चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 24, 2022 | Category : Current Affairs


अबब! मच्छीमाराला सापडला ३१ किलोचा Gold Fish, २० वर्षांपूर्वी सोडला पाण्यात, त्यानंतर काय घडलं :
 • जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक समजला जाणारा ३१ किलोचा मासा एका मच्छीमाराला मासेमारी करताना पाण्यात सापडला. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका मच्छीमाराने हा गोल्ड फिश शर्थीचे प्रयत्न करुन पाण्यात शोधला. जवळपास २० वर्षांपूर्वी हा गोल्ड फिश पाण्यात सोडण्यात आला होता. गोल्ड फिश समुद्रात किंवा तलावाच्या पाण्यात क्वचितच आढळतो. त्यामुळे याला जादुई गोल्ड फिश असं म्हटलं जातं.

 • एका मच्छीमाराने नारंगी रंगाचा गोल्ड फिश पकडला. २० वर्षांपूर्वी या माशाला पाण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर हा मासा पाण्यात क्वचितच दिसायचा. एका फिशरी मॅनेजरने सांगितलं की, या गोल्ड फिशचं आरोग्य आजही ठणठणीत आहे. हा मासा जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक आहे, असा दावा केला जात आहे.

 • या माशाला पकडण्यासाठी एंडी हैकेटने जवळपास २५ मिनिटं पाण्यात शोध घेतला. कॅरट नावाच्या या गोल्ड फिशला पकडल्यानंतर पुन्हा त्याला पाण्यात सोडण्यात आलं. हायब्रिड प्रजातीचा हा मासा खूप आकर्षक आहे. डेली मेल ने दिलेल्या माहितीनुसार, कॅरटला २० वर्षांपूर्वी जेसन काउलरने पाण्यात सोडलं होतं. फिशरी मॅनेजर जेसनने म्हटलं की, या माशाचं आरोग्य आजही उत्तम आहे. एंडीने गोल्ड फिश पकडल्यामुळं आम्ही त्याला शुभेच्छा देत आहोत. हा मासा सर्वात वेगळा आहे.

 • हा गोल्ड फिश पाण्यात क्वचितच लोकांना दिसतो. एंडी हॅकेटनं ३१ किलोचा गोल्ड फिश पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. २०१९ मध्ये जेसन फुगेटनं अमेरिकेच्या मिनोस्टामध्ये असाच एक मासा पकडला होता. पण त्यांचं वजन १८ किलो होतं. एंडीने म्हटलं की, मला या गोल्ड फिशबाबत माहिती होती की, हा मासा फ्रांसमध्ये ब्लूवॉटर लेक्समध्ये उपलब्ध आहे. पण मी या गोल्ड फिशला पकडेल, असं मला कधी वाटलं नव्हतं. दरम्यान, एंडीने हा मासा पकडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले आणि त्यानंतर त्याने या माशाला सुरक्षितपणे पाण्यात सोडलं.

टिपू सुलतानवरील पुस्तकाच्या विक्री, वितरणाला स्थगिती :
 • टिपू सुलतानावरील एका पुस्तकाच्या वितरण आणि विक्रीला बंगळूरुतील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पुस्तकात म्हैसूरचा राजा असलेल्या टिपू सुलतानाबद्दल चुकीची माहिती छापली असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात मंगळवारी याबाबत सुनावणी झाली. ‘टिपू निजा कनसुगालू’ (टिपूचे खरे स्वप्न) या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक असलेल्या अयोध्या पब्लिकेशन आणि मुद्रक असलेल्या राष्ट्रोत्थान मुद्रणालय यांना हे पुस्तक विकण्यास आणि त्याचे वितरण करण्यासा ३ डिसेंबरपर्यंत तात्पुरता मनाई आदेश जारी केला आहे.

 • कन्नड भाषेतील हे पुस्तक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे न्यायालयाच्या आदेशात म्हटल आहे. या पुस्तकाची छपाई करण्यास आणि छापलेली पुस्तके संग्रहित करण्यास मात्र कोणतही मनाई करण्यात आलेली नाही.

 • जिल्हा वक्फ बोर्ड समितीचे माजी अध्यक्ष बी. एस. रफिउल्ला यांनी या पुस्तकाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. हे पुस्तक टिपूबद्दल चुकीची माहिती देत असून या पुस्तकाला कोणताही ऐतिहासिक आधार व पुरावा नसल्याचा दावा रफिउल्ला यांनी केला. या पुस्तकात वापरलेला ‘तुरुकारू’ हा शब्द मुस्लीम समाजाचा अवमान करणारा आहे.

