चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ ऑगस्ट २०२१

Date : 24 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पायाभूत सुविधांचे परिचालन,  व्यवस्थापन खासगी क्षेत्रांकडे :
  • केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील पाच वर्षांत सहा लाख कोटी रुपये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन’ (एनएमपी)कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केला.

  • केंद्र सरकारच्या आठ मंत्रालयांच्या अखत्यारीतील रस्ते, रेल्वे, वीज आदी क्षेत्रांतील चलनीकरण होऊ घातलेले प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. चालू स्थितीत असलेल्या या पायाभूत प्रकल्पांद्वारे ‘जास्तीतजास्त मूल्यप्राप्ती’ असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सरसकट जमिनीची विक्री यातून केली जाणार नाही, अशी पुस्तीही अर्थमंत्र्यांनी खुलासेवार निवेदन करताना (पान २ वर)

  • जोडली. या सर्व मालमत्तांची मालकी सरकारकडे राहणार असून, त्या ठरावीक कालावधीसाठी खासगी क्षेत्रामार्फत चालविल्या जातील आणि पुन्हा सरकारकडे येतील, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

  • निती आयोगाने केंद्रातील पायाभूत क्षेत्रांशी संलग्न वेगवेगळ्या मंत्रालयांशी सल्लामसलत करून ‘एनएमपी’चा अहवाल तयार केला आहे. या योजनेतून उभा राहणारा निधी ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन’ (एनआयपी) या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या ४३ लाख कोटी रुपये खर्चाच्या नवीन पायाभूत सोयीसुविधा विकासाच्या कार्यक्रमासाठी १४ टक्के हातभार लावणार आहे.

SET,TET 2021: या महत्त्वाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक :
  • महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परिक्षा(SET) या दोन्ही परिक्षांच्या तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून गेले होते. त्यामुळे या दोन्ही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

  • महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET)

  • महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या परिक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत म्हणजे २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवार https://mahatet.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. ही परिक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र करोना प्रादुर्भावामुळे या तारखेत बदल होण्याची शक्यता परिक्षा परिषदेने वर्तवली आहे.

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या तारखाः

नोंदणीची अंतिम तारीख-२५ ऑगस्ट २०२१

प्रवेशपत्र मिळण्याची तारीख- २५ सप्टेंबर २०२१

परिक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ (सकाळी १०.३० ते दुपारी १.००)

परिक्षा पेपर २- १० ऑक्टोबर २०२१ (दुपारी २.०० ते संध्याकाळी ४.३०)

राज्य पात्रता परिक्षा(SET)

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेणाऱ्या येणाऱ्या राज्य पात्रता परिक्षेची(SET) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादीही विद्यापीठाने https://setexam.unipune.ac.in/Home.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. परिक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी विद्यार्थी आपले प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन थेट डाउनलोड करु शकतात. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

शैलीने विक्रम मोडल्यास अत्यानंद! ; प्रशिक्षक अंजू बॉबी जॉर्जचे मत : 
  • नाजूक, छोटय़ा चणीची आणि अव्वल तिघांमध्ये न येऊ शकणारी हीच शैली सिंग ओळख होती, जेव्हा अंजू बॉबी जॉर्जने तिला प्रथम पाहिले. परंतु तिच्यातील जिद्द वाखाणण्याजोगी होती. त्यामुळेच अंजूने तिला मार्गदर्शन करायचे ठरवले. जागतिक युवा (२० वर्षांखालील) अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत रौप्यपदक जिंकल्यानंतर अंजूचा हाच विश्वास शैलीने सार्थ ठरवला. आता माझा विक्रम मोडल्यास मला अत्यानंद होईल, अशी प्रतिक्रिया ४४ वर्षीय अंजूने व्यक्त केली.

  • शैली अंजूच्या नजरेस पडली, तेव्हा ती १३ वर्षांची होती. राष्ट्रीय स्पध्रेत तिला पाचवा क्रमांक मिळाला होता. आता ती १७ वर्षांची आहे. परंतु युवा स्पध्रेचे रौप्यपदक पटकावून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली आहे. तिने ६.५९ मीटर लांब उडी मारली. परंतु तिचे सुवर्णपदक फक्त एक सेंटिमीटरने हुकले.

  • झांशीत जन्मलेल्या शैलीला तिच्या आईने एकटीने वाढवले. तिची आई उदरनिर्वाहासाठी टेलरिंग करते. पण तिच्या वेगाने आत्मसात करण्याची वृत्ती अंजूने टिपली आणि तिला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. २००३मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत अंजूने कांस्यपदक पटकावण्याची किमया साधली होती.

अफगाणिस्तानातून माघारीचा निर्णय तर्कसंगत - बायडेन :
  • अमेरिकेच्या अफगाणिस्तान विषयक धोरणावर टीका होत असतानाच अध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘‘सैन्य माघारीचा निर्णय तर्कसंगत आणि योग्यच होता’’, असे समर्थन केले आहे.

  • तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता हस्तगत केली असून अमेरिकेचे सैन्य माघारी जाण्याच्या दोन आठवडे आधीच तालिबानने काबूलचा ताबा घेतला. सैन्य माघारीच्या निर्णयावरून विरोधी रिपब्लिकन पक्षाने बायडेन यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सैन्य माघारीची घाई केल्यानेच तालिबानने सत्ता काबीज केली असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु बायडेन यांनी सैन्य माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले असून त्यांनी रविवारी व्हाइट हाऊस येथे वार्ताहरांना सांगितले की, आपला निर्णय विवेकी आणि तर्कसंगत होता याचीच नोंद इतिहासात होईल.

  • ‘३१ ऑगस्टपर्यंत सैन्यमाघार अशक्य’ - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केली असली तरी ब्रिटन आणि युरोपीय महासंघाच्या म्हणण्यानुसार ते अशक्यप्राय आहे. अफगाणिस्तानातून एका आठवडय़ात सर्व सैन्य परत आणणे अवघड असल्याचे युरोपीय महासंघाने म्हटले आहे, तर बायडेन यांच्यावर मुदत पाळण्याबाबत दबाव आहे. रविवारी बायडेन यांनी सैन्यमाघारीचे समर्थन करताना मुदतवाढीचेही संकेत दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही लष्करातील महिला स्थायी नियुक्तीविना :
  • सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही भारतीय लष्करातील किमान २८ महिला अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत लष्करी सेवेत कायम राहण्याची संधी म्हणजेच ‘परमनंट कमिशन’ नाकारण्यात आले आहे. त्याविरोधात काही महिला अधिकारी लष्करी दलांच्या लवादाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

  • किमान २८ महिला अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन नाकारण्यात आले असून त्यातील किमान सात महिला तरी या आदेशाला आव्हान देणार आहेत. यापैकी एका महिला अधिकाऱ्याने सांगितले, की २८ अधिकाऱ्यांबाबत १५ जुलै रोजीच  यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले असून  ७७  अधिकाऱ्यांबाबतचे आदेश राखून ठेवण्यात आले आहेत.

  • महिलांना ‘परमनंट कमिशन’ मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा कायदेशीर लढा दिला असून सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा यात हस्तक्षेप केला होता.

  • ऑगस्टच्या सुरुवातीला न्यायालयाने असे म्हटले होते, की महिलांच्या परमनंट कमिशनचे आदेश रोखले गेले असतील तर त्यांनी लष्करी दलांच्या लवादाकडे दाद मागावी.

‘तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत अटळ’ :
  • देशात कोविड १९ विषाणूची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत अटळ आहे, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे, असे मत गृह मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ गटाने म्हटले आहे.

  • राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन संस्थेने नेमलेल्या समितीने म्हटले आहे की, मुलांना प्रौढांइतकीच जोखीम असून जर मोठय़ा प्रमाणात मुलांना संसर्ग झाला तर त्यांना पुरतील एवढी श्वसनयंत्रे, रुग्णवाहिका आपल्याकडे उपलब्ध नाहीत.

  • पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतात ७.६ टक्के लोकांचे लसीकरण झाले असून ही संख्या एकूण १०.४ कोटी आहे. जर सध्याचा लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर भारतात पुढील लाटेत दिवसाला सहा लाख लोकांना संसर्ग निघू शकतो. आघाडीच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, भारतात कोविड १९ विषाणूची तिसरी लाट आता अटळ आहे. कारण अजूनही समूहाची प्रतिकारशक्ती तयार झालेली नाही कारण लसीकरणाचा वेग कमी आहे.

  • एनआयडीएमच्या अहवालात कानपूर आयआटीच्या तज्ज्ञांचा  हवाला देऊन आगामी लाटेच्या तीन शक्यता दिल्या आहेत. पहिल्या शक्यतेनुसार ऑक्टोबपर्यंत लाटेचे शिखर गाठले जाईल त्यात ३.२ लाख रुग्ण दिवसाला सापडतील. दुसऱ्या शक्यतेनुसार नवीन विषाणू उत्परिवर्तन झाले तर सप्टेंबरमध्येच लाटेची शिखरावस्था होऊन दिवसाला पाच लाख रुग्ण आढळतील तर तिसऱ्या परिस्थितीत साथीची शिखरावस्था ऑक्टोबरमध्ये गाठली जाऊन दिवसाला दोन लाख रुग्ण आढळतील. या अहवालात म्हटले आहे की, लसीकरण व संसर्गातून ६७ टक्के लोकांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते.  पण आता विषाणूचे नवे उपप्रकार येत असल्याने ही परिस्थिती अवघड बनली जात आहे.

२४ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.