भारतीय महिला संघाने नेमबाजीत १० मीटर रायफलमध्ये पटकावले रौप्यपदक
आशियाई खेळांची रंगतदार सुरुवात झाली आहे. २४ सप्टेंबर हा दिवस भारतासाठी संस्मरणीय ठरत आहे. एकीकडे भारत आणि बांगलादेशच्या महिला संघांमध्ये क्रिकेटमध्ये चुरशीची स्पर्धा पाहिला मिळाली. दुसरीकडे भारताला रौप्यपदक मिळाले आहे. तसेच भारताने महिला नेमबाजीत पहिले रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी पुरुषांच्या हलक्या वजनाच्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक पटकावले. दुसरीकडे भारतानेही बांगलादेशवर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. आतापर्यंत भारताने एकूण ५ पदके जिंकली आहेत.
भारतीय महिला संघात मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी १० मीटर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले. या काळात भारताची एकूण गुणसंख्या १८८६.० होती. यानंतर रोईंगमध्ये भारताने बाजी मारली, भारताच्या अरविंद सिंग आणि अर्जुन लाल यांनीही लाइट वेट डबल स्कलमध्ये रौप्यपदक जिंकले. त्यांनी ६:२८:२८ वेळेसह रौप्य पदक जिंकले. याशिवाय भारताकडे अजून पदके जिंकण्याची मोठी संधी आहे. भारताची बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीनवरही सर्वांच्या नजरा असतील. त्याच वेळी, पुरुष आणि महिला फुटबॉल संघ देखील गट सामन्यांमध्ये सहभागी होतील.
बाबूलाल यादव आणि लेख राम या जोडीला मिळाले कांस्यपदक -
भारताच्या बाबूलाल यादव आणि लेख राम यांना कॉक्सलेस जोडीमध्ये कांस्यपदक मिळाले, ज्यांनी ६:५०.४१ सेकंदाची वेळ नोंदवली. चीनने सुवर्णपदक तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. भारताने रोइंगमध्ये ३३ सदस्यीय संघ पाठवला आहे. आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण ५ पदके जिंकली आहेत. ३ रौप्य आणि २ कांस्यपदक आले आहेत. बांगलादेशचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. म्हणजे क्रिकेटमध्येही पदक निश्चित झाले आहे.
चीनचा दबदबा -
चीनने आशियाई क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. महिलांच्या नेमबाजीत चीनचा दबदबा दिसून आला. रमिता, मेहुली आणि चौकसे या त्रिकुटाने १८८६ गुण मिळवून रौप्यपदक जिंकले आणि चीनच्या (१८९६.६) मागे दुसरे स्थान गाठले. त्याच वेळी, लाइटवेट पुरुष दुहेरी स्कल्समध्ये चीन देखील पुढे राहिला, यजमानांनी अर्जुन आणि अरविंदपेक्षा ५:०२ सेकंद वेगवान राहून सुवर्णपदक जिंकले.
आजपासून आणखी नऊ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’; ११ राज्यांतील धार्मिक-पर्यटन स्थळांसाठी सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ११ राज्यांच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरातमधील स्थळांचा यात समावेश आहे.
यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे, की पंतप्रधान दूरदृश्यप्रणालीद्वारे या रेल्वेगाडय़ांना हिरवा झेंडा दाखवतील. या वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील. देशभरातील रेल्वे दळणवळण व्यवस्थेत सुधारणा आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने या गाडय़ा एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यात म्हटले आहे.
वेळेची मोठी बचत
’राउरकेला-भुवनेश्वर-पुरी आणि कासारगोड-तिरुवनंतपुरम मार्गावरील सध्याची सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत वंदे भारत एक्सप्रेस संबंधित गंतव्य स्थानांतील प्रवासाचा वेळ सुमारे तीन तासांनी कमी करेल.
’हैदराबाद-बंगळुरू मार्गावर अडीच तासांपेक्षा जास्त, तर तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई मार्गावरील प्रवासात दोन तासांपेक्षा जास्त वेळेची बचत होईल.
