चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ फेब्रुवारी २०२१

Date : 24 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
श्रेयसच्या शतकामुळे मुंबईचे ‘धवल’ यश :
  • कर्णधार श्रेयस अय्यरने (९९ चेंडूंत नाबाद १०३ धावा) साकारलेले दिमाखदार शतक आणि अनुभवी धवल कुलकर्णीच्या (५/४४) भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राचा सहा गडी आणि १६ चेंडू राखून सहज धुव्वा उडवला.

  • जयपूरच्या के. एल. सैनी मैदानावर झालेल्या ‘ड’ गटातील या सामन्यात महाराष्ट्राने दिलेले २८० धावांचे लक्ष्य मुंबईने ४७.२ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. सलग दुसऱ्या विजयामुळे मुंबईने आठ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले आहे. महाराष्ट्राच्या यश नाहर (११९) व अझिम काझी (१०४) यांची शतके व्यर्थ ठरली. गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या साखळी सामन्यात मुंबईची पुदुचेरीशी, तर महाराष्ट्राची राजस्थानशी गाठ पडणार आहे.

  • प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची कुलकर्णीच्या माऱ्यापुढे ४ बाद ३८ धावा अशी अवस्था झाली. अनुभवी केदार जाधव (५) याच्यासह कर्णधार ऋतुराज गायकवाड (१९), अंकित बावणे (०), नौशाद शेख (०) स्वस्तात माघारी परतले. मात्र त्यानंतर नाहर-काझी यांच्या जोडीने पाचव्या गडय़ासाठी तब्बल २१४ धावांची भागीदारी रचल्यामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ९ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारली.

  • लक्ष्याचा पाठलाग करताना गेल्या सामन्यातील शतकवीर पृथ्वी शॉ (३४), यशस्वी जैस्वाल (४०), सूर्यकुमार यादव (२९) आणि शिवम दुबे (४७) यांनी मुंबईसाठी बहुमोल योगदान दिले. अय्यरने मात्र अखेपर्यंत नाबाद राहून नऊ चौकार आणि एका षटकारासह १०३ धावा फटकावल्या. त्याने चौथ्या गडय़ासाठी दुबेसह ९८ धावांची भागीदारी रचून मुंबईचा विजय सुनिश्चित केला.

हवामान बदलांत टिकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करा :
  • हवामान बदलांचे अनेक धोके असून उत्तराखंडसारख्या दुर्घटना त्यामुळेच घडत आहेत, परिणामी भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी हवामान बदलांच्या धोक्यातही टिकाव धरू शकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संशोधन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • खरगपूर आयआयटीच्या ६६ व्या पदवीदान समारंभानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना सेल्फ ३ हा मंत्र दिला. आत्मविश्वास, नि:स्वार्थीपणा व स्वजागृतता या तीन गोष्टींना महत्त्व दिले तरच नवोद्योग लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतील. सुरक्षित, किफायतशीर, पर्यावरणस्नेही ऊर्जा पर्याय शोधण्याची गरज असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारखे उपक्रम त्यासाठी पथदर्शक आहेत असे त्यांनी सांगितले. हवामान बदल हे मोठे आव्हान असून त्यामुळे अनेक दुर्घटना होत आहेत.

  • पायाभूत सुविधाच नष्ट झाल्याचे उदाहरण आपण उत्तराखंड दुर्घटनेत पाहिले आहे त्यामुळे यापुढे अशा दुर्घटनांतही टिकाव धरू शकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन हा भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्त्वाचा विषय बनल्याचे त्यांनी सांगितले.

  • ते म्हणाले की, उत्तराखंडमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिलेच, त्यामुळे अशा आपत्तीतही टिकाव धरू शकणाऱ्या पायाभूत सुविधा तयार करण्याचे आव्हान तंत्रज्ञांपुढे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या २०१९ मधील दी ग्लोबल कोअ‍ॅलिशन फॉर डिझास्टर रिसायलियंट इन्फ्रास्ट्रक्चर  या संस्थेच्या स्थापनेचा उल्लेख त्यांनी केला. सीडीआरआय ही संस्था देशातील सरकार, संयुक्त राष्ट्रांच्या संस्था, बहुउद्देशीय विकास बँका, वित्त पुरवठा संस्था, खासगी क्षेत्र, ज्ञान संस्था यांना एकत्र आणून हवामान व आपत्ती जोखीम, शाश्वत विकासावर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  करोनाप्रतिबंधाच्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांनी  खरगपूर आयआयटीची प्रशंसा केली.

