चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ नोव्हेंबर २०२०

Date : 24 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद झाली तेव्हा अमित शाह झोपा काढत होते का” :
  • ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि एआयएमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसी बंधू हैदराबादचा विकास कधीच करणार नाहीत ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील अशी टीका केल्यानंतर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन भाजपाचे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • जर तुम्ही ३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एवढं सगळं होईपर्यंत झोपा काढत होते का?, असा टोला ओवेसींनी लगावला आहे. सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना ओवेसींनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

  • एक डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाने या निवडणुकींसाठी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. भाजपाचे अनेक नेते या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. तर दुसरीकडे एआयएमआयएमनेही निवडणुकीचा प्रचार सुरु केला आहे. अशाच एका प्रचारसभेमध्ये भाजपाचा खासदार तेजस्वी सूर्या यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केलेल्या आरोपांना ओवेसींनी उत्तर दिलं.

  • “तर मतदार यादीमध्ये ३० हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? ३० ते ४० हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांच नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी उद्या (मंगळवार) संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी,” असं आव्हानच ओवेसींनी भाजापाच्या नेत्यांना केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, बायडेन यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण :
  • अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.

  • अमेरिकेतील निवडणुका होऊन तीन ते चार आठवडे उलटले असून डोनाल्ड ट्रम्प निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास वारंवार व्यक्त करत होते. निकाल आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे. निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही डोनाल्ड ट्रम्प अजिबात पराभव मान्य करत नव्हते. यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गही निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या हाती निराशाच आली. अशा परिस्थितीत अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत.

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला (General Service of Administration) सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा असं सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.

इस्रोच्या शुक्रयान मोहिमेतील वैज्ञानिक उपकरणांसाठी परदेशी प्रस्ताव :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या शुक्रयान मोहिमेसमवेत वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी परदेशातून अनेक प्रस्ताव आले असून त्यात वीस प्रस्तावांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. यात फ्रान्सच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. याशिवाय रशिया, स्वीडन व जर्मनी या देशांचेही प्रस्ताव असून ते देशही भारताच्या शुक्रयानासमवेत संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यास तयार आहेत.

  • शुक्राच्या अभ्यासासाठी हे यान पाठवले जाणार असून त्यात परदेशांतून वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी काही प्रस्ताव आले होते, त्यातील वीस वैज्ञानिक उपकरणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. हे २० पेलोड म्हणजे वैज्ञानिक उपकरणे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी पाठवले जाणार आहेत.

  • फ्रान्सच्या सीएनइएस संस्थेचे ‘व्हीनस इन्फ्रारेड अ‍ॅटमॉस्फेरिक गॅस लिंकर’ हे उपकरण रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संशोधन संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. फ्रान्सच्या सीएनआरएस संस्थेने ‘लॅटमॉस’ नावाचे उपकरण तयार केले असून त्याच्या मदतीने शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करता येईल.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन :
  • आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे गुवहाटी येथे आज(२३ नोव्हेंबर) सायंकाळी निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज तरूण गोगोई यांची प्रकृती अतिशय खालवली होती. त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

  • त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपला नियोजित कार्यक्रम रद्द दिब्रुगढ येथून ते गुवाहाटी येथे निघाले होते. त्यांनी ट्विटकरून याबाबत माहिती दिली होती.

  • तसेच, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले होते की, तरूण गोगोई माझ्या वडिलांसमान आहेत. मी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो आहे. ”सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मी दिब्रुगढ येथून गुवाहाटीला जात आहे, जेणेकरून तरूण गोगोई व त्यांच्या कुटुंबासोबत राहता येईल, कारण माजी मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली आहे.” असं त्यांनी ट्विट केलं होतं.

महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणार शाळा :
  • पालघर: जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर क्षेत्रातील नववी ते १२ इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तर उर्वरित ग्रामीण भागातील शाळा मात्र १ डिसेंबरनंतर शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची अनुमती राज्य शासनाने दिली असून त्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार, आमदार आणि वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

  • वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू व जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा व विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.

  • त्याचप्रमाणे पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत संमती पत्र घेण्यात येणार आहे. त्या संमतीपत्रांनंतर स्थानिक परिस्थितीनुसार शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

२४ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.