’रांची-हावडा, पाटणा-हावडा आणि जामनगर-अहमदाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत सुमारे एक तासाने कमी होईल. ’उदयपूर-जयपूरदरम्यान या रेल्वेप्रवासात अर्धा तास कमी लागेल.
खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या घडविण्यात भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाने केला असून त्याला गुप्तचरांनी दिलेली माहिती, संदेशवहन यंत्रणांकडून मिळालेले पुरावे आणि कॅनडाच्या फाईव्ह आय इंटेलिजन्स नेटवर्कमधील सहकारी देशाकडून मिळालेल्या माहितीचा आधार आहे, असे वृत्त कॅनडातील माध्यमांनी तेथील सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
खलिस्तानवादी निज्जर याच्या हत्येत भारताच्या गुप्तचरांचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर उभय देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. निज्जर याची हत्या ब्रिटिश कोलंबियात झाली १८ जून रोजी झाली होती. निज्जर याला भारताने २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. ट्रुडो यांनी केलेले आरोप भारताने फेटाळून लावले असून अशा बिनबुडाच्या आरोपांबद्दल संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातून कॅनडाने एका भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्यास सांगितल्यानंतर भारतानेही कॅनडाच्या एका अधिकाऱ्याला भारत सोडण्यास सांगितले.
कॅनडातील सीबीसी न्यूजने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार, निज्जर याच्या हत्येचा काही महिने तपास केल्यानंतर कॅनडा सरकारच्या हाती गुप्तचर तसेच गोपनीय तांत्रिक माहिती आली. यात कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसह अन्य भारतीय अधिकाऱ्यांतील संभाषणाचा समावेश आहे, असा दावा कॅनडा सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. ही माहिती केवळ कॅनडातून मिळालेली नाहीत, तर फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्समधील एका अनामिक सहकारी देशानेही कॅनडाला ही माहिती पुरविली आहे. फाईव्ह आय नेटवर्कमध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझिलंडचा समावेश आहे.
निज्जर याच्या हत्येच्या तपासासाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा भारतात जाऊन सहकार्याची विनंती केली होती, असेही या वृत्तात म्हटले आहे. ऑगस्टच्या मध्यात कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार जोडी थॉमस हे चार दिवस भारतात होते. त्यानंतर ते पुन्हा सप्टेंबरमध्ये भारतात गेले होते. याच दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तणावपूर्ण चर्चा झाली, असे येथील माध्यमांनी म्हटले आहे.
याबद्दल कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टीया फ्रीलॅन्ड यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, तपासकामावर परिणाम होऊ नये, तसेच फाईव्ह आय पार्टनरबाबतच्या कटिबद्धतेतून यावर काही बोलणे योग्य होणार नाही. परंतु कायद्याच्या प्रक्रियेत हे पुरावे उघड केले जातील, असे सीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.
हिटमॅनला मागे टाकत शुबमन गिल बनला २०२३ चा सिक्सर किंग, जाणून घ्या किती मारलेत षटकार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूर येथे खेळला जात आहे. होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकली. ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतक झळकावले. तसेच शुबमन गिलने रोहित शर्माचा एक विक्रम मोडला.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या वनडेतही तो या संघाविरुद्ध फॉर्ममध्ये दिसला. त्याने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला. गिलने या सामन्यात ३७ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या होत्या. या षटकारांच्या जोरावर तो या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत आपला कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले.
शुबमन गिलने रोहित शर्माला टाकले मागे –
कांगारू संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, शुबमन गिलने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ३ षटकार मारले. या षटकारांच्या मदतीने तो यावर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या दोन षटकारांनंतर २०२३ मध्ये गिलच्या एकूण षटकारांची संख्या ४४ झाली, तर हिटमॅन रोहित शर्माने आतापर्यंत ४३ षटकार मारले आहेत.