“राजासारखे वागू नका, जमीनीशी नातं सांगणारं नेता व्हा”, मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या वरीष्ठ नेत्यांसमोर भाषण करताना त्यांना लोकांशी नाळ अधिक घट्ट करण्याचा सल्ला दिला आहे. “एखाद्या राजासारखे होऊ नका. जमीनीशी नातं असणारा नेता व्हा,” असा सल्ला मोदींनी नेत्यांना दिला आहे. द प्रिंटने दिेलेल्या वृ्त्तानुसार पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांना पक्ष कार्यकर्त्यांशी अहंकाराने वागू नये असा सल्ला दिलाय. या कार्यकर्त्यांनीच तुम्हाला नेता बनवलं आहे याची आठवही मोदींनी नेत्यांना करुन दिलीय. तसेच सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू असल्याचेही मोदींनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे.

  • रविवारी पंतप्रधान मोदींनी भाजपाचे नेते, राज्यातील प्रभारी, अध्यक्ष आणि सचिवांची बैठक घेतली. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी अनेक नेत्यांना आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे मत अनेक नेत्यांनी वक्त केलं.

  • पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला तोंड देताना तेथील स्थानिक भाजपा नेतृत्व संवाद साधण्यात आणि आपलं म्हणणं मांडण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत असल्याने मोदींनी हा इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ भाजपा नेत्याने दिल्ल्या माहितीनुसार पंतप्रधांनांनी या तिन्ही शेती कायद्यांचे काय फायदे होणार आहे हे नेत्यांनी जनतेपर्यंत पोहचवावं, असं आवाहन केलं आहे.

अवकाशात चीनशी ‘सामना’, भारताच्या DSA ने सुरु केलं ‘स्टार वॉर्स’ टेक्नोलॉजीवर काम :
  • संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. दिवसेंदिवस डिफेन्स टेक्नोलॉजी अत्याधुनिक बनत चालली आहे. भविष्यात पारंपारिक युद्धाचे स्वरुप बदलणार असून अवकाशातून हे युद्ध लढले जाईल. त्या दृष्टीने भारताने आता स्वत:ला समर्थ बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे.

  • दोन वर्षांपूर्वी भारताने ‘मिशन शक्ती’च्या माध्यमातून जगाला आपल्याकडे असलेल्या उपग्रह विरोधी टेक्नोलॉजीची चुणूक दाखवली. वातावरणाच्या पलीकडे अवकाशातील उपग्रह सुद्धा आम्ही पाडू शकतो, हे भारताने या चाचणीतून दाखवून दिले. त्यापुढे जात आता भारताने डिफेन्स स्पेस एजन्सी स्थापन केली आहे. अवकाशातून धोका निर्माण झाल्यास, त्याचा सामना कसा करायचा, त्यासाठी नवीन टेक्नोलॉजीचा शोध घेण्यास डिफेन्स स्पेस एजन्सीने सुरुवात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

  • शत्रूपासून अवकाशातील आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:ला समर्थ बनवणे, हे DSA चे मुख्य लक्ष्य असणार आहे. प्रामुख्याने ही संस्था त्यासाठीच काम करेल. डीएसएने स्पेस सिच्युएशनल अवरेनेस म्हणजेच SSA च्या टेक्नोलॉजीसाठी वेगवेगळया कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यात अवकाशात आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याची आगाऊ कल्पना देण्याबरोबरच शत्रुची अवकाशातील संपत्ती शोधून त्याचा माग काढण्याची टेक्नोलॉजी या SSA मध्ये असेल.

सीमावाद मागे सोडून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता :
  • पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. तणाव कमी झाला असला, तरी वाद अजून पूर्णपणे मिटलेला नाही. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

  • वेगवेगळया क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्रिक्सच्या अन्य सदस्यांसह काम करण्याची इच्छा असल्याचे चीनने म्हटले आहे. पुढच्या काही महिन्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारली, तर यावर्षात ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येऊ शकतात.

