चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जानेवारी २०२१

Date : 25 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पश्चिम बंगालमध्ये वारसास्पर्धा :
  • पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी ‘वारसास्पर्धे’ला तोंड फुटले. तृणमूलने नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त त्यांचा जन्मदिवस ‘देशनायक दिवस’ जाहीर केला, तर केंद्र सरकारने ‘पराक्रम दिन’ म्हणून घोषित केला.

  • तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यात मोठी मिरवणूक काढून नेताजींची जयंती साजरी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पराक्रम दिना’च्या कार्यक्रमात सहभागी झाले. नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यभर अनेक कार्यक्रम आयोजित करून परस्परांशी जणू स्पर्धाच केली.

  • तृणमूल आणि भाजप यांच्यातील निवडणूकपूर्व राजकीय संघर्ष आजपर्यंत रस्त्यावर होत होता. परंतु शनिवारी नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मारकात झालेल्या सरकारी कार्यक्रमातही निवडणुकीच्या राजकारणाने शिरकाव केल्याचा प्रत्यय आला.  या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होते.

  • ममता भाषणासाठी उभ्या राहताच श्रोत्यांमधील भाजप समर्थकांनी जय श्रीराम घोष सुरू केला. त्यामुळे ममता यांनी भाषण करण्यास नकार दिला आणि अशा प्रकारचा अपमान अस्वीकारार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सरकारी कार्यक्रम आहे, राजकीय नाही. निमंत्रित केल्यानंतर मान राखला पाहिजे. निमंत्रित करून कोणीही अपमानित करीत नाही, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला.

सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी बनली मुख्यमंत्री; सरकारी योजनांचा घेतला आढावा :
  • राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आज(रविवार) हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी हिला उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली होती. यावेळी, सृष्टीने राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजानांचा अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.

  • देशभरात महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.

  • हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद विकासखंडच्या दौलतपुर गावातील असलेली सृष्टी गोस्वामी २०१८ मध्ये बाल विधानसभेत बाल आमदार म्हणून देखील गेलेली आहे. तसेच, २०१९ मध्ये सृष्टीने गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशीपसाठी थायलंडमध्ये भारताचे नेतृत्व देखील केलेले आहे. मागील दोन वर्षांपासून सृष्टी ‘आरंभ’ ही योजना चालवत आहे. यामध्ये परिसरातील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचं काम केलं जातं.

  • सृष्टी रुडकी येथील बीएसएम पीजी महाविद्यालयाची बीएससी अॅग्रीकल्चरची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील प्रवीण पुरी हे गावात किराणा दुकान चालवतात. तर आई सुधा गोस्वामी या अंगणवाडी कार्यकर्ता आहेत. छोटा भाऊ श्रेष्ठ पुरू इयत्ता अकारावीचा विद्यार्थी आहे. सृष्टीचा सर्व गावाला अभिमान आहे, असं तिच्या वडिलांना म्हटलं आहे.

निम्म्यावर स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार :
  • करोना काळात देशभरातून उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या ४५ लाखांहून अधिक कामगार-मजुरांपैकी निम्म्याहून अधिक जणांना उत्तर प्रदेशमधील लघु व मध्यम उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. इतरांनाही मनरेगासह स्वयंरोजगाराच्या अन्य योजनांमध्ये रोजगार पुरविण्यात येत असल्याने आता बहुतांश स्थलांतरित  अन्य राज्यांमध्ये परतणार नाहीत, असे उत्तर प्रदेशच्या लघु व मध्यम उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नवनीत सेहगल यांनी सांगितले.

  • करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतरच्या तीन-चार महिन्यांच्या काळात दिल्ली, महाराष्ट्रासह देशभरातून लाखो स्थलांतरित मजूर व कामगार उत्तर प्रदेशमध्ये परतले. रस्ते व रेल्वे वाहतुकीची साधनेही उपलब्ध न झाल्याने हजारो कामगारांनी मिळेल त्या वाहनाने व पायीही प्रवास केला. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्ये रोजगार पुरविण्यासाठी स्वतंत्र स्थलांतरित आयोग (मायग्रंट कमिशन) स्थापन करण्याची घोषणा केली होती.

  • स्थलांतरित आयोगाकडे सुमारे ४५ लाख जणांची नोंद झाली आहे. या कामगार-मजुरांचे शिक्षण, रोजगार कोणत्या स्वरूपाचा होता, त्यांच्याकडे कोणते व्यवसाय कौशल्य आहे, हे पाहून आतापर्यंत २८ लाख २८ हजार ३७६ कामगार-मजुरांना येथील लघु-मध्यम स्वरूपाच्या सुमारे ११ लाख ५० हजार उद्योगांमध्ये रोजगार देण्यात आला आहे.

  • सुमारे चार लाख जणांना शासकीय आस्थापनांशी निगडित रोजगार देण्यात आला आहे. मनरेगा, मुद्रा बँक योजनेसह स्वयंरोजगार यांच्या योजनांचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आता हे स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशमध्येच राहतील, असे अपेक्षित असल्याचे सेहगल यांनी सांगितले.

नेपाळच्या पंतप्रधानांची पक्षातून हकालपट्टी :
  • नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यापूर्वी या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते.

  • ओली यांच्या अलीकडच्या कृतींबाबत पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. मात्र त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यामुळे माजी पंतप्रधान प्रचंड व माधवकुमार नेपाळ यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना सर्वसाधारण सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ‘दि हिमालयन टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

  • प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांच्या बालुवाटार येथील निवासस्थानी हकालपट्टीचे पत्र नेऊन दिले. ओली हे पक्षाचे नियम मोडीत  असल्याचा आरोप आहे.

चिली हॉकी दौरा - भारतीय महिला हॉकी संघाचा चिलीवर विजय :
  • भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने चिली हॉकी दौऱ्यातील विजयाची मालिका कायम राखली. भारताने प्रिन्स ऑफ वेल्स कंट्री क्लबवर झालेल्या सामन्यात चिली संघावर २-० अशी मात केली.

  • या दौऱ्यातील पाचवा सामना खेळणाऱ्या भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवत सहज विजय मिळवला. पहिल्या तीन सत्रात एकही गोल लगावता न आल्यामुळे संगिता कुमारी (४८व्या मिनिटाला) आणि सुषमा कुमारी (५६व्या मिनिटाला) यांनी अखेरच्या सत्रात दोन गोल करत भारताला विजय मिळवून दिला.

२५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.