चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ नोव्हेंबर २०२१

Date : 24 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘भारतात २०२३ अखेपर्यंत देशी ६जी तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट’ :
  • देशात विकसित करण्यात येत असलेल्या ६जी तंत्रज्ञानावर सध्या काम सुरू असून २०२३च्या अखेरीस किंवा २०२४च्या सुरुवातीला ते सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिली.

  • या तंत्रज्ञानावर काम करणारे शास्त्रज्ञ व अभियंते यांना या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या यापूर्वीच देण्यात आल्या आहेत, असे फायनान्शिअल टाइम्स व दि इंडियन एक्सप्रेस यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘न्यू टेक्नॉलॉजी अँड दि ग्रीन इकॉनॉमी : टू ट्रेंड्स शेपिंग अ न्यू इंडिया’ या ऑनलाइन मालिकेत बोलताना वैष्णव यांनी सांगितले.

  • ‘६जी बाबतची घडामोड आधीच सुरू झाली आहे. २०२४ किंवा २०२३ची अखेर या सुमारास ते दिसून येईल. आपण या दिशेने जात आहोत. नेटवर्क चालवण्यासाठीचे भारतात डिझाइन केलेले दूरसंचार सॉफ्टवेअर, भारतात उत्पादन झालेले दूरसंचार उपकरण आणि जगभरात जाऊ शकणारे दूरसंचार नेटवर्क आपल्याकडे असेल’, असे वैष्णव म्हणाले.

गलवान खोऱ्यातील योद्धय़ांचा गौरव ; बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान :
  • गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी हल्ल्याला निधडय़ा छातीने तोंड देणारे १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांचा मंगळवारी मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला. समोरासमोर झालेल्या लढाईत अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

  • बाबू यांची पत्नी बी. संतोषी व आई मंजुला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देशाचे उच्चपदस्थ लष्करी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. परमवीर चक्रानंतर महावीर चक्र हा युद्धकाळातील दुसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.

  • गेल्या वर्षी १५ जूनला गलवान खोऱ्यातील संघर्षांत चिनी फौजांशी लढताना प्राणांचे बलिदान करणाऱ्या नायब सुबेदार नुडुराम सोरेन, हवालदार (गनर) के. पलानी, नाईक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंग या इतर चार सैनिकांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे.

व्हाईस अ‍ॅडमिरल (निवृत्त) मुरलीधर पवार यांना ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ :
  • फेब्रुवारी२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय नौदलाच्या वेगवान हालचालींसह इतर अनेक महत्वपूर्ण मोहिमांची देखरेख समर्थपणे पार पाडणारे भारतीय नौदलाचे सहनौसेनाध्यक्ष व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर सदाशिवराव पवार सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि गौरवपूर्ण कारकीर्दीनंतर ३१ मे २०२१ रोजी निवृत्त झाले होते.

  • दरम्यान नौसेनेच्या या मराठी अधिकाऱ्याला त्यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल, खास करून पुलवामा हल्ल्यानंतर सर्व सैन्यदल अलर्ट असतांना नौसेनेला कुठल्याही परीस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवल्याबद्दल राष्ट्रपतींनी परम विशिष्ट सेवा मेडल देत गौरविले आहे. 

  • आपल्या कार्यकाळात त्यांनी भारत-चीन दरम्यान गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षपूर्ण परिस्थितीसह इतरही अनेक महत्वपूर्ण प्रसंग हाताळले. त्यांनी १ फेब्रुवारी २०१९रोजी सहनौसेनाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता.

एसटीतील तीन हजारांवर कर्मचाऱ्यांचे निलंबन :
  • संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच असून ही संख्या तीन हजारांपार गेली आहे. मंगळवारी ८५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महामंडळाने आधीच स्पष्ट केले होते.

  • विलिनीकरण आणि अन्य मागण्यांसाठी पहिल्या बंद झालेल्या सांगली विभागातील आटपाडी आगारातूनही वाहतूक सुरू झाली असून या आगारातून तीन बस सोडण्यात आल्या. परंतु त्या रिकाम्याच धावल्या. राज्यात दिवसभरात विविध भागातून २३६ बस सुटल्याची माहिती महामंडळाने दिली.

  • निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या सोमवारी २ हजार ९६७ होती. यात मंगळवारी काहीशी वाढ झाली. ही संख्या ३ हजार ५२ पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत ६४५ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. संप कालावधीतील वेतनही न देण्याचा महामंडळाचा विचार आहे. दरम्यान राज्यातील काही भागातून धावणाऱ्या एसटीची संख्या वाढली आहे.

  • सोमवारी १९७ बस सोडण्यात आल्या असून त्यातून ४ हजार ८४८ प्रवाशांनी प्रवास केला होता. मंगळवारी मात्र २३६ बस सोडण्यात आल्या तर ४ हजार २२७ प्रवाशांनी प्रवास केला. यात संपकाळात बंद झालेल्या सांगली विभागातील आटपाडी आगारातील वाहतूकही सुरू झाली. आटपाडी ते भिवघाट अशा तीन गाडय़ा धावल्या.

इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - लक्ष्य, कश्यप यांचा पहिल्या फेरीत पराभव :
  • भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन आणि अनुभवी पारुपल्ली कश्यप इंडोनेशिया बॅडिमटन खुल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गारद झाले. 

  • पुरुष एकेरीत २१ वर्षीय लक्ष्यला अव्वल मानांकित जपानच्या केंटो मोमोटाकडून २१-२३, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्यने दोन वेळच्या जगज्जेत्या मोमोटाला उत्तम लढा दिला. मात्र, दोघांमध्ये २१-२१ अशी बरोबरी असताना मोमोटाने खेळ उंचावत पुढील दोन्ही गुण जिंकले. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही.

  • दुसरीकडे, सिंगापूरच्या लो किन येवने कश्यपला २१-११, २१-१४ अशी धूळ चारली. पुरुष दुहेरीत, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांचेही आव्हान संपुष्टात आले.

  • त्यांच्यावर कोरियाच्या चोइ सोलग्यू आणि किम वोन्होने २०-२२, १३-२१ अशी मात केली. तसेच मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगणचा योनस राल्फी जेन्सन आणि लिंडा एल्फेर या जर्मन जोडीने १२-२१, ४-२१ असा पराभव केला.

२४ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.