चांद्रयान ३ च्या निमित्ताने भारताने आज इतिहास घडवला आहे. चांद्रयान २ अयशस्वी झाल्यानंतर चांद्रयान ३ कडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. संपूर्ण जगभरातून इस्रोच्या या कामगिरीकडे डोळे लागले होते. अखेर ६ वाजून ३ मिनिटांनी चांद्रयान ३ चंद्रावर लँड झाले. त्यामुळे समस्त भारतीयांची मने अभिमानाने आणि आनंदाने फुलून गेली आहेत. दरम्यान, चांद्रयान ३ यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचा प्लान सांगितला आहे. चंद्रानंतर आता भारत आता थेट सूर्याचा अभ्यास करणार आहे.
“आपण आपल्या सौरमंडळाच्या सीमांचे सामर्थ्य पाहणार आहोत. मानव जातीसाठी ब्रम्हांडाच्या अनेक संभावनांना साकार करण्यासाठी काम करणार आहोत. आपण भविष्यासाठी अनेक मोठे आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरवले आहेत. लवकरच सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी इस्रो आदित्य एल वन मिशन लॉन्च करणार आहे. यानंतर, शुक्रही इस्रोच्या लक्ष्यावर आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“गगनयानच्या माध्यमातून Human Spaceflight Mission साठी पूर्ण तयारीशी सज्ज आहे. भारत आज सिद्ध करत आहे की स्काय इज नॉट दि लिमिट. विज्ञान आणि तंत्रज्ञान देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. यामुळे आजचा क्षण मी नेहमीसाठी लक्षात ठेवणार आहे. हरल्यानंतरही जिंकायचं कसं असतं याचं प्रतिक आजचा दिवस आहे, असंही मोदी म्हणाले.
आजपासून सगळी मिथकं बदलणार
“आजपासून चंद्राशी संबंधित मिथक बदलणार आहे. कथानकही बदलणार आहेत. नव्या पिढीसाठी म्हणीही बदलणार आहेत. भारतात आपण सर्वजण पृथ्वीला आई संबोधतो. चंद्राला मामा म्हणतो. पूर्वी म्हटलं जायचं की चंदा मामा खूप लाबंचे आहेत. आता एक दिवस असाही की लहान मुलं म्हणतील की चंद्रमामा दूरवर आहे”, असं ते म्हणाले.
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा अंतिम लढत: प्रज्ञानंद-कार्लसन पहिला डाव बरोबरीत
भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मंगळवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनविरुद्धचा पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला. भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंदने स्वत:च्याच वेगळय़ा शैलीच्या खेळाने आपल्यापेक्षा सरस असलेल्या अव्वल मानांकित कार्लसनला ३५ चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले.
पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञानंदने भक्कम खेळ केला. लढत बरोबरीत सोडवणे त्याला फारसे कठिण गेले नाही. पूर्ण डावात मी कधी अडचणीत आलो होते, असे वाटले नाही, अशी प्रतिक्रिया प्रज्ञानंदने दिली. पारंपरिक पद्धतीतील दुसरा डाव बुधवारी खेळला जाईल, तेव्हा कार्लसनकडे पांढरे मोहरे असल्यामुळे त्याचे पारडे जड राहिल असे जाणकारांना वाटते.
‘फिडे’च्या ‘ट्विटर’ अकाऊंडवर दिलेल्या प्रतिक्रियेत प्रज्ञानंदने एकवेळ हत्तीच्या चालीला मला काही तरी करणे अपेक्षित होते. मात्र, कार्लसनची ही चाल भक्कम असल्यामुळे मला फार काही करता आले नाही, असे सांगितले. दुसऱ्या डावाविषयी बोलताना प्रज्ञानंदने, माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले जातील. पांढरे मोहरे कार्लसनकडे असल्याने तो जोरात खेळेल यात शंका नाही. पण, आता विश्रांती घेऊन दुसऱ्या डावात पूर्ण शांतपणे उतरण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सांगितले.
