प्रसिद्ध मल्याळी कवयित्री आणि कार्यकर्त्यां सुगथाकुमारी (वय ८६) यांचा करोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘सुगथा टीचर’ नावाने त्या लोकप्रिय होत्या. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. २१ डिसेंबर रोजी त्यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांना आधी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. चाचणीतून त्या करोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या औषधाला प्रतिसाद देत नव्हत्या. नंतर त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. त्यांना ‘ब्राँकिअल न्यूमोनिया’ही झाला होता. करोनापश्चात न्यूमोनियाने त्यांची प्रकृती आणखी गंभीर बनली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मल्याळम भाषेत समकालीन काळातील त्या प्रसिद्ध कवयित्री होत्या. सुगथाकुमारी या सहवेदना, मानवी संवेदनशीलता व तात्त्विक बैठक असलेल्या कविता करीत असत. महिलांना मिळणारी वाईट वागणूक व निसर्गाचा मानवाकडून सुरू असलेला ऱ्हास याविरोधात त्यांनी सहा दशके लढा दिला. पर्यावरण व निसर्ग संवर्धनाच्या मुद्दय़ावर त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले होते.
पश्चिम घाटातील सायलेंट व्हॅलीत जलविद्युत प्रकल्प उभारण्यास विरोध करणाऱ्या आंदोलनात त्या आघाडीवर होत्या. अरणमुला येथील विमानतळाविरोधातील आंदोलनातही त्या सहभागही होत्या. परित्यक्ता महिला व अत्याचारग्रस्त महिलांचा त्या आधार होत्या. त्यांनी तीन दशके ‘अभया’ ही संस्था महिलांसाठी चालवली.
कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार आहे. हे प्राणी संग्रहालय गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात येणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
रिलायन्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच सपरटणारे प्राणीही पर्यटकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील वेगेगवेळ्या भागांमधील प्राणी या संग्रहालयामध्ये असतील असं सांगण्यात आलं आहे.
हे प्राणीसंग्रहालय २८० एअर परिसरावर निर्माण केलं जाणार आहे. जामनगरमधील मोती खावेडी येथे रिलायन्सचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे. या ठिकाणापासूनच जवळच हे प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. रिलायन्सचा हा रिफायनरी प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. येथून रिलायन्स समुहाचा पेट्रोकेमिकल्समधील सर्व व्यवसाय चालतो.
ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा दिला आहे. रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. करोना आणि लॉकडाउनच्या काळात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच लिकर इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता.
कोविड काळात लॉकडाउन असताना राज्यातील परवानाधारक मद्यविक्रीची दुकानं बंद होती. त्यामुळे या बंद असलेल्या दुकानांच्या परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. जी मान्य करण्यात आली आहे. ज्यांनी आधीच परवाना शुल्काची रक्कम भरली आहे त्यांना ती पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे .
लॉकडाउनमधून सूट देत असताना म्हणजेच अनलॉकमध्ये जात असताना ठाकरे सरकारने मंदिरांच्या आधी बार सुरु केले, दारु दुकानांना संमती दिली आणि दारु परवान्यांच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे समाजातले इतरही घटकही त्रस्त झाले आहेत. वारंवार मागण्या करुनही त्यांना दिलासा मिळत नाही.
मग हे सरकार दारुवाल्यांवर मेहरबान का? का दारुवाले या सरकारमधल्या काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत? असा प्रश्न विचारत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सामान्य माणूस भरमसाठ वीज बिलात सवलत मागत होता. त्यासाठी रस्त्यावरही उतरला तरीही या सरकारने सूट दिली नाही. घरपट्टी, पाणीपट्टी असेल कशातच सामान्य माणसांना दिलासा दिला नाही. मग दारुवाल्यांनाच दिलासा का? दारुवाल्यांचं भलं करणं हाच या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आलं आहे.
एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरता ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
‘आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) करोना महामारीमुळे सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झालं आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.
‘‘२०२१मध्ये ‘आयपीएल’चे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे.
नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.