चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 फेब्रुवारी 2023

Date : 25 February, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

‘एअर इंडिया’चे ‘भरती उड्डाण’ ; ९०० वैमानिक, ४,२०० कर्मचाऱ्यांची पदे भरणार

  • एअर इंडिया यंदा ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. 
  • वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ७० मोठय़ा विमानांसह ४७० विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय ३६ विमाने भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘७७७-२०० एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत.  
  • टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया १८ हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-२०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात एअर इंडियाने १,९०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि १,१०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.
  • भारतीय आदरातिथ्याचे प्रशिक्षण - भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस

  • अमेरिकेतील भारतीय वंशाचे कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. गुरुवारी याबाबत घोषणा करताना अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि वातावरण बदल या क्षेत्रांमध्ये बंगा यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
  • जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिल मालपास यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून मे महिन्यापर्यंत नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. जागतिक बँकेमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी अधिक असल्यामुळे सर्वसाधारणपणे तेथील प्रशासनाने शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होण्याचा प्रघात आहे. असे असल्याने बंगा यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकीच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यापैकी जागतिक बँकेमध्ये अमेरिका तर नाणेनिधीमध्ये युरोपातील व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षपदी असते.
  • बंगा यांचा परिचय - अजयपाल सिंग बंगा यांचा जन्म १९५९ साली पुण्यात झाला. हैदराबादमध्ये प्राथमिक शिक्षण आणि दिल्लीत उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या आयआयएममधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी नेस्ले, पेप्सिको यासारख्या अनेक बडय़ा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली. मास्टरकार्ड कंपनीमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिलेले बंगा १ जानेवारी २०२२पासून जनरल ॲटलांटिक कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी

  • मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आज अखेर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
  • देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या निर्णयाचं स्वागत करत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करून दाखवलं, असंही फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले.
  • खरं तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
  • पण राज्यात सत्तांतर घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावाला स्थगिती दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याचा नवा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अखेर आज या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

विराट कोहलीने खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का

  • क्रिकेटपटू विराट कोहलीने नुकताच अलिबागमधील आवास गावात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मोठा भाऊ विकास कोहली याने अलिबागमध्ये बंगला खरेदी करण्याची सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे.
  • विराट आणि अनुष्काची अलिबागमधील पहिली मालमत्ता नाही. या जोडप्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबागमध्ये १९.२४ कोटी रुपयांना फार्महाऊस खरेदी केले होते. त्याने १.१५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती आहे.
  • हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने आवास व्हिलेजमधील २,००० चौरस फुटाच्या व्हिलावर ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. या मालमत्तेवर त्यांनी ३६ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. या व्हिलामध्ये ४०० स्क्वेअर फूटचा स्विमिंग पूलही असल्याचं सांगण्यात येत आहे. बॉलीवूड अभिनेता संजय खानची मुलगी आणि हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान हिने या प्रकल्पाचे इंटीरियर डिझाइन केले आहे.
  • वकील महेश म्हात्रे हे आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपीचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “आवास हे नैसर्गिक सौंदर्यामुळे सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. तसेच, मांडवा जेटी आवासपासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे आणि स्पीड बोटींनी मुंबईचे अंतर आता फक्त १५ मिनिटांवर आणले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडला धक्का ; प्रथमच महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

तझमिन ब्रिट्स (५५ चेंडूंत ६८ धावा) आणि लॉरा वोल्व्हार्ड (४४ चेंडूंत ५३) या सलामीवीरांची अप्रतिम फलंदाजी, तसेच अयाबोंगा खाका (४/२९) आणि शबनिम इस्माइल (३/२७) या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी इंग्लंडला सहा धावांनी पराभवाचा धक्का देत महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठली.

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ४ बाद १६४ अशी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात इंग्लंडला १८ चेंडूंत २८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी अयाबोंगा खाकाने तीन धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. इंग्लंडचा डाव २० षटकांत ८ बाद १५८ धावांवर मर्यादित राहिला.

 

 

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 फेब्रुवारी 2022

 

१२ वी परीक्षा वेळापत्रकात बदल! प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टोम्पोला आग लागल्याने निर्णय :
  • राज्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. १२ वीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, आता ५ मार्च आणि ७ मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश आहे. नुकतीच अहमदनगरमधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

  • १२ वीचा ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे, तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर हा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

  • मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, “यावर्षी मंडळाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ मार्चला इंग्रजीचा पेपर होईल. परंतू ५ मार्च आणि ७ मार्चला दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा विषयाची परीक्षा होती.

  • बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुर्दैवाने एक घटना घडली त्यात पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा ट्रक जळून खाक झाला. त्या ट्रकमध्ये ५ आणि ७ मार्चच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे राज्यभरातील ५ आणि ७ मार्चच्या परीक्षा पुढे नेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला होईल आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. “

रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…” :
  • नोव्हेंबर महिन्यापासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरुवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात पहिल्या दिवशी ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे.

  • तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय.

