चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ सप्टेंबर २०२०

Date : 23 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दुरुस्त्या मान्य होत नाहीत तोवर बहिष्कार :
  • वादग्रस्त शेती विधेयकांवरून संसदेत सलग तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली. नव्या शेती कायद्यांमध्ये प्रमुख तीन दुरुस्त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार जाहीर करत काँग्रेसने केंद्र सरकारवरील दबाव आणखी वाढवला.

  • सत्ताधारी भाजपनेही नरमाई दाखवत, निलंबित सदस्यांनी खेद व्यक्त केला तर कारवाई मागे घेण्याचा विचार केला जाईल. त्यांना अधिवेशनाच्या कामकाजापासून वंचित ठेवावे असे आम्हालाही  वाटत नाही, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत सांगितले. सदस्यांनी माफी मागितल्यास निलंबन मागे घेतले जाऊ शकेल, असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी संसदेच्या बाहेर पत्रकारांना सांगितले.

  • केंद्र सरकारने नवे विधेयक आणावे, त्यात खासगी कंपन्यांनी वा व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतीमाल खरेदी न करण्याचे बंधन घालावे, स्वामिनाथन आयोगाने सुचवलेले हमीभावाचे (सी-२) सूत्र हमीभावासाठी निश्चित करावे आणि अन्न महामंडळासारख्या सरकारी कंपन्यांनी हमीभावापेक्षा कमी किमतीत पिकांची खरेदी करू नये, या तीन मागण्यांचा समावेश नव्या विधेयकात करावा, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत मंगळवारी स्पष्ट केले. या मागण्या मान्य केल्याशिवाय काँग्रेस अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार नाही असे सांगत आझाद यांनी सभात्याग केला.

सुधारणांअभावी संयुक्त राष्ट्रांपुढे विश्वसनीयतेचा पेच - मोदी :
  • सध्या संयुक्त राष्ट्रात सर्वंकष सुधारणांच्या अभावी विश्वासाच्या अभावाचा पेच निर्माण झालेला आहे. आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात सुधारणावादी बहुराष्ट्रवादामुळे अनेक सदस्य देशांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. त्यातून अनेक समकालीन आव्हानांना तोंड देत मानव कल्याण साधता येईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

  • पंतप्रधान मोदी यांनी सुधारणावादी बहुराष्ट्रवादाचे आवाहन केले असून भारताची अलीकडे सुरक्षा मंडळाचा अस्थायी सदस्य देश म्हणून निवड झाल्याने त्यांच्या या आवाहनास विशेष अर्थ आहे. १ जानेवारी २०२१  पासून भारत संयुक्त राष्ट्रांचा अस्थायी सदस्य म्हणून काम करणार आहे.

  • संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी सांगितले,की आजच्या आव्हानांना आपण जुनाट व्यवस्थांच्या मदतीने तोंड देऊ शकत नाही. त्यासाठी सर्वंकष सुधारणा गरजेच्या आहेत. संयुक्त राष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने आमसभेच्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या निमित्ताने एक राजकीय जाहीरनामा मान्य करण्यात आला. त्यात दहशतवादाचा मुकाबला, सुधारित बहुराष्ट्रवाद, सर्वंकष विकास, कोविड १९ सारख्या साथींचा प्रतिबंध या मुद्दय़ांवर भर देण्यात आला.

  • संयुक्त राष्ट्रांची स्थापना १९४५ मध्ये झाली, आता २१ व्या शतकात ही संघटना समकालीन वास्तव व आव्हानांना तोंड देण्यास असमर्थ आहे . त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेत सुधारणा करण्यात याव्यात असे भारताने नेहमीच म्हटले आहे.

आयएनएस विराट अलंगमध्ये दाखल :
  • जगात सर्वात जास्त सेवा केलेल्या आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवासही संपला असून ती मुंबईहून गुजरातमधील अलंग येथे पोहोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

  • ही युद्धनौका शनिवारी मुंबईहून निघाली होती, ती सोमवारी सायंकाळी भावनगर जिल्ह्य़ातील अलंग येथे पोहोचली. जहाज तोडणी कार्यशाळेत तिचे भाग वेगळे करून ते भंगारात विकले जाणार आहेत. भारतीय नौदलात १९८७ मध्ये सामील करण्यात आलेली ही युद्धनौका श्रीराम ग्रुपकडून यावर्षी जुलैत ३८.५४ कोटी रुपयांना घेण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाज तोडणीचे नियम वापरुनच तिचे सर्व भाग वेगळे केले जातील.

  • श्रीराम ग्रुपचे मुकेश पटेल यांनी सांगितले,की सर्व औपचारिकता पूर्ण  झाल्यानंतर हवामान अनुकूल असेल तर आम्ही ही युद्धनौका किनाऱ्यावर आणू. २८ सप्टेंबरला भरतीच्या वेळी दुपारी १ वाजता हा प्रयत्न केला जाईल. आयएनएस विराट ही जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका असून ती सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती.

  • २९ वर्षे ती नौदलाच्या सेवेत होती व मार्च २०१७ मध्ये ती सेवेतून बाद करण्यात आली. या युद्धनौकेवर सागरी संग्रहालय करण्याचा प्रस्ताव होता, पण जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्यानेच ही युद्धनौका मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते. २०१४ मध्ये मोडीत काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतनंतरची ही दुसरी युद्धनौका आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाकडून १४ भारतीय भाषांत जाहिराती :
  • अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने १४ भारतीय  भाषांत प्रचाराच्या जाहिराती डिजिटल पद्धतीने केल्या आहेत. ३ नोव्हेंबरला ही  निवडणूक होत असून त्यात जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे, तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत.