कार्लसन पहिला डाव पूर्ण शारीरिक ताकदीने खेळू शकला नाही. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे कार्लसन पूर्ण क्षमतेने त्याला खेळण्यास अडथळा येत होता. ‘‘अंतिम फेरीपूर्वी मला विश्रांती मिळाली होती. पण, प्रज्ञानंदला ‘टायब्रेकर’ खेळावा लागल्याने त्याला पुरेश विश्रांती मिळाली नव्हती. मी पहिला डाव पूर्ण क्षमतेने खेळू शकलो नाही,’’ असे कार्लसन म्हणाला. ‘‘प्रज्ञानंदकडून इंग्लिश ओपिनगची अपेक्षा मी बाळगली नव्हती. त्यामुळे मला नियोजन बदलावे लागले. त्यानंतरही पहिल्या डावात अडचणींवर मात करून लढत बरोबरीत सोडवू शकलो यात मी समाधानी आहे,’’ असेही कार्लसनने सांगितले.
Mhada Exam Malpractice म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी सातारा येथून एकाला अटक केली आहे. परीक्षेदरम्यान तो साताऱ्यातील एका परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
म्हाडाच्या भरती परीक्षेत जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या गैरप्रकारात ६० जणांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून खेरवाडी पोलिसांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय या परीक्षा केंद्रावरील म्हाडा परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अमोल तानाजी पवार (२३ वर्षे) याला नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तो चौकशीसाठी न आल्याने खेरवाडी पोलिसांनी २० ऑगस्टला त्याला साताऱ्यातील चिमणगाव, कोरेगाव येथील त्याच्या घरातून अटक केली.
‘ब्रिक्स’ विस्तारासंदर्भात भारताची महत्त्वाची भूमिका; शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला तपशीलवार चर्चा
भारत, रशिया, ब्राझील, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ या संघटनेच्या विस्ताराबाबत बुधवारी महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. ‘ब्रिक्स’च्या शिखर परिषदेच्या एक दिवस आधी मंगळवारी रात्री या संघटनेच्या नवीन सदस्यांच्या निवडीबाबत सहमती निर्माण करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली.
‘लीडर्स रिट्रीट’दरम्यान ‘ब्रिक्स’च्या विस्ताराच्या मुद्दय़ावर तपशीलवार चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रप्रमुख ‘लीडर्स रिट्रीट’मध्ये सहभागी झाले होते. रशियाचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अटक वॉरंटमुळे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित नाहीत. सूत्रांनी सांगितले की, ‘ब्रिक्स’ विस्ताराबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि नवीन सदस्यांच्या निवडीमध्ये एकमत निर्माण करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिक्सच्या धोरणात्मक साथीदार-भागीदारांना समाविष्ट करण्याच्या उद्दिष्टाने प्रयत्न सुरू आहेत.
‘ब्रिक्स’ सदस्यत्वासाठी २३ देशांचे अर्ज’
भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सोमवारी सांगितले होते की विविध देश ‘ब्रिक्स’मध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत. आतापर्यंत २३ देशांनी त्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि अर्जेटिना या ‘ब्रिक्स’ सदस्यत्वासाठी प्रबळ दावेदार आहेत. ‘ब्रिक्स’मधील विस्ताराबाबत आमचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे क्वात्रा यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा
जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. उभय नेत्यांनी भारत-दक्षिण आफ्रिका संबंधांतील प्रगतीचा आढावा घेतला. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संरक्षण, कृषी, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि जनसंपर्क यासह विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीची नोंद घेत समाधान व्यक्त केले. ‘जी-२०’ शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीला येण्यास उत्सुक असल्याचे रामाफोसा यांनी सांगितले.
चंद्रावर भारताचा ‘विक्रम’!; चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला प्रथमच गवसणी; ‘इस्रो’च्या अंतराळ भरारीने अवघे जग थक्क
अठराशे किलोचे वजन आणि अब्जावधी भारतीयांच्या आशाआकांक्षांसह १४ जुलै रोजी पृथ्वीवरून झेपावलेल्या चंद्रयान-३च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण केले आणि भारताने नवा इतिहास घडवला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केलेल्या अचूक वेळेवर, सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करत असतानाचा सोहळा ‘लाइव्ह’ पाहणाऱ्या कोटय़वधी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.
चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘पाऊल’ ठेवणारा भारत पहिलाच. चार वर्षांपूर्वी याच महत्त्वकांक्षेनिशी चंद्रावर झेपावलेले ‘चंद्रयान २’ चंद्राच्या अगदी जवळ असताना कोसळले होते. मात्र, त्या अपयशातून धडा घेत नव्या जिद्दीने, अधिक ताकदीने चंद्रावर पोहोचलेले ‘चंद्रयान ३’ संभाव्य जलस्रोतासह चंद्रावरील असंख्य रहस्यांचा भेद करेल, अशी आशा आहे.
अमेरिका, चीन, रशिया या बलाढय़ देशांच्या कोटय़वधी डॉलर खर्चाच्या अनेक मोहिमांतूनही जे साध्य झालेले नाही ते अवघ्या सहाशे कोटी रुपयांत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी साध्य करून दाखवले. १४ जुलै रोजी ‘मार्क-थ्री’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने पाठवण्यात आलेल्या चंद्रयानाने ४१ दिवसांच्या प्रवासात एकदाही निर्धारित मार्गावरून न ढळता, एकही टप्पा न चुकवता चंद्राला गाठले होते. तीच अचूकता बुधवारी अवतरण मोहिमेदरम्यान दिसून आली.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हे वैज्ञानिक नाटय़ रंगले असताना संपूर्ण देश, जगभरातील शास्त्रज्ञ आणि अन्य देशांमध्ये वसलेले भारतीय नागरिक श्वास रोखून याचे थेट प्रक्षेपण बघत होते. चंद्रयान-२ याच टप्प्यावर अयशस्वी होऊन चंद्राच्या पृष्ठावर कोसळले होते. त्यामुळे यावेळी काय होणार, याची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होती. अखेर ६.०४ वाजता ‘विक्रम’चे पाय चंद्राला टेकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बंगळुरूमधील नियंत्रणकक्षात टाळय़ांचा कडकडाट झाला. इस्रोमधील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या या जल्लोषात क्षणार्धात प्रत्येक देशवासीय सहभागी झाला. ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘इस्रो’ नियंत्रणकक्षाशी जोडले गेले होते. मोहीम फत्ते होताच पंतप्रधानांनी संशोधकांचे आणि देशवासियांचे अभिनंदन करत भारताच्या संकल्पाची ही पूर्तता असल्याचे गौरवोद्गार काढले.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याप्रकरणी वायुसेनेने केली मोठी कारवाई, तीन अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा घेतला निर्णय :
मार्च महिन्यात संरक्षण दलाच्या हरियाणा येथील तळावरून ब्राह्मोस क्षेपणास्त्र थेट पाकिस्तच्या भूमीत गेले होते. या घटनेनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या घटनेची दखल घेतली होती. दरम्यान, याप्रकरणी भारतीय सरंक्षण दलाने वायुसेनेच्या तीन अधिकाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. तांत्रित बिघाड झाल्यामुळे ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमधील मिया चन्नू या भागात डागले गेले होते.
या कारवाईसंदर्भात भारतीय वायुसेनेने एक निवेदन जारी केले आहे. क्षेपणास्त्र डागण्यासाठीच्या निश्चित कार्यपद्धतीची अंमलबजावणी न केल्यामुळे ही चूक घडली होती, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे. या चुकीला एकूण तीन अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. हे तिन्ही अधिकारी ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडरच्या श्रेणीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी वायुसेनेने समितीची स्थापना केली होती. अध्यक्षपदी एअर व्हाइस मार्शल आर.के. सिन्हा हे होते. “या घटनेसाठी तीन अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. त्यांची सेवा तत्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहे,” असेदेखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये खेळणार :
लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी स्नायूंच्या दुखापतीतून सावरलेल्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
या स्पर्धेत चांगली कामगिरी करून नीरजला पुढील महिन्यात झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. नीरज सध्या चौथ्या स्थानावर आहे.
नीरजला दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. स्पर्धेच्या दोन दिवस आधी त्याने माघारीचा निर्णय घेतला. त्याला चार आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.
