चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ मे २०२०

Date : 24 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्याबाबत संभ्रम :
  • इतर विद्याशाखांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्याबाबत संभ्रम  कायम असून वैद्यक परिषदेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे महाराष्ट्रात उच्च व तंत्रशिक्षणाच्या पदवीपूर्व परीक्षा रद्द झाल्या आहेत. आता अंतिम वर्षांची परीक्षासुद्धा रद्द करण्याची भूमिका पुढे आली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण खात्याने या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. अ‍ॅलोपॅथीच्या भारतीय वैद्यक परिषदेप्रमाणेच आयुषच्या म्हणजेच आयुर्वेद, होमिओपॅथी व अन्य शाखांसाठी केंद्रीय पातळीवर परिषदा आहेत. त्यांच्याकडे या संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आले आहे.

  • मे ते जूनदरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत असतात. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी ठेवली. पण, करोना संकटामुळे परीक्षा होतील की नाही, याविषयी शंका आहे.

  • या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते वैद्यकीय शिक्षण कायद्यानुसार परीक्षा अटळच आहे. त्या केवळ पुढे ढकलल्या जाऊ शकतात. परीक्षा घेण्याचे अधिकार असणाऱ्या वैद्यकीय अभिमत विद्यापीठातदेखील संभ्रमच आहे. सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले म्हणाले की, आम्ही सर्व अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी वैद्यक परिषदेकडे मार्गदर्शन मागितले आहे.

जून-जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता :
  • देशांतर्गत विमानसेवेप्रमाणे आंतरराष्ट्रीय सेवाही पूर्ववत करण्याचे संकेत नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी शनिवारी दिले. जूनच्या मध्यात वा जुलैच्या अखेरीसही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा सुरू केली जाऊ शकते.

  • त्यासाठी ऑगस्ट वा सप्टेंबपर्यंत वाट पाहण्याची गरज लागणार नाही. करोना संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी बदलते त्यावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पुरी यांनी सांगितले.

  • करोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचे निश्चित स्वरूप दिसत आहे. त्यात बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे. शिवाय, करोनाशी संघर्ष करत नजीकच्या भविष्यात आपापले व्यवहार सुरू ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा  जून-जुलैमध्ये टप्प्याटप्याने पूर्ववत होऊ शकेल, असे पुरी म्हणाले.

देशभरात चोवीस तासांत ६ हजार ७६७ नवे रुग्ण, १४७ मृत्यू :
  • देशभरात मागील चोवीस तासांत 6 हजार 767 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 147 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 31 हजार 868 वर पोहचली आहे.

  • देशभरातील तब्बल 1 लाख 31 हजार 868 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 73 हजार 560 जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले 54 हजार 440 व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 867 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे.

  • देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दिवसागणिक करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये एक हजार 566 नव्या रूग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या 28 हजार 634 झाली आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त मुंबई शहरात आहे. मागील 24 तासांत मुंबईमध्ये 40 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाग्रस्तांच्या बळींची संख्या 949 वर गेली आहे. मागील 24 तासांत राज्यात 60 जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी एकट्या मुंबईतील 40 जण आहेत.

एक चूक झाली नी जगाला कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स :
  • व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींची एक चूक झाली आणि सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स समजले. करोना व्हायरसचा कहर जगभरात पसरला आहे. अमेरिकाही त्याला अपवाद नाही. अमेरिकेतही करोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सगळ्या वातावरणात आता ट्रम्प यांच्या नावाची चर्चा पुन्हा होते आहे. कारण व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सगळ्या जगाला सांगून टाकले. 

  • व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकनेनी यांनी करोनासंबंधीची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सांगून टाकले. ही चूक त्यांच्याकडून अनावधानाने झाली.

  • व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव केली मॅकनेनी या पत्रकाराना करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काय काय कामं केली? काय निर्णय घेतले ते सांगत होत्या. त्यावेळी काही दस्तावेज दाखवताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्सही सांगून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स यामुळे जगाला समजले. १ लाख डॉलरचा चेक केली मॅकनेनी दाखवत होत्या. त्याचवेळी ट्रम्प यांच्या खासगी खात्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दाखवून टाखली.

जागतिक बँकेतील पदावर आभास झा :
  • जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती आहेत, त्या दक्षिण आशियात वापरण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

  • हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे. सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

रेल्वे मंडळाचा स्पष्टीकरणाचा दिवस :
  • स्थलांतरित मजुरांसाठी पुढील दहा दिवसांमध्ये आणखी २६०० श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या जाणार असून ३६ लाख मजूर आपापल्या गावी जाऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पण  पाऊण तासाच्या या पत्रकार परिषदेत यादव यांना रेल्वेच्या कारभाराची माहिती कमी स्पष्टीकरण जास्त द्यावे लागले.

  • केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी कोणत्याही पार्श्वभूमीविना देशभरात किती लोक स्थलांतर करतात याची आकडेवारी दिली. देशांतर्गत सुमारे ४ कोटी लोक रोजगारानिमित्त स्थलांतरित होतात, ही माहिती फक्त तुम्हाला सांगायची होती, असे श्रीवास्तव म्हणाल्या. पण, अनावश्यक दिलेल्या या माहितीमुळे यादव यांची कोंडी झाली. आत्तापर्यंत रेल्वेने १ मेपासून २३ दिवसांमध्ये २६०० श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या आणि त्याचा ३५ लाख मजुरांनी लाभ घेतला.

  • देशात ४ कोटी लोक स्थलांतरित असतील तर समजा रेल्वेने निम्म्या स्थलांतरितांना म्हणजे दोन कोटींना पोहोचवायचे ठरवले तरी किती दिवस श्रमिक रेल्वे चालवणार असा प्रश्न विचारला गेला. त्यावर, गरज असेपर्यंत श्रमिक रेल्वे चालवल्या जातील, असे उत्तर देऊन यादव यांनी सुटका करून घेतली.

२४ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.