  • चीनने नेहमीच ब्रिक्स परिषदेला महत्त्व दिले आहे. या माध्यमातून सहकार्य, संबंध दृढ करण्याचा प्रयत्न राहिला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. “भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाला आमचा पाठिंबा आहे. भारत आणि अन्य देशांसोबत विविध क्षेत्रात संपर्क आणि सहकार्य बळकट करण्यासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे” असे प्रवक्ते वँग वेनबिन म्हणाले. सीमेवरील परिस्थितीचा ब्रिक्स परिषदेवर परिणाम होणार का ? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

अरब देशांच्या ‘इंधननिती’चे शिल्पकार यामानी यांचे निधन :
  • सौदी अरेबियाचे प्रदीर्घ काळ तेलमंत्री राहिलेले अहमद झाकी यामानी यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. अरब जगताने ऊर्जा साधनांवर नियंत्रण ठेवण्याच्या धोरणाचे ते १९७० मध्ये शिल्पकार ठरले होते. त्याच काळात तेलाचा पेचप्रसंग जगाने अनुभवला होता. इंधन किमती, इंधन उत्पादन हे दोन्ही घटक आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकतात हे त्यांनी दाखवून दिले होते.

  • सौदी अरेबियाच्या दूरचित्रवाणीने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले असून निधनाचे कारण समजलेले नाही. त्यांचा दफनविधी मक्केत करण्यात येणार असल्याचे समजते. पाश्चिमात्य उद्योग जगतातील लोकांप्रमाणे त्यांचा पेहराव असे.  ते अत्यंत मृदुभाषी पण कर्तव्य कठोर होते. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिग कंट्रीज म्हणजे ओपेक या संघटनेवर सौदी अरेबियाचे वर्चस्व ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. या गटात सौदी अरेबियाचे पारडेच नेहमी जड राहिले. तेलाच्या पिंपाच्या किमती या सौदी अरेबियाच्या मतावर ठरत असत.

  • जागतिक तेल उद्योग, राजकीय नेते. वरिष्ठ अधिकारी व पत्रकार यांच्यासाठी ते तेलाचे महत्त्व असलेल्या नव्या जगाचे प्रतिनिधी होते, असे तेल उद्योगावरील लेखक डॅनियल येरगिन यांनी म्हटले आहे.

संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध :
  • भारताला पूर्वीच्या काळापासून शस्त्रे व लष्करी साधने बनवण्याचा अनुभव होता. स्वातंत्र्यानंतर देशाला ही क्षमता वाढवता आली नाही. परंतु आता आम्ही संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींची योग्य अंमलबजावणी करण्याबाबतच्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. सरकारला देश संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे शस्त्रे व लष्करी सामग्री निर्मितीच्या क्षमता होत्या. जागतिक महायुद्धांमध्येही भारताने मोठय़ा प्रमाणात शस्त्रांची निर्यात केली होती, पण स्वातंत्र्यानंतर अनेक कारणांनी संरक्षण उत्पादन क्षमतेत भारत मागे पडत गेला. आपल्याला अगदी लहान शस्त्रेही परदेशांकडून विकत घेण्याची वेळ आली. भारत हा शस्त्रांचा मोठा आयातदार देश बनला, पण ही अभिमानाची बाब नाही.

  • भारतातील लोकांकडे संरक्षण उत्पादनाची क्षमता नाही असा भाग नाही, ते वाढवता येऊ शकते पण आधीच्या काळात शस्त्रांची आयात करण्यात आली. भारतात आता परिस्थिती बदलत असून संरक्षण सामग्री उत्पादन वाढवण्यास सरकार वचनबद्ध आहे.

  • निर्यात उत्तेजन, परदेशी गुंतवणूक उदारीकरण याच्या माध्यमातून सरकारने संरक्षण उत्पादन वाढीस चालना दिली आहे. संरक्षणप्रमुख पद निर्माण करून भारताने संरक्षण उत्पादन खरेदी प्रक्रियेत समन्वय साधला आहे. त्यामुळे आता नवीन संरक्षण शस्त्र सामुग्रीची निर्मिती शक्य झाली आहे.

२४ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.