डायमंड लीग आयोजकांनी १७ ऑगस्ट रोजीच जाहीर केलेल्या स्पर्धकांच्या यादीत नीरजच्या नावाचा समावेश होता. फक्त, त्यावेळी आयोजकांनी त्याच्या नावापुढे तंदुरुस्तीवर नीरजचा सहभाग अवलंबून असल्याचे नमूद केले होते. नीरजनेच तंदुरुस्त असल्याचे जाहीर करून स्पर्धेतील सहभाग निश्चित केला.
क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : अखेरच्या फेरीत प्रज्ञानंदचा कार्लसनवर विजय; परंतु जेतेपदाची हुलकावणी :
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सोमवारी एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील मॅग्नस कार्लसनवर ४-२ सनसनाटी विजय मिळवला. प्रज्ञानंदने वर्षभरात तिसऱ्यांदा विश्वविजेत्या कार्लसनला हरवण्याची किमया साधली आहे.
कार्लसनला पराभूत करूनही १७ वर्षीय प्रज्ञानंदला (१५ गुण) अंतिम गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दोन अतिजलद (ब्लिट्झ) कोंडी फोडणाऱ्या (टाय-ब्रेक) सामन्यांसह एकंदर तीन लढतींमध्ये प्रज्ञानंदने विजय मिळवले. नॉर्वेच्या कार्लसनने सर्वाधिक १६ गुणांनिशी विजेतेपद मिळवले. अलिरझा फिरौझाच्या खात्यावरही १५ गुण जमा होते. परंतु प्रज्ञानंदकडून पराभव पत्करल्याने त्याला तिसरा क्रमांक मिळाला.
कार्लसन-प्रज्ञानंद लढतीमधील पहिले दोन सामने अनिर्णित ठरले. परंतु तिसऱ्या सामन्यात कार्लसनने विजय मिळवून आघाडी घेतली. नंतर प्रज्ञानंदने चौथा सामना जिंकत निकाल ‘टाय-ब्रेक’पर्यंत लांबवला. ‘टाय-ब्रेक’मध्ये प्रज्ञानंदने दोन्ही सामन्यांत कार्लसनवर धक्कादायक विजयांची नोंद केली.
प्रज्ञानंदने यंदाच्या हंगामात याआधी कार्लसनला ऑनलाइन स्पर्धामध्ये दोनदा नामोहरम केले आहे. याशिवाय बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमधील कांस्यपदक विजेत्या भारतीय ‘ब’ संघाच्या कामगिरीतही प्रज्ञानंदची भूमिका महत्त्वाची होती.
मद्यमाफियांची मालमत्ता जप्त करण्याचे आदित्यनाथ यांचे आदेश :
बेकायदा दारूविक्री तसेच अमली पदार्थाच्या विक्रीत सहभागी असलेल्या लोकांची मालमत्ता जप्त करावी आणि या आरोपींची छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी लावावीत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सांगितले आहे, अशी माहिती मंगळवारी एका अधिकाऱ्याने दिली. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचविण्यासाठी ही कारवाई केली जाणार आहे.
राज्यात बेकायदा मद्य आणि अमली पदार्थाच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आदित्यनाथ यांनी बैठक घेतली. त्या वेळी ते म्हणाले की, या बेकायदा व्यापारात गुंतलेले लोक हे देशाविरोधात गुन्हा करीत आहेत, असे मानून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने अमली पदार्थविरोधी कृती दल (एएनटीएफ) स्थापन केले आहे, असे सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कृती दलावर अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हे) पर्यवेक्षण करतील. सर्वप्रथम बाराबंकी आणि गाझीपूर जिल्ह्यांत अमली पदार्थविरोधी पोलीस ठाणी स्थापन केली जातील. या कृती दलात एनसीबी, सीबीएन, डीआरआय या यंत्रणांतील अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेतले जातील. या कृती दलाला झडती, जप्ती, अटकेचे तसेच तपासाचे अधिकार दिले जातील.
आपल्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही पोलीस ठाण्यात मद्य- अमली पदार्थ माफियाविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविल्यानंतर हे कृती दल कारवाई सुरू करू शकेल. हे दल राज्याच्या पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन परिक्षेत्रांत विभागले जाईल. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ७८५ आरोपींना अटक करण्यात आली.