चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ सप्टेंबर २०२०

Date : 24 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कामगार कायद्यांतील बदलांना मंजुरी :
  • केंद्रातील भाजप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाच्या कामगार कायद्यांतील दुरुस्त्यांना सामावून घेणाऱ्या तीन कामगार संहिता संसदेत एकतर्फी मंजूर करण्यात आल्या. विरोधकांच्या अनुपस्थितीत बुधवारी राज्यसभेने, तर मंगळवारी लोकसभेने या संहितांवर शिक्कामोर्तब केले. आता त्यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा असेल.

  • व्यावसायिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि सामाजिक सुरक्षा अशा या तीन संहिता असून वेतन संहितेला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आले असून ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे.

  • नव्या धोरणांमुळे कंपन्यांना कामगारांची भरती वा कपात, कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांचा नोकरीचा कार्यकाळ अशा कळीच्या मुद्दय़ांवर लवचीकता दाखवता येईल. या संहितांमुळे कामगार संघटनांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ  शकेल. या बदलामुळे देशातील खासगी- औद्योगिक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार होईल असा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे.

  • काळानुसार कामगार कायदे बदलण्याची गरज होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांसंदर्भातील भूमिकेशी मिळतेजुळते धोरण अवलंबण्यासाठी कामगार कायद्यांना एकत्रित करून तीन संहिता तयार करण्यात आल्या आहेत. कामगार आणि औद्योगिक क्षेत्र यांचे संयुक्तिकपणे कल्याण साधण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत सांगितले.

चीनकडून नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण :
  • चीनने नेपाळलगत सीमेवर ११ इमारतींचे बांधकाम केल्याचे समोर आले आहे. हुमला जिल्ह्य़ातील या प्रकारामुळे नेपाळने चीनवर अतिक्रमणाचा आरोप केला आहे. दोन्ही देशांत सीमावाद निर्माण झाला असल्याचे नेपाळी प्रसिद्धीमाध्यमांनी म्हटले आहे.

  • नेपाळने काही वर्षांपूर्वी या भागात एक रस्ता बांधला तेव्हापासून सीमेवर असलेला खुणेचा खांबच नष्ट केला. आता चीनने तेथे इमारती बांधल्या आहेत. २००५ मध्ये या भागात झोपडय़ा होत्या. चीनने हा भूभाग आपला असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती नामखा पालिकेचे प्रमुख बिष्णू बहादूर तमांग यांनी दिली. त्यांनी या भागास रविवारी भेट दिली होती.

  • दक्षिण सीमेवर चीनने १ कि.मी.  परिसरात अतिक्रमण करू या इमारती बांधल्या आहेत. नेपाळचे पथक सीमेवर पाहणीसाठी आले तेव्हा चीनच्या सुरक्षा दलाचे जवान ट्रक, टँकर व जीपने तेथे आले. त्यांनी नेपाळी अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना चर्चेसाठी सीमेवर बोलावले.

  • तमांग यांनी सांगितले की, तो भाग नेपाळचाच आहे; पण चीनने नकाशे दाखवून तो त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले. हुमला व नामखा या भागांत नेपाळच्या गृह मंत्रालयाने पथके पाठवली होती. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

आर्थिक आघाडीवर पूर्ण ताकदीने वाटचाल महत्त्वाची :
  • करोनाविरोधातील लढा कायम ठेवतानाच आर्थिक आघाडीवरही पूर्ण ताकदीनिशी पुढे गेले पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा बैठकीत दिला.

  • टाळेबंदीचा मोठा फायदा झालेला असून जगानेही त्याचे कौतुक केले. पण, आता आपल्याला छोटय़ा छोटय़ा प्रतिबंधात्मक विभागांवरच भर दिला पाहिजे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल व आर्थिक घडामोडीही सुरू ठेवता येतील. एक-दोन दिवसांची स्थानिक स्तरावरील टाळेबंदी किती प्रभावी ठरेल हे प्रत्येक राज्याने परिस्थिती पाहून ठरवावे. टाळेबंदी लागू केल्यामुळे आर्थिक घडामोडी सुरू होण्यात अडचण येत आहे का हेही पाहिले पाहिजे. प्रत्येक राज्याने गांभीर्याने विचार करूनच टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मोदी यांनी केली.

  • महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली आणि पंजाब या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. या राज्यामध्ये देशातील ६३ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात ७०० हून अधिक जिल्हे आहेत पण, करोनाची चिंताजनक परिस्थिती सात राज्यांमधील फक्त ६० जिल्ह्यांमध्ये आहे. आपण या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले तर करोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ  शकेल.

  • ७ दिवसांचा कार्यक्रम आखून दररोज एक तास त्या जिल्ह्यांतील तालुक्यांशी, तिथल्या प्रशासनाशी थेट संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी माहिती घ्यावी. भारतात करोनाचा संसर्ग वाढू लागला असल्याने नव्या प्रयोगांची गरज निर्माण झाली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तालुकास्तरावर थेट संपर्क साधला पाहिजे, असा सल्ला मोदींनी दिला.

इटालियन खुली टेनिस स्पर्धा - जोकोव्हिचला पाचवे विजेतेपद :
  • सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने अंतिम फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला ७-५, ६-३ असे पराभूत केले. हे विजेतेपद पटकावत पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे जोकोव्हिचने सिद्ध केले.

  • नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला रागाच्या भरात अनवधानाने पंचाच्या घशावर चेंडू आदळवल्यामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यात भर म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यात रागाच्या भरात रॅकेट जमिनीवर आदळवल्यामुळे जोकोव्हिचला पंचांकडून ताकीद देण्यात आली. मात्र या सर्व प्रकारानंतरही जोकोव्हिचला लाल मातीवरील इटालियन स्पर्धा जिंकता आली. मात्र अंतिम फेरीतही पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच ०-३ पिछाडीवर होता. या पिछाडीनंतरही जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला.

  • दुसरा सेटही सहज जिंकत जोकोव्हिचने पाऊस सुरू होण्याच्या आतमध्ये विजेतेपदावर नाव कोरले. त्यातच श्वार्ट्झमन ही ‘एटीपी’ १००० प्रकारातील पहिलीच अंतिम लढत खेळत होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा अव्वल राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

२४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.