चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ एप्रिल २०२१

Date : 24 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा : सचिनमुळे भारताचे सुवर्णाष्टक साकार :
  • सचिनने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारीभारताचे सुवर्णाष्टक साकारले. पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला बॉक्सिंगपटूंनी सात आणि पुरुषांमध्ये सचिनने सुवर्णपदकांची कमाई केल्यामुळे स्पर्धेखेरीस भारताच्या नावावर एकूण आठ सुवर्ण जमा झाले.

  • सचिनने पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येर्बोलट सॅबीला ४-१ असे नमवले. सचिनने अंतिम लढतीतील पहिल्या फेरीत येर्बोलटने ३-२ अशी आघाडी मिळवली. परंतु त्यानंतरच्या फेरीत सचिनने पुनरागमन केले. अखेरची फेरी संपण्यासाठी काही सेकंद शिल्लक असतानाच येर्बोलटच्या चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे पंचांनी सचिनला विजयी घोषित केले. २०१६नंतर प्रथमच एखाद्या भारतीय पुरुष बॉक्सिंगपटूने या स्पर्धेत जेतेपद मिळवले.

  • गुरुवारी गितिका, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, विन्का, अरुंधती चौधरी, सानामचा चानू आणि अल्फिया पठाण यांनी महिलांच्या विविध गटांत सात सुवर्णपदकांवर नाव कोरले. त्यापूर्वी, पुरुषांच्या अन्य गटांतील उपांत्य फेरीत अंकित नरवाल (६४ किलो), विश्वमिता चोंगथोम (४९ किलो) आणि विशाल गुप्ता (९१ किलो) यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

दीपिका,अतानू उपांत्य फेरीत भारताच्या पाच पदकांची निश्चिती :
  • वेगवान माऱ्याशी सामना करीत अतानू दास आणि दीपिका कुमारी या भारताच्या आघाडीच्या दाम्पत्याने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वैयक्तिक रीकव्र्ह विभागात उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघांसह भारताने पाच पदकांची निश्चिती केली आहे.

  • जवळपास दोन वर्षांच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अतानू आणि दीपिका यांनी गतवर्षी विवाह केला. मिश्र दुहेरीत या जोडीने कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली आहे.

  • लॉस आर्कस क्रीडा संकुलातील वेगवान वाऱ्यांचे आव्हान पेलत तिसऱ्या मानांकित दीपिकाने जर्मनीच्या मिशेले क्रॉप्पेनचा सरळ सेटमध्ये पराभव केला. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव तिरंदाज दीपिकाने २०१२च्या अंताल्या (टर्की) आणि २०१८च्या सॉल्ट लेक सिटी (अमेरिका) येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धांचा दुसरा टप्पा गाठला होता. याशिवाय विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात तीनदा पदकांची कमाई केली आहे.

  • अतानूने उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या ईरिक पीटर्सचा ६-४ असा पराभव केला. त्यानंतर द्वितीय मानांकित दीपिका-अतानू जोडीने स्पेनच्या जाडीला नमवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत अलेजांड्राकडून पराभव पत्करल्याने अंकिता भकटचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष आणि महिला सांघिक गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठून भारतीय संघाने पदकांच्या आशा कायम राखल्या आहेत.

“राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा” :
  • नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज(शुक्रवार) जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलीस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टँकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

  • राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिविरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

  • यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्वीन मुदगल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमारे (रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी) उपस्थित होते.

तुर्कीतील क्रिप्टोकरन्सी दिवाळखोरीत!; थोडेक्स कंपनीचा संस्थापक देश सोडून फरार :
  • तुर्कीत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज म्हणून प्रसिद्ध असलेल्या थोडेक्स कंपनीचा संस्थापक देश सोडून पळून गेल्यानं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. बिटकॉईनमधील घसरणीमुळे गेल्या आठवड्यात तुर्कीच्या केंद्रीय बँकेनं देशात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून खरेदीला बंदी घातली होती. या निर्णयानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतर पोलिसांनी इस्तंबूलमधील थोडेक्स कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला.

  • मात्र २७ वर्षीय संस्थापक फारुख फातिह ओझर हा देश सोडून फरार झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे गुंतवणूदारांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. सरकारने कंपनीची सर्व बँक खाती सील केली आहेत.

  • तुर्कीच्या स्थानिक वृत्तपत्र असलेल्या हेबरटर्कच्या बातमीनुसार २ बिलियन डॉलर्सचं नुकसान झाल्याचं दिसतंय. तर पीडितांचे वकीलांनी ३, ९०,००० गुंतवणूकदारांचे पैसे बुडल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या वेबसाईटनं ३० हजार गुंतवणूकदारांना फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे यात किती गुंतणूकदारांनी गुंतवणूक केली होती आणि त्याचा काय परिणाम झाला आहे, याबाबत अजूनही संभ्रम आहे.

करोनामुळे देशात दररोज ५,००० मृत्यू होणार?; वॉशिंग्टन विद्यापीठाचा इशारा :
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पहिल्या लाटेपेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत असून, वाढत्या मृत्यूची संख्येनं काळजी भर टाकली आहे. देशात मागील काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे, असं असतानाच अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने काळजाचा ठोका चुकवणारा इशारा दिला आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • करोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनमुळे भारतात करोना संसर्गचा वेग प्रचंड वाढला आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, वाढत्या रुग्णसंख्येपाठोपाठ आता मृत्यूंचा आकडाही वाढू लागला आहे. देशात मागील काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक करोना मृत्यूची नोंद होत आहे. त्यात आता वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.

  • इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून, अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. करोनाच्या आपत्तीमुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल, असा इशारा इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासाच्या आधारे दिला आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे.

२४ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.