 • या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे अशांतता आणि जातीय तेढ निर्माण होईल, तसेच सार्वजनिक शांततेचा मोठय़ा प्रमाणात भंग होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने तिन्ही प्रतिवादींना तातडीच्या नोटीस बजावल्या आणि प्रकरणाची सुनावणी ३ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.

ट्विटर संपणार म्हणणाऱ्यांना एलॉन मस्क यांचा उलट सवाल; म्हणाले, “ट्विटरने आत्तापर्यंत…” :
 • ट्विटरमधील नोकरकपात त्यानंतर कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुरू झालेले राजीनामासत्र पाहता ट्विटरच्या भवितव्याबाबत काही युजर्संकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. एलॉन मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे ही मायक्रो ब्लॉगिंग साईट टिकणार नाही, असा कयास काही युजर्सकडून बांधला जात आहे. या टीकाकारांना एलॉन मस्क यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ट्विटरने आत्तापर्यंत संपायला नको होतं का?” असा उलट सवाल करत अनेक उलथापालथीनंतरही कंपनी टिकून असल्याचं अप्रत्यक्षरित्या मस्क यांनी ठासून सांगितलं आहे.

 • ‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’चे प्रमुख एलॉन मस्क यांनी हात जोडून टीकाकारांना दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी आज पुन्हा टीकाकारांना लक्ष्य केलं आहे. हात जोडलेला इमोजी वापरून हिंदीत ‘नमस्ते’ असं ट्वीट मस्क यांनी केलं होतं. ट्विटर खरेदी करताच मस्क यांनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी देताच कंपनीत राजीनामासत्र सुरू झाले आहे.

 • बऱ्याच देशांमध्ये #RIPTwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी कामावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर हा सोशल मीडिया प्लॅटफार्म वापरण्यासाठी सुरक्षित आहे का? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ट्विटरचे माजी मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी लीया किस्नर, मुख्य गोपनीयता अधिकारी डेमियन किरन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आधीच कंपनी सोडून गेले आहेत.

मँचेस्टर युनायटेडपासून रोनाल्डो विभक्त :
 • विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच अर्जेटिनाच्या पराभवाचा धक्का फुटबॉल चाहत्यांना बसला. त्या धक्क्यातून सावरत नाही तो मॅंचेस्टर युनायटेडने रोनाल्डोला तातडीने मुक्त केल्याची घोषणा केली. रोनाल्डो आणि फुटबॉल चाहत्यांना हा धक्काच होता. रोनाल्डोचा व्यवस्थापक जॉर्ज मेंडेस अनेक क्लबबरोबर चर्चा करत आहे. मात्र, ३७ वर्षीय रोनाल्डो कुठल्या क्लबकडून खेळणार हे अजून स्पष्ट होत नाही. रोनाल्डो कोणाकडून खेळणार याचे उत्तर आता विश्वचषक फुटबॉल स्पर्धा संपेपर्यंत तरी मिळणार नाही. युरोपियन लीग असो वा अगदी सौदी अरेबियातील एक क्लब त्याच्यासाठी उत्सुक असले तरी विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत यावर कुणी निर्णय घेईल असे वाटत नाही.

 • रोनाल्डो मॅंचेस्टर युनायटेड सोडणार याचे संकेत गेले काही दिवस मिळतच होते. रोनाल्डोने एका मुलाखतीत क्लबने आपला विश्वासघात केल्याचे आणि क्लबचे काही भागीदार आपल्याला संघाबाहेर ठेवू इच्छित असल्याचे सांगितले होते. मॅंचेस्टरचे नवे व्यवस्थापक एरिक टेन हैग यांच्याशी देखील रोनाल्डोचे सूर जुळत नव्हते. या सगळय़ाची परिणीती रोनाल्डोला मुक्त करण्यात झाली. मॅंचेस्टरकडून खेळण्याची रोनाल्डोची ही दुसरी वेळ होती. रोनाल्डोने मॅंचेस्टरसाठी ३४६ सामने खेळताना १४५ गोल केले आहेत.

 • मँचेस्टर युनायटेडसोबत परस्पर सामंजस्याने मी  क्लब सोडण्यास तयार झालो आहे. क्लब आणि चाहत्यांचा मी नेहमीच आभारी राहीन. त्यांच्याविषयी असलेले माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. पण नव्या आव्हानांचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वाटल्याने हा निर्णय घेतला.

२४ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)