  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या या जाहिराती ग्राफिक म्हणजे आरेखन स्वरूपातील आहेत. आशियन अमेरिकन पॅसिफिक आयलंड लिडरशीप कौन्सिल व नॅशनल फायनान्स  समिती सदस्य अजय जैन भुटोरिया यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही आमच्या मतदारांपर्यंत पोहोचणार असून दक्षिण आशियायी अमेरिकी लोकांना मतदानाबाबत माहिती देणार आहोत. बायडेन-हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • चलो चलो बायडेन को व्होट दो अशा आशयाची संगीतमय चित्रफीत मोठय़ा प्रमाणात प्रसारित होत असून ती लोकप्रिय ठरली आहे. जागो अमेरिका जागो, भुल ना जाना बायडेन-हॅरिस को व्होट देना.. ही याच मालिकेतील दुसरी जाहिरात आहे. एकूण १४ भारतीय भाषात या जाहिराती करण्यात आल्या आहेत. लोकसंगीत, अन्न, भाषा व संस्कृती या घटकांनी बांधले जातात असे त्यांचे म्हणणे आहे.

  • भुटोरिया यांनी सांगितले की, भारतीय अमेरिकी समुदायात बायडेन यांना निवडून देण्यासाठी मोठा उत्साह असून कमला हॅरिस या पुढील उपाध्यक्ष होतील अशी आशा आहे. कॅलिफोर्निया येथील भुटोरिया यांनी १४ भारतीय भाषांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम सुरू केला होता. ‘ अमेरिका का नेता कैसा हो बायडेन जैसा हो.. ही जाहिरातही १४ भाषातून आरेखनासह फिरत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे की, भारतीय अमेरिकी व दक्षिण आशियायी लोकांनी मतदानासाठी बाहेर यावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. डिजिटल आरेखनांना दक्षिण आशियायी मतदारांनी पसंती दिली आहे.

चर्चेच्या सहाव्या फेरीअंतीही गुंतागुंत कायम :
  • लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करून तातडीने सैन्य मागे घेण्याबाबतचा करार भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी करण्यात आला असला तरी भारत आणि चीन लष्कराच्या कमांडर पातळीवर सोमवारी १२ तास चर्चा होऊनही विशेष फलनिष्पत्ती झाली नाही, मात्र पुन्हा एकदा चर्चा करण्याबाबत दोघांमध्ये मतैक्य झाले.

  • भारत व चीन यांच्या दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्व लडाख भागात गेले चार महिने असलेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशात सोमवारी कमांडर पातळीवर दीर्घ काळ चर्चा सुरू  होती. पूर्व लडाखमधील अति उंचीवरच्या भागातील संघर्ष क्षेत्रात तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असताना सोमवारी झालेल्या या चर्चेच्या वेळी वाटाघाटी पुढे नेण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.

  • चीनच्या सैन्याने ताबडतोब माघार घ्यावी असा आग्रह भारतीय शिष्टमंडळाने या वेळी धरला. सैन्य माघारीसाठी चीनने पहिल्यांदा सुरुवात करावी असे भारताचे म्हणणे आहे. तर पांगाँग त्सो आणि चुशूल उपविभागातून प्रथम भारतीय सैन्याने माघार घ्यावी, असे चीनचे म्हणणे आहे.

  • भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर व त्यांचे समपदस्थ वँग यी यांच्यात दहा सप्टेंबरला शांघाय सहकार्य  संस्थेच्या बैठकी निमित्ताने मॉस्को येथे जी चर्चा झाली होती त्यात सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी करार करण्यात आला होता. सध्या सहाव्या फेरीची चर्चा सोमवारी झाली. त्यात विशिष्ट कालमर्यादेत पाच कलमी कराराचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखमधील चीनच्या बाजूला असलेल्या मोल्दो येथे  ही चर्चा  सोमवारी सकाळी नऊ वाजता  सुरू झाली, ती रात्री अकरा वाजता संपली.

इटालियन खुली टेनिस स्पर्धा - जोकोव्हिचला पाचवे विजेतेपद :
  • सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने अंतिम फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला ७-५, ६-३ असे पराभूत केले. हे विजेतेपद पटकावत पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे जोकोव्हिचने सिद्ध केले.

  • नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला रागाच्या भरात अनवधानाने पंचाच्या घशावर चेंडू आदळवल्यामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यात भर म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यात रागाच्या भरात रॅकेट जमिनीवर आदळवल्यामुळे जोकोव्हिचला पंचांकडून ताकीद देण्यात आली. मात्र या सर्व प्रकारानंतरही जोकोव्हिचला लाल मातीवरील इटालियन स्पर्धा जिंकता आली. मात्र अंतिम फेरीतही पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच ०-३ पिछाडीवर होता. या पिछाडीनंतरही जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला.

  • दुसरा सेटही सहज जिंकत जोकोव्हिचने पाऊस सुरू होण्याच्या आतमध्ये विजेतेपदावर नाव कोरले. त्यातच श्वार्ट्झमन ही ‘एटीपी’ १००० प्रकारातील पहिलीच अंतिम लढत खेळत होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा अव्वल राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

२३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.