  • नक्की काय चर्चा झाली मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली, असं या फोनवरील चर्चेसंदर्भातील माहिती देणाऱ्या पत्रकारच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलंय. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

जम्मू भागात ड्रोनमधून आणलेला शस्त्रसाठा जप्त :
  • जम्मूतील आर.एस. पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर एका ड्रोनमधून आणण्यात आलेला शस्त्रांचा साठा जप्त करून पोलिसांनीे लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला.

  •  पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा आणि दि रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) हे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या निर्देशांवरून जम्मू जिल्ह्यातील आर.एस.पुरा- अर्निया सेक्टरमध्ये ड्रोनच्या मदतीने शस्त्रे टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्यानतंर, पोलिसांच्या विशेष कृती गटाने (एसओजी) शोधमोहीम हाती घेतली होती.

  • या मोहिमेत, दोन मॅगझिनसह एक पिस्तूल व ७० काडतुसे, ३ डिटोनेटर्स, रिमोट कंट्रोल नियंत्रित ३ आयईडी, स्फोटकांच्या ३ बाटल्या, कॉर्टेक्स तारांचे एक बंडल, दोन टायमर आयईडी आणि ६ हातबॉम्ब अशी सामुग्री अर्निया सेक्टरच्या त्रेवा खेडय़ात जप्त करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  •  सीमेपलीकडून आर.एस. पुराच्या अर्निया पट्टय़ात भारतीय बाजूला घुसलेल्या एका ड्रोनमधून ही स्फोटके टाकण्यात आली. एलईटी व टीआरएफ यांनी मोठी दहशतवादी योजना आखली असल्याचे या स्फोटकांच्या जप्तीवरून लक्षात आले, असे एक पोलीस अधिकारी म्हणाला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

रशियाविरोधात जगभरातून संताप; अनेक देशांकडून निषेध :
  • रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबाबत जगभरातील नेत्यांनी संताप व्यक्त केला असला, तरी युरोपमध्ये संभाव्य मोठे युद्ध टाळण्यासाठी कुणीही तत्काळ युक्रेनच्या मदतीला आलेले नाही. रशियाने त्याच्या शेजारी देशावर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून, युरोपीय महासंघासह इतरांनी रशियाविरुद्ध अभूतपूर्व असे निर्बंध लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

  • युक्रेनबाबत आपण केलेल्या कृतींमध्ये कुणीही हस्तक्षेप केल्यास त्याला इतिहासात कधीही पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिल्यानंतर; रशियालगतच्या आपल्या पूर्वेकडील मित्रराष्ट्रांतील सैन्यबळ वाढवणअयाच्या हालचाली नाटोने सुरू केल्या असून, शुक्रवारी नाटो नेत्यांची आभासी बैठक बोलावली आहे.

  • युरोपीय महासंघाचा आणि नाटोचा सदस्य असलेल्या लिथुआनियाने आणीबाणी जाहीर केली आहे. या देशाच्या सीमा नैऋत्येला रशियाच्या कालिनिनग्राड भागाला, तर पूर्वेला रशियाचा मित्रदेश बेलारूसला लागून आहेत. नाटो राष्ट्रांनी रशियाला प्रतिबंध करण्याचा उपाय म्हणून १०० विमाने आणि १२० जहाजे सज्ज ठेवली आहेत.

राजधानी दिल्लीत उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट; केजरीवाल सरकारचा ‘हा’ विशेष कार्यक्रम :
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित म्युझिकल शो २५ फेब्रुवारीपासून राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. १५ दिवस हा कार्यक्रम दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये ४० फूट रिव्हॉल्व्हिंग प्लॅटफॉर्म, डझनभर एलईडी स्क्रीन, डिजिटल प्रॉप्स, १६० नर्तक आणि अनेक कलाकार सादरीकरण करणार आहेत.

  • आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांनी मंगळवारी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात ‘बाबासाहेब: द ग्रँड म्युझिकल’ २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून १२ मार्चपर्यंत चालणार आहे. या दरम्यान दररोज दोन शो होतील. कलाकार महुआ चौहान दिग्दर्शित १२० मिनिटांच्या या नाटकात बॉलीवूड अभिनेता रोहित रॉय डॉ.आंबेडकरांची मुख्य भूमिका साकारणार आहे.

  • विशेष म्हणजे हा कार्यक्रम गेल्या वर्षी आयोजित केला जाणार होता, परंतु कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.चौहान म्हणाले, “आम्हाला ते इतर चरित्रात्मक चित्रपटांसारखे करायचे नव्हते. या चित्रपटाचा प्रत्येक भाग तरुणांसाठी संदेश देणारा आहे. आंबेडकर हे केवळ संविधानाचे जनकच नव्हते तर महिला सक्षमीकरणासाठी आणि युवा नेत्यांसाठी ते कसे लढले हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. आम्ही मुलांना ते पाहण्यासाठी आणि समाजसुधारकाच्या जीवनातून काहीतरी शिकण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”

२५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.