चालू घडामोडी आणि दिनविशेष - 24 फेब्रुवारी 2024

Date : 24 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लातूर-टेंभुर्णी महामार्ग लवकरच चारपदरी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
 • लातूर ते टेंभुर्णी या महामार्गाची दुरावस्था पाहून आपल्यालाही शरम वाटते. यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र आता लवकरच हा रस्ता चारपदरी महामार्गात रूपांतरित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील महामार्गाच्या प्रलंबित कामांसाठी २२० कोटी रूपये अधिकचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १७४ कोटी रूपयांच्या विकासकामांचे आज भूमिपूजन होत असल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
 • धाराशिव शहरातील सिध्दाई मंगल कार्यालय येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने १७४ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 • पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, लातूर-टेंभुर्णी हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आजच्या घडीला या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. लवकरच हा महामार्ग चारपदरी केला जाणार आहे. त्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मराठवाड्यात चांगले रस्ते झाले, तरच मराठवाड्याचा विकास होईल आणि शेतकर्‍यांना आपल्या शेतातील उत्पादने कमी वेळात मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येतील. त्यातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास होईल. त्यामुळेच आपण लवकरात लवकर लातूर ते टेंभुर्णी हा चारपदरी महामार्गही पूर्ण करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.
 • पन्नास हजार कोटी रूपयांचा काश्चिर ते कन्याकुमारी हा उत्तरेकडून दक्षिणेला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यालाही जोडला जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. विदर्भापेक्षाही मराठवाडा आणि परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त आहे. बागायती जमिनी सुध्दा अधिक आहेत. त्यामुळे साहजिकच साखर कारखान्यांची संख्या देखील मराठवाड्यात सर्वाधिक आहे. सगळे कारखाने इथेनॉल निर्मिती करू शकतात. मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती झाल्यास अगदी शेतकरी सुध्दा आपली स्कूटर इथेनॉलवरती चालवेल. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती आपोआप कमी होतील आणि शेतकर्‍यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे मतही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. देशात शहरांची प्रगती होत आहे, तशीच ती ग्रामीण भागाचीही अपेक्षित आहे. केवळ सिटी स्मार्ट होवून चालणार नाही. तर खेडी सुध्दा स्मार्ट आणि प्रगत झाली पाहिजेत. दुर्गम भागात रस्ते, वीज पुरवठा करून या भागांना शहराशी जोडायला हवे. त्यासोबत मोठे व्यवसाय उभे करून तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याची भावनाही यावेळी बोलून दाखवली.
लोकसेवा आयोगातच बाह्य यंत्रणेद्वारे भरती; एक वर्षांसाठी काल्पनिक पदनिर्मितीस मंजुरी
 • बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरती रद्द करण्यात आल्याचे राज्य शासनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते. मात्र, आता राज्य शासनाच्या विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवून मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातच (एमपीएससी) बाह्य यंत्रणेद्वारे भरती केली जाणार असल्याचे समोर आले आहे.
 • सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव स्मिता जोशी यांनी या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. एमपीएससीच्या कार्यालयातील २६ संवर्गासाठी मिळून २७१ पदांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, लिपिक टंकलेखक संवर्गातील पदोन्नती कोटय़ातील रिक्त असलेल्या २८ पदांवर पदोन्नतीने किंवा एक वर्ष कालावधीसाठी लिपिक टंकलेखकांची २८ काल्पनिक पदे निर्माण करून, त्या पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास शासनाने मंजुरी दिली होती. तसेच एमपीएससीतील मंजूर पदांपैकी ४५ पदे (नामनिर्देशन ४०, पदोन्नती ५) रिक्त आहेत. ती काल्पनिक पदे निर्माण करून बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचा प्रस्ताव एमपीएससीने दिला होता.
 • लिपिक टंकलेखकांच्या सेवाप्रवेश नियमाप्रमाणे पदोन्नतीने, नामनिर्देशनाद्वारे आणि वाहनचालकामधून कायमस्वरूपी बदलीने नियुक्तीसाठी ४०:५०:१० असे प्रमाण होते. मात्र, एमपीएससी सचिवांनी ते ०५:९०:०५ असे केले आहे. सर्वंकष विचाराअंती लिपिक टंकलेखक संवर्गात ४५ पदे (नामनिर्देशन ४०, पदोन्नती ५) काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात आली. त्यात पदोन्नती, नामनिर्देशन कोटय़ातील अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत संबंधित पदावरील कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे घेता येतील, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 • राज्याची पदभरती करणारी स्वायत्त संस्था असलेल्या एमपीएससीलाच बाह्य यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. पदे रिक्त असणे, पदोन्नती होणे ही प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरील आहे. रिक्त पदे न भरल्याने एमपीएससीच्या प्रक्रिया संथ गतीने होत आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे भरती करणे गोपनीयतेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
अपंग, वृद्धांना आता घरातून मतदानाची संधी; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा
 • आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ८० पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल २६ लाख ७० हजार, तर शारीरिक विकलांग पाच लाख ९० हजार ३८२ नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे.
 • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्ह्याचा शुक्रवारी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. देशपांडे म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८० पेक्षा जास्त वयोगटातील आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
 • केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाच दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव असणाऱ्या संबंधित नागरिकांना ‘१२-ड’ हा अर्ज घरोघरी जाऊन दिला जाणार आहे. हा अर्ज या नागरिकांकडून भरून घेतला जाणार आहे. अर्जात संबंधित नागरिकांना घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार, याबाबतची माहिती घेतली जाईल. या अर्जांवर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील. या नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यास उर्वरित मतदारांना विशेत: तरुणांना त्यातून प्रोत्साहन मिळेल. मात्र, ज्या मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांचे मतदान वाया जाऊ नये, म्हणून ही सुविधा सुरू केली आहे.’
 • दरम्यान, घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.
मुशीर खानने रणजीत झळकावले पहिले शतक, पुजारा-रहाणे ठरले अपयशी
 • १९ वर्षाखालील विश्वचषक २०२४ मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खानने रणजी ट्रॉफीमध्येही शानदार कामगिरी केली आहे. मुशीरने २०२२ च्या अखेरीस मुंबईसाठी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण पहिल्या तीन सामन्यात केवळ ९२ धावा करणाऱ्या मुशीरने रणजी ट्रॉफीतील पुनरागमन सामन्यात शतक झळकावले आहे. बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईचे दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ एक अशा कठीण विकेटवर बाद होत होते. मात्र मुशीरने शतक झळकावून संघाला अडचणीतून बाहेर काढले.