२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
शुबमन गिल – ४५ (वृत्त लिहूपर्यंत)
रोहित शर्मा – ४३
भारताची धावसंख्या १५० धावा पार -
भारतीय संघाने एका विकेटच्या नुकसानावर २० षटकांनंतर 150 धावा केल्या आहेत. श्रेयस आणि शुबमनमध्ये शानदार शतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत आहेत आणि टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. भारताकडून श्रेयय अय्यरनेही ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका - भारताची मालिकेत बरोबरी :
कर्णधार रोहित शर्माच्या (२० चेंडूंत नाबाद ४६ धावा) आक्रमक खेळीच्या बळावर भारताने शुक्रवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली. नागपूर येथे झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
पाऊस आणि त्यानंतर मैदानातील काही भाग ओला असल्याने सामना सुरू होण्यासाठी विलंब झाला. अखेर हा सामना आठ-आठ षटकांचा करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५ बाद ९० अशी धावसंख्या उभारली. कर्णधार आरोन फिंच (१५ चेंडूंत ३१) आणि मॅथ्यू वेड (२० चेंडूंत नाबाद ४३) यांनी फटकेबाजी केली.
ऑस्ट्रेलियाने दिलेले ९१ धावांचे लक्ष्य भारताने ७.२ षटकांत चार गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. रोहितने नाबाद ४६ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. अॅडम झ्ॉम्पाच्या फिरकीपुढे भारताची मधली फळी ढेपाळली. मात्र, अखेरच्या षटकात नऊ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया : ८ षटकांत ५ बाद ९० (मॅथ्यू वेड नाबाद ४३, आरोन फिंच ३१; अक्षर पटेल २/१३) पराभूत वि. भारत : ७.२ षटकांत ४ बाद ९२ (रोहित शर्मा नाबाद ४६; अॅडम झॅम्पा ३/१६)
दिलीप तिर्की ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदी ; प्रथमच एखादा खेळाडू संघटनेच्या प्रमुख पदावर :
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्कीची ‘हॉकी इंडिया’ संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर शुक्रवारी तिर्कीची निवड निश्चित झाली. संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली असून, याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) मान्यता दिली आहे. ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्षपद भूषविणारा तिर्की हा पहिला हॉकीपटू ठरणार आहे.
‘एफआयएच’ आणि प्रशासकीय समितीने ऑगस्टमध्ये ‘हॉकी इंडिया’ला ९ ऑक्टोबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तिर्कीने १८ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश हॉकीचे प्रमुख राकेश कटय़ाल आणि हॉकी झारखंडचे भोलानाथ सिंग यांनीही अर्ज भरले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच त्यांनी माघार घेतल्याने तिर्कीची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी माघार घेतल्यानंतर भोलानाथ सिंग यांची ‘हॉकी इंडिया’च्या सरचिटणीसपदी वर्णी लागली.
अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तिर्कीने भारतीय हॉकीला नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध असेन, असा विश्वास व्यक्त केला. ‘एफआयएच’नेही निवडणुकीला मान्यता देताना तिर्कीचे अभिनंदन केले. ‘‘प्रशासकीय समितीने ‘हॉकी इंडिया’ची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल तिर्कीचे अभिनंदन.’’ असे ‘एफआयएच’ने म्हटले आहे.
कार्यकारिणी - अध्यक्ष : दिलीप तिर्की, उपाध्यक्ष : असिमा अली, एस. व्ही. एस. सुब्रमण्या गुप्ता; सरचिटणीस : भोलानाथ सिंग, खजिनदार : शेखर मनोहरन, सहसचिव : आरती सिंग, सुनील मलिक, समिती सदस्य : अरुण कुमार सारस्वत, अस्रिता लाक्रा, गुरप्रीत कौर, व्ही. सुनील कुमार, तपन कुमार दास.
राज्यातील शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांना टाळे :
राज्यातील शून्य ते वीस विद्यार्थिसंख्या असलेल्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याची विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे याची माहिती शालेय शिक्षण विभागाने मागवली आहे. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा राज्य शासनाकडून बंद केल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
करोनामुळे अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत वित्तीय उपाययोजना करण्याअंतर्गत पदभरती बंदीच्या अनुषंगाने विविध विषयांबाबतची माहिती आणि स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी शिक्षण आयुक्त आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांकडून मागवली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न या पूर्वीही शासनाकडून झाले होते. मात्र त्या वेळी शिक्षण क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात टीका करण्यात आली, तसेच विरोधही झाला.
आता शासकीय पत्रातूनच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. जिल्हानिहाय विद्यार्थिसंख्या, संचमान्यतेनुसार मंजूर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे याबाबतची माहिती, जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक असल्यास त्या शिक्षकांची माहिती, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती २८ ऑगस्ट २००५च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेनुसार शिक्षक पदांची मागणी केली आहे किंवा कसे, राज्यात शून्य ते वीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याची विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे हे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
रोहिंग्यांमुळे बांगलादेशची सुरक्षा, अर्थव्यवस्थेवर परिणाम, पंतप्रधान शेख हसिना यांचे प्रतिपादन, भारताचेही घेतले नाव :
रोहिंग्या निर्वासितांमुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा तसेच सामाजिक-राजकीय स्थैर्यतेवर गंभीर परिणाम होत आहे, असे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नावर परिणामकारक भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले.
रोहिंग्यांच्या प्रश्नामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा, सामाजिक-राजकीय स्थिरता यावर परिणाम होत आहे. आपल्या मायदेशी परतण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे देशातील रोहिंग्यांमध्ये अनिश्चितता आहे. तसेच सीमेपलीकडे संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज तस्करींचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत कट्टरपंथीयतेलाही खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. ही समस्या अशीच राहिली तर सुरक्षा आणि स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, असे हसिना म्हणाल्या.
बांगलादेशमधील रोहिंग्यांमुळे येथील सरकारपुढे आव्हान निर्माण झाल्याचेही शेख हसिना यांनी मान्य केले. आपल्या भाषणानंतर त्या एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. त्यांनी यावेळी भारत देशाचाही उल्लेख केला. रोहिंग्यांचा प्रश्न आमच्यासाठी मोठे आव्हान आणि ओझे आहे. भारत देश मोठा आहे. भारतामध्ये रोहिंग्यांना सामावून घेतले जाऊ शकते. मात्र तेथे रोहिंग्यांची संख्या कमी आहे. आमच्याकडे साधारण १.१ दसलक्ष रोहिंगे आहेत. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय देशांशी सल्लामसलत करत आहोत. रोहिंग्यांना आपल्या मायदेशी पाठवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवरही काही उपायोजना केल्या पाहिजेत, असे शेख हसिना म्हणाल्या.
कॅनडातल्या भारतीय विद्यार्थ्यांना सरकारचा सावधानतेचा इशारा :
भारताने कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कॅनडात भारतविरोधी कारवायांमध्ये तीव्र वाढ झाली असून द्वेष पसरवला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कॅनडातील द्वेषपूर्ण गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांवर परराष्ट्र मंत्रालयाची करडी नजर आहे.
अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. “कॅनडामध्ये राहत असलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जे लोक प्रवासासाठी अथवा शिक्षणासाठी कॅनडामध्ये जायच्या तयारीत आहेत, त्यांनी योग्य खबरदारी घेत सतर्कता बाळगावी,” असे निवेदन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.
कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ओटावातील भारतीय मोहिमेत अथवा टोरंटो आणि वॅनक्युवरमधील वाणिज्य दुतावासात नोंदणी करावी, असे आवाहन भारत सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे आणीबाणीच्या काळात भारतीय उच्चायुक्त किंवा दुतावासाला भारतीय नागरिकांशी संपर्क साधणे सोयीस्कर होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले वाढले आहेत. मंगळवारी ऑन्टारियोमध्ये झालेल्या गोळीबाळात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सतिवदर सिंग असे या घटनेत मृत झालेल्या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. सतिवदर भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. ‘एम. के. ऑटो रिपेअर्स’ या दुकानात तो अर्धवेळ नोकरी करत होता. सतिवदरच्या मृत्यूनंतर कॅनडातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.