत हे पुरस्कार देण्यात आले. केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांचे कौतुक केले. ‘जगातील बहुतेक मोठय़ा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय तरुण असून ही भारतासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.

जगभरात भारतीय तरुण जी भरारी घेत आहे ते गौरवास्पद असून विविध क्षेत्रांत बालके प्रगती करतात त्याचे कौतुक वाटते,’ असे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले. ३ जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल चार कोटी बालकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली असून संपूर्ण समाजाला यातून प्रेरणा मिळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - भारताचा विदित विजयी, प्रज्ञानंद पराभूत :

भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत निल्स ग्रँडेलियसवर विजयाची नोंद केली. आर. प्रज्ञानंदला मात्र सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

१६ वर्षीय प्रज्ञानंदवर आठव्या फेरीत अझरबैजानचा अनुभवी खेळाडू शख्रियार मामेदेरोव्हने मात केली. त्यामुळे आठ फेऱ्यांअंती प्रज्ञानंदच्या खात्यावर २.५ गुण आहेत. या सामन्यातील विजेत्या मामेदेरोव्हने कार्लसनसह (५.५ गुण) संयुक्तरीत्या अग्रस्थान पटकावले.

विदित आणि हॉलंडचा अनिश गिरी प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत. आठव्या फेरीत स्वीडनच्या ग्रँडेलियसने ३४व्या चालीत चूक केली आणि विदितने दर्जेदार खेळ सुरू ठेवत विजय मिळवला. चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीने (७ गुण) आठव्या फेरीत जोनस बिएरेवर मात करताना अग्रस्थानावरील पकड मजबूत केली.

स्मृतीचे संस्मरणीय यश :

भारताची तडाखेबाज सलामीवीर स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. डावखुऱ्या स्मृतीने २०२१ वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दिमाखदार कामगिरी करताना कारकीर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला.

वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रेचल हेहो फ्लिंट’ करंडक पटकावताना २५ वर्षीय स्मृतीने इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट, दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली आणि आर्यलडची गॅबी लेविस यांच्यावर सरशी साधली. स्मृतीने याआधी २०१८ मध्येही हा पुरस्कार मिळवला होता. ‘आयसीसी’चा वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दोन वेळा जिंकणारी ती एलिस पेरीनंतर विश्वातील केवळ दुसरीच खेळाडू ठरली आहे.

भारतीय महिला संघाला २०२१ वर्षांत फारसे यश प्राप्त करता आले नसले, तरी सांगलीच्या स्मृतीने सातत्यपूर्ण कामगिरी करताना आपली छाप पाडली. घरच्या मैदानांवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला आठपैकी केवळ दोन सामने जिंकता आले. स्मृतीने या दोन्ही विजयांत महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेच्या अखेरच्या लढतीत तिने नाबाद ४८ धावा साकारताना भारताला विजय मिळवून दिला.

25 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.