चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ सप्टेंबर २०२१

Date : 24 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
MPSC 2022: पुढच्या महिन्यात जाहीर होणार वेळापत्रक :
  • राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता आयोगाने पटापट सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढच्या वर्षात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं आयोगाने सांगितलं असून तसेच प्रलंबित निकाल ३० सप्टेंबरपर्यंत लावण्याचे देखील नियोजन आयोगाकडून केलं जात आहे. परिपत्रक जारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही माहिती दिली आहे.

  • राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं सांगितलं होतं. सरकारच्या या आदेशानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील कामाला लागला आहे.

  • एमपीएससीकडून ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित निकालदेखील ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमपीएससीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.

  • अजित पवार यांनी वेगवेगळ्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. “मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत. त्या जागांची माहिती एमपीएससीला कळवायची आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे.

  • जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या आहेत. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील”, असं अजित पवार म्हणाले होते.

करोनाबाधित आढळल्यानंतर ३० दिवसांत केलेली आत्महत्या म्हणजे करोनामृत्यूच- केंद्र :
  • केंद्राने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले की, करोनाबाधित आढळणाऱ्या व्यक्तीने 30 दिवसांच्या आत आत्महत्या केल्यास त्यास करोनामृत्यूच ठरवले जाईल. यामुळे मृताच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत मिळणार आहे.

  • करोनामृत्यू कशास म्हणावे याबद्दलच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सरकारने म्हटले होते की करोना संसर्गादरम्यान विषबाधा, आत्महत्या, हत्या, अपघात इत्यादीमुळे झालेल्या मृत्यूला करोनामृत्यू मानले जाणार नाही. न्यायालयाने सरकारला या अटीवर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.

  • गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने महामारीला बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत निधी निश्चित केल्याबद्दल सरकारने आनंद व्यक्त केला. “आज आम्ही खूप आनंदी आहोत. ज्या लोकांना त्रास झाला आहे त्यांच्यासाठी हे सांत्वन ठरेल. सरकार करत असलेली प्रत्येक गोष्ट ज्यांना त्रास झाला त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे. त्यांच्यासाठी काहीतरी केले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.

  • भारताने जे केले ते इतर कोणताही देश करू शकला नाही याची आम्हाला न्यायालयीन दखल घ्यावी लागेल, ”अशी टिप्पणी न्यायमूर्ती शाह, न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने केली आहे.

‘क्यूएस’ रोजगाराभिमुख क्रमवारीत भारतातील १२ शैक्षणिक संस्था :
  • ब्रिटनमधील क्वाकलेरी सायमंड्स (क्यूएस) या संस्थेकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘रोजगाराभिमुख क्रमवारी २०२२’ या ५०० विद्यापीठांच्या यादीत सहा भारतीय तंत्रज्ञान संस्थांसह (आयआयटी) देशातील एकूण १२ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

  • क्यूएस रोजगाराभिमुख क्रमवारीत भारतातील संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा वरचष्मा कायम राहिला आहे. आयआयटी मुंबईचा १०१ ते ११० या श्रेणीत समावेश आहे. तर आयआयटी दिल्ली (१३१-४०), आयआयटी मद्रास (१५१-६०), आयआयटी खरगपूर (२०१-५०), आयआयटी कानपूर (२५१-३००) आणि आयआयटी रुरकी (५००) या श्रेणीत समावेश आहे. तर यात  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस्सी) बेंगळूरुचाही समावेश आहे.

  • देशातील १२ संस्थांमध्ये ३ केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे. यात दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठाने स्थान पटकावले आहे. तर खासगी विद्यापीठांमध्ये ओपी जिंदाल जागतिक विद्यापीठ, सोनेपत आणि बिट्स पिलानी या संस्थांचा समावेश आहे.

  • आयआयएस्सी, बेंगळूरु आणि ओपी जिंदाल जागतिक विद्यापीठ (३०१ ते ५००) श्रेणीत असून बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स (बिट्स), पिलानी आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश (२५१-३००) या श्रेणीत आहे. 

आशियाई फुटबॉल चषकासाठी महाराष्ट्रातील मैदाने सज्ज :
  • पुढील वर्षी भारतात होणाऱ्या महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन मैदानांची आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) शिष्टमंडळाकडून गुरुवारी पाहणी करण्यात आली.

  • एएफसीच्या शिष्टमंडळाने १६ ते २१ सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबईचे डी. वाय. पाटील स्टेडियम, अंधेरी क्रीडा संकुल येथील मुंबई फुटबॉल एरिना आणि बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानांची, तसेच सरावासाठीच्या सुविधांची पाहणी केली. या तिन्ही मैदानांच्या स्थितीबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे.

  • पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत भारतात होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल दोन दशकांनंतर १२ संघ सहभागी होणार आहेत. महिलांच्या २०२३ फिफा विश्वचषकाच्या पात्रतेसाठी ही आशियातील अखेरची स्पर्धा असेल.

ला लिगा फुटबॉल - असेन्सिओच्या हॅट्ट्रिकमुळे माद्रिदचा सलग चौथा विजय :
  • युवा आक्रमणपटू मार्को असेन्सिओने साकारलेल्या हॅट्ट्रिकला अनुभवी करिम बेन्झेमाच्या दोन गोलची उत्तम साथ लाभल्यामुळे रेयाल माद्रिदने ला लिगा फुटबॉलमध्ये मायोर्का संघाचा ६-१ असा धुव्वा उडवला.

  • याबरोबरच माद्रिदने सलग चौथा आणि सहा सामन्यांतील पाचवा विजय नोंदवताना सर्वाधिक १६ गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले. असेन्सिओने अनुक्रमे २४, २९ आणि ५५व्या मिनिटाला गोल नोंदवले. बेन्झेमाने तिसऱ्या आणि ७८व्या मिनिटाला गोल केले. ईस्कोने ८४व्या मिनिटाला संघासाठी सहावा गोल केला.

  • पॅरिस : २२ वर्षीय अचरफ हकिमीने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर अग्रस्थानावरील पॅरिस सेंट-जर्मेनने लीग-१ फुटबॉल स्पर्धेत मेट्झचा २-१ असा पराभव केला. लिओनेल मेसीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या सेंट-जर्मेनसाठी हकिमीनेच पाचव्या मिनिटाला पहिला गोल केला. बुबाकरने ३९व्या मिनिटाला मेट्झला बरोबरी साधून दिली. परंतु ९५व्या मिनिटाला हकिमीने नोंदवलेल्या गोलमुळे सेंट-जर्मेनने सलग सातव्या विजयाची नोंद केली.

  • लंडन : चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने गुरुवारी लीग चषक फुटबॉल स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मँचेस्टर युनायटेडला मात्र स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. चेल्सीने अ‍ॅस्टन व्हिलावर १-१ (४-३) अशी पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केली. गोलरक्षक केपा अरिझाबलागाने त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावली. वेस्ट हॅमने मात्र मॅन्युएल लान्झिनीच्या एकमेव गोलमुळे युनायटेडला १-० असा पराभवाचा धक्का दिला.

२४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.