मुशीरचे देशांतर्गत क्रिकेटमधील पहिले शतक -

 • देशांतर्गत क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमधील मुशीर खानचे हे पहिले शतक आहे. त्याने १७९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मुशीरने आपल्या शतकी खेळीत ६ चौकार लगावले. पृथ्वी शॉने मुंबईला वेगवान सुरुवात करून दिली. पृथ्वी ५७ धावांवर बाद झाल्यानंतर मुशीर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. लवकरच मुंबईची धावसंख्या ९९ धावांवर ५ बाद वरु १४२ धावांवर ५ विकेट अशी झाली. फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टी उपयुक्त होती.

अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला -

 • सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. रहाणे १३ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. पृथ्वी शॉने ३३ धावांची खेळी केली. १४२ धावांवर ५ विकेट पडल्यानंतर हार्दिक तमोरने मुशीरला साथ दिली. त्यामुळे मुंबई संघाला पहिला दिवसअखेर ९० षटकानंतर ५ बाद २४८ धावा केल्या. सध्या मुशीर खान २१६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १२८ धावांवर नाबाद आहे. त्याचबरोबर हार्दिक तमोरने १६३ चेंडूत ३० धावांवर नाबाद आहे.

सौराष्ट्रसाठी सर्वाधिक धावा करणारा पुजारा उपांत्यपूर्व फेरीत अपयशी -

 • अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तामिळनाडूविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याला केवळ दोन धावा करता आल्या. मात्र, सौराष्ट्रसाठी पुजारा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १२ डावात ७८३ धावा केल्या आहेत. पुजाराची सर्वोच्च धावसंख्या २४३ धावा आहे. त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके केली आहेत. पुजारा सध्या भारतीय संघाबाहेर आहे. सौराष्ट्राने हार्विक देसाईच्या ८३ धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात तमिळनाडूने पहिल्या दिवसअखेर १ बाद २३ धावा केल्या.
कोण आहे आकाश दीप? ज्याने रांची कसोटीत भारतासाठी केले पदार्पण
 • भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने युवा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज आकाश दीपला पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा आकाश दीप हा ३१३ वा क्रिकेटपटू ठरला आहे. आता आपण पदार्पणवीर आकाश दीप कोण आहे? जाणून घेऊयात.

आकाश दीप कोण आहे?

 • आकाश दीपचा जन्म बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील देहरी गावात झाला. २७ वर्षीय आकाश दीप त्याच्या घातक इनस्विंग गोलंदाजीमुळे निवड समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापनाच्या नजरेत आला. आकाश दीपने आयपीएलमध्ये ७ सामने खेळले असून त्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या आहेत. आकाश दीपने २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २३.१८ च्या गोलंदाजीच्या सरासरीने १०३ बळी घेतले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आकाश दीपने चार वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आकाश दीपने एका सामन्यात एकदा १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

रोहितचे जिंकले होते मन -

 • आकाश दीप देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. आकाश दीपने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्ध सराव सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंड लायन्सविरुद्ध आकाश दीपची गोलंदाजी पाहून निवड समिती आणि भारतीय कर्णधार रोहित प्रभावित झाले होते.

आकाश दीपला मिळाली पदार्पणाची कॅप -

 • जसप्रीत बुमराहला या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी आरसीबीचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पदार्पण केले आहे. पदार्पणाची कॅप मिळवणारा तो भारताचा ३१३ वा खेळाडू आहे. आकाशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पदार्पणाची कॅप दिली. यावेळी आकाशची आईही त्याच्या पदार्पणाला उपस्थित होती. पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर आकाशने आईला मिठी मारली आणि भावूक झाला.

 

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस

 • अमेरिकेतील भारतीय वंशाचे कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. गुरुवारी याबाबत घोषणा करताना अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि वातावरण बदल या क्षेत्रांमध्ये बंगा यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
 • जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिल मालपास यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून मे महिन्यापर्यंत नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. जागतिक बँकेमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी अधिक असल्यामुळे सर्वसाधारणपणे तेथील प्रशासनाने शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होण्याचा प्रघात आहे. असे असल्याने बंगा यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे.
 • जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकीच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यापैकी जागतिक बँकेमध्ये अमेरिका तर नाणेनिधीमध्ये युरोपातील व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षपदी असते.

‘मेटा’ पुन्हा एकदा करणार कर्मचाऱ्यांची कपात, सात हजार कर्मचाऱ्यांना दिले…

 • सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा कमर्चाऱ्यांची कपात करण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात.

 • फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅप यांच्या मूळ कंपनी असलेल्या Meta मध्ये काही दिवसांत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. मेटा प्लॅटफॉर्म पुनर्रचना आणि downsizing करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतले आहे. यासह कंपनी नोकऱ्यांमध्ये कपात करण्याचा पुन्हा एकदा विचार करत आहे. जर असे झाले तर याचा फटका हजारो कर्मचाऱ्यांना बसू शकतो असे वॉशिंग्टन पोस्टने बुधवारी सांगितले.

 • मेटा कंपनीने या आधीच आपल्या हजारो कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन केले आहे. त्यांच्या कामगिरीवर त्यांना कंपनीने खराब कामगिरी असे रेटिंगसुद्धा दिले आहे. कंपनीने आपल्या ७००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिले आहे. यासह कंपनीने बोनस देण्याचा पर्यायही वगळला आहे. या कारणांमुळे मेटामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 • मेटाने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११,००० कर्मचाऱ्यांना २०२२ मध्ये काढून टाकले होते. मागच्या वर्षातील कर्मचारी कपात ही मेटाच्या १८ वर्षांच्या इतिहासातील पहिले कर्मचारी कपात होती. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी देखील आपल्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

करोनानंतर प. बंगालमध्ये ‘ॲडिनोव्हायनस’ने घातले थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणे आणि उपचार

 • २०१९-२० मध्ये करोना महामारीला सुरुवात झाली. जगभरामध्ये पसरलेल्या या रोगाने लाखो लोकांचा बळी घेतला. पहिल्या लाटेनंतर करोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट उदयास आला. एकूण परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारद्वारे टाळेबंदी करण्यात आली. पुढे प्रकरण स्थिर झाल्यानंतर हळूहळू सर्वकाही सुरु करण्यात आले. करोनाचे संकट असतानाच एका नव्या विषाणूमुळे एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल राज्यामध्ये ॲडिनोव्हायरस विषाणूने पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला आहे.
 • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटरिक डिसीजेस (NICED) या संस्थेद्वारे कोलकाता शहरामधील नागरिकांचे परिक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण परिक्षणामध्ये किमान ३० टक्के नागरिक या विषाणूने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर गंभीरपणे लक्ष देण्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. केंद्राच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागानुसार, ॲडिनोव्हायरस हा विषाणू स्पर्श किंवा हवेमार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहचतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत असला तरी, लहान बालकांना त्याचा जास्त धोका असल्याचे म्हटले जात आहे.
 • मध्यम आकार असलेले अविकसित ॲडिनोव्हायरस विषाणूंमुळे फ्लूचे संक्रमण होते. मानवांसाठी धोकादायक असलेल्या ॲडिनोव्हायरस विषाणूचे ५० प्रकार असल्याचेचा दावा संशोधकांनी केला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्यांना आणि श्वसनाचे त्रास असणाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग लवकर होऊ शकतो. या विषाणूच्या संसर्गामुळे सर्दी, ताप, श्वसनाचे आजार संभवतात. पश्चिम बंगालमध्ये ॲडिनोव्हायरसमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याने तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मार्करम सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी

 • दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू एडीन मार्करमची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’ला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे.न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली सनरायजर्सने गतहंगामात सहा सामन्यांत विजय मिळवले होते, तर आठ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हैदराबादचा संघ आठव्या स्थानी राहिला होता. त्यानंतर यंदाच्या खेळाडू लिलावापूर्वी सनरायजर्सने विल्यम्सनला संघमुक्त केले. त्यामुळे सनरायजर्सचा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात होता.
 • सनरायजर्सच्याच मालकीच्या ईस्टर्न केप संघाने मार्करमच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगमध्ये जेतेपद मिळवले होते. त्यामुळे आता सनरायजर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये मार्करम चांगल्या लयीत होता. त्याने ३६६ धावा करण्यासह ११ गडीही बाद केले. त्यामुळे त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
 • वॉर्नरकडे दिल्लीचे नेतृत्व - दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत अपघातात दुखापतग्रस्त झाल्याने यंदाच्या ‘आयपीएल’ला मुकणार आहे. त्यामुळे दिल्लीला नव्या कर्णधाराची निवड करावी लागेल. यासाठी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
 • अष्टपैलू अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग कर्णधारपदासाठी वॉर्नरला पसंती देणे